राज्याचे माजी मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता यांची नेमणुक महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी (महारेरा) च्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. महारेरा अध्यक्षपदाच्या नेमणुकीसाठी तीन सदस्यीय समितीकडून अजोय मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ठाकरे सरकारकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अजोय मेहता यांचे विद्यमान पद असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागार पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे.
महारेराच्या अध्यक्षपदी असलेल्या गौतम चॅटर्जी यांचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे. आता या पदावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असे अजोय मेहता यांची वर्णी लागली आहे. त्यामुळेच मुंबई महानगर क्षेत्रात रिअल इस्टेट बुममध्ये शिवसेनाही सक्रीय झाल्याची चर्चा आहे. अजोय मेहता यांनी राज्याच्या प्रशासनात अनेक महत्वाच्या पातळीवर काम केले आहे. माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचे प्रधान सचिव, केंद्रीय दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांचे स्वीय सहाय्यक तसेच राज्याच्या ऊर्जा विभागापासून, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण ते मुंबई महापालिका आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये प्रशासकीय कारभाराचा हातखंडा असल्याचे अजोय मेहता यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे.