Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे नितीन गडकरी भेटीनंतर भाजप-मनसे युती चर्चेला उधाण

Webdunia
सोमवार, 4 एप्रिल 2022 (07:11 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर केलेलं भाषण चर्चेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली आहे.
 
राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात दोन तास भेट झाली. मात्र ही भेट वैयक्तिक असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
 
या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये गडकरी म्हणाले, "माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं."
 
नितीन गडकरी पुढे म्हणाले, "परवा ह्रदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही."
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत. शनिवारी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती.
 
राज ठाकरे यांनी केलेलं भाषण भाजपप्रेरित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मनसे भाजपचा ब संघ झालाय का अशा चर्चांना उधाण आलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबाच दिला होता. यावरून मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येणार का हे पाहणंही रंजक ठरणार आहे.
 
याआधीही भाजप-मनसे एकत्र येणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र पुढे काही निष्पन्न झालं नाही. 2019 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली. शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांनी सरकार तयार केलं. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडता आलेलं नाही.
 
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह सरकार स्थापण्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
 
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जातीपातीचं राजकारण केलं असा आरोपही केला. अंडरवर्ल्डशी संबंध असलेले नेते तुरुंगात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
 
ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावा असं राज ठाकरे म्हणाले. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?" असा प्रश्न त्यांनी केला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments