Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सावकारानं 20 हजारांचं कर्ज 7 लाखांवर नेलं, 7 एकर जमीन गेली आणि मारहाणही झाली'

Webdunia
गुरूवार, 7 मार्च 2024 (13:08 IST)
सावकारी पाश हा गळ्याभोवती पडलेल्या फाशीच्या विळख्याहून भयंकर असतो असं म्हटलं जातं. सावकाराच्या जाचाने लोकांचं, त्यांच्या कुटुंबीयाचं जीवन हे असह्य झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अनेक वेळा या जाचाविरोधात कुठे दाद मागायची, काय करायचं हेच माहीत नसल्यामुळे त्या व्यक्तीसमोर अडचणीचा डोंगरच उभा राहतो. गरजेपोटी घेतलेलं कर्ज हे अक्षरशः आपल्या मरणाचं कारण बनलंय अशी जाणीव त्या व्यक्तीला होऊ लागते. त्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलतं आणि त्यानंतर काय करायला हवं हे बीबीसी मराठीने या प्रतिनिधिक उदाहरणांवरुन समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सावकारी पाश रत्नागिरीमध्ये नागरिकांच्या भोवती चांगलाच आवळला आहे. शासकीय कर्मचारी असो वा शेतमजूर, अनेकजण या सावकारी विळख्यात अडकले आणि त्यांचं आयुष्य हे खडतर बनलं. रत्नागिरी पोलिसांनी धडक कारवाई करत बेकायदेशीर सावकारीचा बिमोड करायचं ठरवलं आणि जिल्ह्यात 7 गुन्हे दाखल केले. सावकारीच्या प्रकरणांमध्ये 10 जणांवर अटकेची कारवाईही झाली. सर्वसामान्यांवरील सावकारी जाचाची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. रत्नागिरी शहरामध्ये रिक्षा चालवणारे 43 वर्षी जयवंत कळंबटे सावकारी त्रासाने कमालीचे हैराण झाले होते. रत्नागिरी शहरापासून 25 किलोमीटरवर करबुडे मूळगाव या दुर्गम भागातून ते येतात. रिक्षा व्यवसाय करून त्यांचा आणि कुटुंबीयांचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालत होता. त्यांच्या आयुष्यात एका बाळानं प्रवेश केला. बाळ जन्मतःच गतिमंद असल्यानं त्याला वारंवार उपचाराची गरज भासू लागली. यासाठीच एका खाजगी सावकाराकडून जयवंत कळंबटे यांनी 20 टक्के व्याजावर 20 हजार रुपयांचं कर्ज घेतलं. दोन महिने त्यांनी हप्ता भरला. पण नंतर आर्थिक अडचणींमुळे त्यांना पैसे भरणं शक्य होत नव्हतं. इथूनच त्यांच्या सावकारी त्रासाची सुरुवात झाली. केवळ 20 हजार रूपये घेतलेलं कर्ज हळूहळू 7 लाखांच्याही वर गेलं. त्यांनी 20 हजार रूपयांच्या कर्जाच्या बदल्यात दुप्पट पैसे तर दिलेच शिवाय सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आपली 7 एकर सामूहिक जमीनही त्याच्या नावावर गहाण ठेवली. पण इतकं करुनही त्यांच्या पाठीमागून सावकाराचा ससेमिरा काही सुटला नाही. त्यांनी आपल्या सोबत झालेले अनुभव बीबीसी मराठीला सांगितले. जयवंत कळंबटे यांचे अनुभव थरकाप उडवणारे आहेत. जयवंत कळंबटे यांना हकीकत सांगायला सुरुवात केली. "मी कर्जाचे सर्व पैसे भरले. पण माझ्या रिक्षाचं परमिट सावकाराकडेच अडकलेलं होतं. मी परमिट घ्यायला जाणार होतो. पण शेतीची कामं असल्यानं मला त्याच्याकडे जाता आलं नाही. पैसे परत घेण्यासाठी त्याने थोडा अधिकचा वेळ दिला म्हणून मी सावकाराला आणखी पैसे स्वतःहून देणार होतो. "पण काही कारणास्तव मला ते जमलं नाही. त्याच्याकडून कर्जाचे पैसे मात्र संपलेले नव्हतेच. माझी मुद्दलच पाच लाख आहे, असं तो सांगायला लागला."
 
'शिव्या, धमक्या आणि मारहाणही'
जयवंत पुढे म्हणाले, "धमक्या, शिव्या तर तो भरपूरच द्यायचा. गणपतीमध्ये एके दिवशी तर तो थेट आमच्या घरात शिरला. पाहुण्यांच्या समोरच त्याने धिंगाणा घातला. मला मारलं सुद्धा. माझ्याकडे कामाला ये, हॉटेलला रहा, असं मला तो बोलायचा. मी म्हटलं मी काही तुझ्याकडे कामाला येणार नाही. आज न उद्या तुझे पैसे देऊ. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तो आमच्याकडून जमिनीची मागणी करू लागला. "तो घडीघडी घरी यायचा. चारचौघात तमाशा करायचा. आमची गावात इज्जत जात होती. मग आमचा एक विचार झाला की, त्याला जमीन देऊ आणि त्याचे पैसे परत केल्यावर जमीन परत घेऊ. पण त्याचे पैसे वाढतच गेले. 20 हजार रूपयाचं कर्ज 7 लाखांच्या वर गेलं. "आम्ही जमीन देत नसल्यामुळे एक दिवस त्याने माझ्या भावाला गाठून मारहाण केली. त्याच्या या दहशतीमुळे 12 लाख रुपये किंमतीची आमची सामूहिक जमीन 26 जून 2023 रोजी त्याच्याकडे गहाण ठेवली. "यापूर्वीच कर्ज फिटल्याचं माहिती असून देखील मी त्याला दीड लाख रुपयांची फायनल सेटलमेंटची ऑफर दिली होती. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. मग आमचा नाईलाज झाला आणि जमीन त्याला द्यावी लागली," जयवंत सांगतात.
 
सावकारामुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं'
त्या सावकाराचा जाच सहन होण्यापलीकडे गेल्यामुळे अखेर आम्ही गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. "आता आमची केस सुरू आहे. मला विश्वास आहे की, निकाल आमच्या बाजूनेच लागेल. कारण मी त्याच्याकडून तो सांगतोय तेवढे पैसे घेतलेच नाही, माझ्या अकाऊंटमध्ये आजही झिरो बॅलन्स आहे," असं जयवंत कळंबटे उद्वेगाने आम्हाला सांगत होते. नवा फणसोपचे रेहान सारंग यांचीही जयवंत कळंबटे यांच्यासारखी परिस्थिती झाली होती. त्यांनीही एका खाजगी सावकाराकडून परदेशात जाताना 15 हजार रूपयांचं कर्ज घेतलं होतं. भारतात परतल्यावर त्यांनी कर्जाचे पैसे भरलेही. पण सावकाराने त्यांचा पासपोर्ट जप्त केला. दीड लाख रुपये देऊन पासपोर्ट घेवून जा, असं तो रेहान सारंग यांना सांगू लागला. पैशांच्या मागणीसाठी सावकार सतत त्यांच्या घरी जाऊन मारण्याची धमकी देत असे. एवढंच नाही तर शिवीगाळही करायचा. या सगळ्याला कंटाळून रेहान यांनी रत्नागिरीतून पळ काढला. 550 किलोमीटर दूर जालन्यात जाऊन त्यांनी खासगी नोकरी पत्करली. या काळात ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. एका खूनाचा तपास करत असताना अचानकपणे पोलिसांनी रेहान सारंग यांना शोधून काढलं. मग हा सगळा सावकारी जाचाचा किस्सा उघड झाला. रेहान सारंग सांगतात, "या सावकारामुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. मला परदेशातही जाता आलं नाही. माझी नोकरी गेली. माझी नॅशनॅलिटीही गेली. 2021 पर्यंत मला बाहेर जाण्याची संधी होती, पण माझा पासपोर्ट सावकाराकडे जमा असल्यामुळे माझ्या समोरचे सगळेच दरवाजे बंद झाले होते."
 
10 सावकारांना अटक
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आवाहनाला प्रतिसाद घेत रेहान सारंग यांनीही रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल केली. आता त्यांचा पासपोर्ट पोलिसांच्या मदतीने त्यांना परत मिळाला आहे. लवकरच ते नोकरीसाठी पुन्हा एकदा परदेशात जाणार आहेत. पण हा काळ खूपच वाईट होता, असं ते सांगतात. याच काळात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावकारी जाचाचे बळी ठरलेले 7 तक्रारदार पुढे आले. या प्रकरणांमध्ये रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये 5 आणि चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल झाले. रत्नागिरी जिल्ह्यामधील 10 सावकारांना अटकही झाली. सध्या अटकेत असलेल्या सावकारांची जामिनावर सुटका झाली आहे. पण त्यांच्या विरोधातली चौकशी मात्र अद्यापही सुरुच आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 68 परवानाधारक सावकार आहेत. त्यापैकी 54 तर एकट्या रत्नागिरी तालुक्यातच आहेत. ज्या 7 सावकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी केवळ दोनच सावकार नोंदणीकृत आहेत. त्यांचा सावकारी परवाना रद्द करण्याबाबतची सुनावणी सध्या सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी येथे सुरू आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 नुसार, नोंदणीकृत सावकारांना वार्षिक प्रती शेकडा 12 ते 15 % प्रमाणाचे व्याजदर आकारण्याची परवानगी असते. शिवाय सावकाराला मुद्दलापेक्षा जास्त व्याजदर घेता येत नाही. चक्रवाढ पद्धतीनेही व्याज तर लावताच येत नाही.
"परवानाधारक सावकार जर बेकायदेशीरपणे वागत असेल तर आमच्या कार्यालयामार्फत कर्जदाराला दिलासा देता येईल," अशी माहिती रत्नागिरीचे सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे यांनी दिली. "कर्जदाराची जमीन, घर, गाडी किंवा एखादी वस्तू सावकाराकडे तारण असेल तर त्याची माहिती कर्जदार आणि निबंधक कार्यालयात असणं बंधनकारक आहे. तसं होत नसेल तर संबंधित कर्जदाराने न घाबरता तक्रार द्याला हवी. अशातच एखादा परवाना न घेता सावकारी करत असेल तर त्याच्याकडील कर्ज फेडण्याची आवश्यकतासुद्धा नाही. जर तो त्रास देत असेल तर पोलीस स्टेशन, न्यायालय किंवा आमच्याकडे तक्रार करता येऊ शकते," असं डॉ. सोपान शिंदे यांनी सांगितलं. कर्जदारांना माहिती देण्यासाठी किंवा त्यांची तक्रार घेण्यासाठी डॉ. शिंदे यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक 7972317194 सार्वजनिक केला आहे.
दरम्यान अवैध सावकारी विरोधातली रत्नागिरी पोलिसांची कारवाई अद्यापही थंडावलेली नाहीये. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सावकारी जाचाविरोधात तक्रार दाखल करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. "तक्रारदार अर्ज स्वरुपात पोलीस अधीक्षक कार्यालयात आपली तक्रार दाखल करू शकतात. त्याचबरोबर sp.ratnagiri@mahapolice.gov.in ई-मेल आयडीवर देखील ते आपली तक्रार नोंदवू शकतात. नागरिकांनी न घाबरता, वेळेत तक्रार दिली तर सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्या बेकायदेशीर सावकारांविरोधात पोलिसांना कारवाई करता येईल आणि समाजामध्ये निर्भय वातातवरण निर्माण करता येईल," असं जयश्री गायकवाड नागरिकांना आवाहन करतात.

'खासगी सावकारांकडून पैसे घेताना विचार करा'
दरम्यान, जयवंत कळंबटे सावकाराकडून कर्ज घेतल्यामुळे त्यांना आलेल्या अनुभवावरुन काही गोष्टी सांगू इच्छितात. त्यांचं म्हणणं आहे की, "कर्ज घेणं काही चुकीचं नाही. प्रत्येक माणसाला अडचणी या असतात. कधी ना कधी पैशांची गरज लागते. परंतु, देणारी व्यक्ती पैसे दिल्यावर जी वसुलीची पद्धत अवलंबते ती चुकीची असते. "व्यवसाय करण्याचा सर्वांना अधिकार आहे. सावकारांकडून कागदपत्रांशिवाय अडचणीच्या वेळी पैसे मिळतात देखील. पण त्यांची वसुली घाणेरडी असते. घरात घुसणे, आई-बहिणी वरुन शिव्या देणं किंवा मारहाण करणं, हे कायद्यात बसत नाही. शेवटी सावकार चार ते पाच पट व्याज घेतात. ते समोरच्याला समजून घेत नाहीत. आपल्याकडील मसल पावरच्या जीवावर भाईगिरी करून त्यांची वसुली चालूच असते. त्यामुळे खासगी सावकारांकडून पैसे घेताना थोडा विचार करूनच घेतलेलं बरं." सावकारी कायदा हा अतिशय कडक आहे. बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्यांविरोधात तक्रार करता येते. आरोप सिद्ध झाले तर सावकाराचा परवाना रद्द होऊ शकतो. बेकायदेशीर कृत्य केल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 नुसार, सावकाराला 5 वर्षांपर्यंची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. "ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी पुढे येऊन सावकारांचे निबंधक किंवा पोलिसांकडे तक्रार करणं गरजेचं आहे. अन्यथा अन्याय करणारे, बेकायदेशीर कृत्य करणारे सावकार मोकाटच फिरतील," असं सावकारांचे निबंधक डॉ. सोपान शिंदे सांगतात.

Published By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments