Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी माणसाने बनवली आणखी एक 'जुगाड' गाडी, सांगलीच्या मेकॅनिकने बनवलं 1930 चं 'मिनी फोर्ड' मॉडेल

Webdunia
शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (08:46 IST)
"काहीतरी वेगळं करायची आवड होती. म्हणून 'मिनी फोर्ड' गाडी तयार करायचं ठरवलं. वाटायचं आपल्या दारात चारचाकी गाडी उभी असावी आणि तशी गाडी इतर कोणाकडेच नसावी.
 
आज माझ्या घरासमोर 1930 सालची 'मिनी फोर्ड' गाडी दिमाखात उभी आहे." सांगलीचे अशोक आवटी सांगत होते.
 
M80 दुचाकीचं इंजिन आणि भंगारातलं साहित्य वापरून तयार केलेली जुन्या लूकची नवी गाडी सांगलीत अनेकांचं लक्ष वेधून घेतेय. प्रचंड इच्छाशक्ती आणि कल्पक बुद्धीच्या जोरावर आवटी यांनी या जुगाड मिनी फोर्ड गाडीची निर्मिती केली आहे.
 
शेतातल्या गॅरेजची सुरूवात
सांगली मध्ये जुगाड जिप्सीनंतर आता या विंटेज जुगाड गाडीची चर्चा आहे. आवटी यांनी अवघ्या 30 हजार रुपयात 'जुगाड' करत 1930 सालाच्या गाडीचं हुबेहूब मॉडेल बनवलं.
 
अशोक आवटी यांचं सांगली शहरातल्या काकानगरमध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकी रिपेअरिंगचे एक छोटं गॅरेज आहे. पत्नी, दोन मुलं आणि मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. फक्त गॅरेजमधून मिळणाऱ्या पैशावरच त्यांच्या संसाराचा गाडा चालतो.

अशोक आवटी यांची इनोव्हेशन करण्याची आवड आपल्याला चकीत करते. गॅरेजची सुरूवात खडतर वाटेने झाल्याचं ते सांगतात. आपल्या शेतातल्या जागेत 10 वर्षांपूर्वी व्यवसाय सुरू करण्याआधी त्यांना विजेचं कनेक्शन हवं होतं.पण वीज वितरण कंपनीला ते कनेक्शन परवडणारं नव्हतं. तेव्हा आवटी यांनी स्वतःच वीज निर्मिती करता येईल का याची चाचपणी सुरू केली. "दुचाकी इंजिनचा वापर करून वीज निर्मितीचा विचार करू लागलो. एक पवनचक्की तयार केली." पण हा पर्याय फारसा टीकला नाही. आज त्यांच्याकडे विजेचं कनेक्शन आलंय. आणि सगळी कामं त्यावरच होतात.
 
युट्यूब पाहून गाडी कशी बनवली?
कोव्हिडच्या संकट सुरू झाल्यानंतर 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं आणि आवटी नव्या आयडियाच्या मागे लागले. घरबसल्या युट्यूबवर ते गाड्यांचे व्हीडिओ पाहायचे.
 
परदेशात दुचाकी इंजिनापासून छोट्या चारचाकी गाड्या तयार केल्याचे व्हीडिओ त्यांनी पाहिले आणि त्यांना आपणही अशी गाडी तयार करू शकतो अशी कल्पना सुचली.
 
युट्यूबवरच त्यांनी 1930 सालची 'मिनी फोर्ड' गाडी पाहिली आणि याच पद्धतीची गाडी बनवण्याचा निश्चय केला.
"1930 सालची फोर्ड गाडी ही कोळसा,आणि डिझेलवर चालत असे. ही गाडी दिसायला रूबाबदार वाटते. आजच्या जमान्यात ही गाडी पाहायला मिळावी म्हणून मी ही गाडी फावल्या वेळात बनवायला सुरूवात केली. त्यासाठी एमए-80 दुचाकी इंजिन, रिक्षाचे पार्ट आणि भंगारातलं साहित्य उपयोगाला आलं."
 
"पहिल्यांदा गाडीचा ढाचा बनवला. मग भंगारातून पत्रा, लोखंड असं साहित्य गोळा केलं. त्याला वेल्डिंग असेल तर इतर गोष्टींच्या माध्यमातून हुबेहूब फोर्ड प्रमाणे लूक देण्याचा प्रयत्न केला. काही वेळा चुका होत होत्या, मग पुन्हा सुधारणा करत त्याला आकार आला. मग दोन वर्षांत मेहनतीने हुबेहुब 1930 सालच्या फोर्ड गाडीसारखी दिसणारी गाडी तयार झाली."
 
'30 किलोमीटर मायलेज'
आवटी यांच्या या जुगाड गाडीत चार जण बसू शकतात. गाडीला तीन गियर तर स्टार्ट करण्यासाठी रिक्षेसारखं हँडल किक आहे. शिवाय रिव्हर्स घेण्यासाठी रिक्षाच्या गिअर बॉक्सचा वापर करत वेगळं गिअर बॉक्स बनवलंय.
ही जुगाड गाडी प्रति लीटर 30 किलोमीटर इतकं मायलेज देते आणि ताशी 50 किलोमीटर वेगाने धावू शकते असा आवटी यांचा दावा आहे. बॅटरी, हेडलाईट, इंडिकेटर हे देखील जोडतोड करत बनवलं गेलंय.
 
मोटर वाहन नियमानुसार अशा गाड्यांना परवानगी देता येत नाही.
 
यावर आवटी म्हणतात, "पेट्रोलचे भाव भडकल्याने सामान्य कुटुंबांना परवडतील अशी ही गाडी आहे. त्यामुळे अशा गाड्यांना परवानगी मिळाली पाहिजे."
 
'हौसेला मोल नाही'
विंटेड, जुन्या लुकची गाडी असल्याने अनेकांना ही हौसेखातर हवीहवीशी वाटते असंही ते म्हणतात.
 
"सुट्टीच्या दिवशी रस्त्यावरून आपल्या मुलांना घेऊन फेरफटका मारला तरी फिरल्यासारखं वाटतं. आपल्याला ही वाटतं स्वतःची गाडी असावी. मुलांचीही हौस असते. शिवाय अशा गाड्या आता पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे लोकांना या गाड्या बघून आनंद मिळतो"
जुगाड फोर्ड गाडीच्या निर्मितीनंतर अशोक आवटे यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येत असतात. कोणी त्यांची गाडी विकत मागत असतं तर कोणी गाडी बनवून मागतं.
 
नुकतीच सांगलीच्या देवराष्ट्रे येथील फॅब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रेय लोहार यांनी अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन याच्या माध्यमातून जुगाड जिप्सी तयार केली होती. त्याची दखल महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा यांनी घेतली. त्यांना नवी कोरी बोलेरो गाडी भेट म्हणून दिली. त्यांची जुगाड जिप्सी रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments