Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संभाजीराजे छत्रपती यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

Webdunia
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (12:37 IST)
खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. "माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मला उपोषण करावं लागत आहे," असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
 
मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे छत्रपती हे कालपासून (26 फेब्रुवारी) आमरण उपोषणास बसले आहेत. याप्रसंगी त्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली.
 
काल सकाळी 11 वाजता हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून संभाजीराजे यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली. संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यासुद्धा यावेळी उपोषणात त्यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या.
 
याआधी त्यांनी नवीन राजकीय पक्षाचा विचार देखील बोलून दाखवला होता. सध्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांचा राजकीय प्रवास पाहू.
 
नवीन पक्षाचा विचार
"जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर नव्या राजकीय पक्षाचा निश्चित विचार केला जाईल," असं तुम्ही नवा राजकीय पक्ष काढणार का, या मुंबईतल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं होतं.
 
राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आदोंलनाच्या रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या लढ्याचाही चेहरा बनलेले खासदार संभाजीराजे त्यांच्या राजकीय प्रवासातही निर्णायक मुक्कामी आल्याचं चित्र आहे.
 
राज्यात भाजपाची सत्ता असताना राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत पोहोचलेल्या संभाजीराजे यांचे भाजपासोबत संबंध ताणले गेल्याचं चित्र सध्या आहे.
 
मराठा आरक्षणासाठी खासदारकीही पणाला लावू असं म्हणणाऱ्या संभाजीराजांच्या मनात काही नवा राजकीय निर्णयही घोळतो आहे का, हाही त्यामागे प्रश्न आहे.
 
भाजपाचं सदस्यत्व नाही, पण तरीही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या भाजपाच्या ते जवळ आहेत, हे स्पष्ट आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा आजवरचा राजकीय प्रवासही वळणावळणांचा आहे.
 
लोकसभेत अपयश, मात्र राज्यसभेत प्रवेश
कोल्हापूरच्या राजघराण्याला स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणाचाही इतिहास आहे. त्याप्रमाणे संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा दोन दशकांहून अधिक काळ कोल्हापूरच्या राजकारणाशी संबंधित आहेत.
 
त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनी 2004 मध्ये इथून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते. 2009 मध्ये संभाजीराजे यांना लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. पण या निवडणुकीत संभाजीराजे यांचा पराभव झाला.
 
त्यानंतर 2014 मध्ये जेव्हा राज्यात भाजपचं सरकार आलं, मराठा आंदोलनंही राज्यात सुरु होती, त्यानंतर संभाजीराजे फडणवीस आणि भाजपाच्या जवळ गेले. त्यांना राज्यसभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकीही मिळाली.
 
पण आरक्षण आंदोलनाच्या या काळात ते या चळवळीचा चेहरा बनले. त्यांनी आग्रही भूमिका घेतली. संभाजीराजे छत्रपती यांनी या भूमिकेतून राज्यभर त्यांचं नेतृत्व वाढवलं. उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय इथल्या न्यायालयीन कारवाईमध्येही ते सहभागी राहिले.
 
मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक मराठा नेते आणि संघटना एकत्र येऊन लढत आहेत, मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी या मुद्द्यावर त्यांचं नेतृत्वही प्रस्थापित केलं.
 
दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून ते गडकिल्ल्यांच्या संवर्धन चळवळीतही आघाडीवर आहेत. 'रायगड विकास प्राधिकरणा'चे ते अध्यक्ष आहेत. रायगडावर मोठा शिवराज्याभिषेक सोहळाही ते गेल्या काही वर्षांपासून मोठ्या स्तरावर करत असतात. राज्यातल्या इतर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठीही त्यांनी सातत्यानं भूमिका घेतली आहे.
 
पण आता मराठा आरक्षणावरुन आक्रमक झाले संभाजीराजे छत्रपती काही राजकीय भूमिका घेतील का?
 
"आता सांगता येणार नाही, पण राजकारणात गांभीर्यानं त्यांनी यापूर्वी कोणता निर्णय घेतला आहे असं दिसतं नाही," असं कोल्हापूरचं आणि राज्याचं राजकारण जवळून बघितलेले ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात.
 
"2009 मध्ये सदाशिवराव मंडलिकांविरुद्ध कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न असतांना 'राष्ट्रवादी'मध्ये त्यांचं नाव शेवटी पुढे आलं. पण त्या पराभवानंतर ते राजकारणापासून दूरच होते.
 
मग आंदोलनाच्या वेळेस फडणवीसांनी त्यांना पुढे आणलं, ते महाराष्ट्रभर फिरलेही. उदयनराजेंचा पराभव झाल्यावर त्यांच्यावर एका प्रकारे अधिक जबाबदारीही आली. पण मुद्द्यांमध्ये जी खोली असते ती अधिक दिसली नाही. ते शांत, सुस्वभावी, जंटलमन नेते आहे, पण राजकीय निर्णय कसा घेतील हे सांगता येत नाही. आता ते वेगवेगळ्या नेत्यांना भेटताहेत. पवारांशी त्यांच्या घराण्याचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. पण यानं मराठा आरक्षणाबाबत मीडियाला बातम्या मिळतील यापलिकडे काहीही होणार नाही," असं चोरमारे म्हणतात.
 
'भाजपानं किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत'
भाजपाच्या जवळ गेलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आता त्यांच्यापासून दूर चालले आहेत का, हा प्रश्न अधोरेखित होण्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वाच्च न्यायालयात निकाली निघाल्यानंतर दोन्ही बाजूंनी सुरु असलेली विधानांची सरबत्ती.
 
एका बाजूला भाजप या निकालावरुन मराठा समाजात असलेली अस्वस्थता हेरुन विधिमंडळातले विरोधक म्हणून आक्रमक होण्याचा प्रयत्न करताहेत, तर दुसरीकडे संभाजीराजेंची भूमिका समन्वयाची आणि संयमाची दिसते आहे.
 
सध्या भाजपाचे विविध नेते विविध भागांमध्ये फिरताहेत, 5 जूनच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. संभाजीराजे मात्र स्वत:चा स्वतंत्र दौरा आखून विविध पक्षांतल्या सर्वोच्च नेत्यांशी बोलता होते.
 
मराठा समाजानं आता रस्त्यावर उतरुन संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे, तर सध्या कोरोनाच्या काळात जीवाच मोल अधिक असल्याची भूमिका संभांजीराजे यांनी अगोदर मांडली. पण आता समाजाच्या भावना लक्षात घेता आता त्यांनीसुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनीसुद्धा 6 जूनचा अल्टिमेटम देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण अनेक वेळा भेट मागितली, पण त्यांनी दिली नसल्याचा पुररुच्चार संभाजीराजे छत्रपती यांनी वारंवार केला आहे.
 
आरक्षणासाठी खासदारकी सोडायला तयार आहे हे त्यांचं वक्तव्य भाजपावरची नाराजी म्हणूनच बघितलं जातं आहे. एकीकडे महाविकास आघाडी मराठा आरक्षणाचा चेंडू पंतप्रधानांच्या कोर्टात ढकलू पाहात आहे आणि तेव्हाच संभाजीराजेंचं मोदींनी भेट न दिल्याच वक्तव्य पुन्हा येणं, हे भाजपाला अडचणीचं आहे.
 
त्यामुळे आता भाजपाही त्यांचा, त्यांच्या नाराजीचा प्रतिवाद जाहीरपणे करतांना दिसतं आहे. गुरुवारी चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे असं म्हटलं की भाजपानं त्यांना किती सन्मान दिला हे मात्र संभाजीराजे सांगत नाहीत.
 
"संभाजीराजे आणि शाहूंच्या घराण्याबद्दल कोणीतीही टीका वा अपशब्द आमच्या तोंडून येणारच नाही. ते आपले राजे आहेत. पण भाजपानं त्यांना कायम सन्मान दिला आहे. जेव्हा महाराष्ट्रातनं भाजपाच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचं सुरु होतं, तेव्हा पंतप्रधान मोदींनी म्हटलं की ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. त्यांना पक्ष कार्यालयात बोलवायचं का? ते राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदार होतील. अलाहाबाद म्हणजे प्रयागमध्ये जेव्हा राष्ट्रीय बैठकीला त्यांना घेऊन गेलो तेव्हा मंचावर संभाजीराजे येताच मोंदीसहित सर्व जण उभे राहिले. त्यामुळं संभाजीराजे सांगत हे नाहीत की किती सन्मान पक्षानं त्यांना दिला.
 
रायगड विकास समितीचं अध्यक्ष कसं केलं, त्याला निधी कसा दिला हेही ते सांगत नाहीत. इतरांना ते बहुधा माहीत नाही. 4 वेळेला भेट दिली नाही हे सांगतात, पण त्याअगोदर 40 वेळेस भेट झाली आहे. राजे भेट मागतात म्हटलं की मोदी भेट द्यायचे. पण गेल्या ४ भेटी एक तर कोरोना काळात मागितल्या गेल्या आणि आरक्षणाचा प्रश्न हा राज्याचा आहे असंही मत होतं," असं चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
 
भाजपाचं म्हणणं जरी टीका करणार नाही असं असलं तरीही पाटील यांच्या सूरांमधून त्यांच्यात आणि संभाजीराजे यांच्यात निर्माण झालेली दरी स्पष्ट दिसते आहे.
 
त्यांना भाजपाच्या जवळ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना आणलं. फडणवीस अजून हे संबंध टिकवून आहेत.11 फेब्रुवारी रोजी संभाजीराजेंना 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वत: फडणवीस कोल्हापूरला गेले होते.
 
आरक्षणासाठीच्या दौऱ्यात संभाजीराजे मुंबईत फडणवीसांनाही भेटले. त्यामुळे फडणवीस ही निर्माण झालेली दरी बुजवतात की संभाजीराजे आरक्षण प्रश्नानिमित्ताने वेगळ्या राजकीय वाटेवर चालले आहेत हे पाहणे महत्वाचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments