महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरले आहे आणि त्यामुळे १ मेच्या औरंगाबाद सभेसाठी शर्तींचे उल्लंघन करूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला.
राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेऊन लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. त्यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर काढण्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत दिली होती. राज्य सरकारने कारवाई केली नाही, तर मशिदींसमोर मोठ्य़ा आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याचे आव्हान सरकार समोर उभे केले होते. काही ठिकाणी हनुमान चालिसा म्हटल्या गेल्या. मात्र राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे राज्य सरकार घाबरून कारवाई करत नसल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
“महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद येथील सभेसाठी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी राज ठाकरे यांनी १२ अटींचे उल्लंघन केले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत हे मला समजत नाही. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे,” असे संजय निरुपम म्हणाले.
देशात आणि महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असेही संजय निरुपम म्हणाले.