Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुकाराम बीज: संत तुकारामांचा खून झाला होता की ते सदेह वैकुंठाला गेले?

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (11:44 IST)
- प्राजक्ता धुळप
"अगं पोळ्या काय करत बसली. तुकोबा निघाले वैकुंठाला. चल चल लवकर." शेजारची बाई आवलीला सांगायला येते. चुलीवरची पोळी आणि हातातलं लाटणं टाकून आवली तशीच धावत निघते. तोवर तुकोबा गरुडाच्या पाठीवरल्या अंबारीत बसले असतात. "आम्ही जातो आमुच्या गावा.. आमचा रामराम घ्यावा" असं तुकोबा गाऊ लागताच समोर जमलेले शेकडो भक्तजन 'पांडुरंग हरी'च्या तालावर नाचू लागतात.
 
आवली धावत पळत तिथवर पोहोचते, पण तोवर तुकोबांना घेऊन तो महाकाय गरुड आसमंतात झेपावतो.
 
1936 साली रिलीज झालेल्या 'संत तुकाराम' या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील हे शेवटचं दृश्य अनेकांच्या मनावर कोरलं गेलं असेल. तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठी गेले, असंच आपण आजवर ऐकत आलो आहोत.
 
पण संत तुकाराम खरंच सदेह वैकुंठाला गेले का? हा प्रश्न गेली चार शतकं महाराष्ट्रात दबक्या आवाजात विचारला जातोय. त्यावर जाहीरपणे सहसा बोललं जात नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक लाईव्हमध्ये 'संत तुकारामांचा खून झाला होता' असं वक्तव्य केलं. वारकरी संप्रदायातील काहींनी त्यांचा निषेध केला. नव्या वादाला तोंड फुटल्यामुळे त्यांनी हा व्हीडियो फेसबुकवरून काढून टाकला. पण यामुळे तुकारामांच्या मृत्यूविषयीची कुजबूज पुन्हा सुरू झाली.
 
जितेंद्र आव्हाडांनी हे विधान कोणत्या हेतूने केलं, हा इथे चर्चेचा विषय नाही. पण त्यांनी केलेलं विधान सत्य आहे की नाही, हे तपासून पाहणं आवश्यक आहे. कारण अशी शक्यता व्यक्त करणारे ते पहिले नाहीत. आजपर्यंत कुणी कीर्तनातून या प्रश्नाला वाचा फोडली, कुणी पुस्तकात दाखले दिले तर कुणी 'तुकारामांची हत्या झाली', अशी जाहीरपणे मांडणी केली.
 
संत तुकारामांच्या मृत्यूवरून अधूनमधून असं वादळ का घोंघावतं याचा आम्ही शोध घ्यायचं ठरवलं. दोन्ही बाजू समजून घ्यायचा प्रयत्न केला. संतसाहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी तुकारामांच्या वैकुंठगमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. "पुरावा नसताना याचा राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नये", असं मोरे यांना वाटतं.
 
"गेली 100 वर्षं सत्यशोधक आणि ब्राम्हणेतर चळवळीच्या अभ्यासकांनी तुकारामांच्या हत्येचा आरोप अनेकवेळा केलेला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड जे म्हणतात त्यात नवीन काही नाही," असंही ते बीबीसीशी बोलताना म्हणाले.
 
हत्येची शक्यता
जुन्या सिनेमात रंगवलेले साधे, भोळे तुकाराम वास्तवात तसेच होते का? लेखक आणि विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे लिहितात, 'तुकारामांच्या बहुतेक चरित्रकारांनी आपल्यापुढे उभी केलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तित्वाशी सुसंगत नाही.'
 
डॉ. साळुंखेंनी 'विद्रोही तुकाराम' हे चरित्र लिहिलं आहे. 'तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असहाय होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहारशून्य, भोळाभाबडा किंबहुना भोळसट संत, असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता.' अनेक चरित्रकारांनी सिंहाचे चित्रण शेळीच्या स्वरूपात केल्याचं साळुंखे सांगतात.
 
तुकारामांच्या व्यक्तिमत्त्वाची जहाल बाजू सांगताना साळुंखे लिहितात, 'तुकारामांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले, ते कोणी सामान्य लोक नव्हते. या तथाकथित पूज्य लोकांचे वर्तन ढोंगीपणाने भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तित्वावरील धार्मिकतेचा बुरखा टरकावून टाकत असत. अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहणाऱ्या घोड्या-गाढवापेक्षा हीन असल्याचे ते सांगत.'
 
या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रतिष्ठित, प्रस्थापित आणि धार्मिक अधिष्ठान घेऊन वावरणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालं होतं, असं साळुंखे यांनी लिहिलं आहे.
 
वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।
वेद आणि पंडितांबद्दल तुकोबांनी हा अभंग रचला आणि वेदांवरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान दिलं. पुढे जाऊन वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना, तसंच सर्व स्तरांतील स्त्रियांनाही आहे असं बजावलं.
 
सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।
पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।।
 
पुढे साळुंखे लिहितात की हे विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते म्हणूनच त्यांचा छळ होत होता. 'हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे तुकाराम म्हणतात, याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो. शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही, माझी मान कापली तरी मी वेगळे काही करणार नाही, अशा आशयाची विधाने तुकाराम वारंवार करतात.'
 
आ. ह. साळुंखेंनी तुकारामांच्या हत्येची शक्यता वर्तवताना मनुस्मृतीचा दाखला दिला आहे. 'तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून घालूया: 'ब्राम्हणाला नावे ठेवली असता शूद्राचा वध करावा, शूद्राने आपल्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी. कारण तो जन्माने हीन असतो....' ज्यांच्या हातात धर्मशास्त्रे होती, त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केली आहे.'
 
'विद्रोही तुकाराम' या पुस्तकात तुकारामांच्या मृत्यूबद्दलच्या प्रकरणाचा मथळाच 'धुळवडीच्या रात्री तुकारामांची धुळवड केली' असा आहे. संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबांबद्दल लिखाण केलं आहे. देहूमध्ये मंबाजी गोसावी, तुकाराम आणि त्यांच्या अनुयायांचा कसा द्वेष करत होते, याविषयी संत बहिणाबाईंनी लिहिलं आहे.
 
तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥
बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥
 
'सदेह वैकुंठाला गेले'
पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही. तुकारामांचे वंशज श्रीधरमहाराज मोरे (देहूकर) यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकारामांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे. 
 
श्रीधरमहाराज लिहितात- 'इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना 'आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला' असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले.सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।। अशी सूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले.'
 
या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहूगावच्या सनदेत आहे असं श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. 'तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.''मृत्यूचं गूढ उलगडत नाही'
 
लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी धर्म आणि भक्तिसंप्रदायावर तीन ग्रंथ लिहिले आहेत. जगभरातल्या अनेक संतांमध्ये तुकाराम हे सर्वश्रेष्ठ संत असल्याचं कसबे बीबीसीशी बोलताना म्हणतात.
 
"तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही. उपलब्ध साधनसामुग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता, हे उघड आहे. तसंच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती काम करत होत्या. जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं माझं मत आहे."
 
डॉ. कसबे यांनी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला आहे. सुदाम सावरकर हे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य. या पुस्तकात तुकारामांची हत्याच झाली असा दावा आहे. "ते हळूहळू अदृश्य झाले म्हणजे नेमकं काय झालं, कसं झालं... असे प्रश्न वाचकांच्या मनात आहेतच. लोकांनी विचार करायला हवा. सुदाम सावरकराचं म्हणणं लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून चमत्कारिक कथा रचल्या जातात."
 
"संत चळवळ शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती. व्यवस्थेविरुद्ध केलेला विद्रोह होता. नामदेवांच्या परंपरेपासून ही सगळ्या जातींचा समावेश असणारी चळवळ सुरू झाली होती. तुकारामांनी यावर कळस चढवला होता. ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे, असं म्हणणारे तुकाराम पुढे असंही म्हणतात की माझ्यासाठी देव मेला आहे. हे सगळं त्यावेळच्या ब्राम्हणी धर्माच्या विरुद्ध होतं," असं मत डॉ. कसबे व्यक्त करतात.
 
'देवे विमान पाठविले'
मराठी विश्वकोशात संत तुकारामांच्या मृत्यूची तारीख 9 मार्च 1650 दिली आहे. आणि जन्म साल 1608 आहे. म्हणजे तुकाराम अवघं 42 वर्षांचं आयुष्य जगले.
 
प्रयाण काळी देवे विमान पाठविले । कलिच्या काळामाजि अदभुत वर्तविले ।।
मानव देह घेऊन निजधामा गेले । निळा म्हणे सकल संता तोषविले ।।
 
"हे संतवचन वारकऱ्यांमध्ये कायम म्हटलं जातं," असं ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणतात. ते महाराष्ट्रातल्या वारकरी-फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते 'तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले' यावर सर्व वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या विरोधात बोलणाऱ्या वक्तव्यांचा वेळोवेळी निषेध केल्याचं ते म्हणतात.
 
"जे अशी व्यक्तव्यं करतात, त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी, अशी आमची भूमिका आहे. अशा वादाच्या किरकोळ कारणासाठी आम्ही आमची शक्ती वाया घालवायची का?" असा सवाल ते करतात. "अनेकजण प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रचलित असणाऱ्या गोष्टींच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात," असं त्यांचं म्हणणं आहे.
 
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'तुकाराम' सिनेमा 2012 साली रिलीज झाला
 
'बंडखोर', 'विज्ञाननिष्ठ' तुकाराम
'संत तुकाराम' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर ७६ वर्षांनी आलेल्या 'तुकाराम' या सिनेमात जादू आणि चमत्कार दाखवण्यात आलेले नाहीत. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर घणाणती हल्ले केले, असे प्रसंग दिग्दर्शकांनी चितारले आहेत.
 
नव्या सिनेमातल्या एका महत्त्वाच्या सीनमध्ये रामेश्वर भट आणि मंबाजी गोसावी धर्मपीठाचा आदेश घेऊन तुकारामांकडे येतात. 'आम्ही पंडित काय मेलो की काय?' असं विचारत रामेश्वर भट 'तुझ्या वक्तव्यामुळे सगळ्या परंपरांविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. यावर उत्तर देण्यासाठी फाल्गुन मध्य नवमीला धर्मपीठासमोर हजर राहा' असं तुकारामांना बजावतात.
 
आरोपपत्राला उत्तर देण्यासाठी तुकाराम धर्मपीठासमोर उभे राहतात. आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे, असं ठणकावून सांगतात. तुकारामांच्या निर्भीड आणि स्पष्टवक्तेपणावर संपूर्ण सभागृह स्तब्ध होतं.
 
सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी ।
देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे ।।
 
चंद्रकांत कुलकर्णी यांच्या या सिनेमात 'तुकाराम वैंकुठाला गेले' हा भाग नाही. याविषयी बोलताना ते सांगतात "माझ्या कलाकृतीचा उद्देश विज्ञाननिष्ठ तुकाराम लोकांपर्यंत पोहोचवणं हा होता. तुकारामांच्या मृत्यूविषयी तर्क मांडण्याचं काम जाणकार संशोधकांचं आहे, असं मला वाटतं.
 
"तुकाराम हे तुमच्या-आमच्यासारखे हाडामांसाचा माणूस होते. त्यांनी भयंकर असा दुष्काळ आणि घरातले पाच मृत्यू जवळून पाहिले. अशा अनुभवांनतर त्यांचं तत्त्वज्ञान निर्माण झालं.
 
"तुकारामांनी आपल्या आचरणातून म्हणजेच लिखाण, प्रत्यक्ष धान्यवाटप, दागिने परत करणं अशा अनेक प्रसंगांतून आपलं तत्त्वज्ञान पोहोचवलं आहे. ही विरक्तीपेक्षाही जीवनानुभूती होती. त्यामुळे तुकारामांकडे त्याच दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे," असं ते म्हणतात.
 
तुकोबांनी तत्त्वज्ञानातल्या गूढ गोष्टी लोकांसाठी सोप्या करून सांगितल्या. पण आज चार शतकांनंतरही त्यांच्या मृत्यूचं गूढ उकललं नाहीये, असं अनेकांना वाटतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments