Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

9 जणांचा खून केलेल्या त्याला पोलिसांनी वेडा म्हणून सोडलं, नंतर घेतला 40 जणांचा जीव

Webdunia
रविवार, 20 ऑगस्ट 2023 (15:05 IST)
मायानगरी मुंबईत एक-दोन नव्हे नऊ खून करणारा विकृत क्रूरकर्मा सुरुवातीला 'मी खून केले', असं सांगत स्वतःच पोलिसांकडे आला होता. पण मनोरुग्ण असल्याचं समजून त्याला पोलिसांनी सोडून दिलं.
पुढच्या काही वर्षांत मुंबईच नव्हे तर देशातला सर्वांत भयंकर सीरिअल किलर ठरलेल्या त्याच रमण राघवने चाळीस लोकांचा जीव घेतला.
 
कुठल्याही आधुनिक हत्याराशिवाय अगदी आदिम पण क्रूर पद्धतीने डोक्यात दगड घालून किंवा लोखंडी आकड्याने आघात करत निरपराध गरीब लोकांची त्याने शब्दशः डोकी फोडली.
 
कुठल्याही अतिरंजित, काल्पनिक सिनेमातल्या खलनायकापेक्षाही निर्दय, अमानुष आणि अतार्किक अशा रमण राघवने अनेक माहितीपट, चित्रपट, वेब सीरिज, नाटकांना विषय दिले.
 
रमण राघव 2.0 हा अनुराग कश्यपचा चित्रपटही त्यातलाच एक.
 
नवाजुद्दीन सिद्दिकीने जिवंत केलेला रमण खऱ्या घटनेतल्या रमण राघववरून प्रेरित असल्याचं सिनेमाकर्त्यांचं म्हणणं होतं. पण ती खऱ्या रमण राघवची गोष्ट नव्हती. प्रत्यक्षात त्या काळी नेमकं काय घडलं होतं?
 
आपल्याला देवानेच हे काम करायला सांगितलं असल्याचं या सीरिअल किलरने पोलिसांना सांगितलं. आपलं 'त्याच्या'शी वायरलेस कनेक्शन आहे, असल्या काही गोष्टी त्याने कबुली जबाबात सांगितल्याच्या बातम्या तत्कालीन वृत्तपत्रांत छापून आल्या होत्या.
 
या रमण राघवला जेरबंद करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनीही त्या तपासाविषयी नोंदी पुस्तकरूपाने किंवा मुलाखतीतून समोर आणल्या.
 
खरंच कोण होता रमण राघव, का मारली त्याने माणसं आणि त्याचं शेवटी काय झालं? ही आहे खरी गोष्ट...
 
मायानगरीत दाटला होता भीतीचा अंधार
साठच्या दशकातली मुंबई तुम्ही जुन्या चित्रपटांमधून पाहिली असेल. आजच्या एवढा गजबजाट नसला तरी तेव्हाची मुंबई म्हणजे 'जरा बचके' जगायला शिकवणारी गर्दीची मेगासिटी होतीच.
 
या मुंबापुरीच्या आकर्षणाने देशभरातून लोक इथे यायचे आणि महागड्या मायानगरीत जागा मिळेल तसे दाटीवाटीने राहायचे, कधी फूटपाथवरही पथारी पसरायचे.
 
फूटपाथवर आणि छोट्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांचे जीव 1965-66 च्या काळात टांगणीला लागले होते.
 
कोणी अनामिक, अज्ञात रात्रीच्या अंधारात उघड्यावर झोपलेल्या माणसांवर हल्ले करत होता. त्यावेळच्या GIP लाईनवर म्हणजे आताच्या पूर्व उपनगरातल्या सेंट्रल रेल्वेच्या आसपास राहणाऱ्या 19 जणांवर त्या वेळी असा जीवघेणा हल्ला झाला. त्यातले 9 जण जागीच दगावले होते.
 
काहीतरी किडूक-मिडूक चोरण्यासाठी ज्या पाशवी पद्धतीने माणसांची कत्तल झाली ते पाहता हे काम कोणा विकृत माणसाचं असावं अशी पोलिसांनाही शंका होतीच. पण बचावलेल्या लोकांपैकी एकानेही हल्लेखोराला पाहिलं नव्हतं. त्यामुळे गुन्हेगारापर्यंत पोहोचणं अवघड होतं.
 
रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची चौकशी सुरू झाली. संपूर्ण परिसरात रात्रीची गस्त सुरू झाली. त्या वेळी रमण राघव असं नाव सांगणारा इसम पोलिसांच्या तावडीत आलेला होता. पण कुठलाच पुरावा नसल्याने त्याला सोडून दिलं गेलं. त्याला मुंबईबाहेर तडीपार केलं गेलं.
 
दोन वर्षांनंतर हाच रमण राघव उर्फ सिंधी दलवाई उर्फ तंबी उर्फ अण्णा उर्फ वेलुस्वामी आणि अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणारा नराधम मायानगरीत परतला आणि अनेक निरपराध गरिबांचा त्यानं हकनाक बळी घेतला.
 
दोन वर्षांनी पुन्हा कांड
1968 च्या मध्यात पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर तशाच पद्धतीचं कांड झालं. रस्त्यावर झोपलेल्या निरपराध्यांच्या डोक्यात जड अवजाराने आघात करत खून केले गेले.
 
पोलिस रेकॉर्डवर रमण राघव उर्फ सिंधी दलवाईने 24 खून केले असं असलं तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा असावा, असं मानलं जातं. त्या वेळी नव्याने पद मिळालेले तरुण पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी या केसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
 
हेच रमाकांत कुलकर्णी पुढे महाराष्ट्राच्या पोलीस महामहासंचालक पदावरून निवृत्त झाले. गुन्हेगाराच्या तपासाची त्यांची पद्धत त्या वेळी खूप गाजली होती. शेरलॉक होम्सची उपमा त्यांना दिली जायची.
 
निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 'Footprints on the Sand of Crime' नावाने लिहिलेल्या पुस्तकात आव्हानात्मक केसेसची माहिती आणि अनुभव नोंदवले आहेत. त्यात 'सीरिअल किलर' नावाच्या प्रकरणात त्यांनी रमण राघवला कसं पकडलं आणि त्याच्याविरुद्धच्या खटल्याविषयी विस्ताराने लिहिलं आहे.
 
"बॉलिवूड चित्रपट आणि तत्सम मजकुरावर पोसलेल्या पिढीला पोलिसांनी गुन्हेगाराला पकडलं की, प्रकरण संपतं असं वाटतं, पण पोलिसांसाठी तिथे ते सुरू होतं.
 
भारतीय न्यायव्यवस्थेत आरोपीने पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब ग्राह्य धरला जात नाही. मॅजिस्ट्रेटसमोर त्याला कबुली द्यावी लागते आणि पोलिसांनाही न्यायालयात वेगळे पुरावे सादर करावेच लागतात. तरच त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होऊ शकतो."
 
कसा सापडला सीरिअल किलर?
रमाकांत कुलकर्णी या तरुण तडफदार अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांकडच्या जुन्या नोंदी तपासल्या, तेव्हा दोन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यावरच्या हत्याकांडप्रकरणी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.
 
तो रमण राघवच या वेळीसुद्धा गुन्हेगार असू शकतो अशी शंका त्यांना आली आणि त्यांनी तपासाचे धागेदोरे त्यादृष्टीने जोडायला सुरुवात केली. रमण राघव अनेक नावांनी ओळखला जायचा. त्याला तडीपार केल्यानंतरचं त्याचं रेकॉर्ड पोलिसांकडे नव्हतं.
 
रस्त्यावरचं आयुष्य असणारा भुरटा गुन्हेगार असल्याची नोंद असल्याने त्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा एक पत्ता असण्याची शक्यता नव्हती. कुण्या पोलिसी खबऱ्याकडूनही त्याची काहीच माहिती हाती लागत नव्हती.
 
सर्वसामान्य दिसणारा आणि अगदी दरिद्री, रस्त्यावरचं आयुष्य जगणाऱ्या भणंग माणसाच्या शोधासाठी त्या काळीसुद्धा अख्खं मुंबई शहर पालथं घालणं ही काही सोपी गोष्ट नव्हतीच.
 
शिवाय या अंधारात मारलेला तीर योग्य ठिकाणी असला तरच या कोम्बिंग ऑपरेशनला अर्थ होता. कारण रमण राघव किंवा सिंधी दलवाई किंवा तंबीविरोधात तोपर्यंत काहीच सबळ पुरावा पोलिसांकडे नव्हता.
 
रमाकांत कुलकर्णी यांच्या पुस्तकातल्या नोंदीनुसार, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अलेक्स फिआल्हो या तरुण पोलिसाच्या सतर्कतेमुळे रमण राघवला जेरबंद करण्यात यश आलं.
 
'क्राइम वायर'ने दिलेल्या लेखात फिआल्हो यांनी सांगितलेला अनुभव नमूद केलेला आहे. फिआल्हो सांगतात, "माझ्या खिशात त्या सीरिअल किलरचं रेखाचित्र असायचंच. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहात असताना बसस्टॉपवर मला त्या रेखाचित्रातल्यासारखा एक माणूस खाकी हाफपँट आणि निळ्या शर्टात दिसला.
 
त्याच्याकडे असलेल्या ओल्या छत्रीमुळे माझा संशय बळावला, कारण त्या वेळी मी होतो त्या दक्षिण मुंबईच्या परिसरात अजिबात पाऊस नव्हता. त्याला त्यासंदर्भात हटकलं तर तो आपण मालाडहून आल्याचं म्हणाला. मुंबईच्या याच भागात दोन दिवसांपूर्वी चौघांचा खून झाला होता."
 
त्याला पोलीस चौकीत नेऊन कसून चौकशी केली तेव्हा त्याच्याजवळ एक हाफरिम चश्मा आणि शिंपी सुई लागू नये म्हणून वापरतात तो धातूचा अंगठा होता. मालाड हत्याकांडात एका टेलरचाही खून झाला होता आणि त्याचीच ती वस्तू होती.
 
27 ऑगस्ट 1968 ला रमण राघवला अटक करण्यात आली. कबुलीजवाब, कोर्टात केस, निकाल, हायकोर्टापुढे पुन्हा सुनावणी असं करत करत त्याच्या गुन्ह्याविषयी अंतिम निर्णय यायला 1968 चा ऑगस्ट महिना उजाडला.
 
चिकन चापल्यानंतरच उघडलं तोंड
रमण राघव नावाचा हा सीरिअल किलर विकृत आहे यात तर शंका नव्हतीच पण तो किती लहरी आणि विक्षिप्त आहे याचाही अंदाज पोलिसांना पदोपदी यायला लागला.
 
रमाकांत कुलकर्णींच्या पुस्तकात म्हटलं आहे त्यानुसार, त्याला तोंड उघडायला लावणं सोपं नव्हतं आणि पोलिसांची खरी कसोटी तिथेच सुरू झाली. थोडं चुचकारून, त्याला बोलतं करावं लागेल हे कुलकर्णी यांनी ओळखलं.
कारण पोलिसी खाक्या दाखवून झाला होता. पण हा प्राणी त्याला बधला नव्हता. तुला काय पाहिजे असं विचारताच रमण राघव 'मूर्ग' असं म्हणाला. आणि त्याला खरोखर चिकनची उत्तम डिश मागवून खाऊ घालण्यात आली.
 
मग त्याने आपल्याला सुगंधी तेल आणि आरसा हवा, अशी मागणी केली. सुगंधी तेलाने स्वतःच्या डोक्याला या माणसाने मालिश केलं. आणि हे असं 'तृप्त' झाल्यावर तो आपणहूनच पोलिसांना म्हणाला, 'बोला... आता तुम्हाला काय हवंय?'
 
त्यानंतर खरोखरच त्याने पोलिसांबरोबर जाऊन खून केल्याची ठिकाणं, त्यासाठी वापरलेला लोखंडी आकडा कुठे ठेवला होता ते ठिकाण, खून केला त्याठिकाणाहून उचललेल्या काही किडूक-मिडूक वस्तू हे सगळं त्यानं दाखवलं. वर मॅजिस्ट्रेटसमोर असाच कबुली जबाब देण्याचं आश्वासनही दिलं.
 
आधी फाशी आणि नंतर जन्मठेप
रमण राघवविरोधातली केस कनिष्ठ न्यायालयात सुरू होती तेव्हा त्याने अत्यंत निर्विकारपणे कबुलीजबाब दिला होता. त्याची मनस्थिती विचलित असल्याचं दिसत नसल्याचं न्यायालयाने नोंदवलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
 
फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थेट होत नाही. त्यासाठी उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब होणं आवश्यक असतं. त्यानुसार सीरिअल किलरच्या फाशीची ही केस हायकोर्टात उभी राहिली.
 
रमण राघव मनोरुग्ण आहे का, गुन्हा करताना त्याची मानसिक स्थिती ढासळलेली होती का याचा शोध घेण्यासाठी हायकोर्टाच्या आदेशानुसार मनोविकार तज्ज्ञांचं पॅनेल नेमलं गेलं.
 
रमण राघव सांगतो की, त्याला कायदा पाळावाच लागला.
 
"ही माणसं मारण्याचे त्याला वरूनच आदेश होते, असं काही तो बरळतो. याचा अर्थ आरोपी कुठल्यातरी आभासी जगात वावरत असताना त्याने ही कृत्ये केली. त्याला chronic paranoid schizophrenia असल्याचं निदान झालं आहे. म्हणूनच फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेप दिली जावी आणि त्याच्यावर उपचार व्हावेत", असं हायकोर्टाने 4 ऑगस्ट 1987च्या निर्णयात म्हटलं होतं.
 
पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?
स्किझोफ्रेनिया किंवा ज्याला मराठीत छिन्नमनस्कता म्हणतात, हा मानसिक आजार आहे. पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया झालेली व्यक्ती दुभंग व्यक्तिमत्वाची असते. आभासी जगात वावरत असते.
 
कोणीतरी आपल्याशी बोलत आहे, आपल्या कानात आवाज येत असल्याचे भास अशा व्यक्तींना होतात आणि ते बहुधा नकारात्मक विचारांच्या आहारी जातात. या हॅल्युसिनेशन्समुळे अशा व्यक्ती आक्रमक होतात आणि त्यातूनच दुसऱ्याची हत्या करण्याचे विचार मनात येतात.
 
डॉ. आनंद पाटकर या मनोविकार तज्ज्ञांनी 70 च्या दशतात तुरुंगात असणाऱ्या रमण राघवशी काही काळ संवाद साधला होता. त्याविषयी इंडियन एक्स्प्रेसने बातमी दिली होती. डॉ. पाटकरांनी नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार क्रोनिक पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामुळेच त्याच्यात homicidal tendencies म्हणजे दुसऱ्याचा जीव घेण्याची मनोवृत्ती बळावली.
 
पुण्याच्या येरवड्यात अंत
मुंबईच्या इतिहासातल्या या महाभयंकर, विचित्र, मनोविकृत सीरिअल किलरला अखेर आजन्म कारावासाची शिक्षा झाली आणि त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली.
 
तिथे त्याची मनोवस्था काय होती, त्याच्यावर खरोखर उपचार झाले का, याविषयी माहिती उपलब्ध नाही. पण एप्रिल 1995 मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात किडनीच्या विकाराने रमण राघवचा मृत्यू झाला.
 






Published by- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

हैदराबादमध्ये मनमोहन सिंग यांची प्रतिमा बसवणार, रेवंत रेड्डींची माजी पंतप्रधानांना 'भारतरत्न' देण्याची मागणी

नववर्षापूर्वी पुण्यात मोठी कारवाई, एक कोटी रुपयांची दारू जप्त, नऊ जणांना अटक

LIVE: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नितीश राणेंवर जोरदार टीका केली

केरळला मिनी पाकिस्तान म्हणाले नितीश राणेंना द्वेष मंत्रालयाचे मंत्री करा, संतापले अबू आझमी

दिल्ली आणि काश्मीरला जोडणाऱ्या 5 नवीन आधुनिक रेल्वे सुरू होणार

पुढील लेख
Show comments