Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त

Webdunia
शनिवार, 14 एप्रिल 2018 (12:30 IST)
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (दि. 14 एप्रिल) जयंती. त्यानिमित्त या महामानवाच्या विविध पैलूंवर नजर टाकणारा लेख. 
 
14 एप्रिल 1891 या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याचा उदय झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी कोट्यावधी अनुयायांच्या आनंदाश्रुंना वाट करुन देत काळजाला स्पर्शून जातो. त्याचबरोबर जेथे जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत, तेथे तेथे उसळणारी गर्दी आणि प्रत्येकवर्षीचा ब्रेक होणारा गर्दीचा उच्चांक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या श्रद्धेचा अन्‌ आदराचा दाखलाही देवून जातो.
 
मुंबईच्या चैत्यभूमीवर तर एका बाजूला अथांग महासागर आणि दुसऱ्या बाजूला विराट जनसागर, असे अचंबित करुन टाकणारे चित्र इथे प्रत्येकाला पहायला मिळते! जगाच्या पाठीवर इतर कोणत्याच महापुरुषांच्या जयंतीला अथवा महापरिनिर्वाणदिनाला अशी ऐतिहासिक गदी कोठेच होत नाही. मात्र, या क्रांतिनायकाबाबत हे घडते ! केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य अनुयायी जयंतीदिनी आंबेडकरांच्या ऐतिहासिक ठिकाणी दाखल होत असतात.
 
महत्वाचे म्हणजे इथे येवून भौतिक सुखाची कोणी मागणी करीत नाही की, कोणी संतती अन्‌ संपत्तीसाठी नवस बोलत नाही. मुलाबाळांचे मंगल परिणय जुळावे म्हणून कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हातात गंडे-दोरे बांधत नाहीत की कुटुंब सुखी रहावे, रोगराईतून मुक्तता मिळावी म्हणून कोणी गळ्यात ताईत बांधत नाहीत. मात्र, तरीही इथे अचाट आणि अफाट अशी गर्दी उसळतेच !
 
का घडते हे? या प्रश्नाकडे वळले म्हणजे लक्षात येते की, या सृष्टीवर हजारो वर्षे सूर्य उगवत होता, पण तो कधीही शोषित, पीडित, वंचित दलितांना प्रकाशित करु शकला नाही. मात्र, या सूर्यापेक्षाही प्रखर तेजाने आपली बुध्दी उर्जा पेरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याने “अंधारयुगात’ चाचपडणाऱ्या माणसाला “ज्ञानप्रकाश’दिला. त्यांच्यातील जगण्याची उमेद अन्‌ उर्जा जागविली.
 
जो दलित माणूस शेकडो वर्षे जाती व्यवस्थेच्या एकदम तळाला गटांगळ्या खात होता. त्यांचे प्राण वाचविण्याचे तेजस्वी आंदोलन या क्रांतीसूर्याने छेडले. त्यामुळे स्वयंविश्वासाचा पूर्णतः चोळामोळा झालेल्या दलित, उपेक्षित माणसाला “माणूस’पण मिळाले. त्यांच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले. तो ताठ उभा राहिला. त्याच्या धमण्या-धमण्यांतून स्वयंविश्वास आणि स्वयंअस्मितेचे रक्त सळसळू लागले. प्रस्थापित व्यवस्थेच्या गुलामगिरीचे साखळदंड त्याच्या पायातून निखळून पडले. तो मुक्त झाला. तो स्वतंत्र झाला…!आणि म्हणूनच मानवी स्वातंत्र्याच्या या उद्गात्याबद्दलची अपार श्रध्दा जयंती दिनी उफाळून येताना दिसते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 127 वी जयंती आज साजरी होत आहे. सर्वत्र जयंतीचा उत्सवच नव्हेतर महामहोत्सव होत आहे. या महामहोत्सवात सहभागी होत असताना, आजवरच्या कालखंडामध्ये नेमके काय झाले याचे सिंहावलोकन करण्या बरोबरच इथून पुढच्या काळात पुरोगामी अनुयायांना अत्यंत गांभिर्यपूर्वक व जबाबदारीने पावले उचलावी लागणार आहेत.
 
जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचार चळवळ आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. त्यांचा समतामूलक समाजनिर्मितीचा लढा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा पातळ्यांवर आपण कुठपर्यंत पुढे नेला ? जाती निर्मूलनाची चळवळ आपण किती यशस्वी केली ? अन्याय, अत्याचार रोखण्याबरोबरच गुलामगिरी लादणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक बदलासाठी कोणती ठोस भूमिका घेतली.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण किती झटलो? सफलतेच्यादृष्टीने देश कुठपर्यंत नेला? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील मार्गदर्शक तत्वात नवभारताचे जे चित्र रेखाटले ते आपण साकारले काय ? स्वातंत्र्य, समता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, बंधूभाव, विवेकवाद ही मूलभूत तत्वे जर आदर्श समाज रचनेची तत्वे आहेत, तर या तत्वांशी भारत देश प्रामाणिक राहण्यासाठी आपण कोणत्या स्वरुपाची आंदोलने केली ? जीवनाच्या सुंदर उभारणीचा व सर्जनशील निर्माणाचा जोरकसपणे पुरस्कार करण्यासाठी आपण काय केले ? हजारो वर्ष प्रस्थापित व्यवस्थेने – संस्कृतीने इथल्या माणसाला नाकारून, झिडकारून, लाथाडून, गुलामगिरीच्या साखळदंडात आणि यातनांच्या-वेदनांच्या तुरंगात बंदीस्त केले, त्या बंदिवानाच्या मुक्ततेसाठी आपण कोणता संघर्ष छेडला ? कालबाह्य तत्वांचा, श्रध्दांचा, अंधश्रध्दांचा, कर्मकांडाचा, पूजाअर्चांचा, होमहवनांचा, दैववादाचा, उच्च-निचतेचा, विषमतेचा,वर्ण-वर्गभेदाचा सर्व धर्मसंभार गाढून ज्ञानवादी मनोधारणांसाठी, विज्ञानवादी भाववृत्तीसाठी, स्वयंप्रज्ञ चित्तवृत्तीसाठी आपण किती आणि कशी वाटचाल केली ? निरंतर मानवी प्रगती बुद्धिप्रामाण्यवाद, प्रतित्यसमुत्पाद आणि अनित्यवाद या अजरामर अशा तीन सिध्दांतावर होते. अशी सर्वोच्च विचारधारा पेरणारा सर्वोत्तम भूमीपुत्र जो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिला त्या गौतम बुध्दांचा आपण किती प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक स्वीकार केला ? का फक्त किर्तनात बुध्दाचे नाव आणि वर्तनात मात्र कुठेच नाव नाही ! असे तर आपण विसंगत वागत नाही ना ?या आणि अशा प्रश्नांचा “ठाव’घेऊन समग्र व्यवस्था परिवर्तनाची चळवळ आणखी गतीमान करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, याची खबरदारी पुरोगामी अनुयायांनी घ्यायला हवी.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचार चळवळ भावनिक पातळीपेक्षा बौध्दिक पातळीवर अधिक तेजस्वी आणि यशस्वी कशी करता येईल असा सामुहिक प्रयत्नही करणे गरजेचे आहे. केवळ जयंती दिनाला बाबासाहेबांना आदराने अभिवादन केले म्हणजे आपली “चळवळ’आणि आपले “कर्तव्य’संपले असे मानता कामा नये.
 
छत्रपती शिवरायांना ज्यांनी गुरु मानले त्या जोतीराव फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले आणि अडीच हजार वर्षापूर्वी “अतः दीप भवः’ म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि “भवतु सब्ब मंगलम’म्हणजे लोकशाही समाजवाद या सुत्रांचा पुरस्कार करुन मानवी उन्नयनाचा जागर करणाऱ्या गौतम बुध्दांचा धम्म अनुसरला. हा बाबासाहेबांचा कृती कार्यक्रम भावनिंक पातळीवरचा नसून प्रचंड मनन, प्रगाढ चिंतन आणि अथक अभ्यासातून प्रसूत झालेला व आचरणातून साकारलेला अद्वितीय असा क्रांतीकारी इतिहास आहे.
 
तेंव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ प्रामाणिकपणे, निष्ठापूर्वक अभ्यासातून व आचरणातून पुढे नेल्याशिवाय आता आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही, हे पुरोगाम्यांनी गांभीर्यपूर्वक लक्षात ठेवले पाहिजे. नाहीतर दररोज सकाळी अत्यंत श्रध्दापूर्वक, आदराने व नम्रतेने आपल्या आईवडीलांच्या पाया पडणारा मुलगा आई वडीलांनी सांगितलेला अभ्यास करतच नसेल, त्यांचे विचार आचरणात आणतच नसेल, तर आदराने आणि नम्रतेने आई वडीलांच्या पाया पडणाऱ्या त्या कृतीला काहीच अर्थ उरत नाही, उलट तो ढोंगीपणा ठरतो ; नव्हेतर आई-वडीलांशी ती एक प्रकारची गद्दारी केल्यासारखेच होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 127 व्या जयंती निमित्त अभिवादन करताना तसे घडणार नाही ना, याची काळजी अभिवादन कर्त्यांनी घ्यायला हवी, इतकेच !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

LIVE: महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुढील लेख
Show comments