Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इस्रायलसाठी 10 हजार कामगारांची भरती करणार हरियाणा सरकार, जाणून घ्या पगार

इस्रायलसाठी 10 हजार कामगारांची भरती करणार हरियाणा सरकार  जाणून घ्या पगार
Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2023 (09:47 IST)
इस्रायलमध्ये नोकरी करण्यासाठी हरियाणा सरकारनं दहा हजार जणांसाठी भरती काढली आहे.
राज्य सरकारची कंपनी ‘हरियाणा कौशल रोजगार निगम’ पहिल्यांदाच अशाप्रकारे लोकांना विदेशात काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.
 
कंपनीनं त्यांच्या वेबसाईटवर दुबईत सेक्युरिटी गार्ड, युकेमध्ये स्टाफ नर्स आणि इस्रायलसाठी कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.
 
या तीन देशांमध्ये इस्रायल सर्वांत खास आहे. त्याचं कारण म्हणजे याठिकाणी 'हरियाणा कौशल रोजगार निगम' नं 10 हजार नोकऱ्या काढल्या आहेत. तर इतर देशांसाठी फक्त 170 जणांची भरती केली जाईल.
 
इस्रायलमध्ये नोकरी करण्यासाठी कंपनीनं कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये चार वेगवेगळ्या पदांसाठी व्हॅकेन्सी काढली आहे.
 
7 ऑक्टोबरला इस्रायलनं हमासवर हल्ला केला होता. त्यानंतर गाझा इस्रायलच्या निशाण्यावर आहे. हमासतर्फे चालवल्या जाणाऱ्या गाझाच्या प्रशासनातील आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या युद्धात 18,800 जणांचा मृत्यू झाला आहे. पण हे युद्ध कधी थांबणार हे मात्र कोणालाही माहिती नाही.
 
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या सुरुवातीलाच इस्रायलनं त्यांच्याकडं काम करणाऱ्या पॅलिस्टिनींचं वर्क परमिट रद्द केलं होतं. त्यामुळं त्यांच्यासमोर मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला.
 
अंदाजानुसार इस्रायलला जवळपास एक लाख कामगारांची गरज आहे. ती भरुन काढण्यासाठी ते भारताकडं पाहत आहेत.
 
हीच गरज पूर्ण करण्यासाठी हरियाणा कौशल रोजगार निगम, बांधकाम क्षेत्रातील सेक्टर अनुभवी लोकांकडून अर्ज मागवत आहे. पण याठिकाणी काही महत्त्वाच्या अटीदेखील आहेत.
कॉन्ट्रॅक्ट किती काळाचा असेल? राहण्याची व्यवस्था कशी असेल? वैद्यकीय विमा मिळणार का? हरियाणा बाहेरील व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज करू शकतो का? असा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं गरजेचं आहे.
 
या नोकरीत किती पैसा मिळणार? यावर बोलण्याआधी इस्रायलमध्ये जाऊन काय काम करावं लागेल? जाणून घेऊया.
 
काय काम करावं लागेल?
हरियाणा कौशल रोजगार निगमच्या माहितीनुसार चार प्रकारच्या नोकऱ्यांसाठी एखादी व्यक्ती अर्ज करू शकते.
 
त्यात 'फ्रेमवर्क, शटरिंग कारपेंटर', 'आयर्न बेंडिंग', 'सेरेमिक टाइल' आणि 'प्लास्टिरिंग' याचा समावेश आहे.
 
जाहिरातीनुसार 'फ्रेमवर्क, शटरिंग कारपेंटर' आणि 'आयर्न बेंडिंग' साठी 3-3 हजार, 'सेरेमिक टाइल' आणि 'प्लास्टिरिंग'चं काम करण्यासाठी 2-2 हजार लोकांची गरज आहे.
 
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडं किमान तीन वर्षांचा अनुभव आणि दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असणं गरजेचं आहे.
 
या नोकऱ्यांसाठी वयाची मर्यादा 25 ते 45 वर्ष ठेवली आहे. त्याशिवाय निवड झालेली व्यक्ती जास्तीत जास्त 5 वर्षं इस्रायलमध्ये काम करू शकते. दरवर्षी त्यांचा वर्क व्हिसा वाढवला जाईल.
 
विशेष म्हणजे जाहिरातीत या नोकऱ्यांसाठी इंग्रजीचं ज्ञान अनिवार्य करण्यात आलेलं नाही.
 
हरियाणा कौशल रोजगार निगमच्या सचिव पल्लवी संधीर यांच्याकडे कंपनीत खासगी आणि विदेशातील नोकऱ्यांची जबाबदारी आहे.
 
बीबीसीबरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की, "आम्ही प्रथमच विदेशात नोकरी करण्यासाठी लोकांकडून अर्ज मागवले आहेत. आतापर्यंत आमच्याकडे इस्रायलमध्ये काम करण्यासाठी 800, यूकेसाठी 300 आणि दुबईत सेक्युरिटी गार्डचं काम करण्यासाठी 700 अर्ज आले आहेत.
 
इस्रायलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 20 डिसेंबर आहे.
 
किती पैसे मिळणार?
हरियाणा कौशल रोजगार निगमच्या माहितीनुसार ऑफलाइन इंटरव्ह्यूच्या आधारे या नोकऱ्यांसाठी लोकांची निवड केली जाईल.
 
जाहिरातीनुसार इस्रायलमध्ये नोकरी मिळवणाऱ्या व्यक्तीला दिवसातून 9 तास आणि महिन्यात 26 दिवस काम करावं लागेल. एखाद्याला सुटी हवी असेल तर, कंपनी इस्रायलमधील कामगार कायद्यानुसार सुटी देईल.
 
नोकरी करणाऱ्या कंपनीला महिन्याला 6100 इस्रायली न्यू शेकेल म्हणजे भारतीय चलनात विचार करता जवळपास 1 लाख 38 हजार रुपये एवढा पगार मिळेल.
 
त्याशिवाय नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी वैद्यकीय विमा आणि राहण्याची व्यवस्था असेल. पण त्याचे पैसे खिशातून द्यावे लागतील.
 
जाहिरातीनुसार मेडिकल इन्श्युरन्ससाठी सुमारे 3 हजार आणि राहण्यासाठी महिन्याला सुमारे दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
पण यातली सर्वांत महत्त्वाची अट म्हणजे, दर महिन्याला मिळणारे पैसे व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होईल आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर इस्रायल सोडतानाच ही रक्कम एकरकमी व्याजदासह दिली जाईल.
 
म्हणजे इस्रायलमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दर महिन्याला पैसे मिळणार नाहीत. त्याशिवाय नोकरी करणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी लागेल.
 
फक्त हरियाणातील लोकांसाठी नोकरी
हरियाणा सरकारनं 13 ऑक्टोबर 2021 ला कंपनी कायदा 2013 अंतर्गत हरियाणा कौशल रोजगार निगमची स्थापना केली होती.
 
त्यामार्फत राज्य सरकारबरोबरच खासगी कंपन्यांनाही पारदर्शक पद्धतीनं मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जातं.
 
कंपनीच्या सचिव पल्लवी संधीर यांच्या मते, "समजा राज्य सरकार किंवा एखाद्या खासगी कंपनीला 100 कम्प्युटर ऑपरेटर्स किंवा सेक्युरिटी गार्ड यांची गरज आहे. तर त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही आमच्या पोर्टलवर ती भरती जाहीर करू."
 
त्या म्हणाल्या, "फरक एवढाच आहे की, आता मध्ये कोणी कंत्राटदार असणार नाही. इच्छुक लोक अर्ज करतात आणि पारदर्शक पद्धतीनं एक मेरीट लिस्ट तयार करून ती नावं पुढं पाठवली जातात."
 
पल्लवी संधीर म्हणाल्या की, इस्रायलमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडं हरियाणातील 'कुटुंब ओळखपत्र' असणं अनिवार्य आहे. कारण त्यानंतरच त्याला वेबसाईटवर अर्ज करता येईल.
 
"डिप्लॉयमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्चुअल पर्सन पॉलिसी अंतर्गत उमेदवारांची मेरीटनुसार यादी तयार केली जाते. त्यात वार्षिक उत्पन्न, उमेदवाराचे वय, सामाजिक-आर्थिक स्थिती, कामाचा अनुभव, आधी राज्य सरकारबरोबर काम करण्याचा अनुभव अशा मुद्द्यांचा विचार केला जातो. या प्रत्येकासाठी वेगवेगळे गुण आहेत. त्याच्या आधारावरच एखाद्याला मेरीट लिस्टमध्ये स्थान मिळवता येतं,"असंही त्या म्हणाल्या.
 
हरियाणा कौशल रोजगार निगमच्या मदतीनं राज्य सरकार बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
हरियाणातील बेरोजगारी
हरियाणामध्ये 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे नेते मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्री पदावर आहेत.
 
ऑगस्ट 2023 मध्ये विधानसभेत बेरोजगारीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार 2015 पासून 2022 दरम्यान दरवर्षी सुमारे 1.69 लाख लोकांनी नोकरीसाठी रोजगार कार्यालयात नोंदणी केली आहे.
 
त्याशिवाय भारत सरकारचं सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालय दर तीन महिन्याला लेबर फोर्स सर्वेक्षण करतं. त्यामुळं राज्यात बेरोजगारीच्या दराबाबत माहिती मिळते.
 
या सर्वेक्षणानुसार (जानेवारी-मार्च 2023) देशात बेरोजगारीचा दर 6.8 टक्के आणि हरियाणात हा दर 8.8 टक्के होता.
 
हरियाणा सरकारच्या माहितीनुसार 31 जुलै 2023 पर्यंत राज्यात 1 लाख 3 हजार 265 पदवीधर, 29 हजार 988 पदव्युत्तर आणि 21 हजार 569 व्यावसायिक पदवीधरांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे.
 
राज्य सरकार सक्षम युवा योजनेंतर्गत बेरोजगारी भत्ताही देतं. त्याअंतर्गत पदव्युत्तर उमेदवारांना 3 हजार रुपये, पदवीधरांना 1500 रुपये आणि 12वी पास असणाऱ्यांना 900 रुपये बेरोजगारी भत्ता दिला जातो.

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments