Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री रेणुका देवी माहात्म्य अध्याय २

Webdunia
सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (15:24 IST)
नारदमुनी माहिष्वती नगरीस आले
 
नारदमुनि संचार करीत करीत माहिष्वती नगरीत आले व कार्तवीर्यार्जुनास भेटले. कार्तवीर्याजुनाने त्यांचा यथोचित सत्कार केला व तो त्यांना म्हणाला, "मुनिश्रेष्ठ, आपण त्रैलोक्यात संचार करीत असता आमच्या राजधानीस आपण आल्यास बरेच दिवस झाले. आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. ऋषिवर्य माझ्या राज्यकारभाराची आपणास माहिती झालीच आहे. तेव्हा मी जास्त काय सांगू ? यावेळी माझ्यापुढे देव-दानव अगर राजाधिराज कोणीही समर्थ नाही. यदाकदाचित कोणी राहिलाच तर त्यास तात्काल यमलोकास पाठवीन. एवढेच नव्हे तर माझा पराक्रम देवलोकासही पटवून देऊन, त्यांचा मानभंग करून त्यांचे ऐश्वर्यही माझ्या स्वाधीन करून घेण्याकरिता शूर सेनेची मी जुळवाजुळव चालविली आहे." हे ऐकून नारदमुनि म्हणाले, "हे राजा तू गुरु दत्तात्रेयाचे अनुग्रहास पात्र होऊन जगप्रसिद्ध झाला आहेस. तुझ्या समोर राहण्यास कोणीहि समर्थ नाही बरे, आता आम्ही येथून जातो." असे सांगून नारदमुनि तेथून निघाले.
 
नारदमुनिंनी इंद्रलोकास येऊन देवतांना अर्जुनीचा दुष्ट विचार सांगितला.
 
नारदांनी अत्य्म्त गडबडीने देवलोकी येऊन इंद्राचे सभास्थानी प्रवेश केला. त्यांच्या आगमनाने इंद्रादि देव आनंदित झाले व त्यांना नमस्कार केला व म्हणाले, "नारद महर्षि, आपण आजवर प्रत्येक वेळा वीनानादावर गायन करीत अत्यानंदाने नाचत येऊन आम्हास दर्शन देत होता. पण आज ते काहीच दिसत नसून आपण अत्यंत गडबडीने येऊन दर्शन आम्हास दिले आणि आपला चेहराहि म्लान व चिंतातूर दिसतो. यामुळे आम्हास एक प्रकारचा संदेह उत्पन्न झाला आहे. त्याचे आपण निवारण करावे." असे इंद्र नारदास म्हणाला. त्यावर नारद म्हणाले, 'हे सुरपति, तुमची शंका बरोबर आहे. हे मी आधीच जाणून आहे मी आता काय सांगू ? भूलोकी संचार करीत करीत मी माहिष्वती नगरीत गेलो व कार्तवीर्याजुनाची भेट घेऊन त्याचे मनोगत समजावून घेतले. तो अर्जुनी, आपला पराक्रम व्यक्त करुन आपल्या समोर येण्यास कोणीच समर्थ नाही, वैरी समोर आल्यास त्याचा एका क्षणात नाश करून आपले शौर्य तुम्हा सर्वास दाखवून तुमचे सर्वस्व हरण करून घेण्यास अत्यंत आतुर झाला आहे. त्याचा त्रास दूर करण्याचा उपाय तुम्ही योजावा हे सांगण्यासाठिच मी येथे आलो आहे. हे सुरपति, त्या दुष्टासमोर राहणेस तुम्ही देवही समर्थ नाही तेव्हा तुम्ही तातडीने ब्रह्मदेवाकडे जाऊन मी सांगितलेली सर्व हकीकत त्यास कळवावी. व त्यास बरोबर घेऊन क्षीरसमुद्रावर श्री लक्ष्मीसह विश्रांती घेत असलेल्या श्रीनारायणाचे सहाय्याने तुमचे कार्य साधून घ्यावे असे सांगून नारद पुढे संचाराकरिता निघून गेले. इकडे इंद्रादि देव आपापल्या वाहनावर आरूढ होऊन तातडीने ब्रह्मदेवाजवळ आले व नारदाकडून कार्तवीर्यार्जुनाच्या दुष्ट योजनांचा कळलेला बेते त्यांनी ब्रह्मदेवास सांगितला, व ब्रह्मदेवास बरोबर घेऊन ते सर्व क्षीरसमुद्रावर आले आणि श्री नारायणास त्यांनी नमस्कार केला, व कार्तवीर्याजुनाकडून आपणावर येणारे संकट दूर करण्यास आपणाशिवाय इतर कोणीही समर्थ नाही असे नारदांनी सांगितले. म्हणून, आम्ही सर्व आपणाकडे आलो आहोत असे ब्रह्मदेव श्री नारायणास म्हणाले. हे ऐकून श्री नारायण म्हणाले, "हे ब्रम्हदेवादि देवहो ! मी मत्य्स्य, कूर्म, वराह, नरसिंहादि अवतार घेऊन दुष्ट राक्षसांचा संहार केला आणि कंटाळून विश्रांति घेण्याकरिता या क्षीरसमुद्रावर आलो. आता या समयी माझ्याकडून तुमच्या संकटांचे निवारण होणार नाही. तेव्हा तुम्ही सत्वर हिमाचलावर असलेल्या तुमच्या मातुश्री अदितिदेवी यांच्याकडे जाऊन त्यांना ही सर्व हकीकत कळवा, म्हणजे त्यांच्या कृपेने तुमचे इष्ट साध्य होईल. हे माझे वचन सत्य आहे असे समजा." असे नारायणांनी त्यांना सांगितले. श्री नारायणाचे हे बोलणे ऐकून इंद्रादि देव अदितिदेवीकडे आले व त्यांनी सांगितले श्री नारायणाचे हे माझे वचन सत्य आहे असे समजा." असे इंद्राने तिला नमस्कार करून प्रार्थना केली की, "हे माते, तो दुष्ट कार्तवीर्य आम्हा सर्वांना त्रास देऊन आमचे सकल ऐश्वर्यही आपल्या स्वाधीन करून घेणार असे त्याने नारदांना सांगितले आहे. नारदांचेकडून आम्हास ही हकीकत कळली आणि त्यांनीच या संकटाचे निवारण करण्यासाठी क्षीरसमुद्रावर श्रीनारायणाकडे आम्हास पाठविले होते. त्याप्रमाणे आम्ही श्री नारायणाकडे गेलो पण त्यांनी आपणाकडून हे काम होणार नाही असे स्पष्ट सांगितले व तुमचेकए आम्हास पाठविले म्हणुन आम्ही सर्व येथे आलो आहोत." असे ते देवीस म्हणाले, यावर अदितिदेवी म्हणाली, "बाळांनो बरे झाले. तुम्ही काही घाबरू नका. मी माझ्या तपाच्या प्रभावाने पार्वती-परमेश्वरांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्या सहाय्याने त्या दुष्टांचा नाश करण्याचा उपाय योजत असे. तुम्ही नारायणास कळवून स्वस्थ चित्ताने तुमच्या निवासस्थानी जा." या आज्ञेप्रमाणे सर्व देव नारायणाकडे आले व त्यांनी आपणास अभय मिळाल्याची हकीकत नारायणास कळवून ते आपापल्या स्थानाकडे गेले.
 
अदितिदेवीच्या तपाने प्रसन्न होऊन श्री शंकरानी तिची अपेक्षा पूर्ण केली
 
इकडे अत्यंत तेजस्वी, प्रचंड सामर्थ्यवान व क्रोधाने कलिकेसारखी भासणारी अदितिदेवी पार्वती-परमेश्वरांना प्रसन्न करून घेण्यासाठी पंचाग्नीमध्ये उग्र तपश्चर्येस बसली. हिच्या तपाची ज्वाला सर्वत्र पसरली, इतकेच नव्हे तर कैलास पर्वतावर वास करीत असलेल्या पार्वती परमेश्वरांनाही तिची झळ लागली. जगन्माता पार्वती भय पावून म्हणाली की, "हे परमात्म्या ही उग्र बाधा लवकरच शांत कर" त्यावर श्रीशंकर म्हणाले, "पार्वती, ही उग्र बाधा कोणापासून उत्पन्न झाली आहे हे तुला माहीत नाही वाटते ? ऐक तर मी थोडक्यात सांगतो. तुझ्याच वंशातली अदितिदेवी आपल्या डाव्या पायाच्या अंगुष्ठाखाली गजगा व त्याखाली पोलादी सुया ठेवून एका पायावर उभी राहून तुझ्या व माझ्या दर्शनासाठी पंचाग्नीमध्ये करीत असलेल्या तपाची ज्वालाच इतकी प्रखर आहे समजले ना ! असेच पूर्वी एकदा या देवीने उग्र तपाने आम्हास प्रसन्न करून घेऊन, देण्यास असाध्य असे वर मागितले होते; ते आम्ही न देता तिचे कसे तरी त्यावेळी समाधान केले होते हेहि तुला ठाऊक आहे. मी आता यास काय उपाय योजावा हे तूच मला सांग." असे परमेश्वराने कृपादृष्टीने पाहून पार्वतीस विचारले. पार्वती म्हणाली, "हे भक्षरक्षका शंकरा, आता तिजवर आलेले संकट दूर करून तिची मनीषा पूर्ण करण्याची कृपा करावी." मग परमेश्वर म्हणाले, "चल तर आपण तिकडेच जाऊ." असे म्हणून ते नंदीवर आरूढ झाले. अदितिदेवी तप करीत असलेल्या ठिकाणी आले. तेथे कोणासही जवळ राहता न येण्यासारख्या उग्र तपाच्या ज्वाला श्री शंकरांनी भक्षण केल्या व तेथे शांतता स्थापन करून ते अदितिदेवीजवळ आले. तेव्हा अदितिदेवीने नेत्र उघडून पाहिले व तिला नंदीवर आरूढ झालेले पार्वती-परमेश्वराचे दर्शन झाले. अदितिदेवीने हात जोडून त्यांना नमस्कार केला व ती त्यांचे सांत्वन करू लागली.
 
हिच्या तपाच्या प्रभावाने प्रसन्न होऊन श्री शंकर म्हणाले, "हे अदितिदेवी अशा प्रकारचे तप आजवर कोणीच केले नव्हते. तेव्हा असले खडतर तपाचरण तू कशासाठी करू लागलीस ते आम्हास सत्वर सांग" हे शंकराचे वचन ऐकून अदितिदेवी म्हणाली, "हे जगदीशा माझे पुत्र जे इंद्रादि देव त्यांना राक्षसकुलाचे क्षत्रिय त्रास देण्याचे योजनेत आहेत असे नारदांच्या मुखाने ऐकलेल्या बातमीने भयग्रस्त होऊन त्यांनी राक्षसांच्या नाशासाठी श्री नारायणाकडे धाव घेतली. श्री नारायणांनी हे काम आपणाकडून होणार नाही असे सांगून त्यांना माझ्याकडे पाठविले, म्हणून त्यांच्या निवारणार्थ मी हे तप आचरुन आपल्या दर्शनास पात्र झाले. आता त्या दुष्टांचा नाश करून देवतांचे रक्षण करावे अशी माझी इच्छा आहे. ती आपण पूर्ण करावी अशी माझी आपणास विनंती आहे, तेव्हा श्री शंकर नंदीवरून उतरून आले आणि म्हणाले, "देवी मी तुझी इच्छा पूर्ण करतो. तू काही चिंता करू नकोस." अदितिदेवी शंकरास म्हणाली, "हे देवाधिदेवा माझी सतत दिति इजपासून उत्पन्न झालेले राक्षस वरचेवर माझ्या देव पुत्रांना त्रास देत असतात म्हणून त्यांच्या निवारणार्थ मी उग्र तप करून तुमचे दर्शन घेतले. याप्रमाणेच यापुढेही असा प्रसंग मजवर येऊ नये यासाठी हे शंकरा माझे पति सत्वांशाने चिरंजीव व्हावेत अस वर तुम्ही मला द्यावा." श्री शंकर म्हणाले, "आदिति मी तुझे वचन ऐकून प्रसन्न झालो आहे. मागे एकदा या पार्वतीसमक्ष तू ८ प्रकारचि लक्ष्मी आणि १४ प्रकारची योगिनी होशील असे तुला वचन दिले आहे आता यापुढे दुष्ट राक्षसांचा संहार करण्याकरिता पार्वती देवीच्या वंशातली तू रेणुकराजा पृथ्वीवर करीत असलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञात अयोनिज होऊन जन्म घे कश्यपांपासून मी जन्म घेऊन तुझा पति होईन, व मी दिलेल्या प्रसादापासून तुला प्रथम ४ मुले होतील. नंतर शेवटचा पुत्र श्रीनारायणच तुझ्या उदरी येऊन पार्वती देवीपासून अंबिकास्त्र व श्री गजाननाच्या सेवेने परशु अस्त्र मिळवून देवतांना पिडणार्‍या या क्रूर राक्षसांचा संहार करील आणि देवतांना संतोष देईल. हे सर्व तुझ्या तपाच्या प्रभावानेच घडून येऊन त्याची जगभर प्रसिद्धी होईल. पण तुला तीन निमिषाचेच वैधव्य येईल व नंतर तू सकल ऐश्वर्य युक्त सुवासिनी होऊन जगदंबा, एकवीरा, रेणुकादेवी या नावाने चिरंजीव होशील. पुढे कलियुगात सद्‌भक्ति, सदाचार, सद्‍धर्म नष्ट व्हावयास लागतील त्यावेळी तू महिमाशाली म्हणून गाजून तुझ्या ठिकाणी श्रद्धा ठेवलेल्या लोकांचे इष्टार्थ पूर्ण करशील. त्यामुळे सर्व जातीचे लोक कोणताही भेदभाव न मानता तुझी भक्तियुक्त पूजा करू लागत्ल आणि तू त्यांच्यामध्ये प्रसिद्ध पावशील' असा श्री शंकरांनी अदितिदेवीस वर दिला. व ते पार्वतीसह नंदीवर आरूढ होऊन कैलासास परत गेले. अशी ही अदितिदेवीच्या तपःप्रभावाची कथा सूतमुनींनी शौनकादि ऋषींना निवेदन केली आणि पुढे जमदग्नी ऋषींच्या जननाची कथा सांगण्यास प्रारंभ केला.
 
च्यवन भार्गव रुचिक मुनि आणि सत्यवती यांच्यासह सिद्धाचलास आल्याची कथा-
 
इकडे गोदावरीचे काठी अदिमोहरा नावाचे अत्यंत महिमाशाली क्षेत्र फार प्रसिद्ध होते. या ठिकाणी भृगुवंशातील योगविद्या प्रवीण च्यवनऋषी राहत होते. याना चार वेद, सहा शास्त्रे तसेच यजनयाजनादि कर्मात निपुण असा रुचिकमुनि नावाचा अत्यंत तपोबल व शापानुग्रह संपन्न असा एक पुत्र होता. त्यास गाधि राजाची कन्या सत्यवती दिली होती. ही सुद्धा पतीप्रमाणेच दानधर्म, परोपकारी इत्यादि कामात सहाय्यकारि, पतिभक्तिपरायण व अतिथीअभ्यागतांचे आदरातिथ्यदक्ष अशी होती. यामुळे ते आदिमोहरा स्थान गुरुकुल-वासाकरिता योग्य झाले होते. अशा या पुण्यस्थानास अनेक मुनि तसेच राजे लोकही येऊन आपल्या मनः कामना पूर्ण करून गुरुकुलास तन-मन धनाने सहाय्य करून जात असत. हे जाणून दक्षिणेकडे उरगादीस उत्तर वाहिनी अशा दुभागलेल्या पवित्र मलापहारी नदीचे काठी असलेल्या सिद्धाचलावरील मुनिजन येथे येऊन च्यवनभार्गव व रुचिक मुनीचे दर्शन घेवून काही दिवस त्यांच्या सेवेत काढीत आणि त्यांनी आपल्याला सिद्धाचलावरी आश्रमास येऊन एकवेळ भेट द्यावी अशी विनंती करीत. या विनंतीस मान देऊन काही मुनिपुत्रांना तेथे ठेवून च्यवन भार्गव ऋषि, पुत्र रुचिक मुनि व सत्यवतीसमवेत लिंगमुनि, तृप्तिमुनि, सिद्धमुनि, परशुमुनि, गुप्तमुनि इत्यादि आपल्या अंगरक्षकासह सिद्धाचलावर येऊन पोचले. यांच्या आगमनाची बातमी कळताच कित्येक राजे, मुनि वगैरे सिद्धाचलास आले व त्यांनी ऋषींचे दर्शन घेवून गुरुदक्षिणा ठेवून आशिर्वाद घेतला. या ऋषींच्याकडे यज्ञयागाच्या व वेद शास्त्रांच्या अभ्यासाकरिता कितीतरी ऋषिकुमार येऊन राहिले व आपापल्या इच्छेनुसार त्यांनी विद्याभ्यास केला.
 
अशाप्रकारे या सिद्धाचलावर बरेचसे ऋषि जमले. रुचिकमुनींच्या अनुज्ञेप्रमाणे या सर्वांचे यथोचित आदरातित्य सत्यवती करू लागली. हे पाहून च्यवनभार्गवांनी आपले सर्व अधिकार रुचिक मुनींकडे सोपविले व आपण शिवयोगानंदात तल्लीन झाले.
 
गाधिराजा सिद्धाचलास येऊन सत्यवतीस बोलावून घेऊन गेला ती कथा
 
इकडे गाधिराजा व त्याची पत्‍नी कमलाक्षी ही उभयता साधुसत्पुरुषांचा भक्तिपूर्वक सत्कार करून सर्व प्रजाजनांच्या प्रीतीस प्रात्र झाली होती. आपली कन्या सत्यवती हिला राजधानीस बोलावून आणण्याबद्दल त्यांचा विचार चालला असता कमलाक्षी राणि राजस म्हणाली, "प्राणप्रिय ! आमची कन्या सत्यवती हिची पुष्कळ दिवस झाले भेट झाली नाही व तीहि आम्हांस पाहणेस उत्सुक झाली असेल म्हणून आपण सत्वर जाऊन तिचा क्षेमसमाचार समजून घेऊन च्यवन भार्गवऋषींच्या अनुज्ञेने तिला इकडे बोलावून आणावे." हे प्रियपत्‍नीचे बोलणे ऐकून गाधिराजा मंत्र्यासह रथारूढ होऊन सिद्धाचलास येऊन पोचला. च्यवन भार्गवांना हे आलेले समजताच त्यांनी आता आपणाकडे बोलावून घेतले, व त्यांचे क्षेमकुशल विचारून आपल्या आश्रमाचा सुखानंद व तेथे नित्य होत असलेला अतिथि-अभ्यागतांचा सत्कार, रुचिक मुनींच्या आज्ञेने सत्यवती भक्तिपूर्वक उत्तम तर्‍हेने चालवीत असल्याचे त्यास सांगितले, यास राजा व मंत्री यांनी "ऋषिवर्य या सर्व सौभाग्यास देवीची कृपा व आपला मंगल आशिर्वाद कारण ओय." असे म्हणाले व आपला येण्याचा उद्देशही ऋषींना त्यांनी निवेदन केला. नंतर ऋषींच्या सांगण्यावरून ४-५ दिवस तेथेच राहून उत्तरवाहिनी मलापहारी नदीमध्ये स्नानादी कर्मे करून व ऋषींच्या आश्रमात रोज होणारी शिवपूजा आणि होमादिशांतिकये राजपद्धतीप्रमाणे करून आपण आणलेली गुरुदक्षिणा त्यांच्यापुढे राजाने ठेवली. ऋषींनी राजाचा यथोचित सत्कारहि केला. नंतर राजने आपले प्रजाजन सत्यवतीच्या दर्शनास आतुर झाले आहेत व धर्मपत्‍नी कमलाक्षी हिनेहि आपल्या अनुज्ञेने सत्यवतीस सत्वर बोलवून आणण्यास अत्यंत आग्रहाची सूचना देऊन आपणास पाठविल्याचे सांगितले. तेव्हा आपण जसे सांगाल त्याप्रमाणे आम्ही करू. हे ऐकून ऋषि म्हणाले, "तुझी वत्सलता ठीक आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. उदईक शिवलिंगाप्रीत्यर्थ शांतिहोमादि कर्मे व्हावयाची आहेत आणि या कार्याचे नेतृत्व तुझी कन्या सत्यवती व रुचिकमुनी यांचेकडे आहे तेव्हा हे कार्य संपल्यानंतर तुम्ही मुलीस घेऊन जा. ऋषीच्या आज्ञेप्रमाणे कार्यसमाप्तीनंतर राजाने शिवलिंगाचा प्रसाद स्वीकारला व संतुष्ट होऊन त्या दिवशीची सत्कथाहि श्रवण केली. दुसरे दिवशी ऋषींच्या अनुज्ञेने सत्यवतीसह राजधानीस जाणेकरिता राजाची तयारी चालली असता सत्यवती च्यवनभार्गवाच्या पाया पडलि आणि आपल्या मातेस व आपणासही पुत्रलाभाचा आशिर्वाद मिळावा अशी विनंती केली. ऋषींनी यज्ञेश्वर अग्नि-नारायणाची आराधना करून आपल्या सिद्धमंत्राने तयार केलेले चरुद्रव्य दोन कलशांमध्ये घालुन त्यापैकी एकात ब्रह्मतेजाची व दुसर्‍यात क्षात्रतेजाची प्रतिष्ठापना केली व ते कलश सत्यवतीकडे देऊन म्हणाले, सत्यवती या लहान कलशातील प्रसाद तुझ्या मातेने ग्रहण केला म्हणजे तिला क्षात्रतेजयुक्त असा पुत्र होइल. तेव्हा हा प्रसाद तिला दे व या मोठ्या कलशातील प्रसाद तू ग्रहण केलास म्हणजे तुला ब्रह्मतेजसंपन्न असा पुत्र होईल" असे सांगितले आणि आशिर्वाद दिला. सत्यवती संतुष्ट झाली आणि तिने च्यवनभार्गवांना आणि रुचिक मुनींना नमस्कार केला व त्यांच्या आज्ञेप्रमाणे राजाने सिद्ध केलेल्या रथात ती बसली. मनोवेगाने व वायुवेगाने पळणारे घोडे जोडल्यामुळे तो रथ काही क्षणात सिंधुदेशात प्रवेश करिता झाला. यांच्या आगमनाची बातमी आधीच घोडेस्वारांनी राजधानीत कळविली होती, त्यामुळे सत्यवतीच्या येण्याची वाट पहात असलेल्या राजधानीतील सुवासिनी स्त्रिया वस्त्राभरणाम्नी नटून राजमंदिराच्या महाद्वारात जमल्या. इतक्यात सत्यवतीचा रथ तेथे आला त्याबरोबर राजाने आपल्या कन्येस रथातून खाली उतरविले. तेव्हा सुवासिनीनी भरून आणलेले पाण्याचे घडे सत्यवतीच्या पायावर ओतून कुंकुम-गंध, पुष्प वगैरे तिला अर्पण केले आणि त्या म्हणाल्या, "पहा ही पतिव्रता सत्यवती आपल्या पित्याने दिलेली अनेक उंची वस्त्राभरणे सोडून आणि पतिआज्ञेप्रमाणे वल्कले नेसून, त्रिपुंड भस्म व रुद्राक्षमाला धारण करून महादेवीसारखी कशी शोभत आहे ! हिच्या मंगल दर्शनाने आम्ही पावन झालो असे बोलत सर्व स्त्रिया आपापल्या घरी गेल्या. मग सत्यवती आपल्या वाड्यांतील पार्वतीदेवीच्या मंदिरात गेली व देवीस नमस्कार करून तिने च्यवनभार्गव ऋषींनी दिलेला कलश देवीपुढे ठेवले ती बाहेर आली तेव्हा राणी कमलाक्षीने सत्यवतीस प्रेमाने आलिंगन दिले व तिला आपल्या जवळ बसवून घेऊन तिचे कुशल विचारले. व दोघींच्या भेटीची आनंदाची बातमी तेथेच असलेल्या सत्यवतीच्या सख्यांना कळली. त्याहि संतोष पावल्या. इकडे सिद्धाचलावर असलेल्या च्यवनभार्गवांनी तेथील कार्याचा एकंदर व्याप रुचिकमुनींवर सोपवला व काही शिष्यांसमवेत ते आदिमोहरा स्थानास परत गेले अशी ही कथा सूतमुनींनी शौनकादि ऋषीस सांगितली.
 
सत्यवती व कमलाक्षी देवी या चरुद्रव्यसेवनाने गर्भवती झाल्या ती कथा
 
इकडे गाधिराजा, कमलाक्षी व सत्यवती यांनी देवीचे ध्यान करून ती रात्र आनंदाने झोप घेऊन घालविली व दुसरे दिवशी सत्यवतीने प्रातःकाळी स्नान करून दुर्गादेवीची अष्टविधानाने युक्त अशी पूजा केली आणि त्या ठिकाणी ठेवलेले कलश घेऊन जाऊन ती आपल्या आईस म्हणाली, "आई ! च्यवन भार्गवानी या कलशातील प्रसाद आम्ही दोघींनी सेवन केल्यास आम्हास सत्पुत्र होतील असा आशिर्वाद दिला आहे" असे सांगितले. त्यांचे आज्ञेप्रमाणे तु या कलशातील प्रसाद ग्रहण कर असे सांगून अत्यानंदाचे भरात देहभान विसरून आपण स्वतः सेवन करावयाचा प्रसादाचा मोठा कलश आपल्या मातेस दिला व तिच्या कलशातील प्रसाद आपण स्वीकारला. सत्यवतीचे अमृतवचन ऐकून व ऋषींनी अनुग्रह करून दिलेल्या प्रसादाचा महिमा जाणून कमलाक्षी म्हणाली, "बाळे सत्यवती आम्ही तुझ्यामुळे धन्य झालो." कमलाक्षीने त्या प्रसादाची बातमी गाधिराजास कळविली. ती ऐकून गाधिराजा आनंदित झाला व ऋषींचे स्तवन करू लागला. पुढे १-२ महिने लोटल्यावर सत्यवती व कमलाक्षी दोघीहि गरोदर असल्याची चिन्हे दिसू लागली व आणखी ४-५ महिन्यांनी तर ते स्पष्टच झाले. यावर ही शुभवार्ता रुचिकमुनींना कळविणेकरिता गाधिराजाने सुवर्ण पत्रिका देऊन आपल्या मंत्र्यास सिद्धाचलावर पाठविले. ही पत्रिका मंत्र्याने रुचिकमुनीस दिल्यावर या संतोषजनक बातमीने तेथील सारे ऋषिजन आनंदित झाले. नंतर रुचिकमुनींनी गाधिराजाचे मंत्र्याचा सत्कार केला आणि ते त्यास म्हणाले. हे मंत्रिवर्यू तुम्ही आता गाधिराजास सत्यवतीस येथे आणून पोचविणेबद्दल आमचा आदेश कळवा. मंत्र्याने बरे आहे असे म्हणून रुचिक मुनींचा निरोप घेतला व तो आपल्या राजधानीस आला आणि त्याने गाधिराजाची भेट घेऊन पत्रिका रुचिकमुनींना दिल्याचे व त्यांनी केलेल्या कळविणेस राजाने आपणास पाठविल्याचे सांगितले. ही सुवार्ता ऐकून तेथे मत्काराची सर्व हकीकत त्यास कळविली आणि रुचिकमुनींनी सत्यवतीस आश्रमात आणून पोचविणेची केलेली आज्ञाहि विदित केली; ते ऐकून राजा-राणी यांनी बरे आहे त्याप्रमाणे आपण करू असे आपल्या मंत्र्यास सांगितले.
 
पुढे ४-६ दिवस गेल्यावर एका शुभ मुहुर्तावर गाधिराजा सत्यवतीसह सिद्धाचलावर आला. सत्यवती रथातून उतरली व तिने रुचिकमुनींना नमस्कार केला. आणि आपला आई-बापांचा क्षेमसमाचार, त्याचप्रमाणे कमलाक्षी राणीच्या गरोदरपणाची सुवार्ता त्यांना कळविली. ती संतोषदायक बातमी ऐकून रुचिकमुनींनी कृपादृष्टीने सत्यवतीच्या गर्भाकडे पाहिले व ते तिला म्हणाले, "सत्यवती, मी तुला सेवन करण्यास दिलेल्या ब्रह्मतेजयुक्त कलशातील प्रसाद तू सेवन न करता तुझ्या आईकरिता दिलेल्या क्षात्रतेजयुक्त कलशातील प्रसाद तू सेवन केलास म्हणून तुझा गर्भ ब्रह्मयुक्त नसून क्षात्रतेजसंपन्न असा झाला." हे श्रवण करून सत्यवती अत्यंत व्याकूळ होऊन हात जोडून रुचिकमुनींना म्हणाली, "मुनिश्रेष्ठ आनंदातिरेकामुळे ही चूक माझेकडून घडली याजबद्दल आपण मला क्षमा करावी." मुनि म्हणाले, ’सत्यवती यात तुझी काहीच चूक नाही. ही केवळ शंकरांची अनुग्रह लीलाच होय. आता या बाबतीत तू बिलकूल चिंता करू नकोस." असे अभय देऊन तिचे समाधान केले. "आता तू तुझ्या पित्याच्या उपचाराकडे लक्ष दे" असे तिला सांगितले आणि बाहेर येऊन गाधिराजाची भेट घेतली. त्यास आपल्याजवळ बसवून घेऊन सत्यवतीने त्यांच्या क्षेमसमाचाराची त्याचप्रमाणे कमलाक्षी राणीच्या गर्भाची सविस्तर हकिकत आपणास कळवून संतोष दिल्याचे कळविले. हे ऐकून राजा म्हणाला, "ऋषिवर्य या आपल्या संतोषप्रद समागमास आपले पिताजी यांचीच कृपा मुख्यतः कारण आहे. नंतर राजा त्यांच्या उपचाराने संतुष्ट होऊन एक दोन दिवस तेथेच राहून ऋषींचा निरोप घेऊन व सत्यवतीस बोध करून आपल्या राजधानीस परतला.
 
जमदग्नि-विश्वामित्रांचे जनन.
 
रुचिक मुनीनी सत्यवतीस आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "प्रिये, मी तुला आता गर्भवती स्त्रियांनी आचरावयाचे व्रत सांगतो ते ऐक. वारुळांच्या मातीचे शिवलिंग करून ते पूर्वाभिमुख असे पवित्र ठिकाणी स्थापन करावे व त्याची विधानोक्त पूजा करून लिंगास अर्पण केलला प्रसाद तू स्वीकारावा. हे व्रत २० सोमवार भक्तियुक्त अंतःकरणाने न चुकता करून शेवटच्या म्हणजे एकवीसाव्या सोमवारी या पूजाव्रताची सांगता करून अतिथी म्हणुन आलेल्या ब्रह्मचार्‍यांना त्यांच्या इच्छेनुसार तृप्त करावे. या ऋषींच्या सद्धोधाप्रमाणे सत्यवतीने २० सोमवार न चुकता पूजा केली आणि शेवटची पूजा तेथील ऋषिजनांची पत्‍न्यांच्या समवेत विधानोक्त व अत्यंत वैभवाने करून शिवलिंगास शेवटचे मंगल पुष्प समर्पण केले व आपल्या आश्रमातील सर्वजनास त्यांच्या इच्छेप्रमाणे भोजन देऊन संतुष्ट केले. या लिंगपूजेच्या आनंदाने प्रसन्न झालेल्या सत्यवतीने रुचिक मुनींच्या मुखाने सत्कथा श्रवण केली व त्या दिवसाची रात्र शिवानंदामध्ये घालविली. दुसरे दिवशी मंगल अशा मंगळवारी अरुणोदयाचे सुमारास श्रीशंकर स्वप्नात येऊन म्हणाले ’हे सत्यवती माझ्या वंशातील पुत्रास तुझ्या ओटीत घातले आहे त्याचा स्वीकार कर" व आपण त्या पुत्राच्या शरीरातच गुप्त झाले. सत्यवती जागी होऊन पहाते तो तिला आपल्या शुभ्र व स्वच्छ अशा आसनावर मूल दिसले. त्यावेळी ती "शिव शिवा ! काय हा तुझा अगाध महिमा’ असे म्हणून त्या दयाघन परमेश्वराचे स्तवन करू लागली तेव्हा देवतांनी आनंदजनक अशी पुष्पवृष्टी केली व देव दुंदुभिचा निनाद सिद्धाचलावर सर्वत्र व्यापून राहिला. हे पाहून तेथे असलेले सर्व लोक या सुयोगाने विस्मित झाले व देवतास्तोत्र करू लागले. इतक्यात सत्यवतीच्या पुत्रोदयाची वार्ता सर्वत्र पसरली तेव्हा रुचिकमुनी सत्यवतीजवळ आले व तेथेच झोपलेल्या बाळाकडे त्यांनी कृपादृष्टीने पाहिले तेव्हा सत्यवती म्हणाली, मुनिवर्य, "मलत्रयांना आपल्या पायाने लाथाडून खेळत असलेल्या या बाळाला तुम्ही पाहिले ना" त्यावर मुनी म्हणाले, "प्रिये सत्यवती तू म्हणतेस ते करे. हा शिवांशसंभूत पुत्र जन्मास आला याचे कारण च्यवनभार्गव ऋषींनी आशिर्वाद्पूर्वक दिलेला प्रसाद व तू माझ्या आज्ञेप्रमाणे पार्थिवलिंग पुजेचे फल होय. आता तू मलापहारी नदीच्या शुद्धोदकाने स्नान कर व या बाळासही स्नानास घालून मला कळीव असे ऋषी म्हणाले रुचिकमुनींच्या आज्ञेप्रमाणे सत्यवतीने आपण स्नान करून मुलासही स्नान घातले व रुचिक मुनींना कळवले. त्यावर रुचिक मुनींनी मुलास भस्म लावून आपल्या हातातील रुद्राक्षाच्या जपमालिकेने त्यास स्पर्श केला व सत्यवतीच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना आपले पादोदक देऊन मुनी आपल्या आश्रमास आले. काही ऋषिकुमार या पुत्रोत्वाचा महिमा गात रुचिक मुनीजवळ थोडा वेळ राहिले. इतक्यात कान्यकुजाहून गाधिराजाचे मंत्री ऋषींच्या आश्रमास आले व त्यांनी ऋषींना राजपत्‍नी कमलाक्षी इजला सोमवारी सूर्योदयाचे सुमारास त्रिमलरहित असा पुत्र झाल्याची आनंददायक वार्ता असलेले सारेच जण आश्चर्यचकित व आनंदित झाले आणि ऋषींचा महिमा गाऊ लागले.
 
रुचिकमुनींनी गाधिराजाच्या मंत्र्याचा वस्त्रावरणांनी यथोचित सत्कार केला व त्यांना परत जाण्यास परवानगी दिली. तेव्हा ते तेथून निघून आपल्या राजधानीस आले आणि त्यांनी राजास सांगितले की, "महाराज आपणास झालेल्या पुत्राची शुभवार्ता कळविणेस आम्ही गेलो तो अरुणोदयाचे सुमारास सत्यवतीनेही सत्पुत्रास जन्म दिला ही संतोषजनक बातमी आपणास सांगण्यास ऋषींनी आम्हास वस्त्रालंकार वगैरे देऊन पाठविलेचे कळविले ही शुभवार्ता ऐकून कमलाक्षी राणी अत्यंत संतुष्ट झाली. पुढे बारावे दिवशी गाधिराजाने आपल्या आज्ञेने सर्व शहर तोरणादिकांनी अलंकृत करविले व श्री दुर्गादेवीची कुंकुमादिनी पूजा केली आणि रत्‍नखचित अशा पाळण्यात मुलास निजवून सुवासिनींच्याकडून मंगलगीते गात मुलास ’विश्वामित्र’ असे नाव ठेवविले आणि त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना परत पाठविले. त्याचप्रमाणे सिद्धाचलावरही रुचिकमुनींनी बारावे दिवशी दर्भानी अलंकृत अशा पाळण्यात अदितिदेवीच्या तपाची ज्वाला स्वीकारलेल्या व शिवांशभूत अशा आपल्या मुलास निजवून, ऋषिपत्‍नीच्याकडून मंगलगीत गात गात मुलास ’जमदग्नि’ असे नाव ठेवविले. इकडे क्षत्रिय राजांच्या त्रासास व क्रूर कृत्यास कंटाळून काश्मीर देशाच्या भागावर राज्य करीत असलेल्या रेणुक राजास गाधिराजाने आपली कान्यकुंज राजधानी सर्व प्रजेला कळवून, संतोषाने देऊन टाकली व आपणास पाहिजे तेवढे द्रव्य घेऊन पत्‍नी, पुत्र व काही सेवकांसह तेथून निघून तो केदारेश्वरास आला. विश्वामित्र तेथे असलेल्या ऋषीवर्यांच्या सेवेत तत्पर राहून व योगानुष्ठानाचे उच्च शिक्षण संपादून च्यवनभार्गवांनी अनुग्रह केलेल्या चरुप्रासादाच्या अंशाने ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध झाला अशी ही कथा सूत ऋषींनी शौनकादिकास सांगितली.
 
दुसरा अध्याय समाप्त

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments