Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकीकडे संघाची नाराजी, दुसरीकडे नेत्यांची शरद पवारांकडे घरवापसी; अजित पवारांसाठी आता अस्तित्वाची लढाई

Webdunia
शुक्रवार, 19 जुलै 2024 (08:14 IST)
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्यासमोर आव्हानं वाढली आहेत. एका बाजूला आपल्यासोबत आलेल्या आमदारांना कायम ठेवण्याचं आव्हान, तर दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष म्हणून कायम राहण्याचं आव्हान.
 
याचं कारण म्हणजे आरएसएसशी संबंधित असलेल्या 'विवेक' या साप्ताहिकातील एका लेखात महायुतीला आलेल्या अपयशाचं खापर अजित पवार यांच्यावर फोडलं आहे.
 
यापूर्वीही संघाचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या 'द ऑर्गनायझर' मध्येही अजित पवार यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे भाजपला फटका बसल्याचं यापूर्वी म्हटलं गेलं होतं.
यामुळे अजित पवार यांच्यासोबत युती तोडण्यासाठी आरएसएसकडून दबाव आणला जातोय का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
तर दुसरीकडे जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येतेय तसं आपल्यासोबत आलेले पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपल्या सोबतच राहतील याचीही खबरदारी अजितदादांना घ्यावी लागणार आहे. कारण अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे.
अजित पवार यांचं वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमधून 4 पदाधिकाऱ्यांसह एकूण 24 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे एकूणच अजित पवार यांच्यासाठी आगामी काही महिने अस्तित्त्वाची लढाई असणार आहे.
 
महाराष्ट्रात लोकसभेत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना महायुतीला 48 पैकी केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला. तर महाविकास आघाडीने 30 जागांवर बाजी मारली.
 
'अजित पवार यांच्यासोबतची युती भोवली'
आरएसएसचे मुखपत्र 'द ऑर्गनायझर' मध्ये महिन्याभरापूर्वी अजित पवार यांच्यासोबतची युती आणि काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झालं या पद्धतीचं विश्लेषण करण्यात आलं होतं.
 
हे प्रकाशित होऊन महिनाही उलटला नाही तोवर आरएसएसशी संबंधित साप्ताहिक 'विवेक'मध्ये 'भाजपचं केडर, 'हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही, तर हरवलेला आहे, संभ्रमात आहे.' असं म्हटलं आहे.
 
'कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात!' या मथळ्याखाली छापलेल्या लेखात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याचं म्हटलं आहे.
या लेखात म्हटल्यानुसार, 'लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे.'
 
'अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच. शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या.
 
हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते.'
 
'मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसर्‍या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे.
 
अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच,' असं स्पष्ट यात म्हटलं आहे.
 
याचा अर्थ महायुतीला आलेलं अपयश अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने आणि आता हे राजकीय गणित चुकल्याचंही स्पष्ट झाल्याचं म्हटलं आहे.
यामुळे साधारण नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ही निवडणूक लढवताना भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीतील अजित पवार यांच्या पक्षाचं स्थान स्थिर नाही किंवा काही मोठा निर्णय याबाबत होऊ शकतो असे संकेत यातून मिळतात.
 
या लेखात पुढे म्हटलं आहे की, 'कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे.
 
लेखात आधी उल्लेखिल्याप्रमाणे भाजपामधील कार्यकर्त्यांतून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया, जे भाजपाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे ती प्रक्रियाच पुढील काळात दुर्मीळ होत जाईल की काय, अशी एक प्रकारची भीती वा शंका कार्यकर्त्यांच्या मनात घर करू लागली आहे.'
 
तसंत यात भाजपमध्ये बाहेरून आलेल्या (विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून आलेल्या) नेत्यांना मोठं केलं गेलं किंवा भाजपच्या मूळ नेत्यांपेक्षा जास्त संधी दिल्या गेल्या यावरही भाष्य करण्यात आलं आहे.
 
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवडमध्ये खिंडार
पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. यामुळे अजित पवार यांनी पक्षावर दावा केल्यानंतर तसंच युतीत सामील झाल्यानंतर पिंपरीतूनही अजित पवार यांना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं समर्थन मिळालं.
 
परंतु लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांना मोठं यश आलं. आणि आता विधानसभेच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमधून 4 पदाधिकारी आणि 24 जणांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
 
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह 15-16 नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
यात अजित गव्हाणे (शहराध्यक्ष), हणमंतराव भोसले (माजी महापौर), वैशाली घोडेकर (माजी महापौर), पंकज भालेकर ( माजी नगरसेवक), प्रवीण भालेकर (माजी नगरसेवक), संगीता ताम्हाणे, रवी आप्पा सोनवणे, यश माने (माजी नगरसेवक), संजय नेवाळे, वसंत बोराटे (माजी नगरसेवक), विजया तापकीर (माजी नगरसेवक), राहुल भोसले ( शहर कार्याध्यक्ष), समीर मासुळकर ( माजी नगरसेवक) यांच्यासह 24 जणांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतॱ प्रवेश केला आहे.
 
लोकसभेतही बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांची हाती निराशा आली, कारण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांनी निवडणुकीत उभं केलं होतं. परंतु यात सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला होता.
 
बारामतीत आलेल्या पराभवानंतर आता अजित पवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येही एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नगरसेवक शरद पवार यांच्याकडे पुन्हा परतल्याने हा सुद्धा एक मोठा धक्का अजित पवार यांच्यासाठी आहे.
 
अजित पवार यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई?
2 जुलै 2022 रोजी विरोधी पक्षात असलेल्या अजित पवार यांनी अचानक राजभवन गाठलं आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर 8 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
अजित पवार यांचा हा राजकीय डाव इथपर्यंतच थांबला नाही तर यानंतर एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आणि आपणच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत असाही दावा करण्यात आला.
 
एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच कायदेशीर लढाईचा निकाल त्यांच्याबाजूने लागला
या घटनाक्रमाच्या सुमारे वर्षभरानंतर म्हणजेच युतीत सामील झाल्यानंतर लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेससाठीही पहिली निवडणूक होती. परंतु यात चार पैकी केवळ एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकता आली.
 
तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनालाही पक्षाच्याच नेत्यांनी पक्षापासून त्यांचे परंपरागत मतदार म्हणजे अल्पसंख्याक समाज, आदिवासी, दलित दूर गेल्याचं मत मांडलं गेलं.
 
भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आपला परंपरागत मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येत आहे.
 
हे आव्हान समोर असतानाच आता अजित पवार यांच्यासमोर अनेर नवीन राजकीय पेच आहेत.
 
आरएसएसच्या संलग्नित साप्ताहिकातून थेट टीका होत असताना आगामी काळात भाजपसोबत राहण्याचं तसंच जागा वाटपातही भाजपसोबत जुळवून घेण्याचं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय जोग बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "जो लेख छापून आलाय यावरून असं दिसतं की भाजपला अद्याप लोकसभा निकालातील फटका अजून पचवता आलेला नाही. तसंच आगामी निवडणुकीसाठी त्यांना नरेटिव्हची आवश्यकता आहे परंतु त्यासाठी ते अजूनही चाचपडत आहेत. तसंच आपली चूक लपवण्यासाठी किंवा झाकण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असू शकतो."
 
परंतु हे सुद्धा खरं आहे की अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपचा मूळ केडर, स्वयंसेवक ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष खूप काम केलं, त्यांच्यात मात्र मोठी नाराजी आहे असंही ते सांगतात.
 
"स्वतः नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांचायाबाबतीत 70 हजार कोटींचा घोटाळा असं चित्र रंगवलं आणि काही महिन्यात त्यांनाच त्यांच्या आमदारांसकट पक्षात घेतलं. त्याचेच पडसाद आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटताना दिसत आहेत. पक्षासाठी झटणारे, राबलेले, पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांची दखल घेतलेली नाही हे यातून दिसतं," असंही संजय जोग सांगतात.
 
तसंच या परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्यासोबत त्यांचे आमदार कायम राहतील का? असंही आव्हान अजित पवार यांच्यासमोर उभं आहे.
संजय जोग सांगतात, "अर्थात अजित पवार यांच्यासाठी आगामी काळ कठीण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना 13 जागा मिळतील असं चित्र होतं. पण प्रत्यक्षात मिळाल्या केवळ 4 जागा आणि त्यातही निवडून आली केवळ एक जागा. तसंच स्वतःच्याच काकांचा कुठेतरी विश्वासघात करून ते सत्तेत सामील झाले असाही एक संदेश किंवा प्रतिमा जनतेत गेल्याने त्याबाबत लोकांमध्ये असंतोष आहे.
 
यामुळे अजित पवार यांना आपली जुनी प्रतिमा वाचवावी लागणार आहे. ती म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर ही प्रतिमा जपावी लागणार आहे. भाजपसोबत असूनही आम्ही दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम मतदार पुन्हा मिळवण्यासाठी काम करावं लागणार आहे."
 
शिवाय, हे करत असताना आपल्या पक्षासाठी स्वतंत्र नरेटिव्हची बांधणी करावी लागेल, पक्षाच्या नेत्यांना, पदाधिका-यांना भाजपसोबत गेलो असलो तरी मूळ विचारधारा कायम आहे, त्याच्याशी तडजोड केलेली नाही हे सुद्धा पटवून द्यावं लागणार आहे असंही ते सांगतात.
 
दरम्यान, या संदर्भात पक्षचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत उत्तर देणं टाळलं.
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, "महाराष्ट्रात भाजप, आरएसएसचं राजकारण कायम पवार कुटुंबाविरोधात राहिलेलं आहे. त्यात त्यांनी अजित पवार यांना सोबत घेतलं. यामुळे जनतेत नाराजी तर दिसून आलीच पण पक्षांतर्गतही अस्वस्थता आहे. तसंच निकालानंतर अजित पवार गटाचाही आत्मविश्वास कमी झालेला आहे.
 
'विवेक' या मराठी मुखपत्रातून अजित पवार यांच्यावर टीका करत ते अजित पवार यांच्यावर खापर टाकून मोकळे होत आहेत. तसंच ते भाजप आणिअजित पवार यांनाही इनडायरेक्टली संदेश देऊ पाहत आहेत की या युतीबाबत निर्णय घ्या."
 
ते पुढे सांगतात, "देवेंद्र फडणवीस म्हणतात की वरच्या नेत्यांनी युती केली. त्यांच्यावर केवळ अंमलबजावणीचं काम होतं.पण हेराजकीय गणित बॅकफायर झालं.त्यामुळे या आलाईनमेंटचा फायदा विधानसभेला होणार नाही अशी शंका आरएसएसला आहे.
 
अजित पवार यांच्यासाठी भाजप, आरएसएसकडून एकाबाजूला गळचेपी तर दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे होणारं इनकमींग सुरू झाल्याने विधानसभेपर्यंत आमदार सोडून गेल्यास अजित पवार यांना भाजपसोबत वाटाघाटी करताना अडचणींचा सामना तर करावाच लागेल पण मोठं संकट उभं राहील"
 
यामुळे ही परिस्थिती पाहता आगामी काळात अजित पवार यातून कसा मार्ग काढणार हे पहावं लागेल.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ TMC ने दिली नोटिस

LIVE: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

MSRTC नवीन वर्षात प्रवाशांना खास भेट देणार आहे भरत गोगावले यांनी केली मोठी घोषणा

शरद पवार शेतकर्‍यांन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले

पुढील लेख
Show comments