Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीस : 'आमचे 115 आमदार, तरीही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं'

Webdunia
गुरूवार, 7 मार्च 2024 (17:40 IST)
महाराष्ट्रात शिवसेनेतील फुटीनंतर घडलेल्या घडामोडींनी संपूर्ण राजकारण ढवळून निघालं. भाजपनं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या साथीनं सत्ता स्थापन केली. पण सर्वांत मोठा धक्का होता एकनाथ शिंदेंना मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाचा. या निर्णयावर भाजपचेही अनेक नेते त्यावेळी नाराज असल्याची चर्चा झाली होती. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेल्या उल्लेखामुळे पुन्हा यावर जोरदार राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडं म्हणजे भाजपकडं जास्त आमदार असूनही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिल्याचं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती भाजपनं केसानं गळा कापण्याचं काम करू नये, असं ते म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी शिंदेंना कमी आमदार असताना मुख्यमंत्री केल्याचं बोलून दाखवलं.
 
फडणवीस काय म्हणाले?
रामदास कदमांच्या टीकेवर पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर, "मी एवढे वर्ष रामदास कदमांना ओळखतो. त्यांना अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची किंवा टोकाचं बोलण्याची सवय आहे. कधी कधी रागानं ते बोलतात," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढं देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री करताना भाजपनं मोठं मन केल्याचा उल्लेख केला. "भाजपनं कायम शिवसेनेचा सन्मान केला आहे. आम्ही 115 आहोत तरीही आमच्याबरोबर आलेल्या शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं," असं फडणवीस म्हणाले. खरी शिवसेना आमच्याबरोबर आली त्याचं आम्हाला समाधान आहे. तसंच आम्ही भक्कमपणे शिंदेंच्या पाठिशी आहोत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही त्यांनी म्हटलं. "अनेक वेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आपलं महत्त्वं पटवून देण्यासाठी अशाप्रकारचं टोकाचं बोलत असतात. पण आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर लोकांनी अशा प्रकारची वक्तव्यं गांभीर्यानं घेऊ नये," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांवर प्रतिक्रिया दिली.
 
भाजपचे घृणास्पद राजकारण - कदम
रामदास कदम यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात हेतूपुरस्सर त्रास देत असल्याचं सांगत, जोरदार टीका केली. "महाराष्ट्रात आम्ही मोदी आणि शाहांच्या कामावर विश्वास ठेवून सोबत आलो आहोत. पण आमचा विश्वासघात होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. सध्याच्या आमच्या ज्या जागा आहेत, तिथंही भाजपचे उमेदवार जाऊन प्रचार करत आहेत. मतदारसंघावर दावे करत आहेत. प्रत्यक्षात विद्यमान खासदार असलेल्या ठिकाणीही बळजबरी केली जात आहे," असा आरोप रामदास कदमांनी केला. रत्नागिरी, मावळ, रायगड, संभाजीनगर याठिकाणी भाजप घृणास्पद राजकारण करत आहे. त्यामुळं मोदी आणि शहांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे कान उपटायला हवे, असंही कदम म्हणाले.
 
'केसानं गळा कापू नका'
"प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक सोबत आले त्यांचा केसानं गळा कापून तसं करायला नको. याद्वारे वेगळा संदेश जात असल्याचं भान भाजपच्या काही लोकांना असायला हवं," अशी टीका रामदास कदमांनी केली. "दापोलीत युती असताना भाजपनं माझ्या मुलाच्या विरोधात उघडपणे मतदान केलं. 2009 मध्ये युती असतानाच मला गुहागरमध्ये भाजपनंच पाडलं होतं," असा आरोपही त्यांनी केला. आताही माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये भाजपचे मंत्री चव्हाण आणि भाजप कार्यकर्ते बजेटची कामं आणून भूमीपूजन आणि उद्घाटनं करत आहेत. त्यात स्थानिक आमदाराला बाजुला सारलं जात आहे, असं कदम म्हणाले. असं असेल तर भविष्यात भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल भाजपच्या वरिष्ठांनी घ्यायला हवी. पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझं नावही रामदास कदम आहे. तिकिट जाहीर होईल तेव्हा पुन्हा या विषयावर बोलेल, असं त्यांनी सांगितलं.
 
भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांची प्रतिक्रिया?
महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वक्त्यांवमुळं जागावाटपाच्या मुद्द्यावरून काहीतरी कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चांना बळ आलं. या वक्तव्यांमध्ये छगन भुजबळ यांच्या मागणीचाही समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या आमदारांची संख्या सारखीच आहे. त्यामुळं त्यांच्या एवढ्याच लोकसभेच्या जागा मिळाव्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, कोणीही काहीही मागणी केली तरी जागावाटपाचा निर्णय वास्तविकतेवरच होईल. तसंच महायुतीत काहीही मतभेद नसल्याचंही फडणवीस म्हणाले. जागावाटपावरून आमच्यात काहीही गंभीर मतभेद नाहीत. दोन-तीन जागांवरून चर्चा सुरू आहे. पण त्यातही गंभीर काही नाही. त्यामुळं लवकरच जागावाटप पूर्ण करू, असं फडणवीसांनी सांगितलं. आमच्याबरोबरची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर मित्रपक्षांना सोबत घेऊनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. त्या सर्वांचा पूर्ण सन्मान आम्ही करणार आहोत, असा विश्वास पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यामुळं आता खरचं फडणवीस म्हणतात तसं महायुतीत सर्वकाही आलबेल आहे की, जागावाटपावरून सुरू झालेल्या कुरबुरी वाढत जाणार हे लवकरच म्हणजे जागावाटप होताच स्पष्ट होईल.
 
Published By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातून आणलेली वाघीण झीनत सिमिलीपाल अभयारण्यात सोडली

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, भाजप पुन्हा कोणता निर्णय घेणार?

महायुतीच्या विजयामुळे शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांनी 2 दिवसात 13 लाख कोटींची कमाई

वडिलांनी आपल्या जुळ्या मुलींना विष देऊन ठार केले, नंतर गळफास घेतला

लाडकी बहीण योजनेचा प्रभाव तर आहे, निकालानंतर शरद पवार यांनी स्वीकारले

पुढील लेख
Show comments