राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श होते, असं विधान केलं. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केली. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
याच पार्श्वभूमीवर सोलापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राज्यपालांच्या प्रतिमेला काळं फासत “राज्यपालाला पकडा… राज्यपालाला पकडा” अशा घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान, सोलापुरचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी बरडे म्हणाले, “महाराष्ट्रातील अत्यंत हीन वृत्तीचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आतापर्यंत चारवेळा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले आहेत. शिवाजीमहाराज हे केवळ हिंदुंचे नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जाती-धर्मातील लोकांचे दैवत आहेत. त्यामुळे या राज्यपालाला ताबोडतोब केंद्राने परत बोलवावं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शिवाजी महाराजांबद्दल खरोखर प्रेम असेल तर त्यांनी ताबोडतोब याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठवावा” अशी मागणी बरडे यांनी केली.शिवाय जो कोणी कोश्यारींचं धोतर फेडेल त्याला सोलापूर जिल्हा शिवसेनेतर्फे एक लाख ५१ हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor