Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साईसच्चरित - अध्याय २८

Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (14:25 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
साई नव्हे एकदेशी । साई सर्वभूतनिवासी । आब्रम्हाकीटक - मुंगीमाशी । व्यापक सर्वांशीं सर्वत्र ॥१॥
साई शब्दब्रम्ही पूर्ण । दावी परब्रम्हींची खूण । ऐसा उभयभागीं प्रवीण । तेणेंच सद्नुरुपण तयातें ॥२॥
स्वयें मोठा ज्ञानी गहन । करूं नेणे शिष्यप्रबोधन । अथवा निजस्वरूपावस्थान । त्याचें सद्नुरुपण तयाला ॥३॥
पिता देई देहासी जनन । जननापाठीं लागे मरण । गुरु निर्दाळी जनन - मरण । तें कनवाळुपण आणीक ॥४॥
आतां पूर्वील अनुसंधान । कीजे स्वप्नाध्याय श्रवण । कैसें भक्तांचे स्वप्नीं जाऊन । बाबा दर्शन त्यां देत ॥५॥
कोणास म्हण्त त्रिशूल काढीं । कोणापाशीं मागत खिचडी । कोणास घेऊन हातीं छडी । पाठ ते फोडीत गुरुमिषें ॥६॥
कोणास स्वप्नीं जाऊन भेवंडी । सुरापानादि मोडीत खोडी । टाळूनि भक्तांचीं अनेक सांकडीं । लावीत गोडी निजपदीं ॥७॥
कैसी कोणासी पाठ फोडिली । वरवंटयानें छाती ठेंचिली । दशमाध्यायीं वार्ता हे कथिली । श्रोतां आकर्णिली आधींच ॥८॥
पुढील कथेची अपूर्वाई । धन्य परिसता धन्य जो गाई । दोघे समरसती ठायींचे ठायीं । सौख्य अनपायी लाधती ॥९॥
असत्कथानिंदादिश्रवण । या पापांचें होईल क्षालन । करूं संतकथानुवादन । परम पावन जें सदा ॥१०॥
आतां तेंच कथानिरूपण । श्रोतां सादर कीजे श्रवण । पदोपदीं येईल दिसून । कृपाळूपण साईंचें ॥११॥
राली  - बंधु ग्रीक व्यापारी । खरीदी सर्व हिंदुस्थानभरी । पेढया तयांच्या शहरोशहरीं । मुंबानगरींही एक ॥१२॥
तेथील अधिकार्‍यांचें पदरीं । सांप्रत लखमीचंदासी नोकरी । अति विश्वासू आज्ञाधारी । काम करीत मुनशीचें ॥१३॥
रेलवे - खात्यांत आरंभीं होते । व्यंकटेश मुद्रणागारीं मागुते । तेव्हांच साईंच्या समागमातें । लाधले कैसे तें परिसा ॥१४॥
“माझा माणूस देशावर । असो कां हजारों कोस दूर । आणीन जैसें चिडीचें पोर । बांधून दोर पायांस” ॥१५॥
ऐसें बाबा  कितीदां वदले । जनां लोकांहीं बहुतीं ऐकिलें । अनुभवाही तैसेंच आलें । कथितों त्या लीलेस बाबांच्या ॥१६॥
नेलीं ऐसीं पोरें कितीक । देशोदेशींचीं शिरडीस अनेक । त्यांतीलचि लखमीचंद एक । पोर हें भाविक बाबांचें ॥१७॥
जेव्हां बहुजन्मसंपादित । प्राक्तन कर्म उदया येत । तेव्हांच संतसमागम लाभत । मोहजनित तम नासे ॥१८॥
विवेकाग्नि होई प्रदीप्त । भाग्योदया वैराग्य पावत । संचित - कर्म क्षया जात । होत जीवितसाफल्य ॥१९॥
दिठीं भरतां साईनाथ । दुजिया न लाभे वाव तींत । तेही असोत नयननिमीलित । साईनाथ चौपासीं ॥२०॥
झाली लालाजींची भेटी । कथिल्या त्यांनीं ज्या स्वानुभवगोष्टी । प्रेमें सांठविल्या ह्रदयसंपुटीं । उत्कंठा पोटीं त्या सांगूं ॥२१॥
धरणें आलें तयास देख । तीही लीला अलौकिक । काना मना करून एक । श्रोते भाविक परिसोत ॥२२॥
सन एकोणीसशें दहा । नाताळामधील दिवस पहा । शिरडीप्रयाणयोग तेव्हां । लाधला हा लालाजीतें ॥२३॥
तेव्हांच प्रथम प्रत्यक्ष दर्शन । परी हा योग येण्याचें चिन्ह । एका दों महिन्यांचे आधींच जाण । आलें घडून तें ऐका ॥२४॥
सांताक्रूझगांवीं असतां । ध्यानीं मनीं कांहींही नसतां । स्वप्न पडलें तयास अवचिता । नवल द्दष्टान्ता देखिलें ॥२५॥
म्हातारा एक दाढीवाला । साधु भक्तवृंदीं वेढिला । ऐसा महात्मा उभा देखिला । तो अभिवंदिला सप्रेम ॥२६॥
पुढें दत्तात्रेय मंजूनाथ । बिजूर उपनांवाचे गृहस्थ । आले लखमीचंद तेथ । करीर्तनार्थ गणुदासांच्या ॥२७॥
दासगणूंची नित्य पद्धती । समोर बाबांची छबी मांडिती । ती देखतांच लखमीचंदाप्रती । आठवली मूर्ति स्वप्नींची ॥२८॥
तीच दाढी तेंच वय । तेच अवयव तेच पाय । लखमीचंदाचा लागला लय । कीं तोच हा होय महात्मा ॥२९॥
आधींच तें दासगणूंचें कीर्तन । त्यांत तुकारामाचें आख्यान । वरी त्या स्वप्नींच्या साधूचें दर्शन । लालाजी तल्लीन बहु झाले ॥३०॥
लखमीचंद मनाचे कोमळ । डोळीं आले प्रेमाश्रुजळ । लागून राहिली जीवास तळमळ । मूर्ति ही प्रेमळ देखेन कैं ॥३१॥
आधीं जी देखिली स्वप्नींतीं । प्रतिमा जियेची कीर्तनांतीं । तिकडेच लागली  अंतर्वृत्ति । आणीक चित्तीं येईना ॥३२॥
भेटेल काय  कोणी स्नेही । जो मज शिरडीची सोबत देई । कधीं मी प्रत्यक्ष या संतांपायीं । वाटलें डोई ठेवीन ही ॥३३॥
होईल या साधूंचें दर्शन कदा । भोगीन काय त्या प्रेमानंदा । ऐसी उत्सुकता लखमीचंदा । लागून सदा राहिली ॥३४॥
लाविली पाहिजे खर्चाची सोय । आतां पुढें करावें काय । दर्शन सत्वर कैसें होय । लागे उपाय शोधाया ॥३५॥
देव सदा भावाचा भुकेला । पहा कैसा चमत्कार घडला । तेच रात्रीं आठाचे समयाला । दरवाजा ठोठावला स्नेह्यानें  ॥३६॥
मग दार उघडून जों पाही । तों शंकरराव तयाचा स्नेही । पुसे लखमीचंदास पाहीं । येतां काई शिरडीस ॥३७॥
केडगांवीं जाण्याचा मानस । नारायणमहाराज - दर्शनास । होता, परी आलें मनास । आधीं शिरडीस जावें कीं ॥३८॥
करावे यत्प्रीत्यर्थ सायास । तेंच जैं चालून येई अप्रयास । पारावारा न आनंदास । मनास लखमीचंदाचे ॥३९॥
घेतली चुलतभावांपासुनी । रकम पंधरा रुपये उसनी । शंकररावांनींही तैसेंच करूनि । केली प्रयाणीं सिद्धता ॥४०॥
बिस्तरा बिछायत घेतली । निघावयाची तयारी केली । जाऊनि वेळीं तिकिटें मिळविलीं । गाडी साधिली उभयांनीं ॥४१॥
शंकरराव मोठे भजनी । गाडींत भजन केलें उभयांनीं । लक्षमीचंद चौकसपणीं । करी रस्त्यांनीं चौकशी ॥४२॥
शिरडीकडील कोणी जन । भेटतां करावें तयांस नमन । सांगा साईबाबांचें महिमान । अनुभव प्रमाणा आम्हांला ॥४३॥
साईबाबा मोठे संत । नगरबाजूस अति विख्यात । म्हणती तयांची कांहीं प्रचीत । आम्हांसि निश्चित वदावी ॥४४॥
डब्यांत चार मुसलमान । शिरडीनिकट जयांचें स्थान । परस्पर वार्तावर्तमान । करितां समाधान वाटलें ॥४५॥
साईबाबांची कांहीं माहिती । असल्यास निवेदा आम्हांप्रती । लखमीचंद अति भावार्थीं । तयांस पुसती प्रीतीनें ॥४६॥
साईबाबा महान संत । शिरडींत बहुत वर्षें नांदत । असे महान अवलिया महंत । प्रत्युत्तर देत ते तयां ॥४७॥
येणेंप्रमाणें बोलतां चालतां । आनंदानें मार्ग क्रमितां । दोघे कोपरगांवास येतां । आठवलें चित्ता शेटीच्या ॥४८॥
साईबाबांस पेरूंची प्रीती । कोपरगांवीं पेरू पिकती । म्हणती गोदेच्या कांठीं विकती । समर्पूं येतील बाबांस ॥४९॥
परी येतां गोदावरीकांठीं । देखावा पाहून हर्षले पोटीं । तांगा पोहोंचला पैलतटीं । विसरले गोठी पेरूंची ॥५०॥
तेथूनि शिरडी चार गांव । तांगा निघाला भरधांत । लखमीचंदास झाला आठव । जेथें न ठाव पेरूचा ॥५१॥
तों एक म्हातारी डोईवर पाटी । धांवतां देखिली गाडीच्या पाठीं । थांबविली गाडी तियेसाठीं । पेरूच भेटीस आले कीं ॥५२॥
लखमीचंद आनंदभरित । निवडूनि निवडूनि पेरू घेत । राहिले पाटींत ते म्हातारी म्हणत । अर्पा मजप्रीत्यर्थ बाबांना॥५३॥
पेरूंची स्मृति आणि विस्मृति । म्हातारीची गांठ अवचिती । तिची ती पाहूनि साईभक्ति । दोघेही चित्तीं विस्मित ॥५४॥
आरंभीं म्हातारा दिसला स्वप्नीं । तोचि पुढें आढळला कीर्तनीं। त्याचीच ही म्हातारी नसेल ना कोणी । लालाजी मनीं तरकले ॥५५॥
असो मग पुढें गाडी हांकिली । बोलतां बोलतां शिरडी गांठली । दुरूनि मशिदीचीं निशाणें देखिलीं । भावें वंदिलीं उभयतांनीं ॥५६॥
मग ते पूजासंभारेंसी । गेले तत्काळ मशिदीसी । घेऊनि साईदर्शनासी । आनंदचित्तेंसीं ते धाले ॥५७॥
आंगणाचे द्वारांतून । सभामंडपीं प्रवेशून । पाहोनि बाबांची मूर्ति दुरून । सद्नद मन जाहलें ॥५८॥
होतां इच्छित मूर्तींचें दर्शन  । लखमीचंद जाहला तल्लीन । विसरूनि गेला भूक्त तहान । स्वानंदजीवन लाधला ॥५९॥
हातीं घेऊनि निर्मळ जळ । प्रक्षाळिलें चरणकमळ । अर्ध्यपाद्यादि पूजा सकळ । केळीं श्रीफळ अर्पिलें ॥६०॥
धूप - दीप - तांबूल - दक्षिणा । केली मानस - प्रदक्षिणा । करोनि पुष्पहारसमर्पणा । बैसले चरणांसन्निध ॥६१॥
भक्त प्रेमळ लखमीचंद । तयासही गुरुकृपेचा आनंद । पावूनि साईचरणारविंद । रमला मिलिंद जैसा तो ॥६२॥
तेव्हां बाबा झाले वदते । “साले रास्तेमें भजन करते । और दूसरे आदमीकू पूछते । क्या दुसरेसे पूछना ॥६३॥
सब कुछ अपने आंखोंसे देखना । कायकू दुसरे आदमीकू पूछना । झूठा है क्या सच्चा सपना । करलो अपना बिचार आप ॥६४॥
मारवाडीसे लेकर उछिती । क्या जरूर दर्शनकी होती । हुई क्या अब मुराद पुरती” । आश्चर्य चित्तीं परिसतां ॥६५॥
आपण मार्गांत केली चौकशी । बाबांस येथें ती कळली कैशी । हेंचि आश्चर्य परम मानसीं । लखमीचंदांसी वाटलें ॥६६॥
घरीं आपणा पडलें स्वप्न । गाडींत आपण केलें भजन । कळलें कैसें बाबांस वर्तमान । काय अंतर्ज्ञान हें ॥६७॥
होती दर्शनाची उत्कंठा । होता खराच पैशांचा तोटा । उसने घेऊन केला पुरवला । तेंही पहा ठाऊक यां ॥६८॥
आश्चर्य परम लखमीचंदा । आश्चर्य सकल भक्तवृंदा । आश्चर्य सत्पदपंकजमिलिंदा । अतर्क्य विंदान बाबांचें ॥६९॥
काढोनि ऋण करणें सण । अथवा यात्रापर्यटण । नावडे बाबांस कर्जबाजारीपण । शिकवण ही मुख्य येथील ॥७०॥
असो तें, सकळ भक्तांसमवेत । हेही साठयांचे वाडयांत जात । दुपार भरतां जेवावया बैसत । आनंदभरित मानसें ॥७१॥
इतुक्यांत बाबांचा प्रसाद म्हणून । कोणा भक्तानें सांजा आणून । वाढिला थोडा पानांवरून । तृप्त तो सेवून जाहले ॥७२॥
दुसरे दिवशीं भोजनसमयीं । झाली लालाजीस सांज्याची सई । परी तो कांहीं नित्याचा नाहीं । उत्सुकता राहिली मनांत ॥७३॥
मग तिसरे दिवसाची नवाई । उरल्या वासनेची भरपाई । करूनि देती महाराज साई । कैसिया उपायीं अवलोका ॥७४॥
गंधाक्षतादिपुष्पांसमेत । घंटा नीरांजन पंचारत । घेऊनि जोग मशिदीं येत । पुसूं लागत बाबांसी ॥७५॥
‘काय आणावा नैवेद्य आज’ । आज्ञा करिती महाराज । “सांजा ताटभर घेऊनि ये मज । आरतीपूजन मग करीं” ॥७६॥
ठेवूनि तेथेंच पूजासंभारा । जोग तात्काळ गेले माघारा । परतले सवें घेऊनि शिरा । सर्वां पुरा अविलंबें ॥७७॥
पुढें झाली दुपारची आरती । आधींच आणिले नैवेद्य भक्तीं । ताटें य़ेऊं लागलीं वरती । बाबा तैं वदती निजभक्तां ॥७८॥
आहे आजिचा दिवस बरवा । वाटे सांज्याचा प्रसाद व्हावा । आणवा म्हणती सत्वर मागवा । सकळांनीं सेवावा यथेष्ट ॥७९॥
मग भक्तांनीं जाऊन आणिलीं । सांज्याचीं दोन बगोणीं भरलीं । लखमीचंदांसी भूकही लागली । पाठही भरली होती पैं ॥८०॥
पोटांत भूक पाठीस कणकण । तेणें लखमीचंद अस्वस्थमन । बाबांच्या मुखीं तैं येई जें वचन । श्रोतीं अवधान देइजे ॥८१॥
“भूख लगी है अच्छा हुवा । कमरमें दर्द चाहिये दवा । अब सांजेकी चली है हवा ।  करो सवार आरतीं” ॥८२॥
जें जें लखमींचंदांचे मनीं । तें तें परिस्फुट बाबांचे वचनीं । शब्दावीण प्रतिध्वनी । अंतर्ज्ञानी महाराज ॥८३॥
असो पूर्ण होतां आरती । सांजा मिळाला भोजनवक्तीं । पुरली लखमीचंदांची आसक्ती । आनंद चित्तीं जाहला ॥८४॥
तेथूनि बाबांवर जडलें प्रेम । उदबत्ती नारळ माळेचा नेम । लखमीचंदही लाधले क्षेम । पूजा उपक्रम चालला ॥८५॥
जडली एवढी साईंवर भक्ति । जाणारा लाधतां शिरडीप्रति । माळ दक्षिणा कापूर उदबती । तया हातीं पाठविती ॥८६॥
कोणीही जावो शिरडीप्रती । लखमीचंद्रांस लागतां माहिती । या तीन वस्तु दक्षिणासमवेती । बाबांस पाठविती नेमानें ॥८७॥
त्याच खेपेस चावडीचे निशीं । समारंभ तो पाहावयासी । जातां बाबांस उठली खांसी । कासावीसी जाहली ॥८८॥
लखमीचंद मनीं म्हणत । काय ही खांसी त्रास देत । वाटे लोकांची द्दष्टी लागत । खोकला उठत त्यापायीं ॥८९॥
ही तों  मनाची केवळ वृत्ति । उठली लखमीचंदांचे चित्तीं । येतां सकाळीं मशिदीप्रती । बाबाही अनुवदती नवल पहा ॥९०॥
येतां माधवराव तयांप्रती । आपण होऊन बाबा वदती । काल झाला मज खोकला अती । ही काय कृती द्दष्टीची  ॥९१॥
वाटे मज कोणाची तरी । द्दष्टचि लागली आहे खरी । तेणें हा खोकला परोपरी । करी बेजारी जीवाची ॥९२॥
आश्चर्य लखमीचंदांचे अंतरीं । ही तों अनुवृत्ति आपुलीच खरी । कैसें हें बाबांस कळलें तरी । सर्वां अंतरीं वसती कीं ॥९३॥
मग तो विनवी कर जोडूनी । बहु आनंदलों आपुले दर्शनीं । तरी ऐसीच कृपा करोनी । महाराजांनीं रक्षावें ॥९४॥
आतां मज या पायांवांचुनी । देवचि नाहीं आणिक जनीं । मन हें रमो आपुले भजनीं । आपुलेच चरणीं सर्वदा ॥९५॥
म्हणे चरणीं ठेवितों माथा । निरोप मागतों साई - समर्था । आज्ञा असावी आम्हां आतां । असेंचि अनाथां सांभाळा ॥९६॥
असावी नित्य कृपाद्दष्टि । जेणें न होऊं संसारीं कष्टी । लाधो तव नामसंकीर्तनपुष्टी । सुखसंतुष्टी सर्वथा ॥९७॥
घेऊनि उदी साशीर्वाद । पावोनि स्नेह्यांसहित आनंद । मार्गीं गात साईगुणानुवाद । लखमीचंद परतला ॥९८॥
ऐसीच आणीक दुसरी चिडी । बांधूनि बाबांनीं आणिली शिरडीं । येतां प्रत्यक्ष दर्शनाची घडी । नवलपरवडी  परिसा ती ॥९९॥
चिडी ती एक प्रेमळ बाई । तिचिया कथेची परम नवलाई । बर्‍हाणपुरीं द्दष्टान्त होई । महाराज साई पाही ती ॥१००॥
कधींही नव्हतें प्रत्यक्ष दर्शन । तरी त्या बाईस जाहलें स्वप्न । बाबा तियेच्या द्वारीं येऊन । खिचडी - भोजा मागती ॥१०१॥
बाई तत्काळ होऊन जागी । पाही तों नाहीं कोणीही जागीं । दष्टान्त कथिला लागवेगीं । समस्तांलागीं तियेनें ॥१०२॥
पति तियेचा तेच शहरीं । तेथील टपालखात्याचा अधिकारी । पुढें अकोल्यास बदलल्यावरी । केली तयारी शिरडीची ॥१०३॥
दंपत्य होतें मोठें भाविक । जाहलें साईदर्शनकामुक । वाटलें द्दष्टान्ताचें कौतुक । माया अलौकिक साईंची ॥१०४॥
पुढें सोईचा पाहूनि दिन निघालीं दोघें शिरडी लक्षून । मार्गांत गोमती तीर्थ वंदून । शिरडीलागून पातलीं ॥१०५॥
प्रेमें घेऊनि बाबांचें दर्शन । करूनियां भावें पूजन । नित्य बाबांचे चरण सेवून । सुखसंपन्न जाहली ॥१०६॥
ऐसें तें दंपत्य आनंदमनें । राहिलें शिरडींत दोन महिने । बाबाही तुष्टले खिचडी - भोजनें । भावभक्तीनें तयांच्या ॥१०७॥
खिचडीनैवेद्य - समर्पणार्थ । दंपत्य आलें शिरडीप्रत । चतुर्दशदिन होतां ही गत । खिचडी अनिवेदित तैशीच ॥१०८॥
कृतसंकल्प दीर्घसूत्रता । नावडूनि ती बाईचे चित्ता । पंधरावे दिवशीं माध्यान्ह भरतां । खिचडीसमवेत पातली ॥१०९॥
होते तेव्हां पडदे सोडिले । घेऊइ समवेत भक्त आपुले । बाबा आधींच भोजनीं बैसले । ऐसें समजलें बाईस ॥११०॥
ऐसें भोजन चालते समयीं । पडद्याचे आंत कोणी न जाई । परी त्या बाईस जाहली घाई । खालीं न राही ती उगली ॥१११॥
केवळ खिचडी - निवेदनोह्लासा । अकोल्याहून शिरडीचे प्रवासा । अंगिकारी जी तियेचा धिंवसा । राहील कैसा अपूर्व ॥११२॥
कोणाचेंही कांहीं न मानितां । पडदा स्वहस्तें सारून वरता । करूनि निजप्रवेश निजसत्ता । कामनापूर्तता साधिली ॥११३॥
तेव्हां बाबांनीं नवल केलें । खिचडीलागीं इतुके भुकेले । कीं तीच आधीं मागूं सरले । ताटचि धरिलें दों हातीं ॥११४॥
खिचडी पाहूनि जाहला उल्हास । उचलूनियां घांसावर घांस । बाबांनीं सूदिले निजमुखास । कौतुक समस्तांस वाटलें ॥११५॥
पाहूनि बाबांची ती आतुरता । विस्मय दाटला सर्वांचे चित्ता । खिचडीची कथा परिसतां । वाटली अलौकिकता साईंची ॥११६॥
आतां येथून पुढील कथा । ऐकतां प्रेम दाटेल चित्ता । एक गुजराती ब्राम्हाण सेवेकरितां । आला अवचितां शिरडीस ॥११७॥
रावबहादूर साठयांचे पदरीं । आरंभीं केली जयानें चाकरी । तया शुद्ध सेवाभ्यंतरीं । लाधली पायरी बाबांची ॥११८॥
तीही कथा बहुत गोड । जयासी भक्तिप्रेमाची आवड । कैसें श्रीहरी पुरवी कोड । मनाची होड तें परिसा ॥११९॥
मेघा तयाचें नामाभिधान । साईंसवें ऋणानुबंधन । तेणें तो पावला शिरडी स्थान । कथानु - संधानतत्पर व्हा ॥१२०॥
साठे खेडाजिल्ह्याचे प्रांत । तेथें हा मेघा भेटला अवचित । ठेविला तयास तैनातींत । शिवालयीं नित्य पूजसे ॥१२१॥
पुढें हे साठे शिरडीस आले । तेंच तयांचें भाग्य उदेलें । तेथें महाराज साई जोडले । चित्त जडलें तच्चरणीं ॥१२२॥
त्रायेकर्‍यांचा पाहूनि रगडा । झाला तयांचे मनाचा धडा । असावा येथें आपुला वाडा । सोय बिर्‍हाडा लागेला ॥१२३॥
मग पुढारी ग्रामस्थ मिळविले । तया जागेचें संपादन केलें । जेथें बाबा आरंभीं प्रकटले । वाडयाचें ठरविलें तें स्थल ॥१२४॥
या पवित्र जागेचें महिमान । चतुर्थाध्यायींच पूर्ववर्णन । द्विरुक्तीचें नाहीं प्रयोजन । चालवूं निरूपण पुढारा ॥१२५॥
असो मेघाचें संचित मोठें । लाधले रावबहादुर साठे । तेव्हांच तो  लागला परमार्थवाटे । नेटेंपाटें तयांच्या ॥१२६॥
परिस्थितीस होऊनि वश । पावला होता कर्मभ्रंश । तयास देऊनि गायत्र्युपदेश । करविला प्रवेश सन्मार्गीं ॥१२७॥
मेघा साठयांचे सेवेस लागला । परस्परांशीं आदर वाढला । गुरुच मेघा भावी साठयांला । लोभही जडला तयांचा ॥१२८॥
असो एकदां सहज बोलतां । निजगुरूचें माहात्म्य वानितां । प्रेम दाटलें साठयांचे चित्ता । मेघास सादरता पूसती ॥१२९॥
बाबांस घालावें गंगोदकस्नान । इच्छा ही माझी मनापासून । तदर्थ तुज शिरडीलागून । पाठवितों जाण मुख्यत्वें ॥१३०॥
शिवाय तुझी अनन्य सेवा । पाहूनि वाटे माझिया जीवा । सद्नुरूचा तुज संगम घडावा । पायीं जडावा तव भाव ॥१३१॥
सार्थक होईल तव देहाचें । परम कल्याण या जन्माचें । जा जा काया  - मनें - वाचें । लागें सद्नुरूचे पायांस ॥१३२॥
मेघा पुसे तयांची जात । वस्तुत: साठयांसही ती अज्ञात । म्हणती कोणी अविंधही वदत । बैसती मशिदींत म्हणवूनि ॥१३३॥
अविंध हा शब्द कानीं पडतां । जाहली मेघामनीं दुश्चित्तता । नाहीं नीच यवनापरता ॥ काय गुरुत तयाची ॥१३४॥
नाहीं म्हणतां साठे क्षोभती । होय म्हणतां पावेल दुर्गती । करावें काय चालेना मती । चिंतावर्तीं तो पडला ॥१३५॥
इकडे आड तिकडे विहीर । दोलायमान मनीं अस्थिर । परी साठयांचा आग्रह फार । केला निर्धार दर्शनाचा ॥१३६॥
पुढें मेघा शिरडीस आला । मशिदीचे अंगणीं पातला । पायरी जों चढूं लागला । बाबांनीं लीला आरंभिली ॥१३७॥
उग्र स्वरूप धारण केलें । पाषाण हातीं घेऊन वदले । खबरदार पायरीवर पाऊल ठेविलें । यवनें वसविलें हें स्थान ॥१३८॥
तूं तो ब्राम्हाण उंच वर्ण । मी तों नीचाचा नीच यवन । होईल विटाळ तुजलागून । जाईं परतोन माधारा ॥१३९॥
तें कातावलेपणाचें रूप । दुजें प्रळयरुद्राचें स्वरूप । पहाणारांस होत थरकांप । चळी कांपत तंव मेघा ॥१४०॥
परी हा राग केवळ वरवर । अंतरी दयेचा वाहे पूर । मेघा थक्क विस्मयनिर्भर । कैसें मदंतर कळलें यां ॥१४१॥
कोठें खेडा जिल्हा दूर । कोठें लांब अहमदनगर । माझें विकल्पाकृष्ट अंतर । आविष्करण हें त्याचें ॥१४२॥
बाबा जों जों मारूं धांवत । तों तों मेघाचें धैर्य खचत । पाऊल एकेक मागेंच पडत । जावया न धजत पुढार ॥१४३॥
तैसाच कांहीं दिवस राहिला । बाबांचा रागरंग पाहिला । शक्य ती सेवा करीत गेली । परी न पटला द्दढ विश्वास ॥१४४॥
पुढें मग तो घरासी गेला । ज्वरार्त झाला अंथरुणीं खिळिला । तेथें बाबांचा ध्यास लागला । परतोनि आला शिरडीस ॥१४५॥
तो जो आला तोच रमला । साईपायीं भाव जडला साईंचा अनन्य भक्त जाहला । साईच त्याजला एक देव ॥१४६॥
मेघा आधींच शंकरभक्त । होतां साईपदीं अनुरक्त । शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा ॥१४७॥
करी मेघा अहर्निश । साईशंकर - नामघोष । बुद्धिही तदाकार अशेष । चित्त किल्मिषविरहित ॥१४८॥
झाला साईंचा अनन्य भक्त । साईंस प्रत्यक्ष शंकर भावित । शंकर शंकर मुखें गर्जत । अन्य दैवत मानीना ॥१४९॥
साईच त्याचें देवतार्चन । साईच त्याचा गिरिजारमण । येच द्दष्टीचा ठाय घालून । नित्य प्रसन्नमन मेघा ॥१५०॥
शंकरास बेलाची आवड । शिरडींत नाहीं बेलाचें झाडा । मेघा तदर्थ कोस दीडकोस । जाऊनि निज चाड पुरवीतसे ॥१५१॥
दीड कोसाचा काय पाड । बेलालागीं लंघिता पहाड । परी पूजेचें पुरविता कोड । फेडिता होड मनाची ॥१५२॥
लांबलांबून बेल आणावा । पूजासंभार पूर्ण मिळवावा । ग्रामदेवांचा अनुक्रम घ्यावा । सर्वांस वहावा यथाविधी ॥१५३॥
मग त्याच पावलीं जावें मशिदीं । प्रेमें वंदावी बाबांची गादी । करूनियां पादसंवाहनादि । पादतीर्थ आधीं सेवी तो ॥१५४॥
मेघाचिया आणिक कथा । आनंद होईल श्रवण करितां । ग्रामदेवांविषयीं आदरता । दिसेल व्यापकता साईंची ॥१५५॥
मेघा शिरडीस असेपर्यंत । दुपारची आरती करी तो नित । परी आधीं ग्रामदेव समस्त । पुजूनी मशिदींत जात असे ॥१५६॥
ऐसा तयाचा नित्यक्रम । एके दिसीं चुकला हा अनुक्रम । खंडोबाच्या पूजेचा अतिक्रम । घडला परिश्रम करितांही ॥१५७॥
पूजा कराया केला यत्न । द्वार न उघडे करितां प्रयत्न । म्हणून ती पूजा तैसीच वगळून । आला तो घेऊन आरती ॥१५८॥
तेव्हां बाबा वदती तयाला । पूजेंत त्वां आजला खंड पाडिला । पूजा पावल्या सर्व देवांला । एक राहिला पूजेविण ॥१५९॥
जा ती करूनि ये मग येथें । मेघा वदे दार बंद होतें । उघडूं जातां उघडेना तें । वगळणें पूजेतें भाग आलें ॥१६०॥
बाबा वदती जा तूं पाहें । दार आतां उघडें आहे । मेघा तात्काळ जाय लवलाहें । अनुभव लाहे बोलाचा ॥१६१॥
खंडेरायाची पूजा केली । मेघाचीही मळमळ गेली । पुढें बाबांनीं करूं दिधली । पूजा आपुली मेघाला ॥१६२॥
मग गंधपुष्पादि - अष्टोपचार । पूजा समर्पी अति सादर । यथाशक्ति दक्षिणा हार । फलभारही अर्पितसे ॥१६३॥
एकदां मरसंक्रांति - दिनीं । गोदावरीचें आणूनि पाणी । बाबांस अभ्यंग चंदन चर्चुनी । घालावें स्नान मनीं आलें ॥१६४॥
आज्ञेलागीं पिच्छा पुरवितां । इच्छेस येईल तें कर जा म्हणतां । मेघा घागर घेऊनि तत्त्वतां । पाण्याकरितां निघाला ॥१६५॥
आला न उदयाचलीं जो तरणी । मेघा निघे रिक्तकलशपाणी । निरातपत्र अनवाणी । आणूं पाणी गोमतीसी ॥१६६॥
जातां येतां आठ कोस । लागेल मार्ग क्रमावयास । पडतील कष्ट आणि सायास । स्वप्नींही तयास येईना ॥१६७॥
ही तों मेघास नाहीं चिंता । निघाला तो अनुज्ञा मिळतां । असतां निश्चयाची द्दढता । कार्योह्लासता सवेंच ॥१६८॥
गंगोदकें साईंस स्नान । घालावें ऐसें होतां मन । कैंचे सायास कैंचा शीण । एक प्रमाण द्दढ श्रद्धा ॥१६९॥
असो ऐसें तें पाणी आणिलें । ताम्र - गंगालयीं रिचविलें । स्नानार्थ उठावें आग्रह चालले । परी न मानिलें बाबांनीं ॥१७०॥
माध्यान्हींची आरती झाली । मंडळी घरोघर निघोनि गेली । झाली स्नानाची तयारी सकळी । दुपार भरली मेघा वदे ॥१७१॥
पाहूनि मेघा अत्याग्रही । मग तो साई लीलाविग्रही । कर मेघाचा निजकरांहीं । धरूनि पाहीं संबोधी ॥१७२॥
नको रे मज गंगास्नान । ऐसा कैसा तूं नादान । किमर्थ मज फकीराकारण । गंगाजीवन मज काय ॥१७३॥
परी मेघा तें कांहीं न ऐके । शंकरासम जो बाबांस लेखे । गंगास्नानें शंकर हरिखे । हें एकचि ठाउकें तयातें ॥१७४॥
म्हणे बाबा आजिचा दिन । मकरसंक्रांतीचा सण । गंगोदकें शंकर स्नपन । करितां सुप्रसन्न तो होई ॥१७५॥
मग पाहूनि तयाचें प्रेम । आणि तयाचा अढळ नेम । म्हणती पुरवीं तुझाचि काम । शुद्धांतर्याम मेघाचें ॥१७६॥
ऐसें म्हणूनि मग ते उठले । स्नानार्थ मांडिल्या पाटावर बसले । मस्तक मेघापुढें ओढवलें । म्हणती इवलेंसें जळ घालीं ॥१७७॥
सकळ गात्रीं शिर प्रधान । करीं तयावरी लव जळसिंचन । तें पूर्ण स्नान केलियासमान । हें तरी मान रे इतुकें ॥१७८॥
बरें म्हणूनि कलश उचलिला । शिरीं ओततां प्रेमा जो दाटला । ‘हर गंगे’ म्हणूनि तो रिचविला । सबंध ओतिला अंगावर ॥१७९॥
मेघास अत्यंत आनंद झाला । माझा शंकर सचैल न्हाणिला । घडा रिता जैं खालीं ठेविला । पाहूं लागला नवल तो ॥१८०॥
सर्वांगीं जरी ओतलें उदक । शिरचि तेवढें ओलें एक । इतर अवयव सुके ठाक । वस्त्रींही टांकन जलाचा ॥१८१॥
मेघा जाहला गलिताभिमान । निकटवर्ती विस्मयापन्न । ऐसे भक्तांचे लाड आपण । पुरवीत संपूर्ण श्रीसाई ॥१८२॥
तुझ्या मनीं घालावें स्नान । जा घाल तुझ्या इच्छेसमान । त्यांतही माझ्या अंतरींची खूण । सहज जाण लाधसील ॥१८३॥
हेंच साईभक्तीचें वर्म। व्हावा मात्र सुदैवें समागम । मग तया कांहीं न दुर्गम । सर्वचि सुगम क्रमेंक्रमें ॥१८४॥
बसतां उठतां वार्ता करितां । सकाळा दुपारा फेरिया फिरतां । भक्त श्रद्धा स्थैर्य धरितां । ईप्सितार्था संपादी ॥१८५॥
परी ऐसी कांहीं खूण । प्रत्यक्ष व्यवहारीं पटवून । क्रमानुसार गोडी लावून । परमार्थाकलन तो करवी ॥१८६॥
ऐसीच मेघाची आणीक कथा । सुखावतील श्रोते परिसतां । भक्तप्रेम साईंचें पाहतां । आनंद चित्ता होईल ॥१८७॥
बाबांची एक मोठी छबी । होती नानांनीं जी दिधली नवी । तीही मेघा वाडयांत ठेवी । पूजेस लावी भक्तीनें ॥१८८॥
मशिदींत प्रत्यक्ष मूर्ती । वाडयांत प्रतिमा पूर्ण प्रतिकृती । दोनी स्थळीं पूजा आरती । अहोरात्रीं चालली ॥१८९॥
ऐसी सेवा होतां होतां । सहज बारा मास लोटतां । मेघा पहांटे जागृत असतां । देखिलें द्दष्टान्ता तयानें ॥१९०॥
असतां मेघा शेजेप्रती । जरी निमीलित नेत्रपातीं । अंतरीं असतां पूर्ण जागृति । पाहे स्पष्टाकृति बाबांची ॥१९१॥
बाबाही जाणूनि तयाची जागृती । अक्षता टाकूनि बिछान्यावरती । ‘मेघा त्रिशूल काढीं रे’ म्हणती । गुप्त होती तेथेंच ॥१९२॥
हे बाबांचे शब्द परिसतां । डोळे उघडले अति उल्हासता । पाहूनि बाबांची अंतर्धानता । बहुविस्मयता मेघास ॥१९३॥
मेघा तंव पाही चोहोंकडे । तांदूळ शेजेवर जिकडे तिकडे । वाडयाचीं पूर्ववत बंद कवाडें । पडलें तें कोडें तयास ॥१९४॥
मशिदीस जाऊनि तत्काळीं । बाबांचें दर्शन घेतेवेळीं । मेघानें त्रिसूळकथा कथिली । आज्ञा गागितली त्रिशूळाची ॥१९५॥
द्दष्टान्त साद्यंत मेघानें कथिला । बाबा वदती “द्दष्टान्त कसला । शब्द नाहीं का माझा परिसिला । काढ म्हणितला त्रिशूळ तो ॥१९६॥
द्दष्टान्त म्हणूनि माझे बोल । जातां काय कराया तोल । बोल माझे अर्थ सखोल । नाहीं फोल अक्षरही” ॥१९७॥
मेघा म्हणे आपण जागविलें । ऐसेंच आरंभीं मजही वाटलें । परी दार नव्हतें एकही खुलें । म्हणून मानिलें तें तैसें ॥१९८॥
तयास बाबांचें ऐका उत्तर । ‘माझिया प्रवेशा नलगे दार । नाहीं मज आकार ना विस्तार । वसें निरंतर सर्वत्र ॥१९९॥
टाकूनियां मजवरी भार । मीनला जो मज साचार । तयाचे सर्व शरीरव्यापार । मी सूत्रधार चालवीं” ॥२००॥
असो पुढें नवल विंदान । त्रिशूलाचें प्रयोजन । श्रोतां परिसिजे सावधान । येईल अनुसंधान प्रत्यया ॥२०१॥
येरीकडे मेघा जो परतला । त्रिशूळ काढावया आरंभ केला । वाडियांत छबीनिकट भिंतीला । त्रिशूळ रेखाटिला रक्तवर्ण ॥२०२॥
दुसरेच दिवशीं मशिदींत । आला पुण्याहूनि रामदास भक्त । प्रेमें बाबांस नमस्कारीत । लिंग अर्पीत शंकराचें ॥२०३॥
इतक्यांत मेघाही तेथें आला । बाबांसी साष्टांग प्रणाम केला । बाबा म्हणती “हा शंकर आला । सांभाळीं याजला तूं आतां” ॥२०४॥
ऐसें होतां लिंग प्राप्त । त्रिशूळ - द्दष्टान्तापाठीं अवचित । मेघा तटस्थ लिंगचि देखत । प्रेमें सद्नदित जाहला ॥२०५॥
आणीक पाहाया लिंगाचा अनुभव । काकासाहेब दीक्षितांचा अपूर्व । श्रोतां सादर परिसिजे सर्व । जडेल भरंवसा साईपदीं ॥२०६॥
येरीकडे जो लिंग घेऊनी । निघे मेघा मशिदींतुनी । दीक्षित - वाडयांत स्नान सारुनी । नामस्मरणीं निमग्न ॥२०७॥
धूतवस्त्रें अंग पुसून । शिळेवरी उभें राहून । टुवाल डोईवर घेऊन । करीत स्मरण साईंचें ॥२०८॥
नित्यनेमा अनुसरून । शिरोभाग आच्छादून । करीत असतां नामस्मरण । लिंगदर्शन जाहलें ॥२०९॥
चाललें असतां नामस्मरण । आजचि कां व्हावें लिंगदर्शन । ऐसें जों दीक्षित विस्मयापन्न । मेघा सुप्रसन्न सन्मुख ॥२१०॥
म्हणे मेघा ‘पहा काका । लिंग बाबांनीं दिधलें विलोका’ । काका पावले सविस्मय हरिखा । लिंगविशेखा देखुनी ॥२११॥
रूपरेखा आकार लक्षणीं । आलें ध्यानीं जें पूर्वक्षणीं । तेंच तें लिंग पाहूनि तत्क्षणीं । दीक्षित मनीं सुखावले ॥२१२॥
असो पुढें मेघाचे हातून । त्रिशूळलेखन होऊनि पूर्ण । छबीसंनिध लिंग स्थापन । साईंनीं करवून घेतलें ॥२१३॥
मेघास आवडे शंकरपूजन । करून शंकरलिंगप्रदान । केलें तद्भक्तीचें द्दढीकरण । नवल विंदान साईंचें ॥२१४॥
ऐसी काय एक कथा । सांगेन ऐशा अपरिमिता । परी होईल ग्रंथविस्तरता । म्हणूनि श्रोतां क्षमा कीजे ॥२१५॥
तथापि तुम्ही श्रवणोत्सुक । म्हणोन कथीन आणिक एक । पुढील अध्यायीं साईंचें कौतुक । याहून अलौकिक दिसेल ॥२१६॥
होऊन हेमाड साईंसीं शरण । करवी साईचरित्र श्रवण । होईल तेणें भवभयहरण । दुरितनिवारण सकळांचें ॥२१७॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । द्दष्टान्तकथनं नाम अष्टाविंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
ALSO READ: साईसच्चरित - अध्याय २९

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मल्हारी मार्तंड विजय अध्याय एकोणिसावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय अठरावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय सतरावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय सोळावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय पंधरावा

सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

पुढील लेख