Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इन्स्टाग्रामवर ओळख होऊन फोटोशूटसाठी गेलेल्या तरुणाची हत्या, फेसबूकच्या मदतीने असे शोधले आरोपी

Webdunia
बुधवार, 6 मार्च 2024 (11:02 IST)
26 फेब्रुवारी 2024. या दिवशी फोटोग्राफर साईकुमार आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमहून राजमुंद्रीसाठी निघाला होता. पण तो त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचलाच नाही. नंतर त्याचा एका गावातील वाळूच्या ढिगाऱ्यात थेट मृतदेहच सापडला.
 
3 मार्च रोजी आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील मूलस्थानम गावात त्याचा मृतदेह सापडला.
 
विशाखापट्टणमहून ट्रेनने निघालेल्या साईकुमारची हत्या करण्यात आली होती. पण हे सगळं समजायला एक आठवडा उजडला.
 
या आठवड्यात नेमकं काय घडलं? फोटोशूटसाठी गेलेल्या साईकुमारला कुणी मारलं? आरोपींना सोशल मीडियाच्या वापर करून कसं शोधलं? जाणून घेऊयात.
 
साईकुमार आधी बेपत्ता मग हत्या…
विशाखापट्टणम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईकुमार बेपत्ता झाला आहे, अशी आधी पालकांनी तक्रार दिली होती. पण आणखी शोध घेतल्यानंतर त्याची हत्या झाल्याचं समोर आलं.
 
23 वर्षीय साईकुमार हा विशाखापट्टणमच्या मदुरावाडा भागात राहायचा. तो व्यवसायाने फोटोग्राफर होता.
 
लग्न समारंभासाठी फोटो काढण्याचं आणि व्हीडिओ करण्याचं काम तो करायचा.
 
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो फोटोशूटची ऑर्डर घ्यायचा आणि दूरवर कामानिमित्त जायचा, असं त्याच्या पालकांनी सांगितलं.
 
मृत्यू होण्याआधी एका इव्हेंट शूटसाठी त्याला ऑनलाइन रिक्वेस्ट आली होती.
 
विशाखापट्टणमचे पोलीस उपअधीक्षक चंदू मणिकंथा यांनी बीबीसीला सांगितलं की, आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील पोथीना षण्मुख तेजा आणि विनोदकुमार हे दोन तरुण साईकुमारसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तीन महिन्यांपासून संपर्कात होते.
 
दोघेही 20 वर्षांचे आहेत. त्यांनी 16 फेब्रुवारीला साईकुमारला फोन केला आणि 27 फेब्रुवारीला रावुलापलेम येथे फोटोशूटसाठी येण्यास सांगितलं.
 
हा कार्यक्रम 10 ते 15 दिवस चालेल. त्यासाठी पुरेशी उपकरणं घेऊन येण्यास साईकुमारला सांगण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास चित्रपट शूट करण्याची संधी मिळेल, असंही साईकुमारला सांगितलं होतं.
 
26 फेब्रुवारी रोजी साईकुमारने कॅमेरा आणि उपकरणे घेतली आणि आपण रावुलापलेम येथे जात असल्याचं घरी सांगून तो ट्रेनने निघाला.
 
साईकुमार राजमुंद्री रेल्वे स्थानकावर पोहोचला. त्याठिकाणी त्याला घेण्यासाठी षण्मुखा तेजा आणि विनोद कुमार एका कारमध्ये आले. साईकुमारला रेल्वे स्थानकावरून घेऊन गेले.
 
रात्री आठच्या सुमारास राजमुंद्रीजवळ या दोन्ही तरुणा साईकुमारसोबत बिअर प्यायले. त्यानंतर तो तेथून निघून गेला. पण आरोपींनी त्याचा पाठलाग केला. तिथं त्यांनी साईकुमारच्या गळ्यात पट्टा बांधून त्याची हत्या केली. मध्यरात्रीनंतर साईकुमारचा मृतदेह मूलस्थानम गावातील वाळूच्या ढिगाऱ्यात पुरण्यात आला, असं पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
 
साईकुमारचा कॅमेरा आणि संबंधित इतर उपकरणे घेऊन ते दोघे तिथून निघून गेले.
 
आईला पाठवलेला 'तो' फोटो
26 फेब्रुवारीला विशाखापट्टणमहून निघताना साईकुमारने त्याच्या आईला सांगितलं की, माझा एक मोठा कार्यक्रम आहे आणि 10 दिवसांनी घरी परतणार आहे.
 
साईकुमारचे वडील ऑटोचालक म्हणून काम करतात. त्यांनी सांगितले की, साईकुमार कार्यक्रमांसाठी जायचा तेव्हा तो बरेच दिवस बाहेर राहत असे. एक-दोन दिवस फोनवरही उपलब्ध नसायचा.
 
पण 26 फेब्रुवारीला दुपारी घरून निघालेल्या साईकुमारने सायंकाळी 7.45 वाजता आई रामनम्मा यांना फोन केला.
 
तो म्हणाला, “आई, मी आता काही अनोळखी लोकांसोबत जातोय. त्यांचं वागणं थोडं संशयास्पद वाटतंय. माझा फोन लागला नाही तर या दोन नंबरवर फोन कर. त्या रात्री साईकुमारने फोन ठेवल्यानंतर आम्ही सर्व झोपायला गेलो. सकाळी उठल्यावर फोन ट्राय केला तर तो स्विचऑफ येत होता.
 
"साईकुमारने दिलेले दोन नंबर वापरून पाहिलं. त्यापैकी एक वाजत होता, पण तो उचलला जात नव्हता. आणखी एक नंबर स्विचऑफ आला. त्यामुळे आम्हाला संशय वाटू लागला. साईने पाठवलेले व्हॉट्सॲप मेसेज पाहिले, तर त्यात एका कारचा फोटो होता. तो फोटो आम्ही पोलिसांना दिला.
 
कारचा फोटो, कॉल रेकॉर्ड आणि आरोपींचा शोध
दोन दिवसांपासून आपल्या मुलाची वाट पाहत असलेल्या साईकुमारच्या पालकांनी 29 फेब्रुवारी रोजी मल्ल्यापालेम पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
 
पोलिसांनी साईकुमार बेपत्ता झाल्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला.
 
साईकुमारच्या फोन कॉल डेटाच्या आधारे, त्याच्याशी कोण बोलले, याचा तपशील गोळा करण्यात आला.
 
तसंच, साईकुमारने त्याच्या आईला पाठवलेल्या कारच्या क्रमांकाच्या मदतीने ही कार कोणाची आहे हे शोधून काढले.
 
फोटोशूट आहे असे फोन करणाऱ्या षण्मुख तेजाच्या नंबरवर फोन केला तर तोही बंद होता.
 
"विशाखापट्टण पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस 1 मार्च रोजी षण्मुख तेजाच्या घरी गेले. षण्मुख तेजा नव्हता. पण, साई कुमारने विशाखाहून आणलेला कॅमेरा आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं षण्मुख तेजाच्या घरात होते. यामुळे, आम्हाला त्याच्यावर संशय आला आणि आम्ही त्याचा शोध सुरू केला,” असं आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील अलामुरू पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीनिवास नाईक यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं.
 
मैत्रिणीच्या मदतीने षण्मुख तेजाचा शोध
षण्मुखा तेजा फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. साईकुमारचा नंबर आणि षण्मुख तेजाचा नंबर दोन्ही बंद झाल्याने पोलिसांनी षणमुख तेजाला पकडण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केला.
 
षण्मुख फेसबुकवर कोणाशी चॅट करत आहे, याचा तपशील पोलिसांनी गोळा केला. तो विशाखापट्टणम येथील एका तरुणीच्या संपर्कात असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी ताबडतोब मुलीशी संपर्क साधून ही बाब सांगितली आणि तिची मदत घेतली.
 
“षण्मुख तेजाने ज्या मुलीशी फेसबुकवर चॅट केले तिच्या मेसेजला रिप्लाय द्यायला सुरुवात केली. त्याद्वारे आम्ही षण्मुख तेजाचा ठावठिकाणा शोधू शकलो. आम्ही त्याला अण्णावरमजवळ शोधून काढले आणि 2 मार्चला त्याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून दुसरा आरोपी विनोदकुमार यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी केली असता षण्मुख तेजाने साईकुमारची हत्या केल्याची कबुली दिली,'' असे श्रीनिवास नाईक यांनी सांगितलं
 
साईकुमारची हत्या का झाली?
साईकुमारकडे महागडे कॅमेरे आणि उपकरणं होती. त्यांची किंमत 10 ते 12 लाख रुपये होती. ती मिळवण्यासाठी या मुलांनी साईकुमारशी ऑनलाइन संपर्क साधला.
 
“साईकुमारने इंस्टाग्रामवर आपल्या कॅमेऱ्याविषयी एक पोस्ट केली होती. त्यानंतर आरोपींनी साईकुमारशी जवळजवळ तीन महिने गप्पा मारल्या. त्यानंतर एक दिवसाचा कार्यक्रम आहे असं सांगून साईकुमारला राजमुंद्री येथे यायला सांगितले. त्यामुळे साईकुमार कॅमेरा घेऊन राजमुंद्रीला गेला,” असं डीसीपी चंदू मणिकंथा सांगतात.
राजमुंद्री येथे पोहोचल्यावर आरोपींनी पूर्वनियोजित योजनेनुसार त्याची हत्या केली आणि मृतदेह वाळूच्या ढिगाऱ्यात पुरला. पालकांनी दिलेल्या बेपत्ता तक्रारीची चौकशी केल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली. महागड्या कॅमेऱ्यासाठी हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असं डीसीपी मणिकंथा यांनी सांगितलं.
 
पोलिसांनी 3 मार्च रोजी मूलस्थानम गावातील वाळूच्या ढिगाऱ्यातून साईकुमारचा मृतदेह ताब्यात घेतला. विशाखापट्टणमच्या सरकारी वैद्यकीय पथकाने पोस्टमॉर्टम केले.
 
साईकुमारचे आई-वडील आणि नातेवाईक, जे विशाखापट्टणमहून मूलस्थानम गावात गेले होते. त्यांनी साईकुमारचा मृतदेह पाहिल्यावर अश्रू अनावर झाले. साईकुमारचा मृतदेह ओळखण्यापलीकडे गेला होता.
 
सोशल मीडियाचा वापर करुन साईकुमारची हत्या करण्यात आली. तसंच आरोपींच्या शोधासाठी पण सोशल मीडियाचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे सध्या हे प्रकरण चर्चेत आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments