माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर आज पहिल्यांदाच एका मंचावर आले. मागील काही दिवसांपासून आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे, असे म्हटले जात आहे. असे असतानाच हे दोन्ही नेते एकाच मंचावर आल्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचे तोंडभरून कौतूक केले आहे. आम्ही पहिल्यांदाजरी एका मंचाव आलो असलो, तरी आम्ही याआधीही एकमेकांना बोलायचो. आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“माझी आणि प्रकाश आंबेडकर यांची ओळख नाही, असे नाही. आम्ही बोलतो, भेटतो. पण त्यांची भेट घ्यायची म्हणजे वेळ काढून भेटायला हवं. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा प्रकाश आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे मिनिटांचं गणित नसायला हवं. आज आम्ही पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलो आहोत. मात्र आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. याच कारणामुळे एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही. आम्ही दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे चालत आहोत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आतापर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आज मात्र त्याला कौटुंबिक रुप आले आहे. आज दोन नातू एकत्र आले आहेत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Edited By -Ratnadeep Ranshoor