Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अयोध्या : निकालापूर्वी शहरात असं आहे वातावरण - ग्राऊंड रिपोर्ट

Webdunia
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (12:09 IST)
फैसल मोहम्मद अली
राम वनवासातून परतल्याच्या आनंदाप्रित्यर्थ रामजन्मभूमी मध्ये अन्नकूट भोजनावळींचं आयोजन केलं जातं. राम जन्मभूमीचे पुजारी सत्येंद्र दास यातल्याच एका पंगतीमध्ये बाबरी मशीदचे पुरस्कर्ते असणाऱ्या इक्बाल अन्सारींसोबत 56 भोगचा आनंद घेताना दिसले. इतकंच नाही सत्येंद्र दास यांनी इक्बाल अन्सारींना 100 रुपये भेट म्हणूनही दिले.
 
एकमेकांच्या शेजारी बसून सत्येंद्र दास आणि इक्बाल अन्सारींनी मीडियाकडून मिळालेलं आमंत्रण, एकमेकांची भेट आणि अयोध्येतला हिंदू-मुस्लिम एकोपा याविषयी गप्पा मारल्या.
 
पण सत्येंद्र दास बोलताना बाबरी मशीदीचा उल्लेख 'ढांचा' असं करतात. त्यांच्यामते या इमारतीच्या खाली मंदिराचे अवशेष सापडले आहेत. आणि 'जर तिथे खरंच मशीद होती तर मग सुन्नी वक्फ बोर्डाने कोर्टात 1961मध्ये दावा का केला,' असा प्रश्न ते विचारतात.
 
"रामलल्ला गेली 26 वर्षं बासनात गुंडाळून आहेत. आणि त्यांचं भव्य मंदिर बांधायची वेळ आल्यासारखं वाटतंय," आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत बसलेल्या सत्येंद्र दास यांनी आम्हाला सांगितलं. मागच्या भिंतीवर हाता धनुष्य-बाण घेतलेल्या रामाचं मोठं पोस्टर आहे.
मूळचे संत कबीर नगरचे असणारे आचार्य सत्येंद्र दास यांची नेमणूक बाबरी प्रकरणाच्या काही महिन्यांपूर्वी झाली होती. राम जन्मभूमीचे त्याआधीचे पुजारी लाल दास यांना हटवण्यात आलं होतं. ते आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलावर कठोरपणे टीका करत.
 
मशीद पाडण्यात आल्याच्या 11 महिन्यांनंतर 1993मध्ये त्यांची हत्या झाली.
 
हा तो काळ होता जेव्हा रामजन्मभूमीचा पुरस्कार करणाऱ्या निर्मोही आखाड्यासारख्या स्थानिक हिंदू संघटनांना मागे सारत कट्टर हिंदुत्त्ववादी याचा ताबा घेत होते.
 
ही रामजन्मभूमी आहे की मशीद याचा निवाडा सुप्रीम कोर्ट करणार असलं तरी अयोध्येतल्या संत-महंतांना आपला विजय स्पष्ट दिसतोय.
 
इथे सुरू असलेल्या चर्चांमध्ये मोदी आणि योगींचा उल्लेख वारंवार होतो.
जिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथे केंद्रात मोदी आणि इथे योगींचं शासन असतानाच एक भव्य मंदिर उभारलं जाईल असं राम जन्मभूमी न्यासाचे नृत्य गोपाल दास म्हणतात.
 
राम जन्मभूमी मंदीर निर्माण न्यासाचे जन्मेजय शरण म्हणतात, "निर्णय राम मंदिराच्याच बाजूने असेल,"
 
जन्मभूमी निर्माण संघटनेचं स्वरूप
रामाच्या नावाखाली तयार झालेल्या संघटनांपैकी कोणीही जन्मभूमीच्या कायदेशीर कारवाईचा भाग नाहीत. पण नृत्यगोपाल दास हे सरकारच्या जवळचे असल्याचं मानलं जातं. मंदिराच्या बाजूने निकाल लागल्यास मंदीर निर्मितीचं काम त्यांच्या संघटनेला मिळू शकतं अशी इथे चर्चा आहे.
 
सोमनाथाच्या धर्तीवर बोर्ड तयार करण्यात येणार असल्याचंही काहीजण सांगतात.
 
निर्मोही आखाडा आणि हिंदू महासभेसारख्या संघटनांनी रामजन्मभूमीची कायेदशीर लढाई अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ लावून धरली होती. पण संघ परिवाराच्या राम मंदिर राजकारणात सहभागी न झाल्याने आता या संघटना या सगळ्यापासून दूर आहेत.
निर्मोही आखाड्याच्या मोडकळीला आलेल्या चार भिंतीच्या आता अशोकाच्या झाडाखाली बसलेले दीनेंद्र दास म्हणतात, "निर्मोही आखाड्याने आपल्या कामाचा प्रचार केला नाही. त्यांनी केला. राम नामाचा प्रचार तर कोणीही करू शकतं."
 
पण पुढे काय करायचं याचा निर्णय सगळ्या हिंदू संघटना मिळून घेतील, असं ते सांगतात.
 
कार्यशाळेतली परिस्थिती
रामजन्मभूमीसाठीचं साहित्य जिथे तयार होतंय, त्या कार्यशाळेत शांतता आहे. जवळच्या मंदिरातल्या लाऊडस्पीकरवरून भजनांचा आवाज येतोय आणि पर्यटकांची रीघ लागलीय.
 
याच परिसरात असलेलं प्रदर्शन गाईड या भाविकांना दाखवतो. राम मंदिर आंदोलनादरम्यान मारले गेलेले कारसेवक यात दाखवण्यात आलेत. इथल्या चित्रांमध्ये एकात असं दृश्य आहे, ज्यामध्ये राम मंदिर उध्वस्त करण्याची परवानगी देणारा बाबर दाखवण्यात आलाय. पण याविषयी कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.
अयोध्येत गाईडही मिळतात का, असं विचारल्यानंतर स्थानिक पत्रकार महेंद्र त्रिपाठींनी हसून सांगितलं, "रामाच्या नावावर अनेकांची दुकानं सुरू आहेत."
 
पण काही दिवसांपूर्वी शेवटच्या कारागिराचं निधन झाल्यानंतर इथलं सगळं काम बंद असल्याचं कारसेवकपुरमचे सुपरव्हायजर अन्नू भाई सोनपुरा सांगतात.
 
एकेकाळी इथे दीडशे कारागिर काम करायचे. पण लाल दगडातून तयार करण्यात आलेले खांब आणि नक्षीकाम आता काळे पडताहेत आणि वापरण्याआधी ते चांगले घासून घ्यावे लागतील असं अन्नू भाई सोनपुरांना वाटतंय.
 
कारसेवकपुरमच्या अगदी बाहेर चहाची टपरी चालवणाऱ्या संतोष चौरसिया राम मंदिर न झाल्याने नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या दीपोत्सवाविषयी आक्षेप घेत त्या म्हणतात, "हे पाच लाख दिवे जाळून काय साध्य झालं, लोक आग्र्याचा ताजमहाल पहायला जातात. अयोध्येत रामलल्लाचं मंदिर झालं असतं तर ते पाहायला लोक आले असते."
 
मग त्या स्वतःच पुढे म्हणतात, पण हे लोक असं होऊ देणार नाहीत कारण नाहीतर यांची कमाई संपेल, मतं कमी होतील.
 
कारसेवकपुरमपाशी अयोध्या शहर जवळपास संपतं. पण शहराच्या इतर भागांप्रमाणेच तिथेही सुरक्षा दलांची एक तुकडी तैनात आहे.
 
असा पोलीस बंदोबस्त आता अयोध्यावासियांच्या अंगवळणी पडलाय. ते आपल्या रोजच्या आयुष्यात गुंगलेले आहेत.
 
हनुमान मंदिराच्या गल्लीमध्ये नेहमीप्रमाणेच लहानसहान वस्तुंपासून ते केशर पेढा आणि नारळाच्या लाडूंची विक्री सुरू आहे. गाड्या आणि मोटरसायकलवर स्वार झालेले भाविक दर्शनासाठी येताहेत.
 
अयोध्येत आजही सगळ्या समाजांमध्ये तेच काका-पुतण्याचे किंवा लहान-मोठ्या भावांचे संबंध असून 'जी काही गडबड दिसतेय ती चॅनलवाले करत असल्याचं' मुजीबुर अहमद म्हणतात.
 
काहीही झालं तरी 2022च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मंदिराचं काम सुरू होणार नाही, असं रोहित सिंह यांना वाटतं. पण निर्णय मुस्लिमांच्या बाजूने आल्यास हिंदू तो स्वीकारतील किंवा हिंदूच्या बाजूने निर्णय आल्यास तो मुस्लिम स्वीकारतील याची काय गॅरंटी, असा सवाल अतीकुर रहमान अन्सारी विचारतात.
 
कोर्टाचा निर्णय हा कायद्याच्या दृष्टीने योग्य असल्यास मुस्लिम तो स्वीकारतील अन्यथा पुढच्या कारवाईचा विचार करण्यात येईल, गरज पडल्यास कोर्टाकडे पुन्हा अपील करण्यात येईल, असं बाबरीच्या बाजूने असणारे खालिक अहमद खान म्हणतात.
 
सुप्रीम कोर्टाच्या सूचनेवरून तयार करण्यात आलेल्या समझोता समितीची खालिक अहमद खान यांनी नुकतीच भेट घेतली होती. बाबरी मशीदीची जमीन सोडण्यासाठी मुसलमानांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा दावा ते करतात.
 
सगळे जुने दावे मागे घेण्यात आले असले तरी मशीदीच्या वक्फ जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करणं हे भारतीय वक्फ कायद्याच्या विरुद्ध असल्याने 20X40 फुटांच्या जमिनीवरचा दावा कायम ठेवण्यात आला आहे.
 
खालिक म्हणतात, "ती जमीन सोडून उरलेल्या जमिनीवर मंदिराची निर्मिती सुरू करायला आमची हरकत नाही. आम्ही तर पुन्हा मशीद उभारण्याची मागणीही करत नाही. पण काही लोकांना हे प्रकरण मंदिर निर्मितीपेक्षा हिंदू-मुस्लिम वाद म्हणून मांडण्यात जास्त रस आहे."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments