Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावरुन लोकसभेत गदारोळ

Webdunia
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (13:07 IST)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन लोकसभेत मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी रांचीतल्या सभेत बोलताना देशातील बलात्कार प्रकरणांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
 
रांचीमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते, "नरेंद्र मोदी म्हणाले होते, मेक इन इंडिया, मात्र सध्या तुम्ही कुठेही पाहिल्यास 'रेप इन इंडिया' दिसतं. उत्तर प्रदेशात मोदींच्या आमदारानं महिलेवर बलात्कार केला. नंतर पीडित महिलेचा अपघात झाला. मात्र, नरेंद्र मोदींनी अवाक्षरही काढला नाही."
 
हाच धागा पकडत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपच्या इतर महिला खासदारांनी लोकसभा सभागृहात राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढवला.
 
राहुल गांधी यांनी सर्व महिलांचा अपमान केलाय आणि त्यामुळं त्यांनी माफी मागितली पाहिजे, असं म्हणत लोकसभेतील भाजपच्या सर्व महिला खासदार आपापल्या जागेवरून उठून घोषणा देत लोकसभाध्यक्षांच्या दिशेनं आल्या.
 
त्यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या, "इतिहासात हे पहिल्यांदा होतंय की, कुणी नेता म्हणतोय की, महिलांवर बलात्कार झाला पाहिजे. देशातील जनतेला राहुल गांधी हाच संदेश देऊ इच्छित आहेत का?"
 
स्मृती इराणी आणि भाजपच्या इतर महिला खासदारांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या या मुद्द्याला राहुल गांधी यांच्या रांचीतल्या सभेचा संदर्भ होता.
 
लोकसभेत गोंधळ निर्माण झाल्यानं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.
 
दुसरीकडे, राज्यसभा सभागृहातही राहुल गांधी यांच्याविरुद्ध काही खासदारांनी घोषणाबाजी केली. 'राहुल गांधी माफी मांगो' असं राज्यसभेतल्या काही खासदारांनी म्हटल्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं, "जी व्यक्ती या सभागृहाची सदस्य नाही, तिचं नाव इथं घेतलं जाऊ शकत नाही. सभागृहात गदारोळ घालण्याचा कुणालाही अधिकार नाही."

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments