गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपानंतर गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने पुण्यात बेकायदेशीरपणे आंदोलन करणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 40 ते 50 प्रमुख नेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपूरे, सुशिल मेंगडे, संदीप खेडेकर, धीरज घाटे, दीपक पोटे, वर्षा तापकीर, कल्पना पुरंदरे, अर्चना पाटील यांच्यासह 40 ते 50 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 21) गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी अलका टॉकिजजवळील टिळक चौकात आंदोलन केले होते. यावेळी बेकायदेशीर गर्दी जमवून राज्य शासनाचे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.