Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात मृत्यूदर जास्त का आहे?

Webdunia
बुधवार, 8 एप्रिल 2020 (14:50 IST)
महाराष्ट्रातला कोरोनाने घेतलेला पहिला बळी मुंबईतला होता. दुबईहून परतलेल्या 64 वर्षांच्या व्यक्तीचा 18 मार्चला मृत्यू झाला. मग 6 दिवसांनंतर मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दुसरा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातला मृतांचा आकडा वेगाने वाढत चाललाय.
 
पण सगळ्यांत चिंतेची गोष्ट म्हणजे एकूण रुग्णांपैकी मृतांची वाढणारी टक्केवारी. कोव्हिड-19च्या दर 100 रुग्णांपैकी एखाद्या जर्मनीसारख्या देशात फक्त 1.6 रुग्णांचा जीव जातो. अमेरिकेत हे प्रमाण 100 पैकी 3 आहे आणि चीनमध्ये 4.
 
भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं
ही माहिती नियमितपणे अपडेट केली जात आहे. तरीही काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे ताजे आकडे लगेच न दिसण्याची शक्यता आहे.
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश एकूण प्रकरणं संपूर्ण बरे झालेले मृत्यू
महाराष्ट्र 1018 79 64
तामिळनाडू 690 19 7
दिल्ली 576 21 7
तेलंगणा 364 35 7
केरळ 336 70 2
राजस्थान 328 21 3
उत्तर प्रदेश 326 21 3
आंध्र प्रदेश 305 1 4
मध्य प्रदेश 229 0 13
कर्नाटक 175 25 4
गुजरात 165 25 13
हरियाणा 147 28 3
जम्मू आणि काश्मीर 116 4 2
पश्चिम बंगाल 99 13 5
पंजाब 91 4 7
ओडिशा 42 2 1
बिहार 38 0 1
उत्तराखंड 31 5 0
आसाम 27 0 0
चंदीगड 18 7 0
हिमाचल प्रदेश 18 2 1
लडाख 14 10 0
अंदमान निकोबार 10 0 0
छत्तीसगड 10 9 0
गोवा 7 0 0
पुडुच्चेरी 5 1 0
झारखंड 4 0 0
मणिपूर 2 0 0
मिझोरम 1 0 0

स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

11: 20 IST ला शेवटचं अपडेट

भारतातही 7 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार 4,421 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून 117 जण दगावले आहेत, म्हणजेच सुमारे 2.6 टक्के. मात्र महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर 7 एप्रिलपर्यंत 1018 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 64 जण मरण पावले आहेत, म्हणजेच 6.2 टक्के.
 
असं का होतंय? महाराष्ट्राची टक्केवारी ही भारताच्या आणि जगात कोरोनानं जास्त थैमान घातलेल्या देशांपेक्षाही जास्त का आहे?
 
मुंबई-महाराष्ट्रात मृतांचं प्रमाण जास्त का?
कोरोनाची लागण झालेली प्रत्येक व्यक्ती मरण पावत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात जे 1018 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यापैकी 79 रुग्णांना बरं झाल्यानंतर घरीही सोडण्यात आलं आहे.
 
मरण पावलेल्यांचं प्रमाण किती, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. मात्र महाराष्ट्र सरकारसाठी mortality rate किंवा मृत्युदर चिंतेचा विषय आहे.
 
यावरच बोलताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते, "आमच्या अंदाजाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी मृतांचा आकडा वाढला आहे. हा आकडा कमी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर्सची समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये आणखी काही करणं आवश्यक आहे का? काय अडथळे आहेत? यासंदर्भात ही समिती निर्णय घेईल.
 
"प्राथमिक अहवालानुसार को-मॉर्बिडिटीमुळे मृत्यूंची संख्या जास्त आहे, म्हणजेच ज्या लोकांना दीर्घ काळ मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, काहींना हृदयविकार आहे, किडनीचा विकार आहे किंवा 60-65च्या वरच्या वयोगटातल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. को-मॉर्बिडिटी हे मृत्यूचं महत्त्वाचं कारण आहे," असं त्यांनी सांगितलं.
 
को-मॉर्बिडिटी म्हणजेच एका आजारात दुसऱ्या प्रकारची गुंतागुंत निर्माण झाली तर त्यातून होणारा मृत्यू, म्हणजे कोव्हिड-१९ झाला असताना इतर आजारांनी डोकं काढणं.
 
महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या 45 मृत्यूंचे तपशील पाहिले असता, असं लक्षात येतं की यापैकी 35 पुरुष आणि 10 महिला होत्या. म्हणजे पुरुषांना कोव्हिड-१९ चा धोका जास्त आहे. हे जागतिक आकड्यांशी सुसंगत आहे. तसंच मृत पावलेल्या पुरुषांमध्येही फक्त एकाचच वय 49च्या खाली आहे.
 
हेही जागतिक आकडेवारी, मग ती चीनची असो वा युकेची, स्पष्ट सांगते की वयोवृद्धांना कोव्हिड-19मुळे मृत्यूचा धोका जास्त आहे.
 
आणि 50 ते 59 या वयोगटात मृतांचं प्रमाण जास्त आहे, कारण याच वयात बहुतांश लोकांना उच्चरक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होतात. तसंच ते या काळात अॅक्टिव्ह असल्यामुळे त्यांचा विषाणूंच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त संभवतो.
 
जर मरण पावलेल्या महिलांचे तपशिल पाहिले तर असं कळतं की सर्वांत तरुण महिलेचं वय 31 होतं आणि ती 9 महिन्याची गरोदर होती.
 
उर्वरित सात महिलांमध्ये एका महिलेचा अपवाद वगळता सर्वांना उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा श्वसनाचा त्रास होता. म्हणजेच ज्या महिलांना काही आजार आहेत त्यांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे.
 
कोणकोणते आजार मृत्यूची शक्यता वाढवतात?
कोरोनामुळे जीव जाणाऱ्या सगळ्या लोकांचा जीव काही कोव्हिड-19मुळे, म्हणजे फुफ्फुसांच्या इन्फेक्शनमुळे जात नाही. सुरुवात तिथून होते आणि मग इतर गुंतागुंत वाढून जीव जातो, असंही होतं. त्यामुळे कोव्हिड-19च्या मृतांचा आकडा असं म्हणण्यापेक्षा कोव्हिड-संबंधित मृतांचा आकडा असं म्हणायला हवं, खरं तर.
 
महाराष्ट्रात दुसरा मृत्यू झालेली व्यक्ती ही फिलिपीन्सची नागरिक होती. त्यांचा कोव्हिड बरा झाला होता, पण उच्चरक्तदाब आणि मधुमेहामुळे समस्या उद्भवल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
 
महाराष्ट्रात ज्यांचे मृत्यू झाले आहेत त्यात को-मॉर्बिडिटीचं प्रमाण अधिक आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
 
ज्यांना संसर्ग झालाय, त्यांचा मृत्यू होणार नाही, यासाठी आता सरकारला पटापट पावलं उचलावी लागणार आहेत. म्हणूनच मुंबई-महाराष्ट्रातलं मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी डॉक्टरांच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना तातडीने करण्यात आली आहे, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय.
 
मृतांचं प्रमाण का वाढतं?
जगातील इतर काही देशांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर काही गोष्टी स्पष्ट होतात.
 
1. लोकसंख्येचं सरासरी वय - साठच्या पुढे ज्याचं वय असतं, त्यांच्या मृत्यूची शक्यता जास्त असते. इटलीसारख्या देशात वयोवृद्धांचं प्रमाण जास्त आहे. तुलनेने चीन-भारतमधली लोकसंख्या जास्त तरुण आहे. त्यामुळेही इटलीमध्ये मृतांची टक्केवारी जास्त असू शकते.
 
2. वयोवृद्धांना वाचवणं कठीण - जर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली तर हॉस्पिटल्समध्ये जागा शिल्लक राहत नाही, पुरेसे व्हेंटिलेटर्स नसतात. त्यामुळे ज्यांचे जीव उपचार करून वाचवता येऊ शकतात, त्यांचेही जीव जाऊ लागतात. आणि यामुळे मृतांची टक्केवारी वेगाने वाढते.
 
3. व्हायरस नव्हे बॅक्टेरियामुळे मृत्यू - व्हायरल फीवर झाल्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शनचा मोठा धोका असतो. या बॅक्टेरियल इन्फेक्शनवर दिल्या जाणाऱ्या औषधांना काही जणांचं शरीर प्रतिसाद देत नाही. याला अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणतात. असा रेझिस्टन्स युरोपात आणि विशेषतः इटलीत मोठा आहे, त्यामुळे हा बॅक्टेरिया अनेकांचे जीव घेतोय.
 
4. टेस्टिंगचं प्रमाण - काही देश लाखो लोकांचं टेस्टिंग करताहेत. ज्यांच्यात लक्षणं दिसत नाहीत, तेही पॉझिटिव्ह असू शकतात. अशी माणसं एकूण आकड्यांत धरले जातात. त्यामुळे मृतांची टक्केवारी कमी वाटते. उलट भारतासारखा देश आहे, जिथे लाखो लोकांचं टेस्टिंग होत नाहीये. त्यामुळे लक्षणं दिसत नसलेल्या लोकांना मोजलं जाणार नाही. त्यामुळे एकूण कोरोना झालेल्या लोकांचं प्रमाण कमी भासेल आणि मृतांची टक्केवारी जास्त वाटेल.
 
5. मृत्यूचं कारण - समजा एखादा कॅन्सर पेशंट आहे आणि त्याला कोव्हिड झाला. कोव्हिडमुळे त्याचा कॅन्सर बळावला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर मग तो कोव्हिडचा मृत्यू की कॅन्सरचा? वेगवेगळ्या देशात याबद्दल वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे आकडे वेगवेगळे येऊ शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख