आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर एक भीषण अपघात झाला आहे. येथे प्रवाशांनी भरलेल्या दोन बोटींची टक्कर झाली. अपघातानंतर अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. ही घटना जोरहाट जिल्ह्यातील निमतीघाट येथील आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बोटींमध्ये सुमारे 100 प्रवासी होते. एक बोट माजुली सेनिमतीघाटच्या दिशेने जात होती तर दुसरी बोट विरुद्ध दिशेने जात होती. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अपघाताची पुष्टी केली आहे.
या अपघातात एक बोट आडवी झाली आहे. या अपघातात एकूण 43 जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर एक मृतदेह देखील सापडला आहे. मात्र अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध देखील सुरु आहे.
या घटनेनंतर लगेचच आसामचे मुख्यमंत्री डॉ.हिमंत बिस्वा यांनी माजुली आणि जोरहाट जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि एसडीआरएफच्या मदतीने बचाव कार्य जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. "जोरहाटमधील निमती घाटाजवळ झालेल्या दुःखद बोट अपघातामुळे मी दुखावलो आहे," असे त्यांनी ट्विट केले.
त्यांनी मंत्री बिमल बोरा यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लवकरात लवकर माजुलीला पोहोचण्यास सांगितले आहे. सरमा यांनी त्यांचे प्रधान सचिव समीर सिन्हा यांना घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री गुरुवारी माजुलीला भेट देतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.