Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वासुदेव गायतोंडेंच्या चित्रासाठी 39.98 कोटी रुपयांची बोली का लागली?

Webdunia
सोमवार, 15 मार्च 2021 (17:29 IST)
जान्हवी मुळे
चित्रकार वासुदेव गायतोंडे जीवंतपणीच भारतीय चित्रकलेतली एक दंतकथा बनले होते. आणि त्यांच्या मृत्यूपश्चात तर त्यांनी काढलेली चित्रं दरवर्षी नवनवे विक्रम रचत आहेत.
वासुदेव गायतोंडेंचं एक चित्र 11 मार्च 2021 रोजी सॅफ्रन आर्टनं मुंबईत आयोजित केलेल्या लिलावात तब्बल 39.98 कोटी रुपये म्हणजे 55 लाख अमेरिकन डॉलर्सना विकलं गेलं.
कोणा भारतीयाने काढलेल्या चित्रासाठी लागलेली आजवरची ही सर्वाधिक बोली आहे. पण गायतोंडेंची चित्रं सध्या एवढी चर्चेत का असतात आणि ती इतकी मूल्यवान का आहेत? हा प्रश्न अनेकांना पडतो.
गायतोंडे यांचं व्यक्तीमत्व आणि त्यांनी निर्माण केलेल्या चित्रांमध्येच या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत.

चित्रांची किंमत कशी ठरते?
सॅफ्रन आर्टच्या लिलावात 39.98 कोटी रुपयांची बोली लागलेलं चित्र 50 इंच बाय 80 इंच एवढं आहे. (साधारण सव्वाचार फूट बाय साडेसहा फूट)
निळ्या रंगाच्या छंटांमधलं हे चित्र मधोमध उभ्या आणि आडव्या रेषांनी विभागलं गेलं आहे. सतत बदलत जाणाऱ्या जलाशयासारखं भासणारं हे चित्र असून पाण्यावर पडणाऱ्या उजेड आणि अंधाराचं प्रतिबिंब त्यात दिसतं.
गायतोंडे यांच्याभोवतीचं हे गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. तशीच चढाओढ याही चित्रासाठी दिसली.
मुळात चित्रकारानं कुठल्या काळात चित्र काढलं आहे, त्यासाठी कुठल्या माध्यमाचा वापर केला आहे, त्याच्या किंवा तिच्या आधीच्या चित्रांना किती किंमत मिळाली होती, अशा अनेक गोष्टींवर एखाद्या चित्राची किंमत अवलंबून असते.
कुठल्याही कलाकाराच्या चित्रांची किंमत त्याच्या मृत्यूनंतर आणखी वाढते. कारण तो चित्रकार आता जिवंत नाही आणि आणखी नवी चित्रं काढू शकणार नाही.
त्यामुळे अशा चित्रांना एक प्रकारे ऐतिहासिक मूल्य प्राप्त होतं आणि त्यांना कला संग्राहकांकडून जास्त मागणी असते.
वासुदेव गायतोंडे तर जीवंतपणीच भाराभर चित्रं काढत नव्हते. त्यामुळे काळ पुढे सरकला, तशी त्यांची चित्र दुर्मिळ होऊ लागली.
आता तर गायतोंडेंचं चित्र आपल्याकडे असणं प्रतिष्ठेचं बनलं आहे. त्यामुळेच कुठल्याही लिलावात गायतोंडेंच्या चित्रासाठी चढी बोली लागते.
2015 साली गायतोंडे यांचं आणखी एक अनाम चित्र 30 कोटी रुपयांना विकलं गेलं होतं. तर गेल्या वर्षी त्यांच्या दुसऱ्या एका चित्रासाठी 32 कोटी रुपयांची बोली लागली होती. तो विक्रम आता त्यांच्याच चित्रानं पुन्हा मोडला आहे.
काही खासगी संग्रहातील गायतोंडेंच्या चित्रांची बाजारातली किंमत तर पन्नास कोटींपर्यंत असल्याचं जाणकार सांगतात.
 
वासुदेव गायतोंडे कोण होते?
"गायतोंडे म्हणजे नेमकं काय रसायन होतं, हे थोडक्यात सांगता येणं कठीण आहे," असं चित्रकार-लेखक सतीश नाईक सांगतात. नाईक यांच्या 'चिन्ह' या कलेला वाहिलेल्या मासिकानं या विलक्षण चित्रकारावर 'गायतोंडे' हा ग्रंथच निर्माण केला आहे.
तरीही आजच्या पिढीला ओळख करून द्यायची, तर वासुदेव गायतोंडे हे अमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार होते आणि ते भारतीय कलाविश्वात एक नवी चळवळ सुरू करणाऱ्या पिढीचे चित्रकार होते.त्यांचा जन्म 1924 साली नागपूरमध्ये झाला होता आणि पुढे ते मुंबईच्या गिरगावात काही काळ वास्तव्यास होते. वयाच्या 19व्या वर्षी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतल्यावर गायतोंडे यांच्यातल्या कलाकारानं खऱ्या अर्थानं आकार घेतला.
गायतोंडे काही काळ बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप या कलाकारांच्या गटाशीही जोडले गेले होते. या ग्रुपमध्ये एमएफ हुसेन, एफ एन सुझा, एसएच रझा अशा दिग्गज कलाकारांचाही समावेश होता. या गटानं भारतात आधुनिक कलेची (मॉडर्न आर्ट) पायाभरणी केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.गायतोंडे आधी मुंबईत आणि मग पुढे बराच काळ दिल्लीत वास्तव्यास होते. परदेशातही त्यांच्या कला प्रदर्शनांची विशेष दखल घेतली गेली.
जपानचा दौरा केल्यावर गायतोंडे यांच्यावर झेन तत्वज्ञानाचा प्रभाव पडला, जो त्यानंतरच्या काळातील त्यांच्या अनेक चित्रांत उमटलेला स्पष्टपणे दिसतो. लंडन, न्यूयॉर्क अशा कलेच्या आंतरराष्ट्रीय केंद्र असलेल्या शहरांतही त्यांची प्रदर्शनं लागली. 1964 साली गायतोंडे यांना न्यूयॉर्कच्या रॉकफेलर संस्थेची फेलोशिप मिळाली होती.
1971 साली गायतोंडेंना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं होतं. 2001 साली दिल्लीत त्यांचं निधन झालं होतं. आता दोन दशकांनंतर त्यांच्या नावाभोवतीचं वलय आणखी वाढलेलं दिसतं.

गायतोंडे नावाचं गूढ
आज आपण लॉकडाऊन आणि आयसोलेशनचा अनुभव घेतला आहे. पण गायतोंडे जणू आयुष्यभर एक प्रकारच्या लॉकडाऊनमध्ये राहिले, असं म्हणावं लागेल.
आपल्या उभ्या आयुष्यात गायतोंडे एक आख्यायिका बनून राहिले. ते फारसे लोकांमध्ये मिसळत नसत.
ते बोलायचे तेव्हाही मोजकंच, पण ठामपणे बोलायचे, असं त्यांचे अनेक समकालीन सांगतात.
गायतोंडेंनी काही मोजक्याच मुलाखती दिल्या आहेत, ज्यातून गायतोंडेंच्या व्यक्तीमत्वाचा ठाव लागणं सोपं नाही.
त्यामुळेच गायतोंडे यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही फारशी माहिती सहज उपलब्ध नाही आणि त्यांच्याभोवतीचं गूढ वलय आजही कायम राहिलं आहे.
 
गायतोंडे यांची चित्रं खास का आहेत?
गायतोंडे यांची चित्र अनेकांना एवढी विलक्षण का वाटतात, हे त्या चित्रांचे फोटो पाहून लक्षात येणार नाही. कारण फोटोंमधून चित्राचा आकार, रंगाचे थर, त्यातला प्रवाहीपणा समजून घेता येत नाही.
त्यासाठी ती चित्रं प्रत्यक्ष पाहावी लागतात. अशा चित्रांचा अर्थ लावायचा नसतो, तर अनुभव घ्यायचा असतो. तो अनुभव कधी मनाला शांत करतो, कधी आत खोलवर हादरवून टाकतो, पण काही झालं तरी समृद्ध करून जातो.
2019 साली कलाप्रेमींना असा अनुभव घेता आला. त्यावेळी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात गायतोंडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन लागलं होतं.
त्यानंतर चित्रकार-गायक सुनील विनायक बोरगांवकर यांनी आपले अनुभव शब्दांत मांडले.
ते लिहितात, " गायतोंडे सरांचं चित्र बघताना, आधी 'संपूर्ण चित्र' दिसतं. 'साक्षात्कारी दर्शन' ! हे दर्शन इतकं गुंतवून टाकतं की आपण नकळत चित्राच्या जवळ, जवळ, अजून जवळ कधी गेलो, चित्रानंच हळूहळू जवळ कसं खेचून घेतलं, खिळवून ठेवलं, हे लक्षात येत नाही.
"अपरिमित शांतता. या साक्षात्कारी अनुभवानंतर भानावर आल्यावर साहजिकपणे मनात सुरु होणारी चल-बिचल. त्यांनी हे कसं केलं असेल, त्यांना हे कसं साधलं असेल, हे सगळं कसं काय जमलं असेल, असं वाटत राहतं आणि पुन्हा ते वाटणंही गळून पडतं."

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments