Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नीरज-अर्शदला एकमेकांविरोधात बोलण्यासाठी डिवचल्यावर त्या दोघांनी काय केलं? वाचा

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (17:53 IST)
पॅरिसच्या स्टेड द फ्रान्स या स्टेडियमवर गुरुवारी एक वेगळेच दृश्य पहात होतो. क्रिकेट आणि हॉकी सामन्यांपेक्षा हे दृश्य वेगळे होते.इथे भारताचे आणि पाकिस्तानचे प्रेक्षक नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम या दोघांनाही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रोत्साहीत करीत होते.
स्टेडियमकडे प्रवेश करताना भारत आणि पाकिस्तानचे ध्वज हातात घेऊन जाणाऱ्या अनेक प्रेक्षकांशी मी बोललो. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं. पदकाचा रंग भले कोणताही असो – नीरज आणि नदीम या दोघांनाही पदक मिळाले पाहिजे.
पदक जिंकल्यानंतर नीरज देखील तेच म्हणत होता. “अर्शद आणि मी, आमच्यात 2016 पासून स्पर्धा सुरू आहे. तोही मेहनत पुष्कळ घेतो. त्याला कधी ना कधी त्या मेहनतीचे फळ मिळायला हवे.”
 
नीरज आणि नदीम यांच्यात स्पर्धा आहे, भालाफेकीच्या अंतराची; मात्र वैर नाही. एरवी दोघं एकमेकांना सहाय्यही करीत असतात.
नीरजचे म्हणणे होते, की “जगातले अन्य देशांचे धावपटू, अन्य अॅथलीट देशापलिकडेही पाहतात. खेळातील गुणवत्तेचा, कौशल्याचा आदर करून एकमेकांना मदत करतात, सहाय्य करतात आणि प्रोत्साहित करतात.
“माझा थ्रो चांगला झाला नाही, की नदीम मला धीर देतो. मी देखील त्याला प्रोत्साहन देत असतो.”
नीरज- नदीमची हीच दोस्ती गुरूवारी मी पॅरिसच्या अॅथलेटिक्स स्टेडियमवर पहात होतो.
 
खास नीरजच्या इव्हेंटसाठी पोहोचले चाहते
भारताचे आणि पाकिस्तानचे अनेक नागरिक इंग्लंडहून खास ही भालाफेकीची अंतिम फेरी पहायला खास आले होते.
 
फ्रान्समध्ये रहाणारे काही विद्यार्थी पदरमोड करून 125 ते 150 युरोचे तिकीट काढून भालाफेक स्पर्धा पहायला आले होते.
 
राजेश नावाचा एक विद्यार्थी पॅरिसला सिनेमा क्षेत्रातलं शिक्षण घेतो आहे. तो सांगत होता, “माझे यंदाचे सहावे आणि शेवटचे वर्ष आहे. पैसा जपून खर्च करावा लागतो. या भालाफेक स्पर्धेसाठी मी वेगळे पैसे जमा केले होते. इतर स्पर्धा पहाणे परवडणारे नाही.”
 
एका दक्षिण भारतीय मुलाला पॅरिस ऑलिंपिकमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. तो म्हणत होता, येथे पॅरिसमध्ये राहणारे माझ्यासारखे एकूण 20 भारतीय आहोत, ज्यांना स्वयंसेवक म्हणून स्वीकारले गेले आहे.
 
स्वयंसेवक म्हणून मानधन मिळत नाही. मात्र स्वयंसेवकाला नियुक्त ठिकाणचे सामने, ‘ड्युटी’ नसताना पाहता येतात. राजेशची नियुक्ती टेनिस स्टेडियमवर केली आहे. त्यामुळे त्याला अ‍ॅथलेटिक्स खेळाची तिकिटे विकत घ्यावी लागली.
पाकिस्तानच्या कराची एक्सप्रेसची पत्रकार नताशा, ऑलिंपिकमध्ये पाकिस्तानच्या वतीने कव्हरेजसाठी आलेली पहिली महिला आहे.
 
ती म्हणत होती, “आज संपूर्ण पाकिस्तान नदीमसाठी प्रार्थना करीत होता, त्याचबरोबर नीरजलाही यश मिळू दे अशी ‘दुवा’ करीत होता. भारत-पाकिस्तानचे दोन्ही स्पर्धक मेडल पोडियमवर पाहिजेत अशी प्रार्थना करीत होते.”
 
स्वतः नदीमची भावनाही हीच होती. पत्रकारांशी वार्तालाप करताना तो सांगत होता, “नीरज भाईका पिछले सात-आठ सालसे मुझे मदत हो रहा है.
“माझ्या प्रशिक्षकांबरोबरच मी नीरजचेही आभार मानेन. दुखापतीच्यावेळी नीरजने सांगितले, दुखापतीतून सावर तुझाही थ्रो आणखी पुढे जाईल.”
नीरज आणि नदीमची मैत्री
नीरज आणि अर्शद एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. दक्षिण आशियाई अॅथलीट्सची एक टीमच बनविली आहे.
स्पर्धेच्यावेळी, जेथे मार्गदर्शन करायला कुणीही जवळ नसते, त्या समरप्रसंगी हे दोघे अनेकदा एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करतात. आजही नीरज आणि नदीम यांनी त्याबाबतचे अनेक प्रसंग सांगितले.
नीरजने एकदा जसा, नदीमला भाला हाती दिला होता तसेच नदीमनेही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नीरज काही वेळा भाला फेकताना करीत असलेल्या चुका त्याच्या लक्षात आणून दिल्या होत्या.
नीरज म्हणत होता, पदक हातून जाईल याची पर्वाही न करता आम्ही अनेकदा एकमेकांना अशी मदत केली आहे.
भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील वैराच्या गोष्टी ठाऊक असलेल्या काही पत्रकारांनी आणि यजमानांच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही एकमेकांविरुद्ध बोलण्यासाठी अनेक प्रश्न विचारून पाहिले.
 
पण या दोघांच्या स्वच्छ निखळ मैत्रीपुढे त्या सर्वांचे प्रयत्न काल पत्रकार परिषदेत यशस्वी होऊ शकले नाहीत.
 
थेट दोघांनीही सांगितले ‘अन्य खेळाप्रमाणे आमचे दोघांचे नाही. आम्ही एकमेकांना पदक मिळावे यासाठी कायम मदत करीत आलो आहोत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोघांनाही पोडियमवर एकत्र पाहण्यासाठी ही तर सुरुवात आहे.’
 
गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरजने सुवर्णपदक कमावलं, तेव्हा अर्शद नदीमला रौप्यपदक मिळालं होतं. त्यावेळी पाकिस्तानात नदीमच्या वडिलांनी नीरजचं अभिनंदन केलं होतं आणि आता नीरजची आई नदीम मुलासारखा आहे असं सांगते आहे. ही गोष्ट मनाला भिडणारी आहे.
 
खेळातून मैत्रीचा संदेश
अनेकदा दोन देशांच्या टीम्समधलं वैर किंवा स्पर्धा विकोपाला जाते. पण खेळाच्या जगात अशीही अनेक उदाहरणं आहेत, जिथे एरवी शत्रूराष्ट्र असलेल्या देशांचे खेळाडू किंवा एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असेले खेळाडू यांच्यात प्रत्यक्षात मैत्रीपूर्ण नातं असतं. मैदानावरचे वैर, तेवढ्यापुरतेच म्हणजे त्या सामन्यापुरतेच, मर्यादित राहते.
 
अमेरिकेचा कृष्णवर्णीय अथलीट जेसी ओवेन्स आणि हिटलरच्या अधिपत्याखालील जर्मनीच्या लुझ लाँगमध्येही असेच मैत्रीपूर्ण संबंध होते जे वर्णद्वेश आणि दोन देशांमधल्या स्पर्धेच्या पलीकडे होते.
 
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल किंवा ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नावरातिलोव्हा यांनी एकमेकांविषयीचा आदर अनेकदा बोलून दाखवला आहे. हे मैदानावरचे प्रतिस्पर्धी एकमेकांची फोनवरून किंवा भेटल्यानंतर चौकशी जातीने करतात.
 
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकत्र काढलेल्या सेल्फीचीही चर्चा आहे. त्यांचे स्पर्धक मोठ्या स्पर्धांमध्ये एकत्र संवाद साधताना अनेकदा मला दिसले आहेत.
याआधी काही क्रीडास्पर्धांमध्ये दोन्ही कोरियांचे खेळाडू एकत्रित एकाच ध्वजाखाली खेळले होते.
टेनिसच्या दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी ही जोडी ‘इंडो-पाक एक्सप्रेस’ म्हणून नावलौकिकाला आली.
 
एकेकाळी पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी या दोन देशांत वैर होतं. मात्र तरीही एकाच खेळातील दोन्ही देशाचे स्पर्धक एकमेकांशी हितगुज करताना देखील दिसासचे. चीन आणि तैवानलाही हे लागू पडते
 
एवढंच नाही, तर भालाफेकी मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचे दोन स्पर्धक पत्रकार परिषदेत हिंदीमध्ये जास्त बोलत असताना, कांस्य विजेता अँडरसन विजेता शांतपणे पाहत आहे, हे अचानक या दोघांच्या लक्षात आलं त्यांनी चटकन सांगितलं, त्यांच्या देशानं हे भालाफेकीत पहिलं पदक मिळवले, ते देखील आमच्याशी संवाद साधत असतो, त्यामुळे आम्ही त्यालाही शुभेच्छा दिल्या.
 
हे सगळे प्रसंग एक गोष्ट अधोरेखित करतात, खिलाडूवृत्ती.
 
ऑलिंपिक ही एक चळवळ आहे जी सव्वाशे वर्ष सुरू आहे. या स्पर्धांचा पायाच असा आहे, सदा मैत्री बंधुता आणि प्रेम.
हा विचार वृद्धिंगत करण्यासाठी खेळाडू पदाधिकारी सहभागी होणारे स्वयंसेवक आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी हे सगळे मिळून एक कुटुंबy असल्याचं ऑलिंपिकचा चार्टर सांगतो.
खेळाडू मधील स्पर्धा केवळ त्या क्षणापूर्ती असते. त्यानंतर 200 हून अधिक देशांचे लोक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरताना दिसतात.
ॲालिंपिकचा समारोप होईल, त्यावेळी देखील संचालना दरम्यान अनेक खेळाडू एकमेकांसोबत एकमेकांचे फोटो काढताना, सेल्फी काढताना आणि हीतगुज करताना दिसतील. ऑलिंपिकचं स्पिरिट किंवा आत्मा हाच तर आहे.
 
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

एका पोलीस कर्मचाऱ्याने 60 पुऱ्या खाऊन नवा विक्रम केला

धुळ्यात धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून 51 लाखांची फसवणूक, 6 जणांवर गुन्हा दाखल

Secular Civil Code लागू करेल मोदी सरकार, पंतप्रधानांनी लोकसभेत घोषणा केली

LIVE: रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार,

रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार, महाराष्ट्राच्या पराभवावर काँग्रेस मंथन करणार

पुढील लेख
Show comments