Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला?, अजित पवार यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला

Webdunia
बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (08:36 IST)
शिंदे गटातील एक आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशी भाषा करत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा… हात तोडा… हात तोडता आले नाही तर तंगडी तोडा… आरे ला कारे म्हणा… कोण अंगावर आलं तर कोथळा काढा अरे ही काय पध्दत आहे का? असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर ते बोलत होते.
 
पवार पुढे म्हणाले की, कुठे शाहू – फुले – आंबेडकरांचा महाराष्ट्र… आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृतपणा शिकवला… ज्यांनी नेहमी काम करत असताना कसे राजकारण केले पाहिजे हे या राज्याला संस्कार दिले त्या महाराष्ट्रात तोडा – फोडा – मारा ही भाषा केली जाते हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस, भाजपला पटते का ? असा संतप्त सवाल करतानाच दुसरीकडे शिंदे गटातील एका आमदाराने सरकारच्याच कर्मचाऱ्याला मारले आहे. तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहात. तुम्ही स्वतः ला कोण समजता… सत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला ? कुणीही व्यक्ती असली तरी त्यांना संविधान, कायदा, नियम सारखे असतात.कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. तो सरकारमध्ये असुद्या नाहीतर विरोधात यापध्दतीची भाषा… अजून तर कुठं सरकार नीट अस्तित्वात आले नाही तोपर्यंत सरकारमधील आमदारांना इतकी मस्ती आलीय का ? असा थेट हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर पत्रकार परिषदेत आज केला.
 
असे वर्तन करणार्‍यांना समजावून सांगण्याची जबाबदारी संबंधितांची नाही का? हे सगळं उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र बघतोय. आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना आणि ते पण आनंदाने १५ ऑगस्ट साजरा करत असताना देशाच्या आर्थिक राजधानीत अशी भाषा वापरली जाते. इथे तुम्ही अशी भाषा वापरत असाल तर त्या चांद्यापासून बांद्यापर्यत शेवटच्या माणसाची काय अवस्था होणार आहे या गोष्टीही लक्षात घ्या असेही अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस यांना सुनावले.
 
ज्याने कर्मचाऱ्याला मारले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तरी मी असाच वागणार इथपर्यंतची मस्ती काही आमदारांची झाली आहे. काहींवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु माणसाचं कधी – कधी चुकल्यानंतर माणूस चूक कबूल करतो परंतु ते राहिलं बाजूला… सत्ता लगेच डोक्यात गेली का? असा संतप्त सवाल करतानाच जेवढी जबाबदारी विरोधी पक्षांची तेवढीच जबाबदारी मिडियाची आहे त्यांनी अशा गोष्टीमध्ये पुन्हा कायदा हातात घेण्याचं धाडस होणार नाही अशी लेखणी चालवली पाहिजे असा सल्लाही दिला. अशा पध्दतीने वागणाऱ्या आमदारांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि ती लोकांना दिसली पाहिजे नुसतं मिलीभगत होता कामा नये. नाहीतर तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं नको. नुसतं कागदोपत्री अटक केल्यासारखं दाखवायचं आणि हात मिळवायचं आणि बोलायचं अटक केली होती आणि त्यांना जामीन मंजूर करायचा असली नौटंकी अजिबात चालणार नाही असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी दिला.
 
आज पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरत उद्या होणाऱ्या अधिवेशनाला विरोधीपक्ष सरकारशी कशापद्धतीने लढा देणार याची भूमिका स्पष्ट केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला असून याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे असे पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत त्याबद्दल काल राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय माजी आमदार विनायक मेटे यांचे दु:खद अपघाती निधन झाले. आपल्यातील एक चांगला सहकारी गमावला आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर आज जम्मू – काश्मीरमध्ये जवानांच्या गाडीला अपघात होऊन त्यातील शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहत आणि जखमींना लवकर बरं करण्याची प्रार्थना अजित पवार यांनी केली.
 
अधिवेशन कामकाज होत असताना ज्याप्रकारे हे सरकार सत्तेवर आले आहे त्या सगळ्याचा विचार केला तर हे शिंदेसरकार मुळातच लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत व विश्वासघाताच्या पायावर हे सरकार स्थापन झाले आहे असा घणाघाती आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. या सरकारला अद्यापही विधी मान्यता नाही. सुप्रीम कोर्टात वेगवेगळी प्रकरणे सुरू आहेत. अजूनही तारखा पडत आहेत. तिथलेही निकाल लागलेले नाहीत त्याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच कमी कालावधीचे हे अधिवेशन आहे असेही अजित पवार म्हणाले.
 
विदर्भ – मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. आजही भंडारा, गोंदिया जिल्हयात प्रचंड पाऊस पडत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी याअगोदर सरकारकडे लेखी पत्र देऊन केली आहे. आता हे मुद्दे सभागृहात घेणार आहोत. ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना ७५ हजार हेक्टरी जाहीर करा. फळबागांना हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत करा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. अशा मागण्या करुनही सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. आतापर्यंत १५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अजून ज्याप्रकारे पाऊस कोसळत आहे हे पहाता यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही अजित पवार म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल पुन्हा ईडीच्या तावडीत, निवडणुकीपूर्वी उघडले दारु घोटाळा प्रकरण

गुजरातमध्ये पार्सल उघडताच मोठा स्फोट झाला,खळबळ उडाली

मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला

LIVE: मंत्र्यांच्या खात्याशिवाय हिवाळी अधिवेशन संपत आहे-नितीन राऊत

जया बच्चन भाजपच्या जखमी खासदारांवर ताशेरे ओढत म्हणाल्या ते ऍक्टिंग करत असून त्यांना पुरस्कार द्यायला हवेत

पुढील लेख
Show comments