Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आषाढी एकादशी माहिती मराठी

Webdunia
मंगळवार, 16 जुलै 2024 (11:36 IST)
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
 
तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.
 
पंढरपूर वारी
पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची पंरपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते.
 
आषाढी एकादशीचे महत्तव
आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहेत. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. 
 
आषाढी एकादशीचे व्रत
आषाढी एकादशीला व्रत- उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.
 
आषाढी एकादशी महात्म्य कथा
एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्री च्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.

ALSO READ: भक्त पुंडलिक कथा Bhakt Pundalik Katha
 
आषाढी एकादशी आरती विठ्ठलाची
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
 
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
 
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
 
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
 
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

विवाह पंचमी या दिवशी लोक लग्न करण्यास का घाबरतात?

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments