Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अण्णा द्रमुकच्या एनडीएमधल्या एक्झिटमुळे भाजपला दक्षिणेची दारं बंद होणार का?

anna dramuk
, बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (20:01 IST)
तामिळनाडूतल्या अण्णा द्रमुक पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत त्यांची असणारी युती तोडण्याचा निर्णय सोमवारी (25 सप्टेंबर) घोषित केला आहे.
 
मागच्या दोन वर्षांपासून भाजप आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाला या फुटीच्या निमित्ताने विराम मिळालाय.
 
केवळ तामिळनाडूमध्येच नाही तर राष्ट्रीय पातळीवर भाजपशी असणारे संबंध तोडण्याची घोषणा 25 सप्टेंबरला अण्णा द्रमुक पक्षाकडून करण्यात आलेली आहे.
 
आता भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अण्णा द्रमुक हा पक्ष या निवडणुकीमध्ये तरी दिसणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अण्णा द्रमुकने घेतलेल्या या निर्णयानंतर भाजपवर टीका केली असून याबाबत बोलताना ते म्हणाले की, "2014 नंतर अनेक पक्षांनी रालोआला सोडचिठ्ठी दिलेली आहे.
 
नरेंद्र मोदींना सहकारी पक्षाची कधीच गरज नसते. त्यांना प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवायची असते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए विरुद्ध इंडिया असा थेट सामना होणार आहे."
 
"इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून भाजप अस्वस्थ झालाय आणि आता अण्णा द्रमुकने देखील भाजपची साथ सोडलेली आहे. हे 2024 च्या निवडणुकीचं प्रतिबिंब आहे," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
 
लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अण्णा द्रमुक पक्षाने हा निर्णय का घेतला आहे? अण्णा द्रमुकचे नेते एडाप्पाडी के. पलानीसामी यांचं राजकीय भवितव्य नेमकं काय आहे?
 
शिवसेनेतून जसा एकनाथ शिंदेंचा उदय झाला अगदी त्याचप्रमाणे अण्णा द्रमुकपक्षातूनही एखादा नेता वेगळी भूमिका घेऊन बाहेर पडू शकतो का? युती तोडून गेलेल्या पक्षांनाच फोडण्याची रणनीती वापरणारा भारतीय जनता पक्ष आता अण्णा द्रमुकच्या बाबतीत नेमकं काय करतो?
 
अण्णा द्रमुकने घेतलेल्या या निर्णयाचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या द्रमुक पक्षाला कसा फटका बसू शकतो? हेच शोधण्याचा हा प्रयत्न.
 
अण्णा द्रमुक आणि भाजप यांच्या युतीची सुरुवात कशी झाली?
तामिळनाडूच्या मतदारांना भाजपची ओळख करून देण्याचं काम करणारा पक्ष म्हणजे अण्णा द्रमुक असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
 
1998 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुकने देशाचे भावी पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा चेहरा घरोघरी पोहोचवण्यात मदत केलेली होती. याच निवडणुकीसाठी पहिल्यांदा हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले होते.
 
मात्र एकाच वर्षात या दोन्ही पक्षांचं बिनसलं आणि वाजपेयी सरकार 13 महिन्यातच कोसळलं होतं.
 
2004 लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि तामिळनाडूमध्ये या युतीचा मतदारांनी दारुण पराभव केला.
 
त्यानंतर पक्षाच्या तत्कालीन सरचिटणीस जयललिता यांनी यापुढे भाजपसोबत कधीही युती करणार नसल्याची घोषणा केली होती. जयललितांच्या मृत्यूपर्यंत अण्णा द्रमुक पक्षाने विधानसभा असो की लोकसभा कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती केली नाही.
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयललितांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकने तामिळनाडूमध्ये दणदणीत विजय मिळवला होता.
 
जयललितांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकत्र
2016 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये जयललितांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकने विजय मिळवला, त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र त्यानंतर काही महिन्यांमध्ये त्या आजारी पडल्या.
 
दोन ते अडीच महिन्यांसाठी त्या दवाखान्यात दाखल असताना भाजपने उर्वरित अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क केल्याच्या चर्चा त्यावेळी सुरु झाल्या होत्या.
 
जयललिता यांच्यानंतर अण्णा द्रमुक पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावरून ओ. पनीरसेल्वम, एडाप्पाडी पलानीसामी, शशिकला यांसारख्या नेत्यांना भाजपने छुप्या पद्धतीने समर्थन देऊन एकमेकांसमोर उभं केल्याचं बोललं जात होतं.
 
अण्णा द्रमुकच्या अंतर्गत वादात भाजप अप्रत्यक्षणे सहभागी असल्याच्या बातम्याही त्याकाळी प्रकाशित झालेल्या होत्या. ओ. पन्नीरसेल्वम आणि के.पी. मुनुसामी बाहेरून हस्तक्षेप होत असल्याचे आरोप केले होते.
 
2019 लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजप आणि अण्णा द्रमुक हे पक्ष एकत्र आले. त्यानंतर 2021 विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्र लढले.
 
या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर मात्र या दोन्ही पक्षांमध्ये अनेक बदल झाले ज्याचा परिणाम मागच्या दोन वर्षात दिसू लागला होता.
 
पलानीसामी आणि अन्नामलाई यांच्या संबंधात तणाव
2021 विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. दुसरीकडे अण्णा द्रमुकमध्ये पलानीसामी यांनीही ओ. पनीरसेल्वम यांना बाजूला करत पक्षावर एकहाती पकड मिळवली.
 
यानंतरच या दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. NIअण्णा द्रमुकला बाजूला करून भाजप विरुद्ध डीएमके असा थेट संघर्ष सुरु करण्यात आला.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनीही आता आम्ही थेट द्रमुकविरोधात लढणार असल्याचा उल्ल्लेख वेळोवेळी केला आणि यातूनच अण्णा द्रमुक पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अन्नामलाई यांच्या वक्तव्यांमुळे अण्णा द्रमुक पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरू लागली.
 
त्यानंतर अन्नामलाई यांनी जयललिता आणि अण्णा द्रमुक पक्षाचे संस्थापक एमजीआर यांचे राजकीय गुरु अण्णादुराई टीका केल्याने अण्णा द्रमुक पक्ष नाराज झालेला होता.
 
माजी मंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाचे नेते डी. जयकुमार यांनी अन्नामलाई यांनी केलेली ही विधानं सहन केली जाणार नसल्याचं सांगितलं होतं.
 
अण्णा द्रमुक-भाजप युती आता पुन्हा एकदा तुटली आहे
मागच्या आठवड्यात डी. जयकुमार यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये ही युती तोडल्याची घोषणा केली होती आणि आता याच घोषणेला काल पक्षाकडून दुजोरा देण्यात आला आहे.
 
फक्त तामिळनाडूमध्येच भाजपसोबत युती तोडल्याची ही घोषणा नसून अण्णा द्रमुकने आता ते अधिकृतरीत्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं आहे.
 
अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांकडून या घोषणेनंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
 
भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी मात्र याबाबत मौन पाळलं असून प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी केवळ एका वाक्यातच याबाबत प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, "अण्णा द्रमुकने केलेल्या घोषणेचा आम्ही अभ्यास करू आणि आमच्या पक्षाचं केंद्रीय नेतृत्व याबाबत प्रतिक्रिया देईल."
 
अण्णा द्रमुकने एनडीएमधून बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्यानंतर केवळ तामिळनाडूमध्येच नाही तर राष्ट्रीय पातळीवर देखील या निर्णयाची चर्चा होत आहे.
 
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपनंतरचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अण्णा द्रमुककडे पाहिलं जात होतं. एवढा मोठा पक्ष आघाडीतून बाहेर पडल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.
 
यामुळेच आधी राजदकडून आणि आता काँग्रेसकडून अण्णा द्रमुकने घेतलेल्या या निर्णयावर भाष्य करण्यात आलेलं आहे.
 
अण्णा द्रमुकची राजकीय ताकद किती आहे?
युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर आम्ही तामिळनाडूचे ज्येष्ठ पत्रकार थारासू शाम यांच्याशी संवाद साधला.
 
याबाबत बोलताना ते म्हणाले की, "अण्णा द्रमुकसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 2026 ला राज्यात होणारी विधानसभा निवडणूक जास्त महत्वाची आहे.
 
सध्या अण्णा द्रमुककडे केवळ एकच खासदार आहे. ओ. पनीरसेल्वम यांचे सुपुत्र रबिन्द्रनाथ हे अण्णा द्रमुकचे एकमेव खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एक किंवा दोन खासदार निवडून आले किंवा नाही आले तरी अण्णा द्रमुकला त्याचा फारसा फरक पडेल असं दिसत नाहीये.
 
मात्र दुसरीकडे भाजपचा विचार केल्यास त्यांच्यासाठी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सलग तिसऱ्यांदा केंद्रातील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने वेगाने पावलं टाकायला आधीच सुरुवात केलेली आहे.
 
विरोधकांच्या इंडिया आघाडीसमोर भाजपच्या नेतृत्वातील रालोआदेखील तेवढीच मजबूत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय.
 
त्यामुळे रालोआच्याच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पहिल्या रांगेत असलेल्या अण्णा द्रमुकने युती तोडल्यामुळे भाजपला दोन पक्षांमध्ये झालेल्या या घटस्फोटाची जास्त चिंता करावी लागणार आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "अण्णा द्रमुक आणि भाजपच्या विभक्त होण्यामागे एकमेव कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई. त्यांची राजकीय भाषणं आणि विधानं त्यांची राजकीय अपरिपक्वता दाखवून देतात.
 
त्यांच्या आक्रमकतेमुळे अण्णा द्रमुकला भाजपचा सहकारी पक्ष म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काहीही फायदा होताना दिसत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी खासदार निवडून आणल्याने एडाप्पाडी के. पलानीसामी यांना काहीही मदत मिळणार नसल्याचं दिसतंय."
 
त्यामुळे आगामी काळात भाजप काय करणार या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, "भाजप ओ. पनीरसेल्वम, टी. डी. व्ही. दिनाकरण आणि इतर छोट्या पक्षांशी युती करून तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीत उतरू शकते."
 
अण्णा द्रमुकने भाजपसोबत असणारी युती तोडल्यामुळे स्टालिन यांच्या द्रमुकसमोर असणाऱ्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजपमुळे अण्णा द्रमुकसोबत युती न करणाऱ्या छोट्या पक्षांना आता द्रमुकच्या विरोधात अण्णा द्रमुकचा पर्याय उपलब्ध असेल.
 
छोट्या पक्षांना पर्याय उपलब्ध झाल्यामुळे आता त्यांची राजकीय वाटाघाटी करण्याची ताकद वाढली असून द्रमुकसमोर यामुळे जागावाटपाच्यावेळी नवीन आव्हान निर्माण झालेलं आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सणासुदीला अधिक प्रमाणात गोड, तेलकट खाल्याने कशाप्रकारे यकृतावर परिणाम होतो?