Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज आहे – उद्धव ठाकरे

Webdunia
शनिवार, 30 जुलै 2022 (13:37 IST)
"मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही," असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
 
शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेसह सर्वच विरोधक राज्यपालांवर टीका करत असून, राज्यापालांनी माफी मागावी, अशी मागणी करत आहेत.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (29 जुलै) मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली. या चौकाचं नामकरण दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असं करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.
 
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणेही होते.
 
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय म्हणाले?
राज्यपालांच्या विधानाशी आपण सहमत नाही, मराठी माणसाचं योगदान नाकारता येणार नाही, मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई या देशाची आर्थिक राजधानी बनली आहे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं तर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यांशी आपण सहमत नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्राच्या जडणघडणीत सर्व क्षेत्रातील मराठी माणसाचा सहभाग जास्त आहे असं फडणवीस यांनी सांगितलं.
 
राज्यपाल कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज आहे - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महाराष्ट्राची संस्कृती पाहिली असेल, पण त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याचीही गरज आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केलीय.
 
महाराष्ट्राकडून सर्व ओरबाडलं आणि महाराष्ट्राचं आता अपमान केला जातोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "राज्यपालपदाचा अवमान करू इच्छित नाही. कारण ते मानाचं पद आहे. राष्ट्रपतींचे ते दूत असतात. मात्र, एक गोष्ट सत्य आहे की, त्या खुर्चीचा मान, त्या खुर्चीत बसवलेल्यांनीही राखायला पाहिजे. मात्र, भगतसिंह कोश्यारींनी तो मान राखला नाहीय. गेल्या तीन वर्षात त्यांची वक्तव्यं, हे पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्याच नशिबी अशी लोक का येतात, हा प्रश्न पडतो.
 
"मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या स्थितीतही या राज्यपालांना सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं उघडण्याची घाई झाली होती. मी त्यावेळी उत्तर दिलं. जबाबदारी पार पाडली. मध्यंतरी सावित्रीबाई फुलेंबाबतही वक्तव्यं त्यांनी केली होती."
 
राज्यपाल कोश्यारींनी मराठी माणसांचा अपमान केलाच आहे, त्याचसोबत त्यांनी हिंदूंमध्येही फूट पाडण्याचाही प्रयत्न केलाय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील इतर महत्त्वाचे मुद्दे -
 
* ही मुंबई कोश्यारींनी मुंबई करांना आंदण दिलेली नाही
* हा त्यांना अधिकार आहे का ? जातीपातील आग लावण्याचं केलंय?
* त्यांना फक्त घरी पाठवावं का तुरूंगात पाठवावं?
* ज्या महाराष्ट्राचं मीठ खातात. त्या मिठाशी नमकहरामी केलीय.
* नवहिंदुत्व असलेल्या सत्ताधारी नवहिंदूंनी राज्यपालांबाबत भूमिका घेतली पाहिजे
* कोश्यारींनी राज्यपाल पदाची शान घालवली. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे
* त्यांच्या पोटात बसून कोणी त्यांच्या ओठावर हे वक्तव्य आणलंय का पहावं लागेल
मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता - राज्यपाल कोश्यारी
आपल्या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी स्पष्टीकरण देणारं पत्रक जारी केलं आहे.
 
स्पष्टीकरणात कोश्यारी म्हणाले की, "मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
"काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.
 
"पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे," असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले आहे."
 
कोश्यारी काय म्हणाले होते?
भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, "राजस्थानी मारवाडी समाजाने व्यावसाय करताना केवळ पैसा कमवला नाही, तर शाळा-महाविद्यालये दवाखाने बांधली आणि गोरगरिबांची सेवा केली. हा समाज देशात तसेच नेपाळ, मॅरिशस आदी देशांमध्ये देखील आहे. हा समाज जातो तेथे आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो."
 
"महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही," असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही राज्यपालांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे.
 
भाजपनं राज्यपालांच्या वक्तव्यापासून अंतर राखलं आहे.
 
त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत राज्यपालांवर टीका केली आहे.
 
अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले की, "महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसले जातात. आम्ही चटणी-भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा."
 
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, "महामहिम राज्यपाल या पदाला आणि त्या गरिमेला अशोभनीय अशी ही टिप्पणी आहे. 'फोडा आणि राज्य करा' ही ब्रिटिश पद्धत आपल्याच लोकांकडून आपल्याच लोकांसाठी वापरली जाते."
 
यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात, "घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे.मात्र,काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे."
 
यावेळी मनसेनेही राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे ट्वीट करून म्हणाले की, "पुरे आता... यांनी आता घरी बसावं. मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये. नावात भगतसिंग इतकेच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा."
 
नितेश राणेंकडून समर्थन
तर दुसरीकडे राज्यपालांनी ज्या व्यासपीठावरून हे वादग्रस्त वक्तव्य केलं, त्या व्यासपीठावर उपस्थित राहिलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांचं समर्थन केलंय. राज्यपालांनी काही चुकीचं केलेलं नाही, असं राणेंनी म्हटलंय.
 
नितेश राणेंनी ट्वीट करत म्हटलं की, "मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना बीएमसीचे काँट्रॅक्ट दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहिजे असतात."
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments