Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री रामाचे अभंग मोक्षोपाय

Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2023 (14:07 IST)
भक्‍तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी ।
 
भक्‍तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥
 
भक्‍तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥
 
जो अज्ञानमदांधदैत्यदमनीं वीराग्रणी कीं असे ।
 
देवा सोडविता समर्थ प्रभु हा यावीण त्राता नसे ॥
 
देहाहंकृतिमत्तरावण असा ज्या योगि जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥२॥
 
वैराग्यात्मक द्या सदा मन महारुद्रासि या चेतना ।
 
सीता स्वानुभवात्मिका जननि जैं व्हावी तुम्हां पालना ॥
 
ज्याचा आश्रय लाभतांचि विषयव्यामोह जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥३॥
 
मी गोरा बहु वा कुरुप मज हें तारुण्य वृद्धाप्य वा ।
 
मी हा ब्राह्मण क्षत्र वा वणिज वा मी शुद्र आलों भवा ॥
 
श्रीमान् विश्‍व दरिद्रि स्त्री पुरुष मी हा भाव जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥४॥
 
मी थोटा बहिरा मुका असत मी पंगू तसा अंध वा ।
 
मी हा चंचल धीत भ्याड जड वा विद्वान्सुखी खिन्नवा ॥
 
मी हा बद्ध विमुक्‍त शिष्य गुरु वा हा भाव जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥५॥
 
जें सच्चिद्‌घन दिव्य सौख्य मिति ज्या लाभे न वेदांतरीं ।
 
जे का वेद वदे स्वरुप असकें तें रामरुपांतरीं ॥
 
येतां प्रत्यय हा न दुःख भविचें भिन्नत्व जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥६॥
 
योगायोगिं वसे तनू न कसला त्या पाश विश्‍वांतरीं ।
 
ज्यातें ब्रह्मचि मी अखंड असतें रामकृपें अंतरीं ॥
 
’मी, हा हें मम’ या न बंध कसला अज्ञान जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥७॥
 
’मी मी’ जें निज अंतरीं स्फुरत तें पुर्वील सच्चित्सुखीं ।
 
नेवोनी विलया त्यजूनि अवघें श्रीराम ठेवा मुखीं ॥
 
संसारीं प्रभुभक्‍ति धर्म जगवा जीवत्व जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥८॥
 
माझ्या अंतरिं जें असें प्रगटलें तें दाविलें हें असें ।
 
जाणोनि निजरुपिं चित्त जडवा श्रीराम त्राता वसे ॥
 
ऐक्यत्वें जरि रामपाद गवसे मायाहि जीवा मुके ।
 
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥९॥
 
रचनाकार - श्रीधरस्वामी महाराज

संबंधित माहिती

Gautam Buddha Stories भगवान बुद्ध यांच्या 5 प्रेरणादायी कथा

Solah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

somvar mahadev mantra jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

Somwar Aarti सोमवारची आरती

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments