“एक जानेवारी 2024 रोजी अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार असेल,” असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरातील सबरूम इथल्या सभेत केला. हा दावा करताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली आणि राहुल गांधींना उद्देशून दावा केला. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
त्रिपुरामध्ये येत्या मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह त्रिपुरा दौऱ्यावर असताना, एका सभेत ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले, “बाबर राम मंदिर उद्ध्वस्त करून गेल्यानंतर आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं राम मंदिराचा मुद्दा लटकवत ठेवला. पण मोदी आले, कोर्टाने निकाल दिला आणि मोदींनी तातडीनं भूमीपूजन केलं.”
“2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी म्हणत असत की, मंदिर वहीं बनायेंगे, लेकीन तारीख नहीं बतायेंगे. पण राहुल गांधींनी कान देऊन ऐकावं, एक जानेवारी 2024 पर्यंत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर बनलेलं असेल,” असंही अमित शाह म्हणाले.
यावेळी अमित शाहांनी त्रिपुरावासियांना मोदींवर विश्वास कायम ठेवण्याचं आवाहन केलं.