Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Omicron: इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळले

Webdunia
रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (15:51 IST)
इंग्लंडमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची लागण झालेले दोन रूग्ण आढळले आहेत, इंग्लंडच्या आरोग्य सचिवांनी याबाबत माहिती दिली.
साजि जावेद यांच्या माहितीनुसार, इंग्लंडमधील आरोग्य सुरक्षा यंत्रणेला केम्सफोर्ड आणि नॉटिंगहँम इथं नव्या व्हेरियंटचे दोन रूग्ण सापडले.
हे दोन्ही रूग्ण स्वत:ला अलगीकरण कक्षात असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या सुरू आहेत. शिवाय, संपर्कात आलेल्या आणखी काही जणांना शोधण्याचा (ट्रेस) प्रयत्न केला जातोय.
याआधी कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्ये आढळला. तसंच, जर्मनीतही या व्हेरिएंटचा रूग्ण आढळल्याची भीती व्यक्त केली जातेय.
 
आफ्रिकेत आढळलेला नवा व्हेरिएंट जर्मनीत पोहोचल्याची शंका
दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर 2021 रोजी ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला. दोनच दिवसात या नव्या व्हेरिएंटचा रूग्ण जर्मनीत आढळल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
शनिवारी (27 नोव्हेंबर) जर्मनीतही नव्या व्हेरिएंटचा रूग्ण आढळल्याची शंका व्यक्त केली जातेय.
जर्मनच्या स्टेट ऑफ हेस्सेच्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्यांमध्ये ओम्रिकॉनचा रुग्ण आढळल्याची शंका आहे.
कोरोनाचा नवा प्रकार 'चिंताजनक', आफ्रिकेच्या प्रवासावर निर्बंध
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाचा नवा विषाणू हा चिंताजनक (variant of concern) असल्याचं जाहीर केलं असून त्याला ओमायक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे.
या नव्या विषाणूमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेलं आढळलं आहे. समोर आलेल्या प्राथमिक पुराव्यांचा विचार करता या विषाणूच्या पुनर्संसर्गाचा धोका वाढला असल्याचं WHO नं म्हटलं आहे.
अशा प्रकारचा विषाणू सर्वप्रथम 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत आढळल्याची माहिती WHO ला देण्यात आली. त्यानंतर बोट्स्वाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्येही या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत.
यानंतर अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेला प्रवास करण्यावर किंवा दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आफ्रिकेतल्या देशांसाठी प्रवास निर्बंध
दक्षिण आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, बोट्स्वाना, लेसोथो आणि इस्वातिनी या ठिकाणाहून प्रवाशांना युकेमध्ये प्रवेश करता येणार नाही. जर प्रवासी युके किंवा आयर्लंडचे नागरिक असतील किंवा युकेचे रहिवासी असतील तरच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही दक्षिण आफ्रिका, बोत्सावाना, झिम्बाब्वे, नामिबिया, लेसोथो. इस्वातिनी. माझाम्बिक आणि मालावीच्या विमानांवर बंदी घालणार असल्याचं सांगितलं आहे. युरोपीय महासंघाचे (EU) सदस्य असलेल्या देशांनी यापूर्वीच अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाईल.
काळानुसार विषाणूमध्ये म्युटेशन किंवा बदल होणं यात काही नवीन किंवा असामान्य नाही. मात्र, जेव्हा अशा प्रकारच्या म्युटेशनमुळं संसर्गाचं प्रमाण, त्याची घातकता आणि लसीच्या क्षमतेवर परिणाम होत असेल, तेव्हा तो व्हेरिएंट काळजीचं कारण ठरत असतो.
आफ्रिकेच्या दक्षिण भागातून आलेल्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल आणि या काळात त्यांना 4 वेळा टेस्ट करावी लागेल असं जपानने जाहीर केलंय.
तर दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना आणि हाँगकाँगहून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी आणि चाचण्या कराव्यात असं भारताने जाहीर केल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलंय. गुजरात राज्य सरकारने युरोप, युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, बोट्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि हाँगकाँगहून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे.
आफ्रिकेच्या दक्षिण भागातल्या 6 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर इराणने बंदी घातली आहे. यात दक्षिण आप्रिकेचाही समावेश आहेत. या भागातून येणाऱ्या इराणी नागरिकांची दोनदा चाचणी करण्यात येईल. आणि या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना देशात प्रवेश दिला जाईल.
 
'वाईट बातमी - पण जगाचा शेवट नव्हे'
सुरुवातीला B.1.1.529 असं नाव देण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत दक्षिण आफ्रिकेतील सर्व प्रांतात वाढ होत असल्याचं WHO नं शुक्रवारी सांगितलं.
"या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. त्यापैकी काही काळजी करण्यासारखे आहे," असं संयुक्त राष्ट्रांच्या सार्वजनिक आरोग्य मंडळानं जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
"सर्वात प्रथम माहिती मिळालेला नव्या B.1.1.529 व्हेरिएंटचा विषाणू हा 9 नोव्हेंबरला गोळा करण्यात आलेल्या रुग्णाच्या नमुन्यात आढळला होता," असं त्यात म्हटलं आहे.
या नव्या व्हेरिएंटचं संक्रमण नेमकं कशा प्रकारे होत आहे, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. त्यामुळं याचा नेमका कसा परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी काही आठवड्यांचा काळ लागू शकतो, असं WHO नं म्हटलं आहे.
कोरोनाच्या या नव्या विषाणूचा प्रभाव पाहता लसीकरण करण्यात आलेल्या लसींचा प्रभाव अत्यंत कमी राहणार असल्याचा इशारा युकेमधील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.
तर,''ही वाईट बातमी असली तरी, हा काही जगाचा शेवट नाही,'' असं ऑक्सफर्ड विद्यापीठातील जीवशास्त्राचे अभ्यासक असलेले प्राध्यापक जेम्स नेस्मिथ म्हणाले.
यातील म्युटेशनवरून त्याचा वेगानं संसर्ग होईल असं लक्षात येत आहे. मात्र, ज्या पद्धतीनं अॅमिनो अॅसिडमुळं ते होतं त्याप्रमाणं किंवा तेवढी सहज ही संसर्गक्षमता नाही. तर हे सर्व म्युटेशन एकत्रितपणे कसे काम करणार, त्यावर ते अवलंबून असेल.
जर हा नवा विषाणू एवढ्या वेगाने पसरत असेल तर तो युकेमध्ये नक्कीच पोहोचेल, असंही प्राध्यापक नेस्मिथ म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या या नव्या विषाणूनं धोक्याचे संकेत दिलेले असले तरी, लसीकरणामुळं अजूनही गंभीर आजारापासून संरक्षण मिळण्याची शक्यता असल्याचं मत, अमेरिकेच्या संसर्गजन्य आजारांचे प्रमुखं डॉक्टर अँथनी फॉसी यांनी व्यक्त केलं.
"जोपर्यंत याबाबत परिपूर्ण अभ्यास होत नाही, तोपर्यंत कोरोना विषाणूच्या धोक्यांपासून बचाव करणाऱ्या अँटिबॉडी यावर प्रभावी ठरतात की अँटिबॉडीचा विषाणूवर प्रभावच होत नाही, हे सांगता येणार नाही," असं डॉ. फॉसी यांनी सीएनएनशी बोलताना म्हटलं.
दरम्यान, WHO नं घाई-घाईत प्रवासावर निर्बंध लादणाऱ्या देशांना इशारा दिला आहे. धोक्याची पातळी आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विचार या देशांनी करायला हवा असं WHO नं म्हटलं आहे.
तरीही, युके, अमेरिका, युरोपियन महासंघ आणि स्वित्झरलंडनं काही आफ्रिकन देशांची येणारी आणि जाणारी उड्डाणं तात्पुरती स्थगित केली आहेत.
"आपण सर्वांनी आता युरोपमध्ये एकजुटीनं, काळजीपूर्वक वर्तन करणं गरजेचं आहे," असं मत युरोपियन कमिशनचे प्रमुख उर्सुला वॉन डर लेयेन यांनी व्यक्त केलं.
 
दक्षिण आफ्रिकेची नाराजी
दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री जो फाला यांनी पत्रकारांनी बोलताना विमानांवर घातलेली बंदी चुकीची असल्याचं मत व्यक्त केलं.
"काही देशांनी प्रवासावर बंदी आणि इतर उपाययोजना करत दिलेली प्रतिक्रिया ही पूर्णपणे WHO नं ठरवून दिलेल्या मानकांच्या विरोधी आहे," असं ते म्हणाले.
 
दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षा अँजेलिक कोत्झी यांनीदेखील फाला यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. प्रवासावर निर्बंध लादण्याचा काही देशांचा निर्णय घाईत घेतला असल्याचं त्या म्हणाल्या.
"सध्या तरी हे चहाच्या कपातील वादळ आहे," असं त्या म्हणाल्या.
जगभरातील शेअर मार्केटमध्येही शुक्रवारी घसरण पाहायला मिळाला. आर्थिक परिणामाच्या शक्यतेचा विचार करता यातून गुंतवणूकदारांमध्ये असलेली भीती समोर आली.
भारतात सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये 26 नोव्हेंबरला प्रत्येकी सुमारे 3 टक्क्यांची घसरण झाली. सेंसेक्स 1687 पॉइंट्स घसरला. तर निफ्टीमध्ये 509 अंकांची घसरण झाली.
अमेरिकेतील प्रमुख FTSE 100 निर्देशांक 3.7% टक्के घसरणीसह बंद झाला. तर जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतील प्रुमख निर्देशांकांनाही फटका बसला.
 
प्रामुख्यानं हवाई आणि प्रवास किंवा पर्यटन क्षेत्राच्या कंपन्यांना या मोठा फटका बसला. ब्रिटिश एअरवेजची मालकी असलेल्या IAG आणि विझ एअरची 15% घसरण पाहायला मिळाली. तर Tui चे शेअर 10% ने घसरले.
 
विश्लेषण - जेम्स गॅलाघर, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
चिंतेचं कारण ठरत असलेला विषाणूचा हा नवा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिडच्या धोकादायक विषाणूंच्या यादीत आघाडीवर आहे.
या निर्णयामुळं नव्या विषाणूच्या संभाव्य क्षमतेबाबत शास्त्रज्ञांची चिंता अधिक ठामपणे पुढं येत असली तरी, त्यामुळं प्रत्यक्ष स्थिती किंवा तथ्य बदलत नाहीत.
या नव्या व्हेरिएंटमध्ये अनेक प्रकारचे बदल झालेले असल्यामुळं त्याचा वेगानं संसर्ग होण्याची क्षमता वाढली आहे. त्याचबरोबर सर्व नाही मात्र काही लसींमुळं मिळणारं संरक्षण यावर फारसं प्रभावी ठरणार नाही, हेही खरं आहे.
पण, तरीही अद्याप याबाबत आपल्याकडे अधिक प्रमाणात आणि अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध नाही.
याचा वेगानं संसर्ग पसरणारच आहे, किंवा लशी आणि औषधांचा त्यावर कमी प्रभाव असेल आणि त्यामुळं गंभीर आजारी पडू शकते, याचीही अद्याप खात्री नाही.
WHO नं या नव्या व्हेरिएंटला नावही दिलं आहे. त्यामुळं त्याबाबत तर्क वितर्क लावण्याचे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे. कारण या प्रकाराला सुरुवातीला "Nu Variant" असं काहीजण म्हणत होते.
ग्रीक अक्षर असलेल्या Nu च्या उच्चाराबाबतही अनेक प्रकारचे वाद होते. (तांत्रिकदृष्ट्या ते "Nee"आहे).
मात्र, आता आपण आगामी काही आठवड्यांमध्ये ओमिक्रॉन बद्दलच अधिक चर्चा करू, अशी खात्री आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख