मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे. ही स्थिती बघता प्रशासन सर्तक झालं असलं तरी गंभीर बाब म्हणजे पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढत आहे. यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी म्हटले की परिस्थिती अटोक्यात आली नाही तर येत्या २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल.
पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठकीत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला गेला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतची वार्निंग दिली आहे. त्यानी स्पष्ट केले की नियम पाळले नाही तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल.
त्यांनी म्हटले की लॉकडाऊन केला तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो अशात आवाहन केले गेले की लोकांनी नियम पाळावे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झाला असला तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे आणि जर परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल, असे त्यांनी म्हटले. २ एप्रिलपर्यंत कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो अशात सर्वांना आवाहन केले गेले की नियम पाळा, मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा आणि सॅनिटायझर वापरा, असं अजित पवार म्हणाले.
नवे नियम
खासगी रुग्णालयात ५० टक्के बेड करोनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
१ तारखेपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद केले पाहिजे.
शाळा आणि महाविद्यालयं ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.
मॉल, चित्रपटगृहांसाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम लागू असेल.
सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील.
लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक संख्या मान्य नाही.
अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी असेल.
सार्वजनिक उद्याने, बाग- बगीचे केवळ सकाळी सुरू राहतील.
गुरुवारी दिवसभरात पुण्यात तब्बल ३ हजार २८६ नवे रुग्ण आढळले आहेत. २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्यातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा २ लाख ४७ हजार ६२९ पर्यंत पोहोचला आहे.