Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरेंना उंदीर म्हणणारे, कुस्तीपटूंनी शोषणाचा आरोप केलेले बृजभूषण सिंह कोण आहेत?

Webdunia
गुरूवार, 19 जानेवारी 2023 (22:11 IST)
दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर अनेक कुस्तीपटू बुधवारपासून (18 जानेवारी) धरणे आंदोलनास बसलेले आहेत.
 
कुस्ती महासंघ आपलं शोषण करत असल्याचा या खेळाडूंचा आरोप आहे.
 
या पैलवानांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बृजभूषण हे कुस्ती महासंघ मनमानी पद्धतीने चालवतात, असाही खेळाडूंचा आरोप आहे.
 
बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू जंतरमंतर मैदानावर धरणे आंदोलनास बसल्या होत्या.
 
यावेळी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
 
कुस्तीपटू विनेश फोगाटने पत्रकारांशी बोलताना म्हटलं, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देता. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.”
 
फोगाट पुढे म्हणाली, “ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. ते आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिक खेळण्यासाठी जातो त्यावेळी आमच्याकडे ना फिजिओ असतो ना प्रशिक्षक. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांनी आम्हाला धमकावणं सुरू केलं.
 
विनेश फोगाट ही 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील 53 किलो वजनी गटातील सुवर्ण पदकविजेता आहे.
 
विनेश फोगाट पुढे म्हणाली, “माझा इतका मानसिक छळ करण्यात आला आहे की मी एके काळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. प्रत्येक खेळाडूला आमच्यासोबत काय घडत आहे, याची कल्पना आहे.” 
 
कुस्तीतील दिग्गज खेळाडूंच्या आरोपांवर ब्रृजभूषण सिंह म्हणाले, "कुस्ती महासंघात खेळाडूंचा छळ होत आहे, असं म्हणणारा कुणीही व्यक्ती नाही. गेल्या 10 वर्षांपासून त्यांना महासंघासोबत काही अडचण नव्हती का?”
 
बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, असं ते म्हणाले.
 
या प्रकरणी क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. कुस्ती महासंघाने यासंदर्भात 72 तासांत उत्तर द्यावं, असे निर्देश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत.
 
दरम्यान, कुस्तीपटू दिव्या काकरानने या प्रकरणात बृजभूषण यांची बाजू घेतली.
 
"कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत," असं तिने ट्वीट करून म्हटलं होतं. मात्र काही वेळाने हे ट्वीट डिलीट केल्याचं दिसून येतं.
 
मात्र, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित दिव्या काकरनने यापूर्वी सरकारकडून मदत आणि सुविधा मिळत नसल्याबद्दल आवाज उठवला होता, हे विशेष.
 
बृजभूषण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे केसरगंजचे खासदार आहेत. केसरगंज लोकसभा मतदारसंघ हा गोंडा जिल्ह्याच्या तरबगंज, कटराबाजार आणि करनैलगंज तर बहराईच जिल्ह्याच्या पयागपूर आणि केसरगंज या तालुक्यांनी मिळून बनलेला आहे.
 
1991 साली पहिल्यांदा गोंडामधून खासदार बनलेले बृजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. 2019 साली ते सहाव्यांदा खासदार बनले.
 
एके काळी गोंडा शहरातील स्थानिक नेते म्हणून ओळखले जाणारे आता बृजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
 
बृजभूषण 2008 मध्ये भाजप सोडून काही काळ समाजवादी पक्षातही गेले होते. मात्र 2014 ला पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला.
 
राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात अयोध्येला जाण्याचं नियोजन केलं होतं. त्यावेळी राज यांच्या दोऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तसंच राज ठाकरे यांना त्यांनी उंदीर असंही संबोधलं होतं.
 
राज ठाकरेंना संबोधलं उंदीर
राज ठाकरेंना अयोध्येत पाय न ठेवू देण्याचा इशारा त्यावेळी बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.
 
अयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
 
"राज यांनी सार्वजनिक माफी मागितली नाही तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही," असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं.
 
"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये," अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली होती.
 
मात्र, नंतर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
 
स्थानिकांच्या मते, बृजभूषण सिंह हे राजकारणात येण्याच्या आधीपासून कुस्ती स्पर्धा आयोजित करत होते. त्यांना महागड्या एसयूव्ही गाड्यांचाही छंद आहे.
 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लक्ष्मणपुरी भागात त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. तिथे गाड्या उभ्या करण्यास जागाही कमी पडते, असं लोक सांगतात.
 
भूतकाळात बृजभूषण सिंह यांच्यावर हत्या, जाळपोळ, तोडाफोडी यांसारखे आरोपही लावण्यात आले होते.
 
बाबरी प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रृजभूषण सिंग हे 2011 पासून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. 2019 मध्ये त्यांची तिसऱ्यांदा कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
 
बृजभूषण हे 1988 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर 1991 मध्ये विक्रमी मतांनी पहिल्यांदा खासदार झाले.
 
दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षातील नेत्यांशी काही मतभेद झाल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला आणि 2009 ची लोकसभा निवडणूक कैसरगंजमधून सपाच्या तिकिटावर जिंकली होती.
 
त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला.
 
नंतरच्या काळात ब्रिजभूषण शरण सिंह यांचे गोंडा तसेच बलरामपूर, अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये वर्चस्व वाढले आणि 1999 पासून ते एकही निवडणूक हरले नाहीत.
 
ब्रिजभूषण शरण सिंह यांचे चिरंजीव प्रतिक भूषण हेसुद्धा राजकारणात आहे. प्रतिक हे गोंडा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.
 
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आणि अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात त्यांच्यावरही आरोप करण्यात आले होते.
 
1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशिदीच्या विध्वंसासाठी जबाबदार धरण्यात आलेल्या 40 मुख्य आरोपींमध्ये भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह ब्रृजभूषण सिंह यांचंही नाव होतं.
 
मात्र, सप्टेंबर 2020 मध्ये न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
 
व्यासपीठावर खेळाडूला थप्पड
अलीकडेच झारखंडमध्ये झालेल्या अंडर-19 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेदरम्यान त्याने स्टेजवरच एका कुस्तीपटूला थप्पड मारली होती.
 
ती चॅम्पियनशिप 15 वर्षांखालील मुलांसाठी होती, मात्र, सहभागी होण्यासाठी एका खेळाडूने हट्ट धरला होता. तो वयाने मोठा असल्याचं सांगत आयोजकांनी त्याला स्पर्धेत सहभागी होऊ दिले नाही.
 
यानंतर त्या मुलाने मंचावर जाऊन तक्रार केली. त्यानंतर त्यांचा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याशीही त्या मुलाचा वाद झाला. त्यानंतर बृजभूषण यांनी व्यासपीठावरच त्या खेळाडूला थप्पड लगावली होती.
 
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत
2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले होते, “तुम्ही समाजवादी पक्षाला मत दिल्यास पाकिस्तानला आनंद होईल. पाकिस्तानबाबत आम्ही का बोलू नये. मोदी आणि योगींना हरवण्यासाठी पाकिस्तान चिंताग्रस्त झालेला नाही का?”
 
पुढे बृजभूषण म्हणाले होते, “कलाम यांना राष्ट्रपती बनवणं आमच्याच पक्षात शक्य आहे. तुम्ही कलाम म्हणून राहिलात, तर तुम्हाला राष्ट्रपती बनवण्यात येईल. पण तुम्ही कसाब म्हणून आलात, तर तुम्हाला कापलं जाईल.”
 
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोंडा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते.
 
ते म्हणाले होते, "मी खात्रीने सांगतो की ओवैसी यांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव तुलसीराम दास होतं.”
 
तेव्हा ओवेसी यांच्या पक्षाचे प्रवक्ते मोहम्मद फरहान म्हणाले होते, "बृजभूषण शरण सिंह यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मानसिक संतुलन गमावल्यामुळेच ते ओवैसीच्या पूर्वजांना हिंदू म्हणत आहेत. त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करावे. भाजपने त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत. भाजपने उपचार केले नाहीत तर बृजभूषण शरण सिंह यांच्यावर हैदराबादमधील ओवैसींच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातील."
 
काही दिवसांपूर्वी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधी आणि बिलावल भुट्टो यांना एकाच जातीचे असल्याचं वक्तव्य केलं होतं.
 
“ते इकडे तिकडे कसे आले माहीत नाही,” असंही त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
 
पतंजलि कंपनीच्या तुपावर आक्षेप
योगगुरू बाबा रामदेव यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही ब्रृजभूषण सिंह चर्चेत आले होते. पतंजली कंपनी बनावट तूप विकते, असा आरोप त्यांनी केला होता.
 
या प्रकरणी पतंजलीने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागायला सांगितली, मात्र खासदार बृजभूषण यांनी माफी मागितली नाही.
 
यानंतर पतंजली कंपनीने त्यांना पुन्हा नोटीस पाठवली.
 
यावर बृजभूषण म्हणाले, “पतंजली कंपनीकडून महर्षी पतंजलिंच्या नावाचा गैरवापर होत आहे. त्यांच्या नावाचा हा गैरवापर थांबायला हवा. ”
 
महर्षी पतंजली यांच्या नावाचा गैरवापर थांबला नाही, तर त्या विरोधात देशव्यापी आंदोलन पुकारू, असा इशारा त्यांनी दिला होता.
 
आपल्याच पक्षावर टीका
बृजभूषण सिंह आपल्या धाडसी विधानांसाठीही ओळखले जातात. त्यांनी अनेकदा आपल्याच पक्षावरही टीका केली होती.
 
गेल्या वर्षी जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पूर आला होता, तेव्हा ते आपल्या मतदारसंघात गेले होते. तिथे जी कामं सुरू होती, ती पाहून त्यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला होता.
 
त्यांनी तेव्हा म्हटलं होतं, “आधी सरकार कोणतंही असो, पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय करायचं यासाठी बैठक होती. आता अशा तयारीची कोणतीही बैठक झाल्याचं मला वाटत नाहीये. लोक देवाच्या भरवशावर आहेत.
 
सिंह यांनी असंही म्हटलं, “पूरग्रस्तांसाठी अशी खराब व्यवस्था मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. आम्ही लोक रडूही शकत नाही, आपल्या भावनाही व्यक्त करू शकत नाही.”
कुस्तीमध्ये कंत्राटी पद्धत
राष्ट्रीय स्पर्धा असो की आंतरराष्ट्रीय, सीनियर टूर्नामेंट असो की ज्युनियर; भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यानंतर बृजभूषण सिंह प्रशासक या नेत्याने प्रत्येक ठिकाणी उपस्थिती लावली. आपल्या हातात माइक घेऊन ते अनेकदा पंचांना सल्ला देताना किंवा नियम समजावून सांगतानाही दिसले.
 
बृजभूषण सिंह यांनीच कुस्तीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम लागू केली. 2018 मध्ये लागू करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये खेळाडूंना वेगवेगळ्या श्रेणीत विभागून एक वर्षाचा करार केला जायचा.
 
या व्यवस्थेंतर्गत ग्रेड एच्या खेळाडूंसाठी 30 लाख रुपये, ग्रेड बीच्या खेळाडूंसाठी 20 लाख रुपये, ग्रेड सीच्या पैलवानांसाठी 10 लाख रुपये आणि ग्रेड डीच्या पैलवानांसाठी 5 लाख रुपये देण्याची तरतूद या कॉन्ट्रॅक्टमध्ये होती.
 
पहिल्यांदा जेव्हा ही व्यवस्था लागू करण्यात आली, तेव्हा ए ग्रेडमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि पूजा ढांडा हे खेळाडू होते. बी ग्रेडमध्ये सुशील कुमार आणि साक्षी मलिक, तर सी ग्रेडमध्ये रितू फोगाट आणि दिव्या काकरानसारखे खेळाडू होते.
 
बृजभूषण शरण सिंह हे बहराइच, गोंडा, बलरामपूर, अयोध्या आणि श्रावस्तीमधल्या 50 हून अधिक शैक्षणिक संस्थानांशी संबंधित आहेत.
 
आपल्या राजकीय कारकिर्दीत मंत्रिपद न मिळाल्याचा सल बृजभूषण सिंह यांना आहे. मागच्या वर्षी एका कार्यक्रमात त्यांनी तो बोलूनही दाखवला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “आमच्या नशीबात मंत्रिपद नाहीये. हातात ही रेषाच नसावी, ती केवळ शास्त्रीजींसाठी आहे.
 
खासदार बृजभूषण सिंह यांच्याच गावातील रमापती शास्त्री भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्रीही झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर मोठा स्फोट

LIVE: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी तीन मोठी नावे पुढे

महाराष्ट्र बिहारच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मुख्यमंत्रीपदावर शिंदे किंवा फडणवीस किंवा अजित पवार

Maharashtra Election Result : एकनाथ शिंदेंनी प्रिय बहिणींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments