Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाना पटोले: या 4 कारणांमुळे झाली पटोलेंची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (17:55 IST)
नामदेव अंजना
बीबीसी मराठी प्रतिनिधी
 
साकोलीचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
 
महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती पाहिल्यास काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे देण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. नाना पटोले हे कुणबी (ओबीसी) समाजातून येतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते आक्रमकही दिसतात.
 
एवढेच नव्हे, तर आणखीही कारणांनी नाना पटोलेंच्या निवडीला महत्त्व आहे. आपण त्यातील निवडक चार कारणांचा आढावा या वृत्तातून घेऊया.
 
प्रफुल्ल पटेल यांना लोकसभेत पराभूत करून 'जायंट किलर' ठरलेले नाना, मोदी हे शेतकरीविरोधी असल्याची टीका करत ऐन सत्तेतल्या भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये परतणारे नाना, नितीन गडकरी यांना त्यांच्याच होमग्राऊंडवर घाम फोडणारे नाना... अशा विविध अंगांनी नाना पटोले यांची महाराष्ट्राला ओळख आहे.
 
1. आक्रमक नेता
नाना पटोले हे आता 57-58 वर्षांचे आहेत. राजकारणात ज्या वयात महत्त्वाची पदं मिळतात, ते पाहता ते काही फार वयस्कर आहेत, असं म्हणण्याचं धाडस करता येणार नाहीत. त्यामुळे राजकीय वयाच्या तुलनेनं त्यांना तरुणच म्हणता येईल. त्यांच्या या 'राजकीय तरुणपणा'ला आक्रमकतेची जोड आहे.
 
नाना पटोले यांच्यातील 'आक्रमक राजकीय नेता' अनेकदा पाहावयास मिळाला आहे. त्यातील काही उदाहरणं इथं नमूद करता येतील.
 
2014 पूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियातून लोकसभा लढवली. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून ते 'जायंट किलर' ठरले. मात्र, पुढे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नसल्याचं म्हणत भाजपलाही त्यांनी राम राम ठोकला. विशेष म्हणजे, देशभरात भाजपच्या प्रभावाची लाट असताना, भाजपचा राजीनामा देणारे ते पहिला खासदार ठरले होते.
 
नाना पटोले हे भाजपमधून स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतल्यानंतर महाराष्ट्र भाजपलाही शेतकरी प्रश्नांवरून धारेवर धरलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश' यात्रा काढली, तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी नाना पटोले यांनी 'महापर्दाफाश' अशी यात्रा काढली होती.
 
तेव्हा नाना पटोले यांनी केलेली एक टीका खूपच चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेदरम्यान नाना पटोले म्हणाले होते, "भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासनं देण्यात येतात. त्याची पूर्तता होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत. स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत."
 
नानांमधील आक्रमक चेहरा वेळोवेळी समोर आला आहे. या आक्रमक चेहऱ्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. याआधीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं व्यक्तिमत्त्व हे फार मवाळ होतं, त्या तुलनेत तर नानांचं व्यक्तिमत्त्व अधिक आक्रमक असल्याचं काँग्रेसजनही मान्य करतात.
 
2. ओबीसी चेहरा
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा जरी सुप्रीम कोर्टात असला, तरी महाराष्ट्राच्या राजकारणातून तो बाजूला सारला गेला नाहीय. वेळोवेळी भाजपकडून सत्ताधारी पक्षाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरलं जातं. आता या मुद्द्याचा नाना पटोले यांच्या निवडीशी काय संबंध असा सहाजिक प्रश्न सगळ्यांना पडू शकतो, पण संबंध आहे. कसं ते आपण पाहूया.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे विविध समाजांचा विविध पक्षांकडे झुकण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. किमान 'नेरेटिव्ह'च्या पातळीवर तरी. राष्ट्रवादीची आधीच प्रतिमा ही 'मराठावादी' आहे. भाजपची वाढच मुळात ओबीसी समाजाच्या पाठबळावर अधिक झालीय. आजच्या स्थितीला भाजप जेवढं मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरेल, तितका ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावेल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. मग या ओबीसी समाजाला राज्यव्यापी पक्षाचा आधार कोणता, तर तो अपरिहार्यपणे काँग्रेस दिसतो
 
इथं शिवसेना, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे मतदार बांधलेले दिसून येतात, असंही राजकीय विश्लेषकांना वाटतं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे बिथरलेल्या ओबीसी समाजाला काँग्रेस हा पर्याय वाटणं सहाजिक आहे. त्यात प्रदेशाध्यक्षही ओबीसी समाजातील असल्यास हा मार्ग अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे, जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावेळी नाना पटोले यांनी ओबीसी समाजात आपली प्रतिमा 'आपला नेता' म्हणून तयार केलीय. विधानसभा सभागृहात अजित पवार यांच्यासारख्यांना दाबून जातनिहाय जनगणा करावी, असा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यासाठी मंजूर करून घेतला. यावेळी त्यांना छगन भुजबळांनी साथ दिली खरी. पण नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरून ही कमाल करून दाखवली, अशी भावना ओबीसी समाजात पसरली आहे. आता जातनिहाय जनगणनेसाठी ज्यावेळी ओबीसी समाजाचे मेळावे होतात, तेव्हा नाना पटोले यांचे आवर्जून आभार मानले जातात. यावरूनच या गोष्टीचं वजन लक्षात येईल.
 
3. शेतीप्रश्नांची जाण
नाना पटोले हे 2014 च्या निवडणुकीआधी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. भाजपमधून त्यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभा लढवली आणि राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केलं. मात्र, नंतर काही महिन्यातच ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. भाजप सोडताना त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आणि या टीकेचं केंद्र होतं शेतकऱ्यांचे प्रश्न.
 
भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले.
 
"शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता, अशी नाना पटोलेंची ओळख आहे," असं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं होतं.
 
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना पटोले यांचं नाव जाहीर झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, "नाना पटोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न रेटून धरणारे नेते आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या रुपानं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते धोरणात्मक निर्णय घेतील."
 
एवढंच नव्हे, तर नाना पटोले हे शेतीप्रश्नी केवळ महाराष्ट्रातच परिचयाचे नाहीत, तर देशव्यापी संघटनेचा त्यांना अनुभव आहेत. काँग्रेसच्या कृषिविषयक संघटनेचे म्हणजेच ऑल इंडिया किसान काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पंजाब-हरियाणापासून सर्वत्र भारतातील शेतकरी नेत्यांसोबत त्यांची उठबस असते. या गोष्टीचा कृषिप्रधान आणि ग्रामीण महाराष्ट्राची नस ओळखण्यासाठी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
 
4. विदर्भाला प्रतिनिधित्त्व
काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची जेव्हापासून चर्चा सुरू झाली, तेव्हापासून विदर्भातील नेत्यांचीच नावं पुढे आली. म्हणजे आधी विजय वडेट्टीवार आणि नंतर नाना पटोले. विदर्भातील नेत्यांची नावं पुढे येण्याला कारणं विधानसभा निवडणुकीच्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आहेत.
 
विधानसभेला काँग्रेसला सर्वाधिक यश विदर्भात मिळालं. एकेकाळी विदर्भा हा काँग्रेसचा गड मानला जात असे. विदर्भात वर्षानुवर्षे काँग्रेसनं वर्चस्व राखलं होतं. मात्र, 2014 मध्ये ही पकड सैल झाली. 2019 मध्ये मात्र पुन्हा आशादायी चित्र निर्माण झालं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसनं विदर्भात महत्त्वाची मंत्रिपदंही दिली. विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री, तर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं.
 
विदर्भाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी काँग्रेसनं केलेला प्रयत्न म्हणूनही नाना पटोले यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. विदर्भात ओबीसी मतांची टक्केवारीही परिणामकारक मानली जाते. अशावेळी नाना पटोले यांच्यासारखा विदर्भातील ओबीसी नेता असा दुहेरी फायदा असणारा प्रदेशाध्यक्ष देणं हे काँग्रेसला जास्त सोयीचं आणि फायद्याचं ठरेल, असं म्हटलं जातं.
 
अर्थात, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे एकास एक दिग्गज नेते आणि मोठमोठी मंत्रिपदं भूषवलेले नेते असल्यानं नाना पटोले हे त्यांना कसं सोबत घेऊन जातात आणि बेरजेचं राजकारण करतात, हे आगामी काळात कळेलच.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments