Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बृजभूषण सिंह यांना पदावरून हटवलं, कुस्तीपटूंनी आंदोलन थांबवलं

Webdunia
शनिवार, 21 जानेवारी 2023 (10:50 IST)
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटू आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन सुरू होतं.
 
ऑलिम्पिक विजेत्यांसह दिग्गज खेळाडूंनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्षं आंदोलनाकडे लागलं होतं.
 
त्यात सलग दोन दिवस केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची चर्चा सुरू होती. अखेर काल (20 जानेवारी) रात्री उशिरा कुस्तीपटूंनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घोषित केला.
 
कुस्तीपटूंसोबत पत्रकार परिषद घेत अनुराग ठाकूरांनी माहिती दिली की, "खेळाडूंनी केलेल्या आरोपांची पुढील चार आठवड्यात पूर्ण चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत बृजभूषण सिंह यांना कुश्ती संघटनेपासून दूर ठेवलं जाईल."
 
या पत्रकार परिषदेत पैलवान बजरंग पूनिया यांनी म्हटलं की, "सर्व खेळाडूंना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आश्वासन दिलंय आणि सर्वांना समजावलंय. आम्ही आता आंदोलन थांबवत आहोत. आम्हाला सरकारनं आश्वासन दिलंय. आम्हाला न्याय मिळेल, यावर आमचा विश्वास आहे."
 
अनुराग ठाकूर यांच्या माहितीप्रमाणे, "खेळाडूंच्या आरोपांच्या चौकशीसाठी ओव्हरसाईट कमिटी स्थापन केली जाईल. पुढच्या 4 आठवड्यात ही कमिटी चौकशी पूर्ण करेल. चौकशी पूर्ण होईपर्यंत कमिटीच संघटनेचं काम पाहील. तोपर्यंत कुश्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे दैनंदिन कामकाजापासून दूर राहतील आणि चौकशीत सहकार्यही करतील."
 
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
 
पण नक्की या प्रकरणात काय घडलं, जाणून घ्या 7 मुद्यात :
1. विनेश फोगटचे आरोप
कुस्तीपटू विनेश फोगाटने पत्रकारांशी बोलताना म्हटलं, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देता. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.”
 
फोगाट पुढे म्हणाली, “ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. ते आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिक खेळण्यासाठी जातो त्यावेळी आमच्याकडे ना फिजिओ असतो ना प्रशिक्षक. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांनी आम्हाला धमकावणं सुरू केलं.
 
विनेश फोगाट ही 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील 53 किलो वजनी गटातील सुवर्ण पदकविजेता आहे.
 
विनेश फोगाट पुढे म्हणाली, “माझा इतका मानसिक छळ करण्यात आला आहे की मी एके काळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. प्रत्येक खेळाडूला आमच्यासोबत काय घडत आहे, याची कल्पना आहे.”
2. दिग्गज खेळाडू मैदानात
कुस्तीपटूंनी पुकारलेल्या धरणे आंदोलनात अनेक दिग्गज खेळाडू उतरल्याचं दिसून येत आहे.
 
दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह इतर अनेक खेळाडू ठाण मांडून बसले आहेत.
 
कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, “कुस्ती महासंघामध्ये बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे. या लोकांना कुस्ती खेळाबाबत काहीएक माहिती नाही.”
 
3. बृजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी तत्काळ समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
 
बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, असं ते म्हणाले. तसंच शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आणखी स्पष्टीकरण देण्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले, “दिल्लीत कुस्तीपटूंनी महासंघाविरुद्ध धरणे आंदोलन पुकारल्याची माहिती मिळताच मी तत्काळ आलो. माझ्यावर सगळ्यांत मोठा आरोप विनेशने लावला आहे. महासंघाच्या अध्यक्षांनी या खेळाडूचं शोषण झालं, असं म्हणणारा कुणी खेळाडू समोर आला आहे का?”
 
ते पुढे म्हणाले, “लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही. तसं काही घडलं असल्यास मी स्वतःला फाशी लावून घेईन.”
 
4. बृजभूषण सिंह कोण आहेत?
बृजभूषण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे केसरगंजचे खासदार आहेत. केसरगंज लोकसभा मतदारसंघ हा गोंडा जिल्ह्याच्या तरबगंज, कटराबाजार आणि करनैलगंज तर बहराईच जिल्ह्याच्या पयागपूर आणि केसरगंज या तालुक्यांनी मिळून बनलेला आहे.
 
1991 साली पहिल्यांदा गोंडामधून खासदार बनलेले बृजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. 2019 साली ते सहाव्यांदा खासदार बनले.
 
एके काळी गोंडा शहरातील स्थानिक नेते म्हणून ओळखले जाणारे आता बृजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
 
बृजभूषण 2008 मध्ये भाजप सोडून काही काळ समाजवादी पक्षातही गेले होते. मात्र 2014 ला पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला.
 
राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात अयोध्येला जाण्याचं नियोजन केलं होतं. त्यावेळी राज यांच्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तसंच राज ठाकरे यांना त्यांनी उंदीर असंही संबोधलं होतं.
 
राज ठाकरेंना अयोध्येत पाय न ठेवू देण्याचा इशारा त्यावेळी बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.
 
अयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
 
"राज यांनी सार्वजनिक माफी मागितली नाही तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही," असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं.
 
"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये," अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली होती.
 
मात्र, नंतर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
 
स्थानिकांच्या मते, बृजभूषण सिंह हे राजकारणात येण्याच्या आधीपासून कुस्ती स्पर्धा आयोजित करत होते. त्यांना महागड्या एसयूव्ही गाड्यांचाही छंद आहे.
 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लक्ष्मणपुरी भागात त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. तिथे गाड्या उभ्या करण्यास जागाही कमी पडते, असं लोक सांगतात.
 
भूतकाळात बृजभूषण सिंह यांच्यावर हत्या, जाळपोळ, तोडाफोडी यांसारखे आरोपही लावण्यात आले होते.
 
5. कुस्तीमध्ये कंत्राटी पद्धत
बृजभूषण सिंह यांनीच कुस्तीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम लागू केली. 2018 मध्ये लागू करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये खेळाडूंना वेगवेगळ्या श्रेणीत विभागून एक वर्षाचा करार केला जायचा.
या व्यवस्थेंतर्गत ग्रेड एच्या खेळाडूंसाठी 30 लाख रुपये, ग्रेड बीच्या खेळाडूंसाठी 20 लाख रुपये, ग्रेड सीच्या पैलवानांसाठी 10 लाख रुपये आणि ग्रेड डीच्या पैलवानांसाठी 5 लाख रुपये देण्याची तरतूद या कॉन्ट्रॅक्टमध्ये होती.
 
पहिल्यांदा जेव्हा ही व्यवस्था लागू करण्यात आली, तेव्हा ए ग्रेडमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि पूजा ढांडा हे खेळाडू होते. बी ग्रेडमध्ये सुशील कुमार आणि साक्षी मलिक, तर सी ग्रेडमध्ये रितू फोगाट आणि दिव्या काकरानसारखे खेळाडू होते.
 
6. विजेंदर सिंह यांचा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा
जंतरमंतरवर भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात कुस्तीपटून आंदोलन करत आहेत. या कुस्तीपटूंची भेट घ्यायला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटून विजेंदर सिंह जंतरमंतरला आला आहे.
“माझा या खेळाडूंना पाठिंबा आहे, मी त्यांना भेटायला आलोय असं त्याने म्हटलं.”
 
7. ‘आम्ही या प्रकरणाची पूर्ण चौकशी करू’
माजी धावपटू पीटी उषा सध्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी ट्वीट करून म्हटलं की खेळाडूंचं हित पाहाणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
त्यांनी लिहिलं, “आम्ही सर्व खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तक्रारी घेऊन समोर यावं. सध्या जे घडतंय त्याबद्दल मी असोसिएशनच्या सदस्यांशी चर्चा केलेली आहे.”
 
“या प्रकरणीची संपूर्ण चौकशी करून न्याय दिला जाईल याची आम्ही काळजी घेऊ. भविष्यात अशा घटना घडल्या तर कारवाई करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचाही आम्ही निर्णय घेतला आहे.”
 
IOA ने स्थापन केलेल्या सात सदस्यीय समितीत मेरी कोम, डोला बॅनर्जी, योगेश्वर दत्त आणि सहदेव यादव यांचा समावेश आहे.
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले

छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत म्हणाले 132 जागा जिंकल्या तर मुख्यमंत्री भाजपचाच असावा

प्रेयसीची हत्या करून प्रियकराने मृतदेहाचे 50 तुकडे केले

सांगलीतील कृष्णा नदीच्या पुलावरून कार खाली पडल्याने पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू

नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरत विचारले राज्यात सात टक्के मतदान कसे वाढले?

पुढील लेख
Show comments