Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपामुळे काय गमावलं, काय कमावलं?

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:00 IST)
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात ज्या महिलेनी बलात्काराची तक्रार केली होती त्या महिलेनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे.
 
बलात्काराचे आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं म्हटलं.
 
पण, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांची आमदारकी जाईल का, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर याचा काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
 
विरोधी पक्ष भाजपनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
 
आता तक्रारदार महिलेनं तक्रार मागे घेतल्यानंतर संबंधित महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपनं केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही धनंजय मुंडेंवरील आरोपाप्रकरणी आमचा चौकशी करून निर्णय घेण्याचा निष्कर्ष योग्यच होता, असं म्हटलं आहे.
 
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला.
 
धनंजय मुंडेंनी या प्रकरणामुळे नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं हा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
राजकीय प्रतिमेला तडा?
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या मते, "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे होते आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता होती. पण ज्या महिलेनं बलात्काराची तक्रार केली, त्या महिलेविरोधातच अनेकांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार केल्यामुळे या प्रकरणात विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला.
 
"असं असलं तरी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेला जो तडा गेला, तो तक्रार मागे घेतल्यामुळे पूर्णपणे भरून निघणार नाही. त्याचे व्रण कायम राहतील. या प्रकरणामुळे त्यांची जी इमेज डॅमेज झाली आहे, त्यातून रिकव्हर होण्यासाठी त्यांना अधिक जोमानं काम करावं लागेल."
"पण, धनंजय मुंडेंवर जे आरोप झाले त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर इंचभरही फरक पडणार नाही," असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय जोग व्यक्त करतात.
 
जोग सांगतात, "धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस लगेच त्यांनी एक पोस्ट लिहून यावषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले संबंध आहेत आणि त्यातून झालेल्या मुलांना पालकत्व दिल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, असंही नमूद केलं. त्यामुळे कुणी महिलांचा वापर करून राजकीय उद्दिष्ट पूर्ण करायचा प्रयत्न करत असेल तर हा धोकादायक ट्रेंड आहे. राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अशाप्रकारच्या घटनांवर चर्चा करायला हवी."
 
फडणवीसांशी मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धनंजय मुंडेंना फायदा झाला, असं मत लोकसत्ताचे बीड प्रतिनिधी वसंत मुंडे मांडतात.
 
त्यांच्या मते, "देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर फडणवीसांनी सार्वजनिक सामंजस्याची भूमिका घेतली. पोलीस तपासात काय निष्पन्न होतं, त्यावर भूमिका घेऊ, असं फडणवीस यांनी म्हटलं. केवळ आरोपांवर आधारित भूमिका त्यांनी घेतली नाही. यामुळे निश्चितच धनंजय मुंडे यांना फायदा झाला."
तर "धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले या प्रकरणी भाजपमध्ये उभी फूट दिसली. देवेंद्र फडणवीस यांनी एकदम मवाळ भूमिका घेतली. पोलीस आणि न्यायालयातील चौकशी नंतर भूमिका घेऊ, असा त्यांचा सूर होता. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी मात्र आक्रस्ताळी भूमिका घेत थेट राजीनाम्याची मागणी केली आणि ती फसली. भाजपमधील या फुटीमुळे हे प्रकरण पुढे टिकणार नाही, हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं," असं निरीक्षण संजय जोग नोंदवतात.
 
पक्षातून मजबूत पाठिंबा
धनंजय मुंडे यांना या प्रकरणात पक्षाकडून पाठिंबा मिळाल्याचं दिसून येतं, असं राजकीय विश्लेषक राही भिडे सांगतात.
 
त्या म्हणतात, "धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी लोकांमध्ये जे संभ्रम होते ते सुरुवातीपासून शरद पवार दूर करत होते. त्यांनी प्रकरणाची माहिती घेतली आणि लोकांसमोर ते मांडत राहिले. याशिवाय महिलेनं तक्रार दाखल करायच्या आधीच धनंजय मुंडेंनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्यांची केस मजबूत होती.
 
"राष्ट्रवादी काँग्रेसनं याप्रकरणी धनंजय मुंडेंवर राजीनामा घेतला असता किंवा कारवाई केली असती, तर भाजपवाले म्हटले असते की, बघा या माणसाला स्वत:च्या पक्षानेच बाहेर काढलं आहे. असं म्हणत भाजपनं त्यांची राजकीय कारकीर्द संपवली असती. त्यामुळेही राष्ट्रवादीने सुरुवातीपासून त्यांना पाठिंबा दिला."
स्थानिक पातळीवर सहानुभूती
"धनंजय मुंडे यांना या प्रकरणामुळे वैयक्तिक पातळीवर प्रचंड त्रास सहन करावा लागला. कारण त्यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. पण, यामुळे त्यांच्या राजकीय भविष्यावर फारसा परिणाम होणार नाही, हेही तितकंच स्पष्ट आहे. कारण तक्रार कुणी केली, तिचं गांभीर्य किती हे लोक बघत असतात," असं वसंत मुंडे सांगतात.
 
ते पुढे सांगतात, "नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडेंनी परळीतल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायती एकहाती निवडून आणल्यात. या निवडणुकासाठी मतदान आणि मतमोजणी दोन्ही गोष्टी मुंडेंवरच्या आरोपांनंतर झाली होती. उलट या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी एक सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं. एखादा कुणी वर्षानुवर्षं कष्ट करून वर जात असेल आणि त्याला खाली खेचण्यासाठी असे उद्योग केले जात असतील तर ते योग्य नाही, अशीच स्थानिकांमध्ये भावना होती."

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments