Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शशिकांत वारिसे : कोकणातील पत्रकाराची हत्या की अपघात? काय आहे प्रकरण?

Webdunia
बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (16:01 IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मंगळवारी (7 फेब्रुवारी) अपघाती मृत्यू झाला. राजापूर या ठिकाणी पेट्रोल पंपावर 'थार' गाडीनं त्यांच्या दुचाकी वाहनला जोरात धडक दिली. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
हा अपघाती मृत्यू नसून घातपात आहे, असा आरोप पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. तसंच याचा संबंध रिफायनरीसंदर्भातील एका बातमीशी आहे असा दावा वारिसे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
 
दरम्यान, विविध पत्रकार संघटनांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासोबत त्यादिवशी काय घडलं? हा अपघात कोणत्या बातमीशी संबंधित का? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
 
'त्या'दिवशी काय घडलं?
सोमवारी सकाळी म्हणजे 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांनी वॉट्सअपवरील रिफायनरी ग्रुपवर एका बातमीची पोस्ट पाठवली होती.
 
'पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या बॅनरवर त्यांच्यासोबत गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो' अशा आशयाच्या बातमीचे कात्रण शशिकांत वारिसे यांनी त्या वॉट्सअप ग्रुपवर पाठवले होते.

कोकणातील रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या जाहिरातींसंदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या आसपास शशिकांत वारिसे राजापूर-कोदवली या परिसरातून आपल्या दुचाकी वाहनावरून जात होते. त्याचवेळी तिथे असलेल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने समोरून 'थार' गाडी आली. या गाडीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली.
 
यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आलं. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7 फेब्रुवारीला सकाळी त्यांचं निधन झालं.
 
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या निधनाची बातमी समोर येताच अपघातीमृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबियांनी आणि काही पत्रकार संघटनांनीही संशय व्यक्त केला आहे.
 
गुन्हा दाखल
या अपघाताप्रकरणी थार गाडीचे चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात राजापूर पोलीस स्टेशन स्थानकात कलम 308 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केल्यानंतर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया पोलिसांनी सुरू केली आहे.
 
तसंच कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांना पोलिसांनी 6 फेब्रुवारीला रात्री अटक केली आहे. तर जिल्हा न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सांगतात, "या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही कोणत्याही दबावाशिवाय करत आहोत. तसंच फॉरेन्सिक रिपोर्टदेखील आम्ही तपासणार आहोत. सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा तपास आणि चौकशी केली जाईल."
 
'आरोपीला कठोर शिक्षा करा'
शशिकांत वारिसे मुळचे राजापूर तालुक्यातील कशेळी आवळीची वाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्रकारितेची कारकिर्द राजापूर तालुक्यापासून सुरू झाली.
 
ते सध्या 'महानगरी टाईम्स'मध्ये पत्रकारिता करत होते. शशिकांत वारिसे यांच्या मागे त्यांचा 20 वर्षांचा मुलगा आहे आणि 80 वर्षांची आई आहे. त्यांचा मुलगा सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण घेत आहे.
 
वारिसे यांच्या पार्थिवावर मंगळवारी (7 फेब्रुवारी) रात्री 9.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी वारिसे यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
 
'कोकणात रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प नको,' अशी प्रकल्पाच्या विरोधात असणाऱ्यांची बाजू शशिकांत वारिसे मांडत होते. या काळात आपलं काहीतरी बरं-वाईट होऊ शकतं, अशी भीती त्यांना होती असंही वारिसे यांचे कुटुंबिय सांगतात.
 
कोकणातील ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं, "हा प्रकार नक्कीच निषेधार्थ आहे. घटनेला रिफायनरीची किनार आहे. रिफायनरीच्या समर्थकांच्या नेतेमंडळींपैकी एक प्रकरणातील आरोपी आहे. तर संबंधित पत्रकाराने प्रकल्पाच्या विरोधात काही बातम्या दिल्या होत्या हे सुद्धा खरं आहे. मला वाटतं आंबेरकर यांच्या व्यक्तिगत रागातून हा प्रकार घडला असावा."
 
"कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत दोन गट असले तरी विरोधक आणि समर्थकांमध्ये एवढं वातावरण चिघळलेलं नाही किंवा हाणामारीचीही कोणतीही प्रकरणं नाहीत. आतापर्यंत कोकणात जैतापूरला झालेला विरोध असेल आणि आता या प्रकल्पाला होणारा विरोध असेल हा काही मोजके अपवाद वगळले तर विरोध शांततेच्या मार्गाने झालेला आहे. यावरून कोणाच्या हत्या होतील असं चित्र नाही. त्यामुळे आंबेरकर यांच्या रागातून हा प्रकार घडला का हे पोलिसांच्या तपासातूनही समोर येईल."
 
कोण आहे पंढरीनाथ आंबेरकर?
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
 
ते म्हणाले, "यापूर्वीही रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या अंगावर वाहन चालवून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे," असा आरोपही विनायक राऊत यांनी केला.
 
पंढरीनाथ आंबेरकर हे नाणार रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याविरोधात हाणामारी आणि अपघाताचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
 
जाणकारांनुसार, 2017 मध्ये नाणार रिफायनरी आल्यानंतर पंढरीनाथ आंबेरकर हे नाव मोठं झालं. या प्रकल्पाजवळ आंबेरकर यांच्या जमिनी आहेत, असाही रिफायनरी विरोधकांचा दावा आहे.
 
राजापूर कोर्ट परिसरातला त्यांचा एक वाद काही वेळापूर्वी गाजला होता तसंच रिफायनरी विरोधकांसोबतही वाद असल्याचं बोललं जातं.
 
'आंबेरकर यांच्याविरोधात वारिसे यांनी बातमी दिल्यानेच घातपाताची शक्यता आहे,' असं वारिसे यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.
 
पत्रकार संघटनांकडून निषेध
'न्यायाविरुद्ध धडाडणारी तोफ' म्हणून ओळखले जाणारे दै. 'महानगरी टाईम्स'चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली,' या शब्दात मुंबई मराठी पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
 
तसंच या प्रकरणातील आरोपीला अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचं पत्र संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं आहे.
 
मुंबई पत्रकार संघाने म्हटलं आहे की, 'वारीशे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे. अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. संबंधित आरोपीला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी.'
 
आपला निषेध व्यक्त करताना पत्रकार संघाने पुढे म्हटलं, 'वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत होते. त्यांची शेवटची बातमी 6 फेब्रुवारी, 2023 च्या 'महानगरी टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झाली होती.
 
आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो असल्याची ती बातमी होती. तो आरोपी म्हणजे रिफायनरी प्रस्तावित होऊ शकणार्‍या भागात जमिनींचे व्यवहार करणारा पंढरीनाथ आंबेरकर होय. याच आंबेरकरने सोमवारी दुपारी 1 वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर वारीशे यांना पाहिले. त्यानंतर बेसावध असलेल्या वारीशे यांच्या दुचाकीवर आपले वाहन चढवून त्यांची हत्या केली,' असा त्यांचा आरोप आहे.
 
मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 
पीयूसीएलने केलेले आरोप
पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजने (पीयूसीएल) यासंबंधी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये पीयूसीएलने पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर आरोप केले आहेत. पत्रकार वारिशे यांनी नाणार रिफायनरीच्या विरोधातली बातमी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली तसंच आंबेरकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटोही छापले होतं, असं बातम्यांमधे प्रसिद्ध झाल्याचं पीयूसीएलनं म्हटलं आहे. भूमी अधिग्रहणाच्या नावाखाली जमीन हडपण्यासाठी सुरू असलेली दंडेलशाही आणि धाकाविरोधात जे बोलण्याचं धाडस करत आहेत, त्यांना गप्प करण्यासाठीच पत्रकाराची हत्या घडवून आणल्याचं आम्हाला वाटत असल्याचं पीयूसीएलने आपल्या पत्रात म्हटलं आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेडविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला दडपताना अनेकदा नागरी हक्कांचंही उल्लंघन केलं जात असल्याचं पीयूसीएलने म्हटलं आहे.
 
प्रस्तावित रिफायनरी ही रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. आधी नाणार इथे प्रस्तावित असलेली ही रिफायनरी स्थानिकांच्या विरोधानंतर बारसू इथे हलविण्यात आली. पण तिथेही स्थानिकांकडून पर्यावरणाच्या मुद्द्यावर रिफायनरीला विरोध होत आहे. शांततेच्या मार्गाने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांविरुद्ध अनेक एफआयआर करण्यात आले आहेत, असं पीयूसीएलच्या पत्रकात म्हटलं आहे.
 
रिफायनरीचा प्रवास: नाणार ते बारसू
रत्नागिरीतल्या प्रस्तावित रिफायनरीबद्दल गेल्या बऱ्याच काळापासून अनेकांगी चर्चा सुरु आहे. काही विरोधात आहेत आणि बाजूनं. राजकीय पक्षांनीही या प्रकल्पावरुन आजवर अनेक कोलांट्या उड्या घेतल्या आहेत. पण या रिफायनरीचा बारसूपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मोठा आहे.
2018 मध्ये भारत आणि सौदी अरेबियामध्ये झालेल्या करारानुसार भारतात या रिफायनरी प्रकल्पाचा प्रस्ताव आला. जगातली सर्वांत मोठ्या ऑइल रिफायनरी असं म्हटलं गेलेल्या या प्रकल्पासाठी रत्नागिरीचा समुद्रपट्टा प्रस्तावित करण्यात आला. त्यासाठी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (RRPCL) ही कंपनी स्थापन करण्यात आली.त्यात सौदी अराम्को, अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC), इंडियन ऑइल कॉर्परेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम हे भागिदार आहेत.
 
सर्वांत प्रथम हा प्रकल्प राजापूरमधल्या नाणार इथं होणार होता. तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं भाजपा-सेना युतीचं सरकार होतं. पण हा सगळा पट्टा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं नाणारच्या प्रकल्पाला विरोध केला. स्थानिक पातळीवर आंदोलनं झाली. असा प्रचंड विरोध झाल्यानं 2019 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर ती जागा रद्द करण्यात आली.
 
त्यानंतर बराच काळ हा प्रकल्पाच्या आघाडीवर तो बासनात गेल्यासारखा थंड हालचाल होती. राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर ठाकरे आणि शिवसेनेची या रिफायनरीबद्दलची भूमिका बदलली. जानेवारी 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहून बारसू परिसरातली 13 हजार एकर जागा या रिफायनरीसाठी नव्यानं प्रस्तावित केली. तेव्हापासून हा प्रकल्प बारसू आणि परिसरात होणार, असं म्हटलं जात आहे.
Published by- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments