मगरपट्टा चौकातील वाहतुकीमध्ये केलेला बदल वाहनचालक आणि नागरिकांना पहिल्याच दिवशी जीवघेणा ठरला. या चौकासमोर महापालिकेचे अण्णासाहेब मगर रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका आणि रुग्णांना या चौकातील वळण बंद केल्याने मोठी गैरसोय झाली. पहिल्याच दिवशी मगरपट्टा चौक ते वैदूवाडी चौकापर्यंत वाहनांच्या खच्चून रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका वाहतूककोंडीत अडकल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सोलापूर रस्त्यावर वैभव चित्रमंदिर ते वैदूवाडी चौक आणि चंदननगरकडून येणाऱ्या वाहनांच्या मगरपट्टा चौकापर्यंत खच्चून रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्याऐवजी विस्कळीत केल्याचा थेट आरोप वाहनचालकांकडून केला गेला. ही स्थिती अशीच राहिली, तर रुग्णवाहिका वाहतूककोंडी अडकून रुग्णांचे उपचाराविना प्रचंड हाल होतील, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने नियोजन बदलावे, अशी मागणी अभ्यासकांकडून होत आहे.
मगरपट्टा चौकातील उड्डाण पुल वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभारला आहे. तो चुकीचा असेल तर पाडून पुन्हा नियोजन करणार की काय, अशी विचारणाही नागरिकांकडून सुरू झाली आहे. उड्डाण पुलावरून पुण्याकडे, चंदननगरकडे आणि चंदननगरकडून येऊन पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू होती. मात्र, आता चंदननगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचा वापर होणार नसेल, तर उड्डाण पाडावा लागणार आहे. त्याचबरोबर उड्डाण पुलाच्या बाजूचा रस्ता अरुंद असल्यामुळे उड्डाण पाडून रस्ता रुंद करण्याचे नियोजन आहे की, काय अशी विचारणाही नागरिकांबरोबर वाहनचालकांकडून होऊ लागली आहे.
मगरपट्टा चौक ते वैदूवाडी चौक दरम्यान वाहतूककोंडी सतत असून, मगरपट्टा चौकातून वळण घेण्यास बंदी घातल्याने त्यामध्ये आणखी भर पडली आहे. मगरपट्ट्यातून पुण्याकडे जाणारी पुलावरील वाहतूक बंद करून पुलाच्या बाजूने पुढे जाऊन पुलाखालून पुण्याकडे जाण्याचे नियोजन केले आहे. मात्र, त्यामुळे पुण्याकडून हडपसरकडे आणि हडपसरकडून पुण्याकडे येणारी वाहनांना अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलिसांचीही त्रेधातिरपीट उडाली आहे.