काही दिवसापुर्वी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर भाजप (BJP) नेत्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता. यानंतर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.
नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व आहे, ना धर्म आहे. तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्रिपद, असा जोरदार निशाणा नारायण राणे यांनी साधला आहे. पुढे राणे म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वृत्तांत सामनामध्ये वाचला. मेळाव्यामध्ये जोश आणि दरारा, जो संजय राऊत यांनाच दिसला, तो इतर कोणाला दिसला नाही. या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडी नामर्द, अक्करमाशा, निर्लज्जपणा असे शब्द येतात आणि त्यांची उजळणी सामनामध्ये होते. याला काय म्हणायचे? ही भाषा आणि संस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाही. असं टिकास्त्र राणेंनी सोडलं आहे.
आज (गुरुवारी) प्रहारमध्ये हार आणि प्रहार या लेखात प्रसिद्ध झालेल्या लेखामधून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. पुढे ते म्हणातात की, उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा, हिंदू तितुका मेळवावा, हिंदुस्थान धर्म वाढवावा. किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा? किती ही बनवाबनवी? असं राणे म्हणाले.
दरम्यान, याच सामनामध्ये उल्लेख आहे की, अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे.पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अमली प्रकारच आहे. कोण करणार नायनाट? सत्तेचा जनहितासाठी वापर कधी करणार?घ्या की अंगावर, करा की नायनाट, संजय राऊत बरोबर बोलतात.सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली पदार्थांचाच प्रकार. सत्तेचे व्यसन लागल्यामुळेच हिंदुत्वाचा त्याग आणि सत्तेचा हव्यास केला गेला.असं देखील नारायण राणेंनी म्हटलं आहे.