शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याबाबतचा आदेश दिला आहे.न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी हा निर्णय दिला आहे.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज विहित वेळेनंतर भरण्यात आला, असा आक्षेप काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी घेतला होता. त्यावर औरंगाबादेत सुनावणी सुरु होती.
दरम्यान या निर्णयावर दाद मागण्यासाठी अर्जुन खोतकर यांना कोर्टानं 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत आमदारकी रद्द करण्याचा निर्णय स्थगित असेल.
दरम्यान, “तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू. 27 तारखेला 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे होते. मात्र शेवटच्या दिवशी जो-जो रांगेत असेल, त्या त्या सर्वांचे अर्ज भरुन घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच तांत्रिक मुद्दा पाहून खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला मी सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, तिथे मला दाद मिळेल”, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला आहे.