आज विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात इतर विषयांच्या चर्चेच्या मुद्यांपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर महिन्याभरापूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. तेव्हापासून मुख्यमंत्री सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव नागपूरला होणार असलेलं अधिवेशन हे मुंबईत घेतलं जात आहे. पण मुंबईतही मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहणं शक्य आहे का? हा प्रश्न कायम आहे. अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरू होत असताना, विधानभवनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्व नेत्यांकडून अभिवादन करून सुरवात केली जाते. पण अभिवादनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते. पण मुख्यमंत्री मात्र यावेळी गैरहजर होते.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ते म्हणाले, "अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने घेण्याचे नियम का बदलले? एवढी सरकारला कसली भीती वाटते आहे? की सत्ताधारी आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे यावर सरकारचा विश्वास नाही का? नियम रचनेत बदल करण्यात आला. लोकशाहीत 60 वर्षांत असं कधी झाली. मग या सरकारवर नियम रचनेत बदल करण्याची वेळ का आली? अध्यक्षांची निवडणूक ही आवाजी मतदानाने का होणार?"
हा नियम बदलण्यासाठी घाई करण्याची गरज नव्हती. विरोधी पक्षाशी चर्चा करूनही अध्यक्षांची निवडणूक घेतली जाऊ शकते, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.
मात्र तरिही अध्यक्ष निवडणुकीचा प्रस्ताव विधानसभेने आवाजी मतदानाने मान्य करुन घेतला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
भास्कर जाधव यांच्यावर पंतप्रधानांच्या नक्कलेचा आरोप, माफीची मागणी
सदनामध्ये कामकाज सुरू असताना भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केली. यावरून विरोधक आक्रमक झाले. हा पंतप्रधानांचा अपमान असून याबाबत भास्कर जाधवांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे ही मागणी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली. भास्कर जाधव यांच्यावर कारवाई करा किंवा हक्कभंग आणू असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
याबाबतात विरोधक आक्रमक झाले आहेत. सदनाचं कामकाज थांबवून या बाबीचा तपास व्हावा, भास्कर जाधवांनी माफी मागावी आणि ही बाब कामकाजातून काढून टाकली जावी अशी जोरदार मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येतेय.
आपण आपले शब्द आणि अंगविक्षेप मागे घेत असून सदनाचं कामकाज थांबवू नये असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. पण अंगविक्षेप केल्याचं त्यांनी स्वतः मान्य केल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
याबाबत विधानसभा अध्यक्षांनी सगळ्या सदस्यांना समज दिली. पण विरोधीपक्ष भास्कर जाधवांकडून माफीच्या मागणीवर ठाम आहे.
परीक्षा घोटाळ्यावर चर्चा घ्या- देवेंद्र फडणवीस
राज्यात विविध परीक्षांच्या झालेल्या घोटाळ्यावर चर्चा व्हावी अशी विनंती विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ते म्हणाले, "परीक्षाप्रक्रीयेत इतका मोठा घोटाळा झाला आहे. न्यासा नावाच्या कंपनीला 21 जानेवारी 2021 ला अपात्र ठरवलं. त्यानंतर ते कोर्टात गेले. पण नंतर ते काम त्याच कंपनीला देण्याचं काय कारण आहे?
या सरकारमध्ये एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण होत नाहीये. आरोग्य विभागाच्या परीक्षेत न्यासा कंपनीने पेपर फोडण्यापासून सर्व घोळ केला.
माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी Audio clip आणली आहे. नियुक्तीसाठीचं रेट कार्ड या ऑडियो क्लिकमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. 10 - 15 लाखांची मागणी केली जातेय.
याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. प्रश्नपत्रिका पोहचवण्याकरता 6-6.30 लाख रूपये घेण्यात आले. 30 लाखांचा व्यवहार यात अटक झालेल्या व्यक्तीकडून मिळाले आहेत."
त्यानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही यावर चर्चा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं.
विधानपरिषदेत परीक्षांच्या घोटाळ्यावरून गोंधळ
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी परीक्षांच्या घोटाळ्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरण- 100 पैकी 92 प्रश्न देण्यात आले. एमपीएससीच्या मार्फत परीक्षा का घेत नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याबरोबरच गोपिचंद पडळकर यांनीही आरोग्य विभागातील परीक्षांवर प्रश्न विचारले.
गोपीचंद पडळकर म्हणाले, "न्यासा कंपनीच्या दलालाचा व्हीडिओ दाखवला गेला, रेट कार्ड नुसार ड गटासाठी 8 लाख, क गटासाठी 15 लाख रूपये याची चौकशी केली का? धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहचत असतील तर सीबीआय चौकशी करावी."
त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले, "सरकारी भरती परीक्षा पद्धती बदलण्याचा सकारात्मक विचार करू. एमपीएससी आयोगाकडे जबाबदारी द्यायची का याचाही विचार सुरू आहे. आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा घेतली तर एकाही विद्यार्थ्याकडून फी घेणार नाही"
आता स्टँप पेपरवर लिहून देऊ का?
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार का? हा प्रश्न वारंवार विचारण्यात आला.
त्यावेळी अजित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री अधिवेशनात येणार आहेत. ते वर्षा बंगल्यावरही आले होते. त्यांनी बैठका घेतल्या. त्यांचं काम सुरू आहे. ते अनेकदा बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होतात. ते अधिवेशनात येतील." हा प्रश्न वारंवार विचारला असता, अजित पवार चिडले आणि म्हटलं, मुख्यमंत्री येणार आहेत हे मी आता. काय स्टँम्प पेपरवर लिहून देऊ का?
आज सकाळी सत्ताधारी सदस्यांची बैठकही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पार पडली. काही आमदारांकडून नाव न घेण्याच्या अटीवर 'मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहू शकणार नाहीत',असा निरोप मिळत असल्याचं सांगितलं जातंय.
पण मार्चचं अधिवेशन नागपुरात हवं...!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती लवकर लवकर बरी व्हावी यासाठी त्यांना शुभेच्छा...! यावेळी मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना प्रवास शक्य नव्हता म्हणून हे अधिवेशन मुंबईत घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीसाठी आम्ही ते मान्यही केलं. पण मार्चचं अधिवेशन नागपूरला घेण्याबाबत आम्ही आग्रही आहोत. "22 डिसेंबर ते 28 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. त्यात दोन दिवस सुट्टी असल्यामुळे 5 दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री किती वेळ उपस्थित राहातात? किंवा उपस्थित राहतात की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत सभागृहाच्या कामकाजाबद्दल चर्चा, मार्गदर्शन केले.
त्यानंतर विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली आहे. शेती, वाळूउपसा, अतिवृष्टी अशा विषयांवरील प्रश्नांनी प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. तत्पुर्वी देगलूरचे नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांची सभागृहाला ओळख करुन देण्यात आली.
अनेक प्रश्नांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाने तयारी केल्याचं काल विरोधकांच्या पत्रकार परिषदेत दिसून आलं. तर हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणा असं उपमुख्यमंत्र्यांनी आव्हान दिल्यामुळे सत्ताधारीही तितक्याच तयारीत असल्याचं दिसून आलं.
पदाचा भार आदित्य ठाकरेंकडे द्यावा- सुधीर मुनगंटीवार
मुख्यमंत्री आजारी असताना आपल्या पदाचा अधिभार इतर कोणाकडे का देत नाहीत असा प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मुख्यमंत्री येऊ शकत नाही म्हणून नागपूरचे अधिवेशन मुंबईत घेतलं. आता ते इथेही नाहीत. मग मुख्यमंत्रिपदाचा चार्ज इतर कोणाला का देत नाहीत? अडचण काय आहे?
शरद पवार परदेशी दौऱ्यावर जायचे तेव्हा ते आपला चार्ज इतर कोणाकडे देऊन जायचे. मग सगळ्या गोष्टीत पवारांचा सल्ला घेणारे याबाबतीत का घेत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा कोणावर विश्वास नसेल तर आपल्या सुपुत्राकडे तरी त्यांनी चार्ज द्यावा. अजित पवारांवर त्यांचा विश्वास नसावा. त्यांना वाटत असेल ते पुन्हा फडणवीसांकडे जातील."
भाजपची महाराष्ट्र विधिमंडळ गटाची बैठक काल पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला. अधिवेशनापूर्वीच्या चहापानावर फडणवीस यांनी बहिष्कार टाकल्याचं स्पष्ट केलं.
ठाकरे सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा नाही असं देखील ते म्हणाले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंगळुरूतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणावर भाष्य केलं. फडणवीसांनी बंगळुरूतील घटनेचा निषेध केला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांना या प्रकरणावर विचारण्यात आलं.
फडणवीस म्हणाले, "कर्नाटकमध्ये जो अवमान झाला, तो कर्नाटकात होवो किंवा कुठेही होवो, महाराजांचा अवमान सहन केला जाणारच नाही."
"त्यासंदर्भात कर्नाटक सरकारनंही स्पष्ट भूमिका मांडली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासह त्यांचं विधान कसं ट्विस्ट करण्यात आलं, हे दाखवलंय. ते म्हणालेत की, छत्रपती शिवाजी महाराज असो वा तिथले एक महनीय व्यक्ती आहेत, त्यांच्या पुतळ्याला इजा पोहोचवण्यात आली. अशाप्रकारचं कृत्य चुकीचंच आहे, असं स्पष्टपणे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. त्यांचं स्टेटमेंट ट्विस्ट करण्यात आलं," असंही फडणवीस पुढे म्हणाले.
उपमुख्यमंत्री म्हणाले...
काल 21 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित चहापान कार्यक्रमावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "मुख्यमंत्री कॅबिनेट घेतात, कोरोनाच्या आढावा बैठका घेतात. अनेक विषय मंजूर केले जातात. अध्यक्षांची निवडणूक या अधिवेशनात होणार हे मागेच सांगितलं होतं. त्यांना आवाजी मतदानावर आक्षेप असेल तर त्यांना अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार विरोधकांना आहे".