कार्यशैलीमुळे वादग्रस्त ठरलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंढे यांना प्रतिनियुक्तीवर रुजू करून घ्यावे, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राला पाठविण्यात येणार असल्याचे समजते. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ते आपल्या विभागात नको असल्याने त्यांना केंद्रात पाठविले जाण्याची शक्यता आहे.
22 नोव्हेंबरला मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आली. मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी त्यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र, त्यांनी नवा पदभार स्वीकारलेला नाही. मुंढे यांना आपल्या विभागात नेमणूक देण्यापेक्षा अन्य विभागात नियुक्ती द्यावी, अशी भूमिका वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे राज्य सरकारने मुंढेंना केंद्रात पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार आहे.