Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय बियाणी हत्याकांडातील सहा आरोपींना अटक, काय आहे प्रकरण

Webdunia
बुधवार, 1 जून 2022 (19:47 IST)
नांदेडमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या संजय बियाणी हत्याप्रकरणामुळे मराठवाडा हादरला होता. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
 
विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती, 55 दिवस सातत्याने सहा राज्यात जाऊन केला तपास, वीस अधिकारी आणि 60 कर्मचाऱ्यांनी केला तपास, चार देशात पत्रव्यवहार करण्यात आला, पाच एप्रिल रोजी संजय बियाणी यांची झाली होती हत्या, हत्येच्या तपासाबाबत पोलिसांची पत्रकार परिषद, तपासासाठी करण्यात आली होती विशेष एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.
 
ज्या वेळी हे प्रकरण झाले होते तेव्हा बीबीसी मराठीने नांदेडहून रिपोर्ताज केला होता. तो तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
 
"माझा नवरा सगळ्यांना सुख-दुःखात साथ देत होता. अडल्या नडल्यांना साथ देत होता. पण त्याला आमच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून मारून टाकलं. या आधी कोकुलवार, कासलीवाल, पाटणी यांच्यावर हल्ले झाले. आणि आता माझ्या नवऱ्यावर हल्ला झाला. असंच चालू राहिलं तर लोकांनी जगायचं कसं," नांदेडचे बिल्डर संजय बियाणींची पत्नी अनिता बियाणी आक्रोश करत हे बोलत होत्या.
 
मंगळवारी संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या झाली आणि नांदेड शहर हादरलं.
 
नांदेडमधील शारदानगर भागात प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर 11 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर नांदेडमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
 
"माझ्या पतीची घरासमोर हत्या झाली, पण पोलीस मात्र नको ते प्रश्न विचारून परिवाराला त्रास देत आहेत. वरिष्ठ अधिकारी भेटायला का येत नाहीत. माझ्या नवऱ्याला सुपारी देऊन संपवण्यात आलं आहे. त्यामुळे आधी सुपारी देणाऱ्याला जेरबंद करा, त्यानंतर हल्लेखोरांना जेरबंद करा," अशी मागणी अनिता बियाणी यांनी केली.
 
नांदेडमधील वजिराबाद या भागात असलेली बाजारपेठ असो किंवा मोंढ्याचं उदाहरण घ्या. वरवर सर्व काही सुरळीत असल्याचं वाटेल. पण तेथील व्यावसायिकांशी बोललं तर ते सर्व जण एकाच सुरात म्हणतील, 'जर असं दिवसाढवळ्या व्यापाऱ्याला गोळ्या घातल्या जाणार असतील, तर या दहशतीत आम्ही काम कसं करायचं.'
 
नांदेडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. ज्यात व्यावसायिकांना धमकवण्यासाठी हवेत गोळीबार करणे, वाहनावर गोळीबार करून भीती दाखवणे असे प्रकार घडले आहेत, पण यावेळीची घटना पूर्णपणे वेगळी होती. संजय बियाणी यांच्यावर थेट हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा जीव गेला.
 
या घटनेनंतर पूर्ण नांदेडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
 
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
मंगळवारी, 5 एप्रिलला सकाळी संजय बियाणी हे आपलं काम आटोपून त्यांच्या राहत्या घरी पोहोचले. सीसीटीव्हीतील वेळेनुसार सकाळी 11 वाजून 10 मिनिट 50 सेकंदाला त्यांची गाडी घरासमोर पोहोचली अन 6 सेकंदांनी संजय बियाणी हे गाडीखाली उतरून घरात जाण्यासाठी निघाले.
तेव्हा काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना समोरील बाजूने गाठलं आणि थेट गोळीबार सुरू केला. अवघ्या 11 सेकंदात सुमारे 11 गोळ्या हल्लेखोरांनी घातल्या. यातील काही गोळ्या या संजय बियाणी यांच्यावर चालवल्या तर एक गोळी घरातून बाहेर येणाऱ्या बियाणींच्या कर्मचाऱ्यावरदेखील चालवण्यात आली.
 
घटनेनंतर बियाणी यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
 
एक गोळी ही कंपाउंड वॉलला लागली आणि एक जिवंत काडतूस घटनास्थळी सापडलं. जिवंत सापडलेल्या गोळीवर KLF असं छापलं आहे. आता हे काडतूस पोलिसांनी जप्त केलं आहे.
 
"संजय बियाणी यांची हत्या करण्यासाठी बंदुकीचा वापर करण्यात आला, पण यात गंभीर बाब ही आहे की या हत्याकांडासाठी 9 मिमी गोळीचा वापर करण्यात आला असे," एसआयटी प्रमुख विजय कबाडे यांनी बीबीसी मराठीला सांगितले.
 
"खरंतर 9 मिमी गोळीचं शस्त्र हे प्रतिबंधित शस्त्र म्हणून ओळखलं जातं. हे शस्त्र केवळ पोलीस, पॅरा मिलिटरी आणि मिलिटरी यांनाच वापरण्याची परवानगी आहे त्यामुळे 9 मिमीची बंदूक आणि गोळ्या हल्लेखोरांकडे कुठून आल्या हा अॅंगल देखील तपासण्यात येईल," असं पोलिसांनी सांगितलं.
 
खंडणीसाठी मिळाली होती धमकी
संजय बियाणी यांना सुमारे 3 वर्षांपूर्वी खंडणीसाठी धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला होता. पोलिसांनीही त्यांच्या जीवाची काळजी करत पुढील पावलं उचलली होती. संजय बियाणी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी स्वतःहून त्यांना पोलीस अंगरक्षक एक वर्षासाठी मोफत पुरवला होता.
 
हा अंगरक्षक सावलीप्रमाणे संजय बियाणी यांच्यासोबत तैनात होता. मिळालेली धमकी ही रिंदा नामक गॅंग कडून देण्यात आली होती असा संशय होता. पण पुढे या गँगच्या अनेक सदस्यांना पोलिसांनी अटक केली आणि शहरातील धमकीचे प्रकार कमी झाले.
 
त्यानंतर संजय बियाणी यांना पैसे भरून अंगरक्षक देता येईल, असं कळवण्यात आलं होतं. पोलिसांच्या सूचनेला बियाणी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही अन् ते बिना अंगरक्षकाच वावरू लागले.
 
या दरम्यान संजय बियाणी यांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागितला, त्यांना डिसेंबर 2019 मध्ये शस्त्र परवाना देण्यात आला त्यांनी भारतीय बनावटीचं पिस्तूल देखील खरेदी केलं होतं.
 
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे म्हणाले, "2019 साली संजय बियाणी यांना धमकी आली होती. त्यानंतर पोलीस अंगरक्षक देण्यात आला होता, पण मागील सुमारे दीड वर्षांपासून अंगरक्षक वापस घेण्यात आला होता. यावर संजय बियाणी यांनी कधीच आक्षेप घेतला नाही. घडलेली घटना ही गंभीर आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे."
 
'आता मी नांदेडमध्ये काम करणंच सोडलंय'
 
संजय बियाणींच्या हत्येनंतर नांदेड शहरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांना जेरबंद करावं या मागणीसाठी बुधवारी व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.
 
"व्यापारी हा शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो, विविध प्रकारचे टॅक्स देऊन जे उत्पन्न होते त्यातून खंडणी दिली तर शिल्लक शून्य राहते अश्या परिस्थितीत नांदेडची अवस्था पहिली तर इथला व्यापारी लूटमार आणि खंडणीमुळे उध्वस्त होतोय त्यामुळे पोलिसांनी अशा प्रवृत्तींना संपवणं गरजेचं आहे," असं सीड्स अँड फर्टिलायजर असोशियनचे सहसचिव विपीन कासलीवाल यांनी म्हटलं आहे.
 
"बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण आहे, नांदेडमध्ये आता नवे प्रकल्प करावेत की नाही या मानसिकतेत बिल्डर मंडळी आहेत आणि याचा फटका स्थानिक महसूलाला बसणार आहे म्हणूनच सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही इथल्या पोलिसांची आणि नेत्यांची जबाबदारी आहे," असं क्रेडाई संघटनेचे राज्य समन्वयक गंगाप्रसाद तोष्णीवाल यांनी म्हटलं आहे.
 
"नांदेडमध्ये मला धमकी मिळाल्यापासून मी काम बंद केलंय सतत अंगरक्षक घेऊन फिरावं लागतं. अशा स्थितीत या शहरात काम करणं कठीण आहे," असं स्थानिक बिल्डर केतन नागडा यांनी म्हटलं आहे.
 
'ही घटना गांभीर्याने घ्यायला हवी'
 
"बियाणी यांची घटना ही अत्यंत धक्कादायक आहे या घटनेपासून पोलिसांनी बोध घ्यायला हवा," असं स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलंय.
 
तर "ही अतिशय धक्कादायक घटना आहे जिल्ह्याच्या इतिहासात अशी घटना घडली नव्हती. मी बारकाईने व्हीडिओ पाहिलेत मी पोलिसांना बारकाईने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही घटना जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. बियाणी हे अत्यंत दानशूर आणि मेहनती होते," असं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments