पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत महापालिका प्रशासनाने निर्गमित केलेल्या विविध सूचना आणि आदेशांचे उल्लंघन करणा-या ४५ हजार १४३ व्यक्तींवर महापालिकेने कारवाई केली असून सुमारे २ कोटी ८ लाख ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
विनामास्क आढळलेल्या व्यक्तींची संख्या ३९ हजार ८२७ असून त्यांच्याकडून १ कोटी ९९ लाख १३ हजार ५१४ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या ५ हजार २८६ व्यक्तींकडून ८ लाख ४१ हजार ४०० रुपये तर फिजीकल डिस्टंसिंगचे उल्लंघन करणा-यांकडून ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कारवाई सुरु राहणार असून नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.