Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विनायक दामोदर सावरकर: या ऐतिहासिक 9 घटनांद्वारे समजून घ्या सावरकरांचे व्यक्तिमत्त्व

Webdunia
मंगळवार, 28 मे 2024 (08:34 IST)
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्या नेत्यांचा आजही उल्लेख केला जातो किंवा चर्चा होते त्यामध्ये सावरकरांच्या नावाची चर्चा अनेकदा होताना दिसते. त्यांच्या नावावरुन अनेक वेळा वाद देखील निर्माण झाले आहेत.
 
रणदीप हुडाने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केली होती आणि सावरकरांच्या प्रमुख भूमिकेतही रणदीप हुडाने काम केलं होतं. त्यावरुन भरपूर चर्चा झालेली आपण पाहिलीच असेल.
 
सावरकरांचे योगदान झाकोळले गेले आहे त्यामुळे मी हा चित्रपट काढल्याचे रणदीप हुडाने म्हटले आहे तर अनेक जण असं म्हणत आहेत की हे सावरकांचे उदात्तीकरण आहे.
 
याआधी देखील सावरकरांवरुन वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
 
राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले होते त्यावेळी त्यांनी सावरकरांबद्दल विधान केल्यानंतर वाद पेटला होता.
 
त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने राज्यभरात जागोजागी आंदोलनं केली होती. ती यात्रा संपली. राहुल गांधींची सर्व चोर हे मोदीच का असतात असे वक्तव्य केल्याप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाकडून खासदारकी रद्द झाली होती.
 
तेव्हा कुणी सावरकरांवर चर्चा करणार नाही असे वाटत असतानाच राज्यातील काँग्रेसचा मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीचा एक घटक असलेल्या शिवसेनेने (UBT) सावरकरांवरून थेट राहुल गांधींचेच कान टोचले होते हे अनेकांच्या लक्षात असेल.
 
शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 मार्च 2023 रोजी झालेल्या मालेगाव येथील सभेत म्हटले की राहुल गांधी जो सावरकरांचा अपमान करतात तो खपवून घेतला जाणार नाही.
 
यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना राजकीय कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न केला होता.
 
त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून सावरकर आणि गोळवलकर यांना काढून टाकल्यानंतर पुन्हा त्यांच्याविषयी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.
 
हे सर्व सुरू असतानाच एक प्रश्न निर्माण होतो की सावरकरांचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे होते. त्यांच्यावरून वाद तर निर्माण होतो पण इतिहासात त्यांचे काय स्थान होते याबद्दलचा हा लेख.
बीबीसीचे रेहान फजल यांनी सावरकरांबद्दलच्या विविधांगी मतांचा धांडोळा घेत त्यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख पुन्हा शेयर करत आहोत.
 
1. आरएसएसचे नसूनही संघ परिवारामध्ये आदर
सावरकर हे स्वतः कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघाचे सदस्य नव्हते. मात्र तरीही त्यांचं नाव संघ परिवारामध्ये आदरानं घेतलं जातं.
 
2000 साली वाजपेयी सरकारनं तत्कालिन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याकडे सावरकरांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र तो स्वीकारला गेला नाही.
द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट' या पुस्तकाचे लेखक नीलंजन मुखोपाध्याय यांनी सांगितलं, की 26 मे 2014 ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोनच दिवसांनी सावरकरांचा 131 वा जन्मदिवस होता. त्याचं औचित्य साधून मोदींनी संसद भवनातील सावरकरांच्या फोटोला अभिवादन केलं होतं. असं असलं तरी सावरकर हे विवादास्पद व्यक्तिमत्त्व होतं हेही आपल्याला मान्य करायलाच हवं.
 
"गांधी हत्येप्रकरणी सावरकरांवर खटला दाखल करण्यात आला होता. ते सुटले असले तरी त्यांच्या हयातीतच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग नेमण्यात आला होता आणि या आयोगाच्या अहवालात सावकरांवर कायमच संशयाची सुई होती. अशा नेत्याला सार्वजनिक आयुष्यात इतका सन्मान देणं ही मोदींची प्रतीकात्मक कृती होती," असंही मुखोपाध्याय यांनी म्हटलं.
 
2. नाशिकच्या कलेक्टरच्या हत्येप्रकरणी अटक
सावरकरांना त्यांच्या राजकीय विचारांमुळेच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं होतं. 1910 साली त्यांना नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून लंडनमध्ये अटक करण्यात आली होती.
 
सावरकरांवर संशोधन करणारे निरंजन टकले सांगतात, की 1910 मध्ये नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर जॅक्सनच्या हत्येप्रकरणी पहिल्यांदा सावरकरांच्या भावाला अटक करण्यात आली होती. सावरकरांनी लंडनहून आपल्या भावाला पाठवलेल्या बंदुकीचा वापर जॅक्सनच्या हत्येसाठी करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर होता. 'एसएस मौर्य' नावाच्या जहाजावरून त्यांना भारतात आणलं जात होतं. हे जहाज जेव्हा फ्रान्समधील मार्सेलिस बंदरामध्ये थांबलं होतं तेव्हा सावरकरांनी शौचालयातील पोर्ट होलमधून समुद्रामध्ये उडी मारली.
 
3. त्या 'प्रसिद्ध' उडीनंतर…
यापुढची गोष्ट 'ब्रेव्हहार्ट' नावानं सावरकरांचं चरित्र लिहिणारे आशुतोष देशमुख सांगतात. "सावरकरांनी जाणूनबुजून आपला नाइट गाउनचा घातला होता. शौचालयाच्या दरवाजाला काच होती, जेणेकरून कैद्यांवर नजर ठेवता येईल. सावरकरांनी आपला गाउन काढून दरवाजावरील काचेवर टाकला."
"त्यांनी आधीच शौचालयाच्या पोर्ट होलचं माप घेतलं होतं आणि त्यांना अंदाज होता, की आपण यातून बाहेर जाऊ शकतो. आपल्या काटकुळ्या शरीराला त्यांनी पोर्ट होलमधून समुद्रात झोकून दिलं."
"नाशिकमध्ये घेतलेलं पोहोण्याचं प्रशिक्षण त्यांच्या कामी आलं आणि ते वेगानं किनाऱ्याच्या दिशेनं जायला लागले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, मात्र ते बचावले," असं आशुतोष देशमुख यांनी सांगितलं.
 
4. सुरक्षारक्षकांच्या ताब्यात
देशमुख पुढे लिहितात, की सावरकरांच्या पाठोपाठ सुरक्षारक्षकांनीही समुद्रात उडी मारली आणि त्यांचा पाठलाग करायला लागले.
 
"सावरकर जवळपास 15 मिनिटं पोहून किनाऱ्यावर पोहोचले. वेगानं धावत त्यांनी किमान अर्धा किलोमीटरचं अंतर पार केलं. त्यांच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. तेव्हा त्यांना एक पोलीस अधिकारी दिसला. त्याच्याजवळ जाऊन सावरकरांनी विनंती केली, की त्यांना राजकीय आश्रयासाठी मॅजिस्ट्रेटकडे नेलं जावं. मात्र त्यांच्या मागावर असलेले सुरक्षारक्षकही तोवर किनाऱ्यावर पोहोचले होते आणि 'चोर, चोर' असं ओरडत होते. सावरकरांनी खूप विरोध केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांना पकडण्यात आलं.
 
5. अंदमानच्या सेल्युलर जेलमधले दिवस
पकडले गेल्यानंतर सावरकरांना भारतात पाठवलं गेलं आणि पुढची 25 वर्षें ते इंग्रजांचे कैदी बनून राहिले.
 
त्यांना 25-25 वर्षांच्या कारवासाच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या आणि शिक्षा भोगण्यासाठी भारतातील अंदमान इथं पाठविण्यात आलं. या शिक्षेला 'काळ्या पाण्या'ची शिक्षाही म्हणायचे.
त्यांना 698 खोल्यांमधील सेल्युलर जेलमध्ये 13.5 बाय 7.5 आकाराच्या खोली क्रमांक 52 मध्ये ठेवण्यात आलं होतं.
 
जेलमधील जीवनक्रमाबद्दल आशुतोष देशमुख यांनी लिहिलं आहे, की अंदमानमध्ये सरकारी अधिकारी बग्गीमधून जायचे आणि राजकीय कैद्यांना या बग्ग्या ओढाव्या लागायच्या.
 
"तिथले रस्तेही धड नव्हते आणि बराचसा भाग हा डोंगराळ होता. जेव्हा कैदी बग्गी ओढू शकायचे नाहीत, तेव्हा त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली जायची. त्रास देणाऱ्या कैद्यांना जेवण्यासाठी केवळ पाणचट सूप दिलं जायचं."
 
अनेकदा कैद्यांना हातकड्या आणि बेड्या घालून उभं रहायची शिक्षाही दिली जायची.
 
6. इंग्रजांकडे दिला माफीनामा
या सेल्युलर जेलमध्येच सावरकरांच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू झाला होता. या तुरूंगात त्यांनी घालविलेल्या 9 वर्षें आणि 10 महिन्यांनी त्यांचा इंग्रजांना असलेला विरोध पूर्णपणे मावळला.
 
निरंजन टकले सांगतात, "मी सावरकरांच्या आयुष्याकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाहतो. त्यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा हा रोमँटिक क्रांतिकारी विचारांनी भारलेला होता. याच काळात त्यांनी 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामावर पुस्तकही लिहिलं होतं. त्यात त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला होता."
"अटक झाल्यानंतर सावरकरांना वास्तवाची जाणीव झाली. 11 जुलै 1911 ला सावरकर अंदमानमध्ये दाखल झाले आणि 29 ऑगस्टला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. म्हणजेच तिथे पोहोचल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात. त्यानंतर 9 वर्षांच्या काळात त्यांनी सहा वेळा इंग्रजांना माफीनामा लिहून दिला.
 
"जेलमधील नोंदींनुसार तिथं तीन-चार महिन्यांमध्ये कैद्यांना फाशी दिली जायची. फाशी देण्याचं ठिकाण हे सावरकरांच्या खोलीच्या बरोबर खाली होतं. कदाचित या गोष्टीचाही सावरकरांवर परिणाम झाला असावा. जेलर बॅरीनं सावरकरांना काही सवलती दिल्याचीही कुजबूज होती," असं निरंजन टकले सांगतात.
 
"अजून एक कैदी बरिंद्र घोष यांनी सांगितलं, की सावरकर बंधू आम्हाला जेलरविरोधात आंदोलन करण्यासाठी गुपचूप प्रोत्साहन द्यायचे. जेव्हा आम्ही त्यांना तुम्हीही आमच्यासोबत या असं म्हणायचो तेव्हा ते मागं हटायचे. तुरूंगात त्यांना कोणतंही अवघड काम दिलं गेलं नव्हतं.
 
"इंग्रजांकडे माफीनामा देताना सावरकरांनी आपल्याला भारतातील अन्य कोणत्याही तुरूंगात पाठविण्याची विनंती केली होती. त्याबदल्यात कोणत्याही तऱ्हेनं सरकारची मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती," असं टकले म्हणतात.
 
इंग्रजांनी जी काही पावलं उचलली आहेत, त्यामुळे घटनात्मक व्यवस्थेवरचा आपला विश्वास दृढ झाला असून आपण आता हिंसेचा मार्ग सोडल्याचं सावरकरांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटलं होतं.
 
या माफीनाम्याचा परिणाम म्हणून कदाचित सावरकरांना 30 आणि 31 मे 1919 ला आपली पत्नी आणि धाकट्या भावाला भेटण्याची परवानगी मिळाली होती.
 
7. 'जेलमधून बाहेर राहण्यासाठीची रणनीती'
नंतरच्या काळात सावरकरांनी इंग्रजांकडे माफी मागण्याच्या आपल्या कृतीचं समर्थनही केलं होतं. हा आपल्या रणनीतीचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
सावरकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं, की जर मी तुरूंगात असहकार पुकारला असता तर माझा भारतात पत्र पाठविण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला असता.
 
भगत सिंह यांच्याकडेही माफी मागण्याचा पर्याय होता. मात्र त्यांनी असं केलं नाही. मग सावरकरांची अशी कोणती हतबलता होती, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि इंदिरा गांधी सेंटर फॉर आर्ट्सचे प्रमुख राम बहादुर राय यांना विचारला.
 
राम बहादुर राय यांनी सांगितलं, की भगत सिंह आणि सावरकरांमध्ये खूप मौलिक अंतर आहे. भगत सिंह यांनी ज्यादिवशी बॉम्ब फेकण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी निश्चित केलं होतं की आपण फासावर जायचं आहे. दुसरीकडे सावरकर मात्र चतुर क्रांतिकारी होते.
 
"भूमिगत राहून जितकं काम करता येईल, तितकं करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. आपल्या माफी मागण्यावर लोक काय म्हणतील याचा सावरकरांनी विचार नाही केला. आपण तुरूंगाच्या बाहेर राहिलो, तरच आपल्याला हवं ते काम करता येईल असं त्यांना वाटत होतं."
 
8. इंग्रजांसोबत करार
1924 साली सावरकरांची पुण्यातील येरवडा जेलमधून दोन अटींवर सुटका करण्यात आली. एक म्हणजे ते कोणत्याही राजकीय चळवळींमध्ये भाग घेणार नाहीत आणि दुसरी म्हणजे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ते जिल्ह्याबाहेर पडणार नाहीत.
 
निरंजन टकले सांगतात, की सावरकरांनी व्हाईसरॉय लिनलिथगो सोबत लिखित करार केला होता. गांधी, काँग्रेस आणि मुसलमानांना विरोध करणं हे आपल्या दोघांचंही समान उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
"इंग्रज सरकार त्यांना महिना साठ रुपये पेन्शनही देत होतं. सावरकर त्यांची अशी कोणती सेवा करत होते, की त्यांना पेन्शन दिलं जावं? असं पेन्शन मिळणारे स्वातंत्र्यलढ्यातील ते एकमेव व्यक्ती होते."
 
9. महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी अटक
 
महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याबद्दल आठ लोकांसह जेव्हा सावरकरांनाही अटक झाली, तेव्हा त्यांच्या प्रतिमेला सर्वाधिक धक्का पोहोचला.
 
ठोस पुराव्यांच्या अभावे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
 
नीलांजन मुखोपाध्याय सांगतात, "पूर्ण संघ परिवाराला गांधी हत्येचा कलंक दूर करण्यासाठी खूप काळ लागला. सावरकर याप्रकरणी तुरूंगातही गेले होते. त्यानंतर ते सुटले आणि 1966 म्हणजे जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्यांना स्वीकार्यता मिळाली नाही."
"त्या काळात आरएसएसनंही त्यांच्यापासून स्वतःला दूरच ठेवलं होतं. सावरकरांनी खूप प्रयत्न करूनही गांधी हत्येच्या संशयापासून ते स्वतःला वेगळं करू शकले नाहीत. कपूर आयोगाच्या अहवालातही म्हटलं आहे, की सावरकरांना माहीत नसताना गांधींची हत्या घडू शकते यावर विश्वास ठेवणं कठीण आहे."
 
राम बहादूर राय सांगतात, की अखेरच्या दिवसांत सावरकरांवर जो कलंक लागला, त्यामुळे त्यांचा एकूणच वैचारिक वारसा झाकोळला गेला. एखादा क्रांतिकारक जो कवी आहे, साहित्यकार आहे आणि चांगला लेखकही आहे असं उदाहरण जगाच्या पाठीवर दुर्मिळच म्हणायला हवं.
 
ते म्हणतात, "अंदमानच्या तुरूंगात असताना त्यांनी विटकरीच्या तुकड्याची लेखणी केली आणि भिंतीवर 6 हजार कविता लिहिल्या, त्या मुखोद्गात केल्या. सावरकरांनी 5 पुस्तकंही लिहिली आहेत. मात्र तरीही महात्मा गांधींच्या हत्येसोबत नाव जोडलं गेलं, की सावरकर संपतात. त्यांच्या राजकीय विचारधारेचा विचारही केला जात नाही."

Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचा आपलं अपहरण झाल्याचा दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी माविआचा जाहीरनामा जाहीर, 50 टक्के आरक्षण मर्यादा काढण्याचे आश्वासन

J&K : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या नेत्याचा मृतदेह आढळला,एका महिलेला अटक

राज ठाकरेंचा शरद पवारांवर मोठा हल्ला म्हणाले-

पुढील लेख
Show comments