Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोमॅटो भारतात येण्याची गोष्ट, टोमॅटो खाल्ले तर माणूस मरतो अशी अफवाही कधी काळी पसरली होती

Webdunia
- पेदगादी राजेश
गेल्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 15-20 रुपये किलोंनी मिळणारे टोमॅटो या आठवड्यात 80 रुपये प्रतिकिलोपेक्षाही जास्त किंमतीने विकले जात आहेत.
 
भारतात प्रत्येक स्वयंपाक घरात टोमॅटो ही फळभाजी प्रचंड महत्त्वाची झाली आहे. प्रत्येक भाजीत याचा वापर करण्यात येत असतो. टोमॅटोच्या वापराशिवाय भाजी करण्याचा विचार कोणताच व्यक्ती करू शकणार नाही.
 
पण, कधी काळी टोमॅटो भारताच्या आहार संस्कृतीचा भाग नव्हते, ते विदेशातून भारतात आले आहेत, असं तुम्हाला सांगितलं तर?
 
होय. हे खरं आहे. भारताला टोमॅटोची ओळख सर्वप्रथम पोर्तुगीजांनी करून दिली. पण मग विदेशातून आलेले हे टोमॅटो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग कसे झाले? जाणून घेऊ टोमॅटोची मसालेदार कहाणी.
 
टोमॅटोला टोमॅटो का म्हणतात?
टोमॅटो ही फळभाजी सोलानासी प्रजातीच्या कुटुंबातील आहे. त्याचं शास्त्रीय नाव आहे सोलानम लिकोपर्सिकम. पण त्याला टोमॅटो या नावानेच सर्वत्र ओळखलं जातं.
 
टोमॅटोमध्ये 95 टक्के पाणी असतं. उर्वरित 5 टक्क्यांमध्ये मॅलिक अॅसिड, सायट्रिक अॅसिड, ग्लुटामेट्स, व्हिटामिन सी आणि लायकोपिन आदी पोषणतत्व असतात.
 
लायकोपिन या पोषणतत्वामुळेच टोमॅटोला त्याचा लाल रंग प्राप्त होतो.
 
टोमॅटोला त्याचं टोमॅटो हे नाव स्पॅनिश शब्द टोमॅटे यापासून मिळालेलं आहे. पण मूळ शब्द स्पॅनिशही नाही. मेक्सिको परिसरात बोलल्या जाणाऱ्या अझ्टेक भाषेतून हा शब्द स्पॅनिश भाषेत आला.
 
अझ्टेक भाषेत त्याला झोटोमॅटिल असं संबोधलं जातं. त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये काहीसा ‘पाण्याने भरलेला फुगा’ असा होऊ शकेल.
 
वनस्पती शास्त्रज्ञ रवी मेहता यांनी टोमॅटोसंदर्भात एक शोधनिबंध लिहिलं आहे. ‘हिस्टरी ऑफ टोमॅटो : पूअर मॅन्स अपल’ मध्ये ते लिहितात की झोटोमॅटिल हा शब्द सर्वप्रथम 1595 साली वापरण्यात आला होता.
 
ते लिहितात, “टोमॅटोचा जन्म कसा झाला, याचे सबळ पुरावे उपलब्ध नाहीत. पण टोमॅटोला त्याचं सध्याचं स्वरुप हे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राप्त झालेलं असण्याची शक्यता आहे. सोलानासी प्रजातीच्या फळांमध्ये काळानुसार बदल होऊन टोमॅटो आताचं आधुनिक रुप मिळालेलं असू शकतं.”
 
टोमॅटोची लागवड सर्वप्रथम कुणी केली?
दक्षिण अमेरिकेतील पेरू, बोलिव्हिया, चिली आणि इक्वाडोर या परिसरात टोमॅटोची लागवड सर्वप्रथम करण्यात आली, असं मानलं जातं.
 
“या परिसरातील अँडीज पर्वत क्षेत्रात वर उल्लेख केलेल्या अझ्टेक संस्कृती अस्तित्वाचा उगम झाला होता. तिथेच इसवी सन 700 च्या आसपास टोमॅटोची लागवड सर्वप्रथम करण्यात आलेली असू शकते,” असं रवी मेहता यांनी आपल्या शोधनिबंधात लिहिलेलं आहे.
 
पण, अँडीज पर्वत परिसरात मानवी वसाहती स्थापन होण्यास सुरूवात झाली तेव्हा म्हणजेच सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी इथे उगवणारे टोमॅटो चवीने काहीसे कडवट होते. तसंच ते आकारानेही अत्यंत लहान होते, असंही ते म्हणतात.
 
पुढे, काही पर्यटकांनी दक्षिण अमेरिकेतून हे टोमॅटो मध्य अमेरिकेला नेले. माया संस्कृतीच्या लोकांनी त्याची लागवड सुरू केली. पण असं असलं तरी टोमॅटोची लागवड करण्यास नेमका कधी प्रारंभ झाला, हे सिद्ध होणारे सबळ पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत.
 
दक्षिण अमेरिकेतून युरोपात
आहारतज्ज्ञांच्या मते, ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधात युरोपातून निघून अमेरिकेला पोहोचला, त्यानंतर म्हणजेच ईसवीसन 1490 नंतर टोमॅटो पोहोचले असू शकतात.
 
रवी लिहितात, “युरोपातील साहित्यामध्ये इटालियन वनस्पती शास्त्रज्ञ मॅटिओली यांनी 1544 साली लिहिलेल्या हर्बल नामक एका ग्रंथात टोमॅटोचा उल्लेख सर्वप्रथम आढळून येतो.
 
भूमध्य क्षेत्रात दक्षिण अमेरिकेसारखंच वातावरण असून इथे टोमॅटो अतिशय चांगल्या पद्धतीने उगवू शकतात, असं त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे.
 
सुरुवातीच्या काळात युरोपात उगवणारे टोमॅटो हे पिवळ्या रंगाचे होते. त्यामुळे त्यांना येलो अॅपल असं त्यावेळी संबोधलं जात असे.
 
विषारी असल्याच्या अफवा
रवी लिहितात, “सुरुवातीला ब्रिटनमध्ये टोमॅटो हे विषारी फळ आहे, अशी अफवा पसरलेली होती. त्यांचा वापर केवळ जेवणाचं टेबल सजवण्यासाठी केला जायचा. 1800 सालापर्यंत अमेरिकेतसुद्धा टोमॅटोबाबत विविध प्रकारचे संभ्रम पाहायला मिळतात."
 
"काही पुस्तकांमध्ये टोमॅटोचा उल्लेख हा पॉईझनस अपल म्हणून करण्यात आलेला आढळतो. टोमॅटो खालेल्या काही श्रीमंत व्यक्तींचा मृत्यू झाला, असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं.
 
पण या सगळ्या चुकीच्या बातम्या होत्या. त्या व्यक्तींच्या मृत्यूचं कारण हे शिसेमिश्रित भांड्यांच्या वापराने झाल्याचं नंतर निष्पन्न झालं. त्या भांड्यांमध्ये शिसे प्रमाणापेक्षा जास्त वापरलेलं होतं.
 
टोमॅटो हे असिडिक फळ आहे. त्यामुळे ते शिसेमिश्रित भांड्यात शिजवल्यास त्याच्याशी रासायनिक अभिक्रियेतून विषबाधा होण्याची शक्यता असते, त्यातून ते सगळे प्रकार घडले," असं रवी लिहितात.
 
टोमॅटो भारतात कसे आले?
भारतात टोमॅटो आणण्याचं श्रेय पोर्तुगीजांचं आहे. आहार इतिहासकार के.टी. अचया यांनी त्यांच्या इंडियन फुड : अ हिस्टरिकल कम्पेनियन या पुस्तकात याबाबत माहिती दिली आहे.
 
त्या लिहितात, “मका, अव्होकॅडो, काजू, कॅप्सिकम यांच्याप्रमाणेच टोमॅटो ही फळभाजीसुद्धा पोर्तुगीजांनीच भारतात आणली.
 
टोमॅटोची लागवड करण्यासाठी भारताचं तापमान अनुकूल आहे. तसंच भारतीय माती त्याची लागवड होण्यासाठी योग्य असल्याचं हेरून टोमॅटो भारतात आणण्यात आले.
 
पण भारतात नेमक्या कोणत्या ठिकाणी टोमॅटोची लागवड पहिल्यांदा झाली, याविषयी सांगणं कठीण आहे. ब्रिटिश काळात टोमॅटोचं पीक भारतात प्रचंड वाढलं, असं अचया लिहितात.
 
चिंचेला पर्याय
आहारतज्ज्ञ डॉ. पूर्णचंद्रू यांनीही बीबीसीशी बोलताना टोमॅटोच्या इतिहासाबाबत चर्चा केली.
 
ते म्हणतात, भारतात टोमॅटोचा इतिहास दोनशे वर्षांपेक्षा जुना नाही. सुरुवातीला टोमॅटो लहान आकाराचे होते. पण मोठ्या आकारांचे हायब्रिड टोमॅटो आल्यानंतर त्याचा वापर वेगाने वाढला.
 
आता अशी स्थिती आहे की भारतात कोणत्याही स्वयंपाकघरात टोमॅटोशिवाय कोणतीही भाजी बनवली जात नाही.
 
विशेषतः चिंचेला पर्याय म्हणून भारतात टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. चिंचेच्या तुलनेत टोमॅटो मुबलक प्रमाणात स्वस्त दरात उपलब्ध असल्याने तसंच प्रत्येक भाजीशी ते मिळतंजुळतं होत असल्याने हे प्रचंड लोकप्रिय झालं. गेल्या 30 वर्षांत हे चित्र जास्त दिसून येत आहे.
 
पण दुसरीकडे चिंचेच्या वेगळ्या चवीसाठी खवय्ये त्याचीही मागणी आवर्जून करतात. चवीनं खाणाऱ्यांना तेही वर्ज्य नाही, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
 
भारतात टोमॅटोचा वापर
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी प्राध्यापक आणि आहारतज्ज्ञ पुष्पेश पंत यांच्या माहितीनुसार, भारतात विशेषतः उत्तर भारतात टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याचं कारण म्हणजे पंजाबी आहार पद्धतीवर टोमॅटोचा प्रभाव जास्त आहे. तुलनेने दक्षिण भारतात टोमॅटोचा वापर जास्त होत नाही.
 
शिवाय, लाल रंगाचा आहार हा भारतीय आहार संस्कृतीत तामसिक मानला गेलेला आहे. त्यामुळे काही मंदिरांमध्ये, तसंच राजस्थान आणि काश्मीरमध्ये काही भागात ते खाल्लं जात नाही.
 
मात्र ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारतात आहार संस्कृतीत मोठा बदल झाल्याचं दिसून येतं. आज घडीला टोमॅटो सॉसचा वापर खूप वाढलेला आहे. मोमोज, पकोडे, बर्गर यांच्यासारख्या अन्नपदार्थांसोबत टोमॅटो सॉस अनिवार्य बनलं आहे. दक्षिण भारतातही डोसासोबत टोमॅटो चटणी दिली जाते.
 
उत्पादनात दुसरा क्रमांक
सध्या टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या अंदाजानुसार, 2022 या वर्षात देशातील टोमॅटोचं उत्पादन 20 लाख टनांपेक्षाही जास्त होतं. यामध्ये सर्वाधिक 14.93 टक्के टोमॅटो हे मध्य प्रदेशात पिकवले जातात.
 
टोमॅटोचे दर सतत कमी जास्त होण्यामागचं कारण हे मागणीनुसार पुरवठा नसणं हे असू शकतात.
 
केंद्रीय ग्राहक विषयक घडामोडींचे मंत्री रोहित कुमार सिंह यांनी याविषयी बोलताना PTI वृत्तसंस्थेला सांगितलं, “सध्याची टोमॅटोची भाववाढ ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे. लवकरच हे दर खाली येतील.”
 
ते पुढे म्हणाले, “देशात काही भागात जोरदार पाऊस झाल्याने वाहतूक साखळीवर त्याचा परिणाम झालेला आहे. तसंच काही ठिकाणी पावसामुळे पिकाचंही नुकसान झालेलं आहे. अशा स्थितीत पुरवठ्यावर परिणाम होताना दिसतो. पण लवकरच परिस्थिती पूर्ववर होईल.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments