Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना-भाजप भविष्यात एकत्र येऊ शकतात का?

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (14:59 IST)
मयांक भागवत,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शिवसेना-भाजप हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील काय यावर चर्चा सुरू झाली आहे.
 
त्यानंतर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली. आहे तर भाजप खासदार गिरिश बापट यांनी देखील म्हटले आहे की 'दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात.'
2019 ला भाजपशी फारकत घेत, शिवसेनेने महाविकास आघाडीची वेगळी चूल मांडली. तेव्हापासून, भविष्यात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतील का? यावर कामय चर्चा सुरू असते. पण मोदी-ठाकरे भेट तसेच, सरनाईकांचे पत्र या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा शिगेला पोहोचली आहे.
 
शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी पाच कारणं आहेत असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे तर त्याचवेळी काही राजकीय विश्लेषक असं म्हणतात की दोन्ही पक्ष आता एकमेकांपासून दूर झाले आहेत त्यांची एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे.
 
या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप हे दोन जुने मित्रपक्ष परत येऊ शकतात की नाही या गोष्टीचा आढावा घेतला आहे.
 
कोणत्या कारणांमुळे शिवसेना-भाजप एकत्र येऊ शकतात?
या 5 कारणांमुळे शिवसेना-भाजप एकत्र येऊ शकतात
 
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारणाच्या केंद्रस्थानी कायम असते ती सत्ता आणि सत्तेचे फायदे. त्यामुळे, भविष्यात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात, असं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.
 
याची पाच प्रमुख कारणं राजकीय विश्लेषक सांगतात,
 
हिंदुत्वाचा मुद्दा आणि दोन्ही पक्षांची नैसर्गिक मैत्री
कोरोनाकाळात मोदींच्या प्रतीमेला गेलेले तडे. त्यामुळे, पुन्हा मित्रांची जुळवाजुळव करण्याची रणनिती
केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना नेते आहेत.
राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारी सत्ता आणि फायदे त्याचे फायदे महत्त्वाचे.
भाजपला राष्ट्रवादीसोबत जाणं अडचणीचं ठरण्याची शक्यता
महाराष्ट्र टाईम्स नाशिकचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे म्हणतात, "शिवसेना-भाजप भविष्यात कधीच एकत्र येणार नाहीत असं नाही. पण, नजिकच्या काळात पुन्हा एकत्र येण्याची शक्यता दिसत नाही."
 
1. 'हिंदुत्व शिवसेना-भाजपतील सेतू'
 
शिवसेना-भाजपची युती हिंदूत्वाच्या मुद्यावर झाली होती. भाजपशी फारकत घेतल्यानंतरही, आमचं हिंदुत्व प्रखर आहे, तडजोड करणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी वारंवार बोलून दाखवली होती.
राजकीय विश्लेषक गजानन जानभोर सांगतात, "शिवसेना नेत्यांच्या मनात सतत चलबिचल सुरू असते. सरकार आता आहे, पण भविष्याचं काय? मराठी अस्मिता आणि हिंदुत्व शरद पवारांचा अजेंडा नाही. त्यामुळे, भविष्यात पवार काय निर्णय घेतील याची खात्री नाही. हिंदुत्वाचा धागा शिवसेना-भाजपतील सेतू आहे. या मुद्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहू शकत नाही. त्यामुळे, भविष्यात एकत्र येणं दोघांची गरज आहे."
 
वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. त्यामुळे, एकत्र येणं नाकारता येणार नाही, असं जानभोर पुढे म्हणतात.
 
2. कोरोना काळात मोदींच्या इमेजला बसलेला धक्का
 
कोरोनाची दुसरी लाट योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे उद्धव ठाकरेंचं देशभरात कौतुक झालं. तर, दुसरीकडे लसीकरण मोहीम, औषधांचा पुरवठा यामुळे नरेंद्र मोदी सरकारवर टीका झाली होती.
 
भाजपला शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची गरज निर्माण झाली आहे का, यावर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का बसलाय. त्यामुळे, भाजपची भूमिका बदलली आहे. नवीन मित्र जोडा, तोडलेल्या मित्रांना जवळ करा, अशी त्यांची रणनिती आहे," राष्ट्रीय स्वयंसेवक संघही शिवसेनेला पूर्णपणे न तोडण्याच्या भूमिकेचा असल्याचं त्यांना वाटतं.
शैलेंद्र तनपुरे पुढे सांगतात, "सामनातून मोदींवर टीका करण्यात आली असेल. पण, उद्धव ठाकरेंनी स्वत: नरेंद्र मोदींवर टीका केली नाही. त्यामुळे कुठेतरी एक धागा ते जोडू पहात आहेत. राज्यातील नेत्यांना किंमत न देता, केंद्रातील नेत्यांशी संबंध ठेवून आहेत."
 
3. तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना नेते
 
प्रताप सरनाईक ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. तर, कोकणात अवैध पद्धतीने रिसॉर्ट बांधल्याच्या आरोपांखाली उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे अनिल परब यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरू झालाय. सचिन वाझे प्रकरणी, अनिल परब यांच्यावरही आरोप झाले होते.
गजानन जानभोर पुढे म्हणतात, "शिवसेनेचे अनेक नेते ईडी, सीबीआयच्या रडारवर आहेत. या नेत्यांवरील संकट दूर व्हावं म्हणून, भाजपसोबत जुवळून घ्यावं असा मतप्रवाह शिवसेना नेत्यांमध्ये आहे."
प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात, 'भाजपसोबत जुळवून घेतल्याने आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणारा त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे,' असं म्हटलं आहे.
 
4. 'सरकारवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न'
 
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबद्दल आम्ही राजकीय जाणकारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
"राजकीय पक्ष म्हणून जिवंत रहायचं असेल. तर, सेनेला भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे, हे पत्र जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आलं," असं गजानन जानभोर म्हणतात.
काही राजकीय जाणकारांच्या मते, 2019 नंतर भाजपसोबत जाण्याचा पर्याय शिवसेनेसाठी बंद होता. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर हा पर्याय आता खुला झालाय.
 
अभय देशपांडे म्हणतात, "माझ्यासमोर पर्याय खुला आहे, असं दाखवून उद्धव ठाकरे, सरकारवरची आपली पकड मजबूत करण्यासाठी याचा वापर करतील असं दिसतंय."
 
काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेने उद्धव ठाकरे नाराज झालेत. त्यांनी आपली नाराजी शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलून दाखवली. पण युती आणि आघाडीत असूनही याआधीही राजकीय पक्षांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंना नाराज होण्याचं कारण नव्हतं, असं सुद्धा राजकीय जाणकारांना वाटतं.
अभय देशपांडे पुढे सांगतात, "सरनाईक यांचं पत्र म्हणजे, काँग्रेसला मेसेज आणि आता मी टर्म डिक्टेट करणार, असं दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. तसंच हे पत्र सार्वजनिक करण्याचा निर्णय पक्षाचाच असावा. भविष्यात आम्ही एकत्र येऊ शकतो असा संदेश जाणं महत्त्वाचं होतं."
 
5. राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे भाजपची प्रतिमा डागाळली?
 
अजित पवारांसोबत पहाटे घेतलेली शपथ माझी चूक होती, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. गजानन जानभोर सांगतात, "भाजपला माहितेय, राष्ट्रवादीसोबत जाऊन चुकीचा संदेश जातो. इमेजही खराब होते. त्यामुळे, सत्ता हवी असेल तर, नैसर्गिक मित्र शिवसेनेसोबत जाणं भाजपची गरज आहे."
 
अभय देशपांडेंच्या सांगण्यानुसार, "एकीकडे मोदींसोबत चर्चा आणि दुसरीकडे शिवसेना भवनासमोर हाणामारी. राजकारणात एकमेकांचे गळे पकडणाऱ्यांना, गळ्यात गळे घालण्यासाठी वेळ लागत नाही."
उत्तरप्रदेशात एकमेकांचे कट्टर विरोधक मायावती आणि अखिलेशही काही काळासाठी एकत्र आले. नरेंद्र मोदींना विरोध करून एनडीएबाहेर पडलेले नितीश कुमार आधी लालूंबरोबर गेले पण नंतर लगेचच त्यांची साथ सोडून भाजपबरोबर आले. आता ते भाजपसोबतच सत्तेत आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र येताना देशानं याआधीसुद्धा पाहिलं आहे.
 
शिवसेना भाजपला एकत्र येण्यासाठी काही कारणं जरी असली तरी शिवसेनेची वाटचाल वेगळ्या दिशेने असल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांचं आहे.
 
'भाजप-शिवसेना एकत्र येणार नाहीत'
राजकीय विश्लेषक जयदेव डोळे म्हणतात, "दोन सेक्युलर पक्षांसोबत सत्तेत असल्याने शिवसेना, सेक्युलरिझमकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागलीये. इतर प्रादेशिक पक्षांसारखी आपली भूमिका राहू शकते. हे शिवसेनेला लक्षात आलंय. म्हणूनच, उद्धव ठाकरे ममता आणि स्टॅलिन यांचं अभिनंदन करतात. याचा अर्थ, भाजपकडे जाण्याचा मार्ग कायमचा बंद केलाय."
 
"भाजपसोबत जाऊन आपला विकास खुंटतो हे शिवसेनेला समजलंय. एकीकडे उद्धव ठाकरेंची वाढलेली मान्यता आणि भाजपचं राजकारण पहाता ते एकत्र येतील असं वाटत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येतील आणि भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतील, अशी स्ट्रॅटेजी वाटते," असं ते सांगतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: नाना पटोले, अजित पवार, एकनाथ शिंदे पुढे

5 कोटींच्या आरोपावरून विनोद तावडेंवर कारवाई, राहुल-खर्गे यांना पाठवली 100 कोटींची नोटीस

20 हजारांच्या फरकाने विजयाचा दावा करत आहेत शिवसेना नेते मुरजी पटेल

लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद झाला, दुसऱ्या दिवशी अल्पवयीनने खून करून बदला घेतला

पुढील लेख
Show comments