Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई आणि नवजात बाळाला जोडणारी गर्भनाळ कधी कापावी?

placenta
Webdunia
सोमवार, 2 डिसेंबर 2019 (15:44 IST)
भूमिका राय
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याच वर्षी नोव्हेंबरमध्ये एक सूचनापत्रक प्रसिद्ध केलं आहे.
 
मंत्रालयाचे विशेष सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक मनोज झालानी यांनी हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये गर्भनाळ बांधणं आणि कापण्यासंबंधी (क्लिपिंग) माहिती देण्यात आली आहे.
 
या सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या आहेत. प्लॅसेंटा स्वतःहून बाहेर येणं, त्यानंतर क्लिपिंग आणि त्याचे फायदे यासंबंधीच्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.
 
जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?
जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर गर्भनाळ आणि क्लिपिंगसंबंधी अशा काहीही सूचना नाहीत. मात्र, बाळाला जन्म दिल्यानंतर कमीत कमी एका मिनिटानंतर नाळ कापावी, असं जागतिक आरोग्य संघटनेचंही म्हणणं आहे.
 
जन्माच्या वेळी नवजात बाळ आईशी नाळेद्वारे जोडलेलं असतं. ही नाळ आईच्या प्लॅसेंटाला जोडलेली असते. नाळेचं एक टोक गर्भपिशवीला (प्लॅसेंटा) तर दुसरं टोक बाळाच्या बेंबीला जोडलेलं असतं.
 
सर्वसाधारणपणे बाळाला प्लॅसेंटापासून वेगळं करण्यासाठी गर्भनाळेला बांधून ती कापतात. जागतिक आरोग्य संघटनेनेनुसार कॉर्ड क्लॅपिंगसाठी साधारणपणे 60 सेकंदांचा वेळ घेतला जातो. याला 'अर्ली कॉर्ड क्लॅपिंग' म्हणतात. मात्र, बरेचदा यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळही लागतो. त्याला 'डिलेड कॉर्ड क्लॅपिंग' असं म्हणतात.
 
नाळ उशीरा कापल्यास नवजात बाळ आणि प्लॅसेंटा यांच्यात रक्तप्रवाह कायम असतो. यामुळे बाळातील लोहाचं प्रमाण वाढतं. याचा प्रभाव बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत राहतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ज्या बाळांना जन्मानंतर चांगलं पोषणं मिळणं कठीण असतं, अशा बाळांसाठी हे जास्त उपयोगी आहे.
 
गर्भनाळ एक मिनिटाआधी न कापल्यास नवजात बाळ आणि बाळांतीण दोघांची प्रकृती उत्तम राहते, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
 
2012 साली जागतिक आरोग्य संघटनेने बाळाच्या जन्माविषयी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार बाळाला जन्मानंतर तात्काळ व्हेंटिलेशनची गरज नसेल तर गर्भनाळ एक मिनिटाआधी कापू नये.
 
मात्र, बाळाला जन्मानंतर तात्काळ व्हेंटिलेशनची गरज पडल्यास गर्भनाळ ताबडतोब कापावी.
 
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाचे राष्ट्रीय सल्लागार प्राध्यापक डॉ. अरूण कुमार सिंह यांनी कॉर्ड क्लॅपिंगविषयी संशोधन केलं आहे. त्यांच्या मते 'डिलेड क्लॅपिंग' फायदेशीर आहे. मात्र, प्लॅसेंटाचा सेल्फ डिस्चार्च म्हणजेच प्लॅसेंटा स्वतःहून नैसर्गिकरित्या बाहेर येण्याचंही महत्त्व ते सांगतात.
'डिलेड क्लॅपिंग' का आहे फायदेशीर?
त्यांच्या मते प्राचीन इजिप्तमध्ये अशी अनेक उदाहरणं आढळली आहेत ज्यात प्लॅसेंटा नैसर्गिकरित्या बाहेर आल्यानंतर गर्भनाळ कापली गेले. मात्र, ही पद्धत कधी आणि कशी बदलली, याचे पुरावे सापडत नाहीत.
 
त्यांच्या मते गेल्या काही दशकात 'अर्ली कॉर्ड क्लॅपिंग' म्हणजे लवकर नाळ कापण्याची पद्धत फार प्रचलित झाली आणि तीच आता प्रचलित बनली आहे.
 
मात्र, फोर्टिस हॉस्पिटलच्या असोसिएट डायरेक्टर मधू गोयल यांना हे मान्य नाही. त्यांच्या मते प्रत्येकवेळी 'अर्ली कॉर्ड क्लॅपिंग'च केलं जातं, असं नाही. सामान्यपणे डॉक्टर 'डिलेड कॉर्ड क्लॅपिंग'च करतात. मात्र, गर्भवती महिलेची परिस्थिती बरी नसेल किंवा नवजात बाळाला आरोग्यविषयक काही समस्या उद्भवली तर 'अर्ली कॉर्ड क्लॅपिंग' करतात.
 
डॉ. मधू सांगतात, "प्रेग्नंसीची प्रत्येक केस एकसारखी नसते. प्रत्येक केसचे स्वतःचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात आणि बरेचदा बाळंतपणादरम्यान परिस्थिती बदलते. अशावेळी एका निश्चित अशा नियमानुसार काम करता येत नाही."
 
मात्र, डिलेड क्लॅपिंग बाळासाठी आरोग्यदायी असल्याचं त्याही मान्य करतात. कारण यामुळे बाळात रक्ताची कमतरता राहत नाही आणि त्यामुळे बाळ अशक्त राहण्याचा धोका कमी होतो.
 
सरकारच्या सूचनांविषयी आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा याविषयी ऐकल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र, ही बाळंतपणाची प्रचलित पद्धत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
डॉ. अरुण कुमार सिंह 'अमेरिकन जर्नल ऑफ पेरेंटोनोलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाचा दाखल देत सांगतात, "गर्भात राहणारं बाळ बाहेरच्या जगात येणं, एक कठीण प्रक्रिया आहे. अशावेळी प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं."
 
ते सांगतात, की आजकाल जास्तीत जास्त बाळंतपण हे सी-सेक्शनने (जवळपास 70%) होतात. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं असतं. विशेषतः मानसिक आरोग्य. कारण सुरुवातीच्या 1000 दिवसात (गर्भधारणेचे 9 महिने आणि त्यानंतरची जवळपास 2 वर्ष) बाळाचा मेंदू जवळपास 90% विकसित होतो.
 
त्यामुळे ज्यावेळी बाळ गर्भात असतं तेव्हा आणि ते बाहेर आल्यानंतर त्या गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मानसिक आरोग्यवर विपरित परिणाम होऊ नये.
 
डॉ. अरुण कुमार सिंह यांच्या मते, "हल्ली बाळंतपणाविषयी एक विचित्र घाई जाणवते. यात होणाऱ्या आईला आधीच ऑक्सिटोसीन हॉर्मोनचं इंजेक्शन देतात. खरंतर हे सगळं अगदी नैसर्गिक पद्धतीने व्हायला हवं."
 
ऑक्सिटोसीन एक नैसर्गिक हॉर्मोन आहे. ते बाळाच्या जन्मावेळी मदत करतं. मात्र, आईला अनुकूल परिस्थिती मिळाल्यावरच शरीरात नैसर्गिकरित्या हे हॉर्मोन स्त्रवतं.
 
डॉ. सिंह यांच्या मते बाळाच्या जन्माच्या पाच मिनिटानंतर प्लॅसेंटा स्वतःहून बाहेर येतो. या प्लॅसेंटामधूनच बाळ पोषकतत्त्वांसोबत ऑक्सिजनही घेत असतो. मात्र, बाळ गर्भाच्या बाहेर आल्यानंतर त्याला हवेतून ऑक्सिजन घ्यायचा असतो. त्यासाठी त्याची फुफ्फुस सज्ज होण्यासाठी किमान एक मिनिटाचा वेळ घेतात.
 
डॉ. अरूण सांगतात, की एकदा का बाळाने बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेतलं की प्लॅसेंटाही आपोआप बाहेर पडतो. बाळंतपणानंतर प्लॅसेंटा बाहेर पडण्याची वाट बघायला हवी आणि त्यानंतर कॉर्ड क्लॅपिंग करावं, असं ते सांगतात.
 
बाळाचा जन्म होताच त्याची नाळ कापली तर त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात, असा डॉ. अरुण यांचा दावा आहे.
 
मात्र, प्रत्येक बाळाची बर्थ कंडीशन वेगवेगळी असल्याने प्रत्येकच बाळावर हा फॉर्म्युला लागू करता येत नाही, असंही ते सांगतात. त्यामुळे कुठल्याच प्रकारचा त्रास किंवा समस्या नसेल तरच ही पद्धत वापरली जाऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन असल्यास डॉक्टरांच्याच सल्लाने प्रक्रिया पार पाडावी, असा सल्ला ते देतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments