Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2022 मधील त्या 5 घटना, ज्यांनी अख्ख्या देशाला हादरवलं...

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2023 (18:18 IST)
गुन्हेगारी विश्वात गेल्यावर्षी म्हणजे 2022 मध्ये घडलेल्या अशा पाच घटना, ज्यांनी संपूर्ण भारताला हादरवलं, त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फ्रेंच तत्वज्ञ आल्बेर काम्यू जसं म्हणतो की, गुन्हा हा केवळ गुन्हाच असतो. त्यामुळे कुठलाही गुन्हा लहान-मोठा असण्याचं कारण नाही. तो गुन्हाच असतो.
 
तरीही त्यातील क्रूरता कमी जास्त असू शकते. आम्ही या ज्या पाच घटना सांगणार आहोत, त्यातील क्रूरता भयंकर मानली गेली.
 
सुरुवात त्या घटनेनं करू, ज्या घटनेनं देशभर खळबळ उडाली.
 
1) श्रद्धा वालकर हत्या प्रकरण
मुंबईजवळील वसईची रहिवासी असलेल्या 26 वर्षीय श्रद्धा वालकरची 18 मे 2022 रोजी दिल्लीत हत्या झाली. तिचा लिव्ह-इन-पार्टनर आफताब पूनावाला यानं श्रद्धाची हत्या केल्याचा आरोप आहे.
 
12 नोव्हेंबर 2022 रोजी आफताबला अटक केल्यानंतर, जेव्हा या घटनेतली क्रौर्य समोर आलं, ते ऐकून संपूर्ण देश हादरला.
 
हत्येची ही घटना जवळपास सहा महिने समोर आली नव्हती.
आफताबवर आरोप आहे की, त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले आणि घरातील फ्रिजमध्ये ठेवले. नंतर एक एक करून दिल्लीतल्या जंगलात ते तुकडे फेकले.
 
श्रद्धाच्या हत्येसंबंधी जसजशी माहिती समोर येत गेली, तसे या घटनेमागील कटही उघडकीस येऊ लागला.
 
आफताबसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी श्रद्धा तिचं घर सोडून दिल्लीत आली होती. आफताबसोबत राहू लगाल्यानंतर श्रद्धाचा तिच्या कुटुंबाशी असलेला संबंध तुटला.
श्रद्धा आणि आफताब दिल्लीतल्या मेहरौली भागात राहत होते.
 
पोलिसांच्या तपासातील माहितीनुसार, श्रद्धानं आफताबला लग्नाची विनवणी सुरू केल्यानंतर तिची हत्या केली. नंतर तिचे तुकडे करून दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात फेकले.
 
आफताब पूनवाला सध्या तुरुंगात असून, पोलीस या हत्या प्रकरणातील पुरावे गोळा करत आहे. या हत्या प्रकरणात आफताबला दोषी ठरवून शिक्षेस पात्र करणं, हे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.
 
2) केरळ नरबळी प्रकरण
ऑक्टोबरमध्ये केरळमधील नरबळीच्या प्रकारानं देशबर खळबळ उडवून दिली.
 
केरळच्या इलाथूर तालुक्यातील एका घरातून दोन महिलांच्या शरीराचे तुकडे मिळाले.
 
पोलीस तपासात उघड झालं की, या घरात राहणाऱ्या एका दाम्पत्यानं पैसे मिळवण्याच्या हेतूने तीन महिन्यांपूर्वी दोन महिलांचा बळी दिला आणि नंतर त्यांच्या शरीराचे तुकडे घरातील अंगण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. पोलिसांनी मृतदेहाचे 61 तुकडे भगावल सिंह यांच्या घरातून जमवले.
 
या प्रकरणात पोलिसांनी भगावल सिंह, लैला आणि शफी अशा तीन व्यक्तींना अटक केली.
बेपत्ता असलेल्या पद्मा आणि रोजलिन नामक दोन महिलांचा शोध घेत असताना पोलीस भगावल सिंह यांच्या घराजवळ जाऊन पोहोचले.
 
या हत्येची माहिती पोलिसांनी माध्यमांसमोर दिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला.
 
या घटनास्थळी जाऊन बीबीसीच्या टीमने स्थानिकांशी चर्चा केली. त्यावेळी दोनहून अधिक महिलांची हत्या झाली असू शकते, अशी शक्यता स्थानिक लोकांनी व्यक्त केली. मात्र, पोलिसांना या घटनेत अद्याप पुढे काहीच सापडलं नाहीय.
 
पोलिसांनी तीन आरोपींना मात्र अटक करून तुरुंगात धाडलं आहे.
 
3) लखीमपूर खिरीमध्ये दोन दलित बहिणींची हत्या
14 सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये दोन अल्पवयीन दलित मुलींचे मृतदेह झाडाला लटकवलेल्या अवस्थेत सापडले. या मुलींवर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं.
 
आर्थिक हालाखीची स्थिती आणि सामाजिकदृष्ट्याही मागास समाजातील या मुलींच्या हत्येनं संपूर्ण देशभरात खळबळ उडवली.
 
पोलिसांनी 48 तासांच्या आत सहा आरोपींना अटक केली होती. सुहैल, करीमउद्दीन, आरिफ, जुनैद, हिफजर्रहमान अशी या आरोपींची नावं असून, हे सहाही जण आजूबाजूच्या गावांमधीलच राहणारी आहेत. तर छोटू गौतम हा आरोपी पीडित मुलींच्या गावातीलच आहे.
पोलिसांच्या दाव्यानुसार, तीन आरोपींनी पीडित मुलींना घरी बोलावलं होतं. नंतर गावातील शेतात नेऊन तिथेच त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. नंतर हत्या करून त्यांचे मृतदेह शेतातल्या झाडावर लटकवण्यात आलं.
 
पोलिसांनी आरोपी जुनैदला कथित चकमकीनंतर अटक केल्याचा दावा केला होता.
 
दलित मुलींवर बलात्कार, त्यांची हत्या आणि नंतर मृतदेह झाडावर लटकवणं, या प्रकरणानं उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते.
 
आरोपी मुस्लीम समाजातील असल्यानं धार्मिक तणावही निर्माण झाला होता.
 
या प्रकरणातील सर्व आरोपी आता तुरुंगात असून, उत्तर प्रदेश सरकारनं पीडित कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
 
4) अंकिता भंडारी हत्या प्रकरण
उत्तराखंडच्या श्रीनगरजवळील डोभ श्रीकोट नामक छोट्या गावात राहणाऱ्या 19 वर्षीय अंकिता भंडारीचा मृतदेह ऋषिकेशमधील चिल्ला नहरमध्ये 24 सप्टेंबरला मिळाला होता. 6 दिवसांपूर्वीच अंकिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
 
अंकिता भंडारीने ऋषिकेशच्या वनंतरा रिसॉर्टमध्ये एक सप्टेंबरला नोकरी सुरू केली होती. केवळ 20 दिवसांमध्येच अंकिताची हत्या झाली.
 
अंकिताच्या हत्येच्या आरोपात रिसॉर्टचे मालक पुलकित आर्या आणि इतर दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.
 
अंकिता गरीब कुटुंबातील होती. तसंच, पुढे शिकण्यासाठी आर्थिक आधार मिळावा म्हणून तिने रिसॉर्टमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
 
माध्यमांमधील वृत्तांनुसार, अंकितावर अनैतिक काम करण्यासाठी आणि पाहुण्यांना विशेष सेवा देण्यासाठी दबाव आणण्यात आला होता.
 
अंकिताचे तिच्या मित्रासोबतचे काही चॅटही समोर आले होते, ज्यात या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता.
 
प्रशासनानं पुलकित आर्याच्या रिसॉर्टवर बुलडोझर चालवलं होतं. हत्येच्या तीन महिन्यानंतर पोलिसांनी स्वीकारलं की, रिसॉर्टमधून कुठलेच फॉरेन्सिक पुरावे सापडले नाहीत.
 
रिसॉर्टवर बुलडोझर चालवल्यानंतर असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला की, हे सर्व पुरावे मिटवण्यासाठी तर केले नाही?
 
अंकितावर कुठल्या विशेष पाहुण्यांना सेवा देण्यासाठी दबाव होता, हेही अद्याप समोर आलं नाहीय.
 
या प्रकरणातील आरोपी पुलकित आर्याचे वडील विनोद आर्या हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत आणि माजी मंत्री आहेत. हत्या प्रकरणानंतर विनोद आर्या यांना भाजपमधून काढून टाकण्यात आलं होतं.
 
सध्या मुख्य आरोपी पुलकित आर्या आणि इतर दोन आरोपींना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. उत्तराखंड पोलिसांची एसआयटी या हत्या प्रकरणाची चौकशी करत आहे.
 
5) उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांची हत्या
28 जूनला राजस्थानच्या उदयपूरमधून एक दहशत पसरवणारा व्हीडिओ समोर आला होता. आपल्या दुकानात काम करणाऱ्या कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा व्हीडिओ तयार करण्यात आला. हा व्हीडिओ पाहावलाही जाऊ नये, इतका भयंकर होता.
 
या हत्येचा व्हीडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, जेणेकरून लोकांमध्ये दहशत पसरावी.
 
ही हत्या अशा पार्श्वभूमीवर झाली, जेव्हा पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी भाजपच्या नेत्या नुपूर शर्मांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
 
हत्या करणारे गौस मोहम्मद आणि रियाज मोहम्मद अत्तारी या आरोपींनी दावा केला होता की, पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्याचीही ही प्रतिक्रिया आहे.
पोलिसांनी सुरुवातीला गौस मोहम्मद, रियाज अत्तारी आणि मोहम्मद शेख यांना अटक केलं होतं.
 
उदयपूरच्या धानमंडी पोलीस ठाण्यात दाखल कऱण्यात आलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणे (NIA) कडे सोपवण्यात आली.
 
या प्रकरणात एनआयएने 11 जणांना आरोपी बनवलं आणि त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.
 
एनआयएने आरोपपत्रात म्हटलं की, आरोपींनी दहशत पसरवण्यासाठी व्हीडिओ शेअर केला होता.
 
‘दहशतवादी गँग मॉड्युल’सारखे हे आरोपी काम करत आहेत आणि बदल्याच्या भावनेतून कट रचला होता, असंही एनआयएने आरोपपत्रात म्हटलं होतं.
 
या घटनेच्या चार महिन्यानंतर बीबीसीशी बोलताना कन्हैयालाल यांच्या मुलाने म्हटलं की, “हा व्हीडिओ इतका भयंकर आहे की, माझ्या आईला तो मी अद्याप पाहू दिला नाहीय. माझ्या घरातील टीव्ही बंद केलाय. आमचं कुटुंब अजूनही या दहशतीतून बाहेर पडू शकलं नाहीय.”
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments