Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज होणार विनेश फोगाटच्या फायनलमधील अपात्रतेसंदर्भातील अपिलावर निर्णय

Webdunia
रविवार, 11 ऑगस्ट 2024 (10:05 IST)
विनेश फोगाटच्या ऑलिंपिकमधील फायनलच्या अपात्रते विरोधात भारतानं केलेल्या अपिलावरील निर्णय आज (11 ऑगस्ट) होणार आहे.ऑलिंपिकच्या महिला 50 किलो वजनी गटात विनेश फोगाटला अतिरिक्त वजनामुळं अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्याविरोधात भारतीय ऑलिंपिक संघटनेनं कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) अपिल केलं होतं.
 
त्यावरील सुनावणीनंतर आज निर्णय होणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र हा निर्णय लांबला होता. आज CAS यावर निर्णय देणार आहे.
 
अमन सहरावतला कांस्य पदक (9 ऑगस्ट)
भारताचा पैलवान अमन सहरावतनं पॅरिस ॲालिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.
 
57 किलो वजनी गटात अमननं हे पदक मिळवलं.
 
अमन या ऑलिंपिकमध्ये खेळणारा भारताचा एकमेव पुरुष पैलवान आहे.
अमननं पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण त्याचा पराभव झाला होता.
त्यानंतर त्याला रिपेचाजमध्ये कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळाली.
9 ॲागस्टला झालेल्या सामन्यात अमननं प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूझवर गुणांच्या आधारे 13-5 अशी मात केली.

नीरज चोप्राला रौप्य पदक (8 ॲागस्ट)
भारताच्या नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. तर नीरजचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्णपदक पटकावलं.
 
सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक कमावण्याची कामगिरी नीरजनं केली आहे.
टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरजनंही भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण जिंकलं होतं. त्याशिवाय गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यानं सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 
यंदा पॅरिस ऑलिंपिकच्या फायनल नीरजचा पहिला थ्रो फाऊल झाला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्यानं 89.45 मीटरवर भालाफेक केली. नीरजचे पुढचे प्रयत्नही अपयशी ठरले. पण रौप्यपदक मिळवण्यासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली.
 
स्वतंत्र भारतासाठी सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदकं जिंकणारा नीरज आजवरचा एकूण तिसरा खेळाडू आणि आजवरचा दुसरा पुरुष आहे.
याआधी पैलवान सुशील कुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य आणि मग 2012 सालच्या लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावलं होतं.
तर पीव्ही सिंधूनं 2016 साली रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि मग टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं.
दुसरीकडे अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरवर भालाफेक करत नवा ऑलिंपिक विक्रम रचला आणि सुवर्णपदकही निश्चित केलं. पाकिस्तानचं हे ऑलिंपिकमधलं पहिलंच वैयक्तिक सुवर्णपदक आहे.
ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सनं 88.54 मीटरवर थ्रो करत कांस्यपदक जिंकलं.
हॉकीमध्ये भारताला कांस्यपदक (8 ऑगस्ट)
भारताच्या पुरुष हॉकी टीमनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.
 
कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारतानं स्पेनवर 2-1 असा विजय साजरा केला आणि सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये तिसरं स्थान मिळवलं.
हॉकीमध्ये भारताचं हे आजवरचं एकूण तेरावं पदक ठरलं आहे. ऑलिंपिकच्या इतिहासात भारतानं आता हॉकीत 8 सुवर्ण, एक रौप्य आणि 4 कांस्यपदकं मिळवली आहेत.
 
52 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदकं मिळवली आहेत. याआधी टोकियो ऑलिंपिकमध्येही भारतानं कांस्यपदकाची कमाई केली होती.
आजचा सामना हा भारताचा स्टार गोलकीपर आणि माजी कर्णधार श्रीजेशचा अखेरचा सामना होता.

अंतिम पंघालवर शिस्तभंगाची कारवाई (7 ऑगस्ट)
पैलवान अंतिम पंघाल आणि तिच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफला पॅरिस ऑलिंपिकमधून भारतात परत पाठवलं जाणार आहे.
 
अंतिम पंघालने तिचं ऑलिंपिक व्हिलेज अ‍ॅक्रेडिटेशन (एक प्रकारचा पास) बहिणीला दिलं होतं. नियमांनुसार आपलं अ‍ॅक्रेडिटेशन दुसऱ्याला देता येत नाही.
त्यामुळे पंघाल आणि तिच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय ऑलिंपिक असोसिएशननं दिली आहे.
 
अंतिम पंघाल 7 ऑगस्टला कुस्तीच्या 53 किलो वजनी गटात सहभागी झाली होती, पण पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती.
 
मीराबाईचं पदक थोडक्यात हुकलं (7 ऑगस्ट)
भारताच्या मीराबाई चानूला ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईनं टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. पण पॅरिसमध्ये अवघ्या एका गुणानं तिचं पदक हुकलं.
मीराबाईनं स्नॅच प्रकारात 85 किलो वजन उचलत चांगली सुरुवात केली. तिचा दुसरा प्रयत्न अपयशी ठरला. पण तिसऱ्या प्रयत्नात तिनं 88 किलो वजन उचललं.
 
मग क्लीन अँड जर्क प्रकारात दुसऱ्या प्रयत्नात तिनं 111 किलो वजन उचललं. अखेरच्या सहाव्या प्रयत्नात मीराबाईनं 114 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तिला यश आलं नाही. 200 गुणांसह तिला चौथं स्थान स्वीकारावं लागलं.

याआधी मिल्खा सिंग, पीटी उषा, दिपा कर्माकर, आदिती अशोक, अभिनव बिंद्रा, सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा, लिअँडर पेस-महेश भूपती अशा खेळाडूंनाही ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं.
2022 आणि 2023 साली मीराबाई चानूला बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
पुरुषांच्या 3000 मीटर शर्यतीत अविनाश साबळेनं चांगली सुरुवात करत आघाडी घेतली होती. पण त्याला अकराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
अविनाशनं 8 मिनिटे आणि 14.18 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. मोरोक्कोचा सुवर्णविजेता सुफियान अलबकालीपेक्षा तो जेमतेम 9 सेकंद मागे राहिला.
 
अविनाशला पदक मिळालं नसलं तरी त्याचं यश ऐतिहासिक आहे. कारण या प्रकारात फायनल गाठणारा तो पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे.
 
विनेश पदकाचं स्वप्न भंगलं, क्रीडा न्यायालयात धाव (7 ऑगस्ट)
भारताची विनेश फोगाट वजनाच्या निकषावर पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली होती.
 
विनेशनं त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. विनेश आणि भारतीय पथकानं कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टस (CAS) या खेळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं आहे.
 
विनेश फोगाटकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण वजनाच्या नियमात न बसल्याने विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली, आणि सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं.
 
महिलांच्या फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. पण सकाळी फायनल पूर्वी वजन घेतलं गेल्यानंतर अधिकाऱ्यांना तिचं वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा जास्त आढळलं.
भारतीय पथकाने हे काही ग्रॅम वजन घटवण्यासाठी थोडा अवधी मागितला, पण अखेर वजन घटवता न आल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं.
 
विनेशला 2022 सालच्या बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
हॉकीमध्ये भारताची झुंज, पण सेमी फायनलमध्ये हार (6 ऑगस्ट)
ऑलिंपिकमध्ये पुन्हा सुवर्णपदक जिंकण्याचं भारतीय हॉकी टीमचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं.
 
उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष हॉकी टीमनं प्रयत्नांची शर्थ केली. पण वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीकडून भारताला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात दोन्ही टीम्स तशा तुल्यबळ दिसल्या आणि भारतानं अखेरपर्यंत लढा दिला.
 
पण एकीकडे जर्मनीनं जसं मिळालेल्या संधीचं सोनं केलं, तसं भारताला मात्र जमलं नाही.
 
शेवटी शेवटी भारतानं आक्रमक पवित्रा घेतला. अखेरची दोन मिनिटं असताना तर गोलकीपर श्रीजेश मैदानाबाहेर गेला आणि त्याऐवजी भारतानं समशेर सिंगला खेळवलं.
 
गोलकीपरशिवाय खेळताना भारतानं एक पेनल्टी वाचवली. अखेरच्या दोन मिनिटांत भारतानं दोनदा जर्मनीच्या गोलपोस्टवर आक्रमण केलं, पण गोल करण्यात अपयश आलं.
 
भारत आता 8 ऑगस्टला कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारत स्पेनशी खेळेल.
 
विनेश आणि नीरज चोप्रा फायनलमध्ये (6 ऑगस्ट)
महिलांच्या 50 किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात विनेशनं क्युबाच्या युस्नेलिस लोपेझ गझमनवर मात केली.
 
विनेशनं उपांत्यपूर्व लढतीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचला हरवलं. त्याआधी विनेशनं जपानच्या युई सुसाकीवर शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
 
सुसाकी ही टोकियो ऑलिंपिकमधली चॅम्पियन होती. गेल्या पाच वर्षांत तिनं एकही सामना गमावला नव्हता.
भालाफेकपटू नीरज चोप्रानंही पॅरिस ऑलिंपिकच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
 
ऑलिंपिकमध्ये फायनल गाठण्यासाठी पात्रता फेरीत 84 मीटरवर भालाफेक करावी लागते. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटरवर भाला फेकला.
ऑलिंपिक जॅव्हलिन थ्रो म्हणजे भालाफेकीची फायनल 8 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार रात्री 23:55 वाजता होणार आहे.
नीरजचा प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमनंही 86.59 मीटरवर भाला फेकत फायनलचं तिकीट मिळवलं. भारताच्या किशोर जेनाला मात्र 80.73 मीटरवरच भालाफेक करता आली आणि त्याचं आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात आलं.
 
अविनाश साबळेनं रचला इतिहास (5 ऑगस्ट)
भारताचा धावपटू अविनाश साबळेनं ऑलिंपिकची फायनल गाठत इतिहास रचला.
 
3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात ऑलिंपिकची फायनल गाठणारा अविनाश हा पहिलाच भारतीय पुरुष धावपटू ठरला आहे.
याआधी 2016 साली रिओ ऑलिंपिकमध्ये साताऱ्याच्या ललिता बाबरनं महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत फायनल गाठली होती.
त्यानंतर अविनाशनं ऑलिंपिकच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये फायनल गाठली आहे.
भारतासाठी खेळताना ऑलिंपिक ट्रॅक इव्हेंटची फायनल गाठणारे अ‍ॅथलीट्स
 
2024 - अविनाश साबळे (3000 मी स्टीपलचेस)
2016 - ललिता बाबर (3000 मी स्टीपलचेस)
1984 - पीटी उषा (400 मीटर हर्डल)
1976 - श्रीराम सिंग (800 मीटर शर्यत)
1964 - गुरबचन सिंग रंधावा (110 मीटर हर्डल)
1960 - मिल्खा सिंग (400 मीटर शर्यत)
1900 - नॉर्मन प्रीचार्ड (200 मीटर शर्यत आणि 200 मीटर हर्डल)
लक्ष्य सेनची निराशा, निशा दाहियाला दुखापत (5 ऑगस्ट)
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं ऑलिंपिकमध्ये पदकाचं स्वप्न भंगलं.
 
बॅडमिंटन पुरुष एकेरीत लक्ष्य सेनकडून सर्वांनाच पदकाची अपेक्षा होती. पण कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली झी जियाकडून लक्ष्यला 13-21, 21-16, 21-11 असा पराभव स्वीकारावा लागला.
 
पॅरिसमध्ये या स्पर्धेत एखाद्या भारतीयानं चौथं स्थान मिळवण्याची ही पाचवी वेळ ठरली.
सोमवारीच नेमबाजीतही शॉटगन स्कीट प्रकारात मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
माहेश्वरी चौहान आणि अनंत जीत सिंग नारुका या भारतीय जोडीनं पात्रता फेरीत चौथं स्थान मिळवलं होतं. कांस्यपदकासाठीच्या लढतीत चीनविरुद्ध खेळताना अवघ्या एका गुणानं त्यांचं पदक हुकलं.
 
पराभव झाला असला तरी माहेश्वरी आणि अनंतनं नवा विक्रम रचला आहे. स्कीट प्रकारात पहिल्यांदाच भारतीय नेमबाज ऑलिंपिक पदकाच्या एवढे जवळ आले.
भारताची महिला पैलवान निशा दाहियाला मात्र दुखापतीचा फटका बसला.
 
उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या पाक सोल गमविरुद्ध खेळताना निशाच्या हाताला जबरदस्त दुखापत झाली. अखेरच्या क्षणी तिनं सामना सोडायचं ठरवलं.
 
हॉकीत भारताचा इंग्लंडवर थरारक विजय (4 ऑगस्ट)
पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी टीमनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतानं इंग्लंडवर शूटआऊटमध्ये 4-2 अशी मात केली.
 
या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात 17 व्या मिनिटाला भारताच्या अमित रोहिदासला मैदानाबाहेर जावं लागलं. उरलेल्या सामन्यात भारतीय संघ दहा खेळाडूंनिशीच खेळला.
 
मग हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल केले होते आणि निर्धारीत वेळेच्या अखेरीस दोन्ही टीम्स बरोबरीत होत्या.
मग पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं 4-2 असा विजय साजरा केला.
बॉक्सिंग रिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहाईंलापराभव स्वीकारावा लागला. चीनच्या ली चिआननं तिला गुणांच्या आधारे हरवलं.
 
पुरुष बॉक्सिंगच्या 71 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय बॉक्सर निशांत देवलाही मेक्सिकोच्या मार्को वर्देकडून पराभव पत्करावा लागला.
 
बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत लक्ष्यला डेन्मार्कचा दिग्गज बॅडमिंटनपटू व्हिक्टर अ‍ॅक्ससननं 20-22, 14-21 असं सरळ गेम्समध्ये हरवलं. त्यामुळे लक्ष्यला कांस्य पदकाच्या लढतीत खेळावं लागलं.
 
मनू भाकर चौथ्या स्थानावर (3 ऑगस्ट)
भारताची नेमबाज मनू भाकरचं एकाच ऑलिंपिकमध्ये पदकांची हॅटट्रिक साजरी करण्याचं स्वप्न थोडक्यात भंगलं. तर बॉक्सर निशांत देवला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
 
मनू आज पॅरिस ऑलिंपिकमध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये खेळली.
 
मनूनं यंदा याआधी 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीमध्ये मनूनं वैयक्तिक आणि मिश्र सांघिक अशी दोन पदकं कमावली आहेत. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिलीच खेळाडू आहे.
 
अवघ्या 22 वर्षांच्या वयात मनूनं हे ऐतिहासिक यश मिळवलं आहे. 
महिलांच्या तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि भजन कौरचं आव्हान संपुष्टात आलं. दीपिका कुमारीला उपांत्यपूर्व फेरीत तर भजन कौरला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
 
लक्ष्य सेनची आगेकूच, तिरंदाजीत चौथं स्थान (2 ऑगस्ट)
मनूनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्टल नेमबाजीची फायनल गाठली आहे. पात्रता फेरीत तिनं 590 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं.
 
25 मीटर पिस्टल नेमबाजीत रॅपिड आणि प्रीसिजन असे दोन राऊंड्स असतात. मनूनं दोन्ही प्रकारांत चमकदार कामगिरी बजावत फायनल गाठली.
बॅडमिंटनमध्ये भारताच्या लक्ष्य सेननं उपांत्य फेरी गाठत इतिहास रचला. लक्ष्य ऑलिंपिकमध्ये बॅडमिटंन पुरुष एकेरीत सेमी फायनल गाठणारा पहिला भारतीय ठरला.
 
त्यानं उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चोऊ तिएन चेनवर 19-21, 21-15, 21-12 अशी मात केली.
 
भारताच्या हॉकी टीमसाठीही हा दिवस खास होता. भारतानं साखळी फेरीत पूल बीमधल्या आपल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3-2 असा विजय मिळवला.
 
ऑलिंपिकच्या इतिहासात गेल्या 52 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं पुरुषांच्या हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे.
तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात भारताला कांस्य पदकाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला आणि चौथ्या स्थानाव समाधान मानावं लागलं.
 
अंकिता भाकत आणि धीरज बोम्मादेवरा या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला हरवलं पण उपांत्य सामन्यात त्यांना बलाढ्य कोरियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मग कांस्य पदकाच्या सामन्यात अमेरिकेनं भारतीय जोडीला हरवलं.
 
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला कांस्य (1 ऑगस्ट)
भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ॲालिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
 
स्वप्नीलनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवलं.
 
खाशाबा जाधवांनंतर पहिल्यांदाच एखाद्या मराठी खेळाडूनं ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे खाशाबा जाधवांप्रमाणेच स्वप्नीलही कोल्हापूरचा आहे.
 
स्वप्नील राधानगरीच्या कंबळवाडी गावातला आहे. नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून त्यानं नेमबाजीचे प्राथमिक धडे गिरवले होते. नेमबाज दीपाली देशपांडे आणि विश्वजीत शिंदे यांचं मार्गदर्शन त्याला लाभलं आहे.पुण्यात बालेवाडी इथे तो सराव करतो. 
फायनलमध्ये पहिल्या फेरीत Kneel (नील) पोझिशन म्हणजे गुडघ्यावर बसून नेमबाजी करताना स्वप्नीलनं 153.3 गुण कमावले. मग Prone (प्रोन) पोझिशन म्हणजे झोपून नेमबाजी करताना स्वप्नीलनं आणखी चांगली कामगिरी केली. या फेरीअखेर एकूण 310.1 गुणांसह तो पाचव्या स्थानावर होता. अखेर उभ्यानं नेमबाजी करताना 422.1 गुणांची कमाई केली.
 
शेवटी 451.4 गुणांसह त्यानं तिसरं स्थान निश्चित केलं आणि कांस्यपदक मिळवलं. अवघ्या अर्ध्या गुणानं स्वप्नीलची रौप्यपदकाची संधी हुकली. पण त्यानं मिळवलेलं कांस्यपदकही ऐतिहासिक ठरलं आहे.
भारतासाठी खेळणारा महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधवला मात्र पराभव स्वीकारावा लागला. चीनच्या काओ वेनचाओनं त्याला 6-0 असं हरवलं.
 
भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनचं आव्हानही संपुष्टात आलं. निखतला प्राथमिक फेरीत चीनच्या वू यूकडून पराभव स्वीकारावा लागला.
 
हॅाकीमध्येही भारताला बेल्जियमकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. तर पी.व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली.
 
स्वप्नील कुसाळे फायनलमध्ये (31 जुलै)
भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला. नेमबाजीच्या या प्रकारात फायनल गाठणारा स्वप्नील पहिलाच भारतीय ठरला.
या स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर मात्र पात्रता फेरीतून बाहेर झाला.
भारताच्या राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंगचं ट्रॅप नेमबाजीतलं आव्हान मात्र संपुष्टात आलं.
 
दरम्यान, बॉक्सर लव्हलिना बोरगोहाईंनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिनं राऊंड ऑफ 16 मध्ये नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टॅडवर गुणांच्या आधारे मात केली.
 
लव्हलिनाला आता पुढच्या सामन्यात 4 ऑगस्टला चीनच्या ली कियानशी मुकाबला करायचा आहे.
 
बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या खेळाडूंचा पराभव झाला तरी त्यांना कांस्यपदक मिळतं. त्यामुळे पुढचा लव्हलिनानं 4 ऑगस्टची लढत जिंकली तर तिचं पदक निश्चित होईल.
 
सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकण्याची नामी संधी लव्हलिनाकडे आहे. याआधी कुस्तीत सुशीलकुमार आणि बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनं अशी कामगिरी बजावली होती.
तिरंदाजीत दीपिका कुमारीनं नेदरलँड्सच्या रोफिन क्विन्टीला 6-1 असं हरवलं आणि 1/8 एलिमिनेशन राऊंडमध्ये प्रवेश केला आहे.
 
बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेननं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे. लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड चॅम्पियन जोनाथन ख्रिस्टीवर मात केली.
 
त्याशिवाय बॅडमिंटनमध्ये एच एस प्रणोयनं बाद फेरी गाठली. प्रणोयला आता भारताच्याच लक्ष्य सेनचा मुकाबला करावा लागणार आहे.
 
मनू भाकर, सरबजोतचं ऐतिहासिक पदक (30 जुलै)
भारताच्या मनू भाकरनं एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची कमाल केली .
 
मनूनं सरबजोत सिंगच्या साथीनं 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात मिश्र सांघिक नेमबाजीत कांस्य पदक मिळवलं. याआधी महिलांच्या वैयक्तिक 10 मीटर एयर पिस्टल स्पर्धेतही मनूनं कांस्यपदक जिंकलं होतं.
 
मनू आणि सरबजोतनं काल झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं होतं. आज त्यांनी कांस्य पदकाच्या लढतीत दक्षिण कोरियावर 16-10 अशी मात केली. मिश्र नेमबाजीत भारताचं हे पहिलं ऑलिंपिक पदक आहे.
2021 साली बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर सोहळ्यात मनू भाकरला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं.
मनू भाकर, बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर ईमर्जिंग प्लेयर पुरस्कारासोबत, 2021 सालचा फोटो
मनूला कांस्य पदकासाठीच्या फायनलमध्ये साथ देणारा सरबजोत सिंगही अवघ्या 22 वर्षांचा आहे. सरबजोतच्या आजवरच्या प्रवासाविषयी इथे वाचा.
 
सरबजोतनं याआधी 2022 मध्ये हांगझूमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारांत सुवर्णपदकं मिळवली होती.
तर 2023 साली भोपाळ आणि बाकूमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्येही त्यानं सुवर्णपदकांची कमाई केली.
सरबजोतनं 2019 साली ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही पदकांची कमाई केली होती.
 
सरबजोत हरियाणाच्या अंबालामधला असून अभिषेक राणा यांच्या हाताखाली तो नेमबाजीचा सराव करतो. त्याचे वडील जतिंदर सिंग शेतकरी असून आई हरदीप कौर गृहिणी आहेत.
दरम्यान, भारताच्या हॉकी टीमनं साखळी सामन्यात आयर्लंडवर 2-0 अशी मात केली.
 
बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकिरेड्डी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
 
तिरंदाजीत भजन कौरनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पण अंकिता भाकतचं आव्हान मात्र संपुष्टात आलं.
 
पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीच्या पात्रता फेरीत पृथ्वीराज तोंडाईमानला 21 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी खेळत आहेत. तर हॉकीमध्ये भारताची आयर्लंडसोबत लढत सुरू आहे.
 
रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवरनं उपांत्यपूर्व फेरीत त्याच्या गटात पाचवं स्थान मिळवल्यानं त्याच्या पदच्या आशा संपुष्टात आल्या.
 
अर्जुन बबुताचं पदक थोडक्यात हुकलं (29 जुलै)
नेमबाजीच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात अर्जुन बबुतानं शर्थ केली, पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
अर्जुन एकेकाळी दुसऱ्या स्थानावर होता. मात्र दुसऱ्या एलिमिनेशन राऊंडमध्ये एका शॉटवर त्यानं 9.9 गुणच मिळवले. मग तिसऱ्या स्थानासाठीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये अर्जुननं 9.5 गुणच मिळवले. त्याचा प्रतिस्पर्धी मिरान मारिसिचनं मात्र 10.7 गुणांसह तिसरं स्थान निश्चित केलं.
त्यामुळे पदकाच्या अगदी जवळ पोहोचूनही अर्जुनला रिकाम्या हाती माघारी फिरावं लागलं.
महिलांच्या 10 मीटर एयर रायफल फायनलमध्ये भारताच्या रमिता जिंदालला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
तर भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. तुर्कीनं भारताला 6-2 असं हरवलं.
 
हॉकीमध्ये भारत आणि अर्जेंटिनामधला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
 
मनू भाकरनं उघडलं पदकांचं खातं (28 जुलै)
22 वर्षीय मनूनं 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीत कांस्य पदक पटकावून पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं.
मनू ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं कमावलेल्या या कांस्य पदकामुळे भारताची ऑलिंपिक नेमबाजीत पदकांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली.
टोकियो ऑलिंपिकमध्ये मनू भाकरच्या पदरी निराशा पडली होती. ते अपयश मागे सारत तिनं पॅरिसमध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
 
तिनं फायनलमध्ये 221.7 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.
 
तसा 28 जुलैचा दिवस भारतीय नेमबाजांसाठी आशादायक ठरला. कारण 10 मीटर एयर रायफल नेमबाजीत रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुटा यांनी फायनल गाठली.
 
महिलांच्या 10 मीटर एयर रायफल महिलांच्या गटात भारताच्या रमिता जिंदालनं 631.5 गुणांसह पाचवं स्थान मिळवलं फायनल गाठली. नेमबाजीच्या या प्रकारात भारताच्या इलानेविल वेलारिवानला मात्र दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर अर्जुन बबुटानं 630.1 गुणांसह सातवं स्थान गाठलं आणि फायनलमधला प्रवेश निश्चित केला. या गटात संदीप सिंगनं बारावं स्थान गाठलं.
तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र भारताच्या महिला टीमचा पराभव झाला. नेदरलँड्सनं भारतावर 6-0 अशी मात केली. टेनिसमध्ये सुमित नागल तर टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांचं आव्हान संपुष्टात आलं.
 
बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, बॉक्सिंगमध्ये निखत झरीन तर टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांनी आगेकूच केली आहे. तर रोईंगमध्ये बलराज पनवर उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.
 
मनू भाकरनं गाठली फायनल (27 जुलै)
22 वर्षीय मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.
 
मनूनं पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सीरीजमध्ये प्रत्येकी 97 गुणांची कमाई केली. तिसऱ्या सीरीजमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं. पाचव्या सीरीजमध्ये तिनं एका खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळता मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
 
भारताची आणखी एक पिस्टल नेमबाज ऱ्हिदम सांगवान पात्रता फेरीत पंधरावी आली. तिनं 573 गुणांची कमाई केली.
 
शानदार उद्घाटन सोहळा
तब्बल 100 वर्षांनी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा ऑलिंपिकचं आयोजन केलं जातंय. तसंच तिसऱ्यांदा पॅरिसनं ऑलिंपिकचं आयोजन केलं आहे.
 
ऑलिंपिकची सुरुवात जरी ग्रीसमध्ये झाली असली, तरी आधुनिक ऑलिंपिक पॅरिसमध्येच आकाराला आलं. साहजिकच या पॅरिसचं ऑलिंपिकशी खास नातं आहे. उदघाटन सोहळ्यातही त्याची झलक पाहायला मिळाली.
2024 चा उद्घाटन सोहळा न भूतो न भविष्यती असाच होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 205 देशांच्या संघांची परेड यावेळी स्टेडियममध्ये नाही, तर सीन नदीत बोटींवरून निघाली. परेडच्या पूर्ण मार्गावर ठीकठीकाणी कलाविष्कार पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अखेरीस टॉर्च रिलेमध्ये फ्रान्सचा सुपरस्टार फुटबॉलर झिनेदिन झिदान सहभागी झाला. तर टेनिसस्टार राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, अमेली मोरेस्मो तसंच अ‍ॅथलीट कार्ल लुईस आणि जिम्नॅस्ट नादिया कोमानेची यांच्यासह फ्रान्सचे अनेक दिग्गज खेळाडू रिलेच्या अखेरच्या टप्प्यात सहभागी झाले होते.
 
एका महिला आणि पुरुष अ‍ॅथलीटनं एकत्रितपणे ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली आणि विविधतेत एकता आणि समानतेचा संदेश दिला. यंदा पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचं प्रमाण 50-50% एवढं समान आहे.
लेडी गागा आणि सेलिन डियॉन सारख्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणानं उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली.
लेडी गागानं सुरुवातीला गाणं सादर केलं तर सेलिन डियॉननं आयफेल टॉवरच्या अर्ध्यावरील टेरेसावरून गात कार्यक्रमाची सांगता केली. दोन वर्षांपूर्वी एका दुर्धर आजारामुळे गाण्याचे कार्यक्रम सेलिन डियॉननं बंद केले होते. एक प्रकारे तिचं हे कमबॅक ठरलं.
फ्रान्समधल्या कला, संगीत, इतिहास आणि ऑलिंपिक चळवळीची वाटचाल अशा गोष्टींचं प्रतीक त्यात पाहायला मिळालं.
Publishd By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments